माझे Quarantine …..
१
२००९ मध्ये भारतात, पुण्यात स्वाइन फ्लू चा संसर्ग नुकताच फैलावू लागला होता. औषध नसलेला फ्लू, मरणाच्या दारात ओढणारा ताप असाच आजार म्हणून तो प्रसिद्ध होता. मला त्यावर्षी आलेले अनुभव इथे मांडते आहे. आजच्या घडीला हे सर्व लिहायला अगदी योग्य वेळ आहे असं मला वाटतं.
मे २०१३ मध्ये मला एका रिसर्चसाठी जर्मनीला जायची शिष्यवृत्ती मिळाली होती. मुळात ३ महिने कालावधी असलेली ही शिष्यवृत्ती मला दीड महिन्याची करून हवी होती, कारण आमची दोन्ही मुलं तेव्हा लहान होती. ८ आणि ९ वर्ष. (होय, दोघांमध्ये फार कमी अंतर आहे). जावं की नाही हा मोठा प्रश्न माझ्यासमोर होता. बराच आटापिटा केला होता या शिष्यवृत्तीसाठी. त्यात ब्रह्मे ते संपूर्ण वर्ष चीन मध्ये होते. मात्र घरी मोठं कुटुंब होतं. मला जर्मनीतून शिष्यवृत्ती मिळते आहे म्हणल्यावर सगळ्यांनी जोरदार पाठींबा दिला आणि बिनधास्त जा म्हणाले. प्रत्येक स्त्रीला हवीहवीशी असणारी आयुष्यातली “जा सिमरन जा” ची मोमेंटच म्हणायला हवी.
एवितेवी मुलांना शाळेला सुट्ट्या होत्या, सासूबाई, माझ्या जाऊबाई, अगदी आनंदाने काहीही काळजी न करता मला जा म्हणाल्या. हे फार महत्त्वाचं असतं. बाहेरगावी, परदेशी जाताना एकवेळ आपली आबाळ झालेली चालते पण आपल्यामागे मुलांची आबाळ झालेली कुठल्याही आईला त्रासदायकच असते. त्यातून मी तर अख्खे ४५ दिवस जाणार होते. तीन महिने मुलांना सोडून जाणं अशक्य होतं.. त्यात त्यांचे बाबा इथे असते तर गोष्ट वेगळी होती. मग नक्कीच गेले असते. मोठं कुटुंब असलं तरी दोन्ही मुलांना आईबाबाविना ठेवायचा तीन महिने हा काळ मला मोठा वाटत होतं. घरच्यांना तरी किती गृहीत धरायचं? बऱ्याच मेल्स केल्या, फोनाफोनी झाली आणि फाउंडेशनच्या नियमात बसत नसूनही कशीबशी माझी शिष्यवृत्ती दीड महिन्याची केली गेली. Hans Seidel Stiftung या फाउंडेशनने दिलेली ही शिष्यवृत्ती होती. आमच्या मेल व्यवहारात तिथल्या प्रमुखाने माझी विशेष कौतुक करणारी मेल मला लिहिली की शिष्यवृत्ती वाढवून घेणारे (कारण आपला सगळा खर्च जर्मन सरकार करणार असतं) त्याने आतापर्यंत अनेक पाहिले होते पण कमी करून घेणारी व्यक्ती तो पहिल्यांदाच पाहत होता.
मध्य एप्रिलमध्ये मी गिसेनला गेले, जूनच्या पहिल्या आठवड्यात परत येणार होते. जाताना दोन्ही मुलांनी मला अगदी हसत बाय केलं. कधी कधी प्रश्न पडतो, मुलं खरंच काही दाखवत नाहीत की आपणच त्यांना अंडरइस्टीमेट करत असतो? त्यांची मानसिक तयारी आम्ही सर्वांनी केलीच होती पण मुलंच ती! ऐनवेळी गोंधळ घातला तर काय? पण झालं उलट! त्यांच्यापेक्षा मलाच रडायला येत होतं. मुलं मस्त मजेत होती. तिकडून ब्रह्मेंनी बजावलं होतं, काय रडायचंय ते विमानात रड, भरपूर वेळ असेल. मी विमानात रडले तर नाहीच, उलट ठरवलं, देवानी इतकी छान संधी दिली आहे, तिचं सोनं करू. भरपूर अभ्यास करू, मजा करू. स्वातंत्र्याच्या कल्पना प्रत्येकाच्या वेगळ्या असतात. मात्र ८ आणि ९ वर्षांच्या मुलाच्या आईच्या तर त्या फारच वेगळ्या असतात. निवांत जेवायला मिळणे, सलग तासभर गाणी ऐकायला मिळणे, पिक्चर बघायला मिळणे या गोष्टी सुद्धा स्वातंत्र्यातच येतात हे अनेकांना माहीत नसेल किंवा नवीन असेल.
मी विचार केला, आत्ता थोडं स्वातंत्र्य उपभोगू, मग ४५ दिवसांनी आहेच परत आहेच अरे संसार संसार…
मला पुसटशीही कल्पना नव्हती की या दीड महिन्याच्या स्वातंत्र्यानंतर माझ्यासमोर एक अत्यंत नावडणारं पारतंत्र्य वाढून ठेवलं असणार आहे!
2
जर्मनीमध्ये माझा चांगला जम बसला. मी ज्यांच्याकडे राहत होते ते गिसेनमधले आजोबा अगदी क्यूट जर्मन कॅटेगरीतले (ही फार rare कॅटेगरी असते) होते. त्यांच्या घरी माझी छान सोय झाली होती. तिथे माझा दिनक्रम एकदम बदलला. सकाळी बसने विद्यापीठात जायचं, मग लायब्ररीत वाचन, अभ्यास करायचा, काही लेक्चर्सना बसायचं, माझ्या गाईडशी चर्चा वगैरे. मधल्या वेळात थोडं इकडेतिकडे भटकायचं, कॅफेटेरियात खायचं. मी घरून डबा वगैरे करून न्यायच्या भानगडीत कधीच पडले नाही. स्वातंत्र्य, यू नो? इथल्या युनिव्हर्सिटीत तीनचार कॅफेटेरीया होते. मी रोज एका वेगळ्या कॅफेटेरियात जायचे. नंतर मग प्रत्येक ठिकाणचा मेन्यू बघून जायला लागले. पहिला घास घेताना हमखास मुलांची आठवण येई.
बऱ्याच वर्षांनी मिळालेली मोकळीक, अनेक स्त्रियांना कधीमधी घरापासून, मुलाबाळांपासून अगदी नवऱ्यापासूनसुद्धा दूर, हवंहवंसं असलेलं ‘सिंगल लाईफ’ मला आवडत होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याबद्दल कोणतीही अपराधी भावना येत नव्हती. आणि का यावी अपराधी भावना? स्त्रियांना त्यांच्या कुटूंबाशिवाय मजा केली की अपराधी वाटावं असं वायरिंग का केलं जातं आपलं? माझ्या आनंदाचा हिशोब मी फक्त माझ्या कुटुंबाच्या आनंदात मांडायचा हा विचार मी तिथल्या तिथे सोडून दिला. माझं काम मी व्यवस्थित करत होते, माझं कुटुंबही तिकडे आनंदी होतं. अजून काय हवं होतं?
गीसेनमध्ये मी सायकलवर भरपूर फिरायचे, शनिवाररविवारी प्रवास करायचे, मित्रमैत्रिणींना भेटायचे, एकटीपुरत्या मला आवडणाऱ्या, वन डिश मील करून खायचे, एका कोपऱ्यात चहाचा कप ठेऊन माझ्या घराच्या लॉनमध्ये गाणी ऐकत लोळायचे, खूप वाचायचे. तेव्हा फारशी लिहीत नव्हते. लिखाण नंतर सुरू झालं. फार रिफ्रेशिंग होतं माझ्यासाठी हे सगळं. अनेकदा आपल्याला फार काही वेगळं नको असतं, पण रुटीनमध्ये ब्रेक हवा असतो. मला अगदी हवा असलेला ब्रेक होता हा.
तरीही घराची, मुलांची आठवण येत नाही असं होत नाही ना! युरोपातला रविवार तर अंगावर येणारा असतो, आपल्या अगदी उलट! सगळी दुकानं बंद असतात, लोक फारसे बाहेर पडत नाहीत, स्मशानशांतता असते. त्यात पाऊस असला की संपलंच म्हणायचं! यादिवशी तर घराची, मुलांची, आपल्या देशाची प्रकर्षाने आठवण यायची.
घरून मला सक्त ताकीद होती की स्काईपकॉल करायचा नाही. मुलांना माहीत होतं, आई बरोब्बर पंचेचाळीस दिवसांनी येणार आहे. त्यामुळे त्यांनी मला स्क्रीनवर बघितलं तर उगाच रडतील आणि पुढे मग त्रास देतील म्हणून फक्त फोनवर बोलायचे. वॉट्सऍप होतं मला वाटतं तेव्हा, पण फार तेजीत नव्हतं.
ब्रह्मेंशी फोन व्हायचे. एका गोष्टीचं मला अजूनही आश्चर्य आणि मजा वाटते, ती म्हणजे आम्ही त्यावेळी जेव्हाही एकमेकांना फोन करायचो तेव्हा आधी मुलांबद्दल बोलायचे. एकमेकांची चौकशी राहायची लांब. राधा आता मस्त जोरात पळते, नील आज फोनवर जरा हिरमुसलेला वाटला, काल खूप व्यवस्थित जेवला म्हणे, हेच आमचे मुख्य विषय असायचे. मग कधीतरी काळजी घे, वेळेवर जेव असं शेवटीशेवटी बोलून फोन ठेऊन द्यायचो. दोन व्यक्ती त्यांनी जन्म दिलेल्या जीवांमुळे एकमेकांशी किती घट्ट बांधल्या जाऊ शकतात हे आम्ही अनुभवत होतो. फार मजेशीर दिवस होते ते. वडील चीनमध्ये, आई जर्मनीमध्ये आणि मुलं भारतात, असं जगाच्या तीन वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये आमचं कुटूंब विभागलं गेलं होतं. पण मुलं आनंदी होती. घरचे सगळेजण त्यांची काळजी घेत होते, उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आंबेही त्यांची काळजी घेत होते. त्यात शाळा नाही. आईबाबा फारसे आठवायचे नाहीत त्यांना, किंवा आठवत असले तरी दोघेही त्याचा त्रास करून घ्यायचे नाहीत आणि इतरांनाही त्रास द्यायचे नाहीत, ही एक जमेची बाब.
जर्मनीत एक महिना होत आला होता. माझा अभ्यास, प्रेझेंटेशन सुरू होतं. तेव्हाच, साधारण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भारतातून स्वाइन फ्लू बद्दल तुरळक बातम्या कानावर येऊ लागल्या…
3
माझं जर्मनीमधलं काम संपत आलं होतं. भारतात परत यायचे दिवस जसेजसे जवळ येऊ लागले तसतशी मुलांची, घरची आठवण तीव्र होऊ लागली. तसं मला एकटीला राहायला आवडतं, स्वतःची सोबत प्रचंड आवडते, पण किती दिवस? आपलं घर, आपली माणसं हेच शेवटी विरामाचं, आपल्या विश्रामाचं ठिकाण असतं. सैन्यातले, नोकरीनिमित्त, इतर कामांसाठी घरापासून महिनोमहिने लोक दूर कसे काय राहत असतील हा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे एकीकडे मनसोक्त स्वातंत्र्य उपभोगत असले तरी घरच्या, हक्काच्या प्रेमाच्या बेड्या आता खुणावायला लागल्या होत्या. मी माझ्या रिटर्न फ्लाईटची आतुरतेने वाट पहायला लागले होते. मुलांनी फोन वर “आता तू फक्त दहा दिवसांनी येणार ना?” असं विचारून पण झालं होतं.
पुण्यात इकडे तोवर स्वाइन फ्लू ने जोर धरला होता. रोज नवनवीन बातम्या येत होत्या, मरणाऱ्यांची संख्या पेपरमध्ये येत होती. वॉट्सऍपचा दंगा तेव्हा सुरू नव्हता आणि तेच उत्तम होतं! ६०० लोकांना संसर्ग झाला होता आणि दीडशे लोक मरण पावले होते. अगदी आजसारखी कहर परिस्थिती नव्हती, पण लोक घाबरले मात्र नक्की होते. युरोपात, जर्मनीत सगळंच आलबेल होतं, त्यामुळे माझ्यापर्यंत परिस्थितीचं गांभीर्य अजून पोचलं नव्हतं.
आमच्या घरी सगळी विज्ञानप्रिय मंडळी असल्याने म्हणा, किंवा एकंदरीत जागरूकता (याला अनेक लोकं अतिचिकित्सा म्हणतात, पण आहे ते आहे) जास्त असल्याने म्हणा,
माझ्या येण्याबद्दल इथे बराच उहापोह झाला. घरात तीन छोटी मुलं, एकंदर सहा माणसं, या सगळ्यांच्या तब्येतीला अचानक धोका होऊ शकतो म्हणून मी परत आल्यावर Isolation मध्ये रहावं असं घरच्यांचं म्हणणं पडलं. माझ्यासाठी हे एकदम नवीन होतं. ब्रह्मे चीनवरून घरी कॉर्डिनेट करत होते. त्यांनीही अनुमोदन दिलं. मला खरंतर कोणताही त्रास नव्हता की ताप, सर्दी खोकला नव्हता. पण संसर्ग लगेच होत नाही, त्याचा वेळ तो घेतो. आणि कुठल्याही इन्फेक्शनशी लढण्याचा, दुसऱ्यांना संसर्ग न होऊ देण्याचा एकमेव मार्ग Quarantine period फॉलो करणे आणि स्वतःचे विलगिकरण करणे हाच असतो.
खरं सांगते, मला हे सुरुवातीला अजिबात पटलं नव्हतं. एकतर दीड महिन्यानी आपल्या घरी परत यायचं, त्याच शहरात मुलांपासून तीन किलोमीटर लांब राहायचं, त्यांना भेटायचं नाही, जवळ घ्यायचं नाही हे माझ्या मनाला काही केल्या पटेना. माझी एक दुसऱ्या घरी एकटी राहायची सोय आहे म्हणून ठीक आहे, ज्यांना अशी काही सोयच नाही, ते काय करतील? ज्यांना विलगीकरणाबद्दल माहीतच नाही, ते काय करत असतील? असं म्हणत मी घरच्यांशी बरेच वाद घातले, कटकट केली, चीनबरोबर कॉन्फरन्स कॉल केले. पण Isolation वर सगळे ठाम होते. कारण अर्थात एकच, एका माणसामुळे, घरातल्या, माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांना इन्फेक्शनचा धोका नको. स्वाइन फ्लू वर तेव्हा कोणतही उपाय नव्हता, लस नव्हती. कोणालाही मोठी रिस्क अजिबात घ्यायची नव्हती, अर्थात सगळ्यांच्या भल्यासाठी.
घरच्यांशी मी फार वाद घालू शकले नाही, माझा नाईलाज झाला आणि एयरपोर्टवरून मी थेट पुण्यातल्या आमच्या दुसऱ्या घरी जायचं ठरलं. विलीगीकरणाचा कालावधी मात्र मी बार्गेन करू शकले, फक्त तीन दिवस लांब राहीन, ताप वगैरे आला नाही तर नंतर मात्र घरी येईन अशी तंबीच दिली. घरच्यांनाही सगळं समजत होतं, नाही असं नाही, पण समोर परिस्थितीच अशी विचित्र येऊन ठाकली होती.
आत्ता विचार करते, तेव्हा मला आम्ही एक किती महत्त्वाची गोष्ट फॉलो केली हे प्रकर्षाने जाणवतं. माझ्याचबरोबर जर्मनीहून आलेली एक मैत्रीण एअरपोर्टवरून थेट तिच्या घरी गेली होती. झालं काहीच नाही, पण झालं असतं तर? हा प्रश्न मला अजूनही सतावतो. आपल्या भारतीयांचा “चलता है” दृष्टिकोन (जो माझ्यातही आहे) तो अनेक अवघड गोष्टींमधून आपल्याला सोडवतो, आपलं काम करून देतो, तोच एका गंभीर प्रसंगी आपली प्रचंड मोठी परीक्षा बघू शकतो. माझ्या एका छोट्याश्या “चलता है” मुळें इतर अनेक लोकांचे जीव मी धोक्यात घातले असते. सर्वात पहिले माझ्या घरच्यांचे. मुळात आपण भारतीय एखाद्या जीवाला किंमत असते हेच आधी मान्य करत नाही, मग तो वाचवायचा प्रश्न तर दूर राहिला. हा फार नकारात्मक सूर वाटेल,पण सत्य बऱ्याच अंशी हेच आहे.
Quarantine period मी ठरल्याप्रमाणे फॉलो केला. एकटी राहिले. खूप वाईट वाटायचं, मुलांच्या इतकं जवळ आले आहे, पण त्यांना बघू शकत नाही, जवळ घेऊ शकत नाही म्हणून. शेवटी कसेबसे दोन दिवस काढले आणि तिसऱ्या दिवशी थेट घरी येऊन दाखल झाले. आधी स्वतःची, सामानाची स्वच्छता केली, मग दोन्ही मुलांना पाच मिनिटं मिठीत घेऊन बसले तेव्हा कुठे शांत वाटलं. दीड महिन्यात केवढे मोठे झाल्यासारखे वाटत होते दोघं! तो पूर्ण दिवस दोघंही सतत माझ्या अवतीभवती करत होते. मन आनंदानी भरून गेलं होतं.
स्वाइन फ्लू ने पुढे दोन महिने अक्षरशः थैमान घातलं होतं. माझ्या Quarantine मुळे आम्हाला फक्त आणि फक्त फायदाच झाला होता. सुशिक्षित, सुविद्य, संस्कारित असणं वेगळं, पण त्याचबरोबर संयमी आणि सहकार्याची भावना अंगी असणं वेगळं. नेमका हाच संयम आत्ता आपल्याला हवा आहे. इतकं मोठं संकट आपल्या पुढ्यात ठाकलंय त्याला आपण फक्त आणि फक्त संयमानेच सामोरं गेलं पाहिजे. आपल्या सहनशक्तीची आणि संयमाची परीक्षाच आहे ही!
वर्तुळं पूर्ण व्हायची असतात, दैव आपल्यासमोर आडवेतिडवे फासे टाकत असतं, आपण ते कसे खेळतो हे ही बघत असतं. जर्मनी, स्वाइन फ्लू, Quarantine हे सगळं आत्ता आठवायचं कारण, इथे लिहावंसं वाटायचं कारण म्हणजे, यावर्षी, जानेवारी २०२० मध्ये मला जर्मनीहून आलेली एक मेल!
4
या वर्षाची सुरुवात माझ्यासाठी अतिशय चांगली झाली. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात जर्मनीमधून मला मारबुर्ग विद्यापीठात होणाऱ्या एका जर्मन भाषेच्या शिक्षकांच्या कॉन्फरन्सकरता शिष्यवृत्ती मिळाल्याचं पत्र आलं. सहजासहजी काहीच झालं नव्हतं, बरेच कष्ट केले होते मी यासाठी. माझ्या विषयाचा पेपर लिहिणे, Recommendation letter मिळवणे, तिथल्या लोकांशी मेलवरून संपर्कात असणे, आवश्यक कागदपत्रं पाठवणे. फार अपेक्षा ठेवल्या नव्हत्या कारण जर्मन लोकांचे विशिष्ट नियम असतात, त्यात ते कसलीही ढिलाई करत नाहीत. (हम्म!) पण अखेरीस शिष्यवृत्ती मिळाली. या गोष्टीचा खूप आनंद झाला. भारतातून ही शिष्यवृत्ती मिळवणारी मी एकटीच होते.
फेब्रुवारीमध्ये तयारीला सुरुवात केली. व्हिसा, इन्शुरन्स, झाला, तिकीट बुक केलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राहण्याची सोय. कॉन्फरन्स जरी मारबुर्गमध्ये होणार असली तरी नंतर मी थोडी फिरणार होते. बऱ्याच वर्षांनी परत तेच ‘सिंगल लाईफ’ एन्जॉय करणार होते. जर्मनीत असलेल्या माझ्या काही विद्यार्थ्यांना मी जेव्हा माझ्या येण्याबद्दल कळवलं, तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण मला नऊ ठिकाणांहून मेसेज आले, की मॅsssम!!, तुम्ही जर्मनीला येताय?? मग काही झालं तरी माझ्याकडे यायचंच आहे.” बर्लिन, म्युनिक, कलोन, फ्रँकफूर्टमधून एलेना (ती आता मोठी झालीये!) अश्या जर्मनीतल्या प्रत्येक कोपऱ्यातून मला आमंत्रणं आली. खूप भरून आलं. शिक्षकी पेशा स्वीकारून मला आता वीस वर्षं होतील. या कालावधीत माझे अनेक विद्यार्थी जर्मनीला गेले आहेत. काही तिथे शिकले, काही सेटल झाले, काही परत आले, काही संपर्कात राहिले, काहींशी तितकासा संपर्क राहिला नाही. मी येणार म्हणल्यावर त्यांना सगळ्यांना उत्साहाचं उधाण आलं. एका विद्यार्थिनीने तर फोन करून, माझ्या तारखा विचारून, “मॅम, आता सगळं माझ्यावर सोडा” म्हणत दुसऱ्या दिवशी चक्क माझ्या प्रवासाची सगळी itinerary मला मेल केली. मी कुठून कुठे जायचं, राहायचं कुठे, काय पहायचं, प्रवास स्वस्तात मस्त कसा करता येईल अशी सगळी माहिती पाठवली.
माझ्या सगळ्यात पहिल्या बॅचचा विद्यार्थी कमलेश, जर्मनीमध्ये एका जर्मन मुलीशी लग्न करून तिथेच सेटल झाला आहे. मी येणार असं समजल्यावर त्याने ताबडतोब त्या दोन दिवसांची सुट्टी टाकली आणि “मॅम, तुम्ही फक्त या, बाकी सर्व मी पहातो, तुम्ही कधीही न पाहिलेली जर्मनी तुम्हाला दाखवतो, तेवढं येताना किलोभर बाकरवडी आणि आंबा बर्फी आणायचं बघा!” असा मेसेज केला. शिक्षकी पेशा आपल्याला काय देतो, असा प्रश्न अनेकदा मला पडतो. तर तो हे प्रेम देतो. आपले विद्यार्थी जगाच्या कोपऱ्यात कुठेही असोत, ते आपल्याला कायम लक्षात ठेवतात, त्यांच्या मनात आपल्यासाठी एक वेगळं स्थान कायम असतं असं माझा अनुभव सांगतो.
माझी Itinerary तयार झाली. मी फ्रँकफूर्ट, मारबुर्ग, हायडेलबर्ग, ट्यूबिंगेन, स्टूटगार्ट, परत फ्रँकफूर्ट असा प्रवास करणार होते. कॉन्फरन्स होती २६,२७,२८ मार्च आणि जर्मनीला जायचं तिकीट होतं २५ चं, म्हणजे उद्याचं! करोना फ्लूच्या बातम्या फेब्रुवारीमध्ये बातम्या यायला लागल्या होत्या तरी १ मार्चपर्यंत सर्व काही ठीक होईल असं वाटत होतं. आपण जाऊ शकू हा विश्वास होता. ब्रह्मेंबद्दल मी आधी म्हणलं तसं,(ते फार सावध असतात असल्या बाबतींतमध्ये) त्यांनी माझ्या मनाची तयारी करायला सुरुवात केली, की हा प्रवास आताच्या घटकेला अजिबात योग्य नाही. पण बायकोच्या आनंदावर विरजण घालून तिच्या आयुष्यभराच्या टीकेचा धनी कोण होणार? त्यामुळे आडून आडून मी जाणं कॅन्सल करावं असं सुचवत होते, पण निर्णय माझा असणार होता.
जर्मनीतले लोक अगदी ८ मार्चपर्यंत “इथे सगळं सुरळीत सुरू आहे” असंच सांगत होते. मारबुर्ग विद्यापीठाच्या साईटवर देखील “कॉन्फरन्स होणार आहे, यायचं की नाही ते तुम्ही ठरवा” असंच येत होतं. इथे फेसबूकवर काही Indians in Germany सारखे उपयुक्त ग्रुप्स आहेत, तिथे बरेच अपडेट येत असतात. मी तिथेही रोज लक्ष ठेऊन होते. एक दोन अपवाद वगळता सगळं नीट सुरू आहे असेच अपडेट्स येत होते.
१२ मार्च नंतर मात्र सगळंच गडबडलं. इटलीत हाहाकाराची सुरुवात झाली, अक्षरशः अंदाधुंदी माजल्यासारखं झालं. मी आयुष्यात पहिल्यांदाच अशी स्थिती अनुभवली की संपूर्ण जगात, कोणालाच, कसलाच, काहीच आणि कशाचाच अंदाज नाहीये. Pandemic काय असतं, त्याचा किती प्रभाव पडतो, तो किती वेगाने पसरतो, quarantine का करावं लागतं, Isolation का महत्त्वाचं आहे हे मला माझ्या आधीच्या स्वाइन फ्लूच्या अनुभवावरून चांगलं माहित होतं. मला परत त्या गर्तेत मुळीच जायचं नव्हतं. बरं, एकदा का परदेशी गेलात, त्यांच्या भूमीवर पाय ठेवलात, की त्या देशाच्या सर्व नियमांचं पालन तुम्हाला करावंच लागतं. जर्मनीत गेले आणि काही कारणाने अडकले तर काय परिस्थिती ओढवली असती ही कल्पनाच करवत नाही. त्यात व्हिसा फक्त १३ एप्रिलपर्यंतचा मिळाला होता/आहे. तिथल्या संचारबंदीत अडकून व्हिसा संपला तर फक्त देवच वाली राहिला असता. इथे घरच्यांना काय टेन्शन आलं असतं हे अजून वेगळंच. करोनाबद्दल आपण जे काही आपण आत्तापर्यंत वाचलं आहे, त्यात तो प्रकर्षाने वृद्ध व्यक्तींना होतो आहे हेच अधोरेखित होतंय आणि माझ्या घरी सत्तरीच्या पुढच्या दोन व्यक्ती आहेत हे मला अजिबात विसरून चालणार नव्हतं. आणि सध्याचा हा प्रसंगच असा आहे की आपण फक्त वैयक्तिक नाही, तर सामाजिक जबाबदारी घ्यायला हवी आहे. मी शांतपणे तिकीट कॅन्सल करण्याचा निर्णय घेतला. Do you want to cancel your flight? च्या प्रश्नाला yes चं बटण दाबताना किती यातना झाल्या ते मलाच माहीत! पण जगभरात ज्या प्रमाणात सगळ्याच गोष्टींचं जे नुकसान होतंय, त्यापुढे माझं वैयक्तिक नुकसान काहीच नाहीये!
सध्या जर्मनीतल्या एकेकाचे अनुभव ऐकते आहे, कोण एके ठिकाणी अडकून पडलंय, कोण फक्त घरात राहतंय, तर कोणी करोनासुट्ट्यांची मजा लूटतंय!(अगदी आपल्यासारखं!) जे जर्मन्स त्यांच्या शिस्तीकरता, स्वच्छतेकरता इतके नावाजले जातात, त्यांना यावेळी मात्र प्रसंगावधानता राखता आली नाही! एक गोष्ट सत्य आहे, या अश्या संकटात आपण आपल्या देशात, आपल्या घरी आहोत ही भावना खूप सुरक्षितता देणारी आहे. मागच्या आठवड्यात माझ्या एका मैत्रिणीने ऍमस्टरडॅम दिल्ली असा प्रवास केला. दिल्लीत फ्लाईट उतरवायला नकार दिला गेला आणि फ्लाईट उलट ऍमस्टरडॅमला न्यावे लागले. कल्पना करा, घराच्या जवळ आलोय आणि परत जावं लागतंय. मुळात विमान उडूच का दिले हा प्रश्न आहेच. पण सध्याची परिस्थितीच भयंकर अंदाधुंदीची आहे. मैत्रिणीचा व्हिसा चार दिवसांपूर्वी संपलाय. ती आता अनिश्चित काळाकरता परदेशात अडकून राहिली आहे. या पार्श्वभूमीवर आपण किती सुरक्षित आहोत ही भावना सतत मनात येते, दिलासा देते.
मला परत ही शिष्यवृत्ती मिळेल की नाही माहीत नाही. त्याचं फारसं अप्रूप आता नाही. Lufthansa नी एका सेकंदात तिकीट कॅन्सल केलं पण रिफंडबद्दल अजून एक शब्द नाही, त्यांच्या सगळ्या हेल्पलाईन डेड आहेत. बुकिंग डॉट कॉम वर एक दोन हॉस्टेलसचं फ्री कॅन्सलेशन असणारं बुकिंग होतं, त्यामुळे ते लगेच करता आलं. जे होतं ते चांगल्यासाठीच हे मात्र शंभर टक्के सत्य! कारण माझ्याबाबतीत आता पूर्वानुभवामुळे असं झालंय की व्हायरस से डर नहीं लागता साहब, लेकिन quarantine होनेसे जरूर लागता है! त्यामुळे मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीत आपण आपल्या देशात आहोत, आपल्या घरी आहोत, आपल्या आप्तेष्टांबरोबर आहोत हेच जगातलं सर्वात मोठं सुख आहे हे लक्षात ठेवूया आणि या संकटाचा सामना करूयात. उद्याचा गुढी पाडवा हाच विचार करून घरी असण्याचा, सुरक्षित असण्याचा सण म्हणून साजरा करूयात!
Image by Pete Linforth from Pixabay
Latest posts by Gauri Brahme (see all)
- समीर – अनयाच्या वॉट्सऍप गोष्टी - September 26, 2022
- कच्चा लिंबू - June 20, 2022
- आई - January 21, 2022
खूपच छान अनुभव कथन…
खरंच मुल लहान असणाऱ्या आईने परदेशात अडकून राहणं.. कल्पना सुद्धा करवत नाही