पडदा

 बाहेर सोसाट्याचा वारा आणि पाऊस सुरू झाला होता . खिडक्यांच्या तावदानावर सपाटून कोसळणारा पाऊस आत येऊ नये म्हणून संजय ने खडकी बंद करायला हात घातला .
थोडंसं बाहेर डोकावला तर खिडकी खाली कुणी बसल्याचं दिसलं .
” कोण ? कोण बसलंय खाली ? “
” लावून घ्या खिडकी , मी जाईन जरा वेळाने . ”  कुणीतरी उत्तरलं .
संजय ने खिडकी लावून घेतली .
       थोड्याच वेळात काळोख झाला . बाहेर बघतांना भीती वाटावी असे थैमान चालू होते . संजय ने
बाहेर अंगणातील दिवा लावला . त्या उजेडात पावसाचा जोर स्पष्ट दिसत होता .  अगदी दाट रेषा … फटकार मारणाऱ्या .  फाटकापासून आत भिंतीपर्यंत भरपूर पाणी साठले होते  , पार घोट्या पर्यंत !
” अरे ! अजूनही कुणीतरी आपल्या खिडकी खाली बसलंय . किती तास झाले ! “
छत्री घेऊन तो बाहेर गेला .
   ओट्यावर खिडकीखाली अंग चोरून एक वृद्ध व्यक्ती बसली होती . अंगावर एक मळलेला पायजमा , आणि लालसर कुर्ता होता . रापलेला चेहरा ,  दाढी वाढलेली ,  पण नजर ? …भेदक . एखाद्या  तपस्वी सारखी . अवतार भिकाऱ्यासारखा असला , तरी देहबोली तशी नव्हती .
” कोण तुम्ही बाबाजी ? “
” पाऊस खूप आहे , जवळपास काहीच नाही आडोश्याला , म्हणून तुमच्या इथे आसरा घेतला “
भाषा स्वच्छ होती .
” इथे कुठे जवळ रहाता का ? “
 ” जवळ आणि दूर ह्या फक्त संकल्पना आहेत . काय आज अन काय काल . काय जवळ आणि काय दूर …”
 ही अशी वरची भाषा ?  संजय ला हे सगळं फार विक्षिप्त आणि वेगळं वाटलं .
” कोणाशी बोलतोय रे ? ” आईने आतून विचारले .
” काही नाही आई , डोन्ट वरी . …..
…….बाबा , बराच वेळ झालाय , मी मोठी प्लास्टिक बॅग देतो , तुम्ही जा घरी . “
” घर ? ……..
चार भिंतीतही  विवंचना
भोगायाचे ते भोग सरेना
आनंद यात्री मी जगाचा
दिशा कोणती उमजेना  ।। “
संजय ने लगेच ओळखले , ह्या ओळी ….कुठे ऐकल्या ? ….बरोब्बर !!  ‘दिशा भूल’
नाटकातील आहेत ह्या ओळी  .
” तुम्ही कोण आहात बाबाजी ? ” भिजणाऱ्या  अर्ध्या शरीराला  छत्रीत सामावत संजय ने विचारले .
” मी ? आनंद यात्री !  मी आहे औग्युस्त रोंद्या चं शिल्पं .. मी आहे मोझार्ट ची धून .. पिकासोच्या ब्रश मधून निघणारी अगम्य
अचल रेषा . ..”  बाबाजी काही बाही बोलत होते .
संजय ने मागे वळून बघितलं .
आई दारात उभी होती . निश्चल ..कान देऊन ऐकत .
” त्यांना आत घेऊन ये संजय . “
आई चा आवाज कापरा झाला का जरा ? .. किंचित शंका वाटली त्याला .
आई ने एक प्लास्टिक ची खुर्ची पुढे केली . बाबाजी  पूर्णपणे आपल्याच नादात  बसले .
” आई , आपल्या जवळच्या भागातील  कुणी  चुकलेले दिसतात .”  संजय हळूच पुटपुटला .
आई निरखून त्यांच्याकडे बघत होती , आणि अचानक म्हणाली ,
”  आतून जेवणाचं ताट घेऊन ये . ताक  आणशील पेलाभर….”
” आई , रिअली? आर यु शुअर ?” आपली साशंकता स्पष्ट करत त्याने विचारले .
” हो , आण.  भुकेले दिसतात हे.”
संजय गेला की तिने वळून बाबाजी कडे नीट बघितलं . खूप रापलेला चेहरा , डोक्यावर फारसे केस नाही , पण दाढी वाढलेली .
कमलकांत ? …..हा ..हो , तोच !  कपाळावरचा व्रण ही तसाच ! …त्यांना असं बघून तिला खूप भरून आलं होतं .
बाबाजी खुर्चीत बसून  मनात काहीतरी वाचत असल्या सारखे बसले होते .
तिने दोन तीन प्रश्न विचारले , पण त्याची नजर शून्यात . उत्तर न देता .
तिने अचानक आभाळमाया मधील नाट्य संवाद सुरू केला …
” सांगा आभाळातील चांदण्यांनो , सांगा तुमची व्यथा … तुम्ही तर स्वयंमप्रकाशी  आहात न ? …”
त्यांची चुळबूळ सुरू झाली …काहीतरी अस्वस्थ करत असल्या सारखी .
तिने  आवाज उंचावून संवादाची धार वाढवली .
” सांगा साऱ्या आसमंताला ओरडून !..”
ह्या  वाक्या  नंतर त्यांची नजर बदलली . आत काहीतरी हललं होतं .
तिचा आवाज टिपेला पोहोचला , तसे ते आवेशात उभा राहिले …..
आणि संपूर्ण  स्वगत अस्खलित अभिनयासहित पूर्ण केलं ,
 आणि थकून पुन्हा खाली बसले .
तिची खात्री पटली . भरल्या डोळ्यांनी तिने  हाक मारली ,
“कमलकांत!!”
त्यांच्या नजरेत मात्र कुठलीच ओळखीची खूण नव्हती .
पाठीमागे  अचंबित होऊन संजय येऊन उभा होता .
” डोन्ट टेल मी आई , हे  ‘ते ‘  कमलकांत आहेत ? दिशाभूल , आभाळमाया , संन्यस्थ वाले ?”
तिने नुसती होकारार्थी मान हलवली .
” तू तर ह्यांची मेकअप आर्टिस्ट होतीस न? तुलाही ओळखलं नाही त्यांनी . “
संजय ने दिलेलं जेवण  आधाशा सारखं संपवलं होतं त्यांनी .  घटाघटा ताक  संपवून  स्वच्छ ताट त्याच्या हातात दिलं .  वर तांब्याभर पाणी ही संपवलं …जणू काही पुढील काही दिवसांची पोटाची बेगमी करून घेतली .
एकेकाळी नाट्यसृष्टी वर राज्य करणारा हा जातिवंत कलाकार …त्याची ही अवस्था ? सगळ्या युनिट ला प्रेमाने खाऊ घालणारे कमलकांत  आज   किती दिवसांनी असं पोटभर जेवले असतील ह्या विचाराने  तिला भडभडून आलं .
” कमलजी , मी नयना . ओळखलं ? तुमची आणि आपल्या ग्रुप ची मेकअप आर्टिस्ट .
आपण पूर्ण महाराष्ट्र भर दौरे केले होते… सपना , मधू ,  मंगेश सर , राजीव …आठवतात ? ……तुमच्या अनेक वेशभूषा आणि गेटअप ची खूप तारीफ झाली तेव्हा तुम्ही मला खास भेट दिली होती ….माझ्याकडे आहेत त्या कुड्या अजुन ..”
बाबाजीची नजर कोरडी . भावनाहीन.  संसारातून निरिच्छता आलेल्या माणसाला  कशाचच अप्रूप वाटत नाही , तसं त्यांचं झालं असावं .
दहा वर्षे होऊन गेली कमलकांत नाट्य सृष्टीपासून दूर जाऊन . त्यानंतर ते कुठे गेले..  फॅमिली कुठे आहे .. जिवंत आहेत तरी का … ह्या बाबत कुणालाच काहीच माहिती नव्हतं .
” संजू , माझी जुनी डायरी आण ! ” डायरी मध्ये बरेच जुने संपर्क होते .
  नयना आणि संजय ने अनेक जणांना फोन केले .   त्यांच्या काळातील नट , दिग्दर्शक , निर्माते यांना त्यांच्याबद्दल माहिती तर नव्हतीच , पण आत्मीयता पण नव्हती .
उगवत्या सूर्याला सलाम करणाऱ्या  जगात    ह्या  मावळत्या दिनकरासाठी कुणालाच वेळ नव्हता .
तोपर्यंत संजय ने त्यांच्यासाठी अंथरुण घातलं होतं . आईला न विचारता …म्हणजे आपल्या आईचीही हीच इच्छा असेल असं वाटलं त्याला .
 बाबाजींची नजर कुठेतरी शून्यात …काहीतरी शोधत असल्या सारखी ..
नयना मात्र वेड्या सारखी सगळीकडे फोन करत होती .   कुठून तरी त्यांच्या पत्नीचा संपर्क मिळाला .
अधिरपणे तिने फोन लावल्यावर तिकडून  कुणीतरी दुसऱ्याच व्यक्तीने फोन उचलला .
” हॅलो , विद्या मॅडम ?”
” चार महिन्यांपूर्वी  हा बंगला माझ्या नावावर करून त्या गेल्या . तुम्ही त्यांच्या नातेवाईक का ? त्या कमलकांत ला सांगा , अजून खूप कर्ज बाकी आहे . ऐपत नव्हती तर  कशाला…….”
तिच्या हातातून रिसिव्हर गळून पडला . पलीकडून बोलणारा जोर जोरात बोलतच होता .
 संजय ने पटकन तिला सांभाळत रिसिव्हर जागेवर ठेवला .   बाबाजी लहान मुला सारखे  एका बाजूला घातलेल्या अंथरुणावर जाऊन पडले होते .
 मध्यरात्री  कडाडून वीज चमकली .पावसाने जोर धरला होता . कसला आवाज येतोय म्हणून नयना आणि संजय बाहेर आले . कमलकांत उठून बसले होते . कुणाशी तरी संवाद केल्या सारखे बडबडत होते .
” मंगेश , तिसरा प्रयोग संपल्यानंतर मायबाप प्रेक्षकांसाठी थांबायचं आहे .
नयना , ही दाढी नीट बसली का बघ बरं . ..”
आणि  त्याच तंद्रीत अचानक उठून उभे राहिले .
 त्या नंतर  असे समाधी लागल्या सारखे त्यांनी एका नंतर एक धडाधड  स्वगतं म्हणायला सुरुवात केली .
संयस्थ मधील  महादेव पंत , आभाळमाया मधील प्रो . फिलिप , दिशाभूल मधील राजासाहेब एका नंतर एक  संवादातून जिवंत होत होते .  इतक्या दुर्दशा झालेल्या अवस्थेतही त्यांच्यातील कलाकाराचा आवेश थक्क करणारा होता .
” मी आहे  सुर्यातील ओजस ! मी आहे द्रौपदीच्या  सुडाचा अग्नी ! माझ्या धमन्यातून वाहणारं रक्त लाव्हा बनून बाहेर पडतंय !  मी असेन , नक्कीच असेन . तुझ्यात ! …तुझ्यात ! आणि ह्या चराचरात !  ”  आवेशात हे बोलून
 कमलकांत  कोसळले .  त्यांच्या चेहऱ्यावर खूप समाधान होतं ….
शेवटचा प्रयोग यशस्वी झाल्यासारखं .
आता मात्र प्रयोग संपून
पडदा पडला होता , कायमचा .
Aparna Deshpande
Latest posts by Aparna Deshpande (see all)

Aparna Deshpande

अपर्णा देशपांडे - (B.E E&TC , M.A soc ) एक अभियांत्रिकी प्राध्यापिका . समाज माध्यमं आणि वर्तमानपत्रात नियमित लेखन . वाचन आणि चित्रकारितेची विशेष आवड .

4 thoughts on “पडदा

    • May 22, 2020 at 4:49 am
      Permalink

      धन्यवाद

      Reply
  • May 21, 2020 at 7:02 pm
    Permalink

    सुंदर ……नटसम्राट नाटकाची आठवण झाली

    Reply
  • May 22, 2020 at 4:50 am
    Permalink

    हो , बरोबर

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!