शकु_आत्या

 
गावात शामजीपंत इनामदार म्हणजे मोठ्ठं प्रस्थ. सरकारी अधिकारी. तसा त्यांचा स्वभाव लाघवी, मितभाषी. सरकारी अधिकारी असुनही कधीच कोणालाही त्यांनी कोणत्याही कामासाठी अडवले नाही की त्या कामासाठी पैसे मागितले. शिवाय ते गावच्या पंचांपैकी एक त्यामुळे गावात त्यांना मान होता. शिवाय गावात जमीन आणि त्यातून भरपूर मिळणारे उत्पन्न. त्या काळातले घर म्हणजे भला मोठ्ठा वाडा.
 
त्याकाळी सख्खी – चुलत मंडळी एकत्र कुटुंबात राहत. आमच्या त्या वाड्यात २० एक माणसांचा वावर असायचा.  आमचे बाबा त्यांच्या भावंडांत चौथे आणि सगळ्यात धाकटे. आणि मी त्यांचे दुसरे आणि सगळ्या कुटुंबात लहान म्हणजे शेंडेफळ. आमच्या याच कुटुंबातील एक सदस्य म्हणजे शकु आत्या. मला आठवतं त्याच्याही आधी पासून ती आमच्याच घरी होती. म्हणजे ती कधी आणि कशी आमच्या घरी आली हे काही माहिती नव्हते.  
 
मला लहाणपणीच्या ज्या गोष्टी आठवतात त्यात लहानपणी पाहिलेली शकु आत्या देखील अजूनही आठवते. पाच फुट उंच, गोरी, उभट चेहर्‍याची, पाणीदार पिंगट डोळे, शुभ्र दंतपंक्ती, डोळ्यात कायम करुण भाव. माझ्या लहानपणी मी सगळ्यात जास्त जीच्या सहवासात वाढलो ती म्हणजे शकु आत्या.
 
शेंडेफळ असल्याने मी तसा व्रात्य. पण माझ्या व्रात्यपणाला चाप लावण्याचे काम माझ्या आईपेक्षाही जास्त वेळा केले ते शकु आत्याने. लहानपणी मी सगळ्यात जास्त वेळ जीच्या मांडीवर खेळलो ते या आत्याच्या. अगदी स्वतःच्या मुलासारखं तीने मला वाढवलं होतं. एकत्र कुटुंबात आई, आजी, काकु या कायम स्वयंपाक आणि इतर घरातील कामात व्यस्त असत. त्यामुळे मी झोपेतून उठून एकदा आईकडून दुध पिले की मग आत्याकडेच असे. पुढे आणखी मोठा झाल्यावर मला उठवून, माझे आवरुन शाळेत पाठवणे देखील आत्याच करे.
 
बरं फक्त मला सांभाळून आत्या गप्प बसत नसे. तीला जेव्हा बघावे तेव्हा ती काही ना काही काम करत असे. वाड्यात मागे आड होता. आडाचे पाणी शेंदून सगळ्यांना पुरेल एवढं पाणी भरुन ठेवणे. आल्या गेल्यांचं चहा पाणी, भाजी निवडून किंवा चिरुन देणे, पडतील तेवढी भांडी घासणे या कामत ती नेहमीच व्यस्त असे. मी शाळेतून आलो की मग मी तिच्या अवतीभवती फिरे. हे दे, ते दे, मी हाताने खाणार नाही मला भरव या अशा फरमाईशी असत. मग आजी किंवा आई “बघ बाई तुझ्या लाडोबाकडे आम्ही आवरतो ही कामे”.
 
मग आत्या मला हाताने जेवू घालत असे. त्यानंतर मला गोष्टी सांगणे, गाणी म्हणून दाखवताना तीने अनेक संस्कार केले. मला जेव्हा एखाद्या प्रसंगी मी काय करावे? कसे वागावे? हा प्रश्न पडतो तेव्हा आत्याने सांगितलेल्या त्या अनंत संस्कररुपी गोष्टी आजही मार्गदर्शन करतात. आपली मुळं लहानपणीच चांगल्या संस्कारांनी रुजवली गेली तर ती आयुष्यभर मजबूत राहून येणाऱ्या प्रत्येक प्रसंगात आपल्याला योग्य वागण्याची बुद्धी देतात. हे मला आत्याने माझ्याही नकळत केले होते. तेव्हा ते कळले नव्हते पण आता एखाद्या आघाताच्या वा दुःखाच्या प्रसंगी ते संस्कार खंबीर रहायला शिकवतात. चुकीच्या मार्गाने जाताना अडवतात. 
 
काळ कितीही थांबावा म्हटला तर थांबत नाही. दिवस पालटत गेले आणि आम्ही भावंडं मोठी होत गेलो. मी मॅट्रिक झालो आणि पुढच्या शिक्षणासाठी पुण्यास यायला निघालो. माझी मोठी भावंडं आधीच पुण्यात होती त्यामुळे तशी बाकी काही अडचण नव्हती. मी निघतेवेळी सगळ्यात जास्त कोण रडले असेल तर शकु आत्या. शेवटी सगळे म्हणाले “अगं आपला संक्या आहे तो. मुलगी नव्हे जी सासुरास निघाली आहे. शिक्षण संपवून पुन्हा तुझ्या कुशीत येईल हो”. या वाक्यावर सगळे हसले. मला जाता जाता लक्षात राहिली ती रडता रडता हसणारी शकु आत्या.
 
मी पुण्यात आल्यावर आधी आधी खुप पत्रं गावी घरी पाठवत असे. त्यातील अर्धा अधिक मजकुर आत्यासाठी असे. ती माझ्या वाटेकडे डोळे लावून बसली असणार हे मला जाणवत असे. मला पुण्यात असताना दोन मनी अॉर्डर यायच्या. एक वडिलांकडून इथल्या खर्चासाठी तर दुसरी आई आणि आत्या मिळून पाठवत. रक्कम छोटी असली तरी माझ्या त्या दोन्ही माता मला चांगलं चुंगलं खाण्यासाठी घेता यावं म्हणून त्यांच्या स्वतःच्या वाचवलेल्या पैशातून ती मनी अॉर्डर पाठवत.
 
मी जेव्हा जेव्हा गावी जात असे तेव्हा आत्या आणि आई मला सगळ्या माझ्या आवडीच्या भाज्या आणि पदार्थ करुन घालत. शकु आत्या आता पोक्त दिसू लागली होती. आमच्या भावंडांच्या बोलण्यात एकदा माझ्या चुलत बहिणीने घरातील मोठय़ा बायकांकडून ऐकलेली आत्याची कहाणी सांगितली होती.
 
शकु आत्या म्हणजे आमच्या आजोबांच्या चुलत भावाची मुलगी. म्हणजे आमच्या बाबांची चुलत चुलत बहीण. ती वयात असताना तीचे गावातील एका मुलावर प्रेम होते. त्या वयात ती इतकी हसती खेळती होती, स्वप्नाळु होती. वडील आणि इतर सगळ्यांचा विरोध पत्करून तिने त्या माणसाशी लग्न केले. तो तिला घेऊन मुंबईला गेला. दोघांचे बरे चालले होते.
 
तो मील मधे कामगार होता. लग्नानंतर सहा महिन्यानंतर एकदा कामावरून परतताना ट्रेनमधून तो पडला तो जागेवरच गेला. तेव्हा आत्या दोन महिन्यांची गरोदर होती. या धक्क्यातच तीच्या पोटातील बाळ गेले. ती गावी आलीतर नवर्‍याच्या घरच्यांनी दारातही उभे केले नाही. नाही तिच्या वडिलांनी तिला जवळ केले. गावच्या विहिरीत जीव द्यायला निघालेल्या आत्याला आमचे आजोबा घरी घेऊन आले ते कायमचेच. आत्या आल्यावर सहा महिन्यांत माझा जन्म झाला. आत्या मला मुलासारखा जीव का लावत होती हे तेव्हा समजले.
 
दिवस आणखीच पालटत गेले. मी इंजिनिअरिंग करुन एका नामांकित कंपनीत नोकरी मिळाल्याचे लेटर घेऊनच घरी गेलो. आई आणि आजीनी तुकडा उतरुन झाल्यावर दारातच मला मिठी मारली. माझी नजर आत्याला शोधत होती हे जाणून आई म्हणाली वरती माडीवर वाट बघत आहे ती. त्यादिवशी आत्याने प्रेमाने मारलेल्या मिठीत मी पुरता न्हाऊन गेलो. तिच्या आनंदाश्रूंमुळे तीला धड बोलताही येत नव्हते.
 
अडकत अडकत भरल्या आवाजात ती मला म्हणाली “संकु, माझ्या मायेची लाज राखलीस हो बाळा. तुझ्या आजोबांसारखा मोठा हो. सगळ्यांना सोबत घेऊन चाल. आयुष्यात कधी काही कमी पडणार नाही तुला.”
 
आत्याचा आशिर्वाद खरा ठरला. नोकरीत बढती मिळाली. लवकरच लग्न झाले. मीनलला म्हणजे माझ्या बायकोला “ही माझी आईच आहे आणि हिला अपण कधीच दुखवायचे नाही” हे सांगितले आणि ते पाळले देखील. अर्थात तीची आमच्याकडून अपेक्षाच काय होती म्हणा? आम्ही नीट व्यवस्थित आणि सुखरूप, आनंदात रहावे एवढंच तीचं मागणं होतं. मुंबईत घर घेतले तेव्हा आत्याला वास्तुशांतीचं निमित्त काढून घेऊन आलो. पण पंधरा दिवसांत गावी सोड म्हणून मागे लागली. आम्ही आणखी रहा म्हणून आग्रह केला पण “आपलं सर्वस्व हिरावणारं शहर कितीही वर्षे झाली आणि कितीही बदलल तरी कधीच आपलंसं वाटत नाही” एवढंच ती म्हणाली. ती असं का म्हणाली हे माहीती होतं. तिच्या भुतकाळाबद्दल ती माझ्याशी डायरेक्ट असे एवढं एकच वाक्य बोलली. मीही आग्रह केला नाही. जाता जाता “आता दोन वर्षे झाली लग्नाला संकु. आम्ही श्रीराम म्हणायच्या आत नातवंडाचं तोंड दाखवा.”
मी उगाच ओरडलो तीला. “काहीही काय बोलतेस आत्या. तुला भरपूर आयुष्य आहे. अजिबात असली भाषा करायची नाही.”
आत्या नेहमीप्रमाणे लाघवी हसली होती. 
 
एव्हाना गावात फोन आले होते. अगदी रोज नसला तरी आठवड्यातून दोन तीनदा फोन होत असे. आता कामाचे व्याप वाढत गेले. जवळच्या माणसांना आपण विसरत नसलो तरी ती रोज समोर नसणे ही पण एक शिक्षाच असते. आई बाबा, काका काकु, मोठा चुलतभाऊ आणि आत्या गावी आणि बाकी आम्ही इतर भावंडं पुण्या मुंबईत होतो. आजी आजोबा जाऊन आता बरीच वर्षे झाली. गावचा दगडी वाडा मात्र तसाच दणकटपणे उभा होता. आणि तोच आम्हा भावंडांना बांधणारा दुवा होता. तिथल्या असंख्य आठवणी आमच्या सोबत होत्या.
 
शकु आत्या आता थकली होती. आता मात्र ती दर फोन मधे कधी येणार आणि माझी इच्छा कधी पूर्ण करणार असे विचारत असे. अशातच मीनल आणि मी आई बाबा होणार या बातमीने वाड्यात जे चैतन्य पसरलं होतं ते शब्दात न सांगता येणार नाही. आई, काकु आत्या आता वेगवेगळी दुपटी, अंगडी, टोपडी शिवण्यात आणि स्वेटर विणन्यात मग्न झाल्या. पावसाळ्याचे दिवस होते. मीनलची डिलिव्हरी डेट जवळ आली होती. तिकडे आत्या थंडी तापाने आजारी पडली. साधा ताप असेल म्हणून घरगुती उपाय केले पण ताप कमी होत नव्हता. शेवटी जवळच्या हॉस्पिटलमधे अॅडमीट करावे लागले.
 
तीने माझ्या नावाचा घोषा लावला होता. पण डीलीव्हरीनंतर सुट्टी लागेल म्हणून मी जायला उशीर करत राहिलो. मीनल डिलिव्हरीसाठी तिच्या माहेरी होती. तिचे माहेर आमच्या गावाजवळच होते. शेवटी एके रात्री आईचा फोन आला ताबडतोब नीघ. आत्या खुपच आठवण काढते आहे. मी पोहचलो तेव्हा आत्या मलूल ग्लानीत पडली होती. मी आल्याचे कळताच ती जागी झाली जणु फक्त माझी वाट पाहत असल्यासारखी. मला डोळेभरून पाहिल्यावर, माझ्या चेहर्‍यावरुन तिचा तो सुरकुतला पण मऊशार हात जेव्हा फिरला आणि अगदी क्षीण आवाजात आत्या म्हणाली “आलास बाळा? नातवंड बघायचे तेवढे राहिलेच बघ संकु” तेव्हा मात्र मी अश्रूंचा बांध रोखू शकलो नाही.
 
हळूहळू आत्याचा तो मऊशार हात थंड पडत गेला. आईसारखं प्रेम, माया देणारी आत्या तीची इच्छा पुर्ण व्हायच्या आतच गेली.
 
सासर्‍यांचा फोन आला. मीनलच्या पोटात दुखत असल्याने काही वेळापूर्वी अॅडमीट केले आणि आम्हाला कन्यारत्न झाल्याची बातमी समजली. तेव्हा माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहणाऱ्या सगळ्यांकडे मी पाहिले आणि म्हणालो “मीनलची डिलीव्हरी झाली… शकुंतला परत आली”
 
 
Image by Sonam Prajapati from Pixabay 
 

Abhijit Inamdar

Abhijit Inamdar

लेखक परिचय : नाव- अभिजित अशोक इनामदार. सातारा जिल्ह्यातील म्हासुर्णे माझे बालपण हे (वयाची पहिली १४ - १५ वर्षे) हे खेडेगावामध्ये गेले. मी इंजिनिअरिंग केले असून एमबीए इंटरनॅशनल मार्केटिंग मध्ये केले आहे. नोकरीनिमित्त बऱ्याच ठिकाणी फिरून झाल्यानंतर सध्या पुणे येथे वास्तव्यास आहे. लहानपणापासूनच मला कला क्षेत्राबद्दल जिव्हाळा आहे. काही नाट्यप्रयोग तर काही म्युझिकल शोज चे अँकरिंग केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आपणही काहीतरी लिहू शकतो याची मनाला आस लागून राहिली होती अन म्हणूनच मग फेसबुक वर २०१२ पासून लिखाण सुरु केले. माझे क्षेत्र जरी यांत्रिकी असले तरी लिखाणामुळे नवी उर्जा मिळते.

7 thoughts on “शकु_आत्या

    • May 31, 2020 at 2:11 am
      Permalink

      खूप छान अभिजित.👍👍

      Reply
    • June 22, 2020 at 2:54 pm
      Permalink

      मायेचे पाश सहज सुटत नाही.ते पुन्हा नव्या रुपाने जन्माला आले
      अप्रतिम कथा.

      Reply
  • May 29, 2020 at 9:51 am
    Permalink

    डोळ्यात पाणी आलं…. 😊

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!