पालवी

डिपार्टमेंट चे जवळपास सगळेच जणं आज मोकाशी च्या टेबला भोवती जमले होते . हे त्यांचं नेहमीचंच . कुणी नवीन मेंबर जॉईन होणार म्हटलं की ही अशी  ‘कोंडाळी’  होणार , आणि त्या व्यक्ती बद्दल आराखडे केल्या जाणार हे ठरलेलं. मिस जया अष्टेकर मात्र ह्याला अपवाद .

मान खाली घालून , चष्मा आणखीन वर ओढत  कॉम्प्युटर  ‘नेट’  वर ती आपले काम  अगदी ‘नेटाने’  करत असे .  त्याला कारण ही तसंच होतं .  मिस जया , वय वर्ष बत्तीस , ही एक अविवाहित  आणि अनुभवाने तुसडी झालेली  स्वतःला पोक्त समजणारी महिला .. कुणामध्ये न मिसळता एकटं रहाणं पसंद करत आपलं काम चोख करण्यात  पटाईत.   आजही सगळे जमलेले असतांना ती कामातच होती .

मोकाशी च्या टेबलाजवळ जोरात चर्चा सुरू …

“ए कोण येतंय ? बकरा ,  का बकरी ?”

” बोकड आहे कुणी , सारंग शेटे नावाचा.”

” ए ,  आधी मी माझ्या फाईल्स त्याच्या डोक्यावर टाकणार हा ? माझं झाल्यावर तुम्ही तुमची कामं सांगणार.”

” अरे , मिस कडू बघ न !  फॅन खाली बसूनही हिचा एक केस देखील हलत नाही रे ! काय धाकात ठेवलंय न?”

सगळे फिदीफिदी हसले …आणि एकदम शांतता झाली.  तांबे साहेब नवीन रुजू होणाऱ्या  तरुणास घेऊन येत होते. त्यांनी  सारंग शेटे ची सगळ्यांशी ओळख करून दिली .

नंतर  मिस जया च्या टेबलापाशी जाऊन तिची वेगळी ओळख करून दिली . तिचा  तुटक पणा सारंग च्या लगेच लक्षात आला. तिच्या शेजारच्याच टेबलावर त्याची जागा होती .

” हॅलो मिस जया . माझ्या डाटा मधील  ह्या सगळ्या आकड्यांना पाय चार्ट मध्ये  दाखवायचंय , पण ह्या  संख्या त्यात येतंच नाहीयेत . जरा बघता का ? ..प्लिज?”

गेल्या आठ दिवसात एक शब्दही न बोललेल्या तिला  नाही म्हटलं तरी  हे ऐकून छानच वाटलं. तिने त्याचं काम करून दिलं . त्यानंतर अधूनमधून  दोघं एकमेकांना मदत करू लागले. सारंग फार मिश्किल होता .  हरहुन्नरी आणि रसरशीत !  काहीतरी विनोद करून तिला हसवायचा.

डिपार्टमेंट च्या टवाळखोरांना  तिची खिल्ली उडवायला आणखी एक कारण मिळालं. सारंग ला हे समजत नव्हतं असं नाही , पण त्याला ते आवडत नसूनही त्याने विरोध केला नाही . बाकीच्या मंडळींनाही तो आपल्या  मजेदार  शैलीत काहीतरी ऐकवून  सतत हसवायचा .

” आज डबा नाही आणला मॅडम ?” एकाने विचारलं .

” नाही , आज जमलं नाही . ”

” चल न जया ,  माझ्यासोबत जेव आज.”  निकिता ला आज  अचानक कुठली उपरती झाली हा विचार करत तिने  हसून नकार दिला .

नव्हतं जमलं आज …बाबांच्या एक्स रे आणि टेस्ट ला बराच वेळ लागला होता . कसाबसा  त्यांच्या पुरता वरण भात करून निघाली होती ती .

” हं , हे घ्या ! ”  एक पार्सल पुढे करत सारंग बोलला .

“कशाला आणलंस सारंग ? मी चहा बिस्कीट खाल्लं आत्ताच .”

” पण जेवली नाहीस न तू ? म्हणून पराठ्यांचं  पार्सल आणलंय . घे .”

पोटभर खाऊन झाल्यावर तिच्या लक्षात आलं की  त्याच्याशी बोलतांना आपण नकळत एकेरीवर आलोय .

आता दोघंही बरेच मोकळे झाले होते. कधी संध्याकाळी मिळून गाणे ऐकत  एखादा पदार्थ करणे , कधी बाहेर जेवायला जाणे ..सारंग तिच्या वडिलांना औषध किंवा  काही सामान लागलं तर आणून देई .  त्याचा हा स्वभाव तिला मोहवून टाकत होता , पण पहिल्या लग्नाच्या कटू आठवणी मुळे तिच्या  वठलेल्या मनाला कोवळ्या  पालवीचंही ओझं होतं.  तिच्या रहाण्यातील , देहबोलीतील बदल पाहून  ऑफिस मध्ये सूचक नेत्रपल्लवी होऊ लागली .

” आजकाल  बेलाच्या कडू झाडालाही गोड फळं येतायत नाही ?”

” पण शेवटी कडू ते कडूच! ”

अश्या संवादाकडे आधी सारखे दुर्लक्ष करणे तिला जड जात होतं .

आपल्याला कुणी चांगलं म्हणावं , तारीफ करावी , आपणही आरश्यात पाहून मुग्ध हसावं असं वाटू लागलं .

सारंगने कधीही कुठलीच मर्यादा ओलांडली नव्हती , किंवा सूचक बोलला नव्हता .  कधी ऑटो मध्ये एकत्र जावं लागलं तर तिला अप्रशस्त वाटू नये ह्याची तो काळजी घेई .

आपल्याला वाटतंय ते प्रेम आहे का ?

तर  तिचं उत्तर होतं ,  नाही !

त्याचं नसणं तिला अधीर करत नाही . ..त्याच्या पुसटश्या स्पर्शाने अंगावर रोमांच फुलत नव्हते .. नव्या संसाराची स्वप्नही बघितली नव्हती . पण फरक पडला होता नक्की . तिला माणसांमध्ये मीसळावं , हसून बोलावं , टापटीप छान रहावं असं वाटू लागलं .  शेजारच्या छोट्या बबलूशी खेळून तिचा शीण कमी होत होता .

” बाबा , फिरून आलात ? ”

” हो ग , आजकाल इतकं चं फ्रेश वाटतं न , ह्या सारंग च्या येण्याने फार मोठी जादू झाली ग !  अशी माणसं असावीत बघ आजूबाजूला .  जग किती सुंदर होईल न ?”

” चला बाबा , मस्तं नाटक आलंय , आपण जाऊ बघायला . ”

बाबा पण नवीन आयुष्य मिळाल्या सारखे उत्साहात निघाले . सारंग आणि जयाचे बाबा गप्पा मारत बसले होते . सारंग ने त्यांना खूप हसवलं होतं ….

” सारंग , एक विचारू ? ”

” बिनधास्त बोला  काका .”

” अजून लग्न का नाही केलस ?”

” काका , मी माझ्या आई वडिलांचं आयुष्य जवळून बघितलंय . त्यांनी आईला कधीच काडीचंही सुख मिळू दिलं नाही . सतत तिचा पाणउतारा केला . ती कमालीची तयार अशी रियाजी गायिका होती  , भरतनाट्यम ची प्रशिक्षित नृत्यांगणा होती . लग्नाच्या वेळी यांनी तिला फार मोठे मोठे  अश्वासनं दिले ..नृत्याचे , गाण्याचे कार्यक्रम भरवू , परदेशात जाऊ ….”

” मग ?”

”  कार्यक्रम सोडा  , ती  नुसती शेजारी जरी गेली न , तरी घर डोक्यावर घ्यायचे ते . चांगले कपडे घालू नको , केस घट्ट बांध ..गाणं गुणगुणायचं नाही …

त्यांनी तिचा अक्षम्य मानसिक कोंडमारा केला . ..मी पाचवीत असतांनाच गेली ती .”

” अरेरे ! …

पण म्हणून तू लग्न नाही करायचं असं थोडीच ! ”

” करीन की !  आणि तुम्ही जयाची काळजी नका करू काका . जगण्यातील आनंद घ्यायला जमतंय तिला आता . ..तिचा पुढचा प्रवास बहरलेला असणार , नक्की ! ..पुढच्या आठवड्यात  मी नाशिक ला जातोय .तिथे ट्रेनिंग प्रोग्राम घ्यायचे आहेत .”

” वापस कधी येणार ?”

” आता  पुन्हा इथे नाही येणार काका. तिथून दुसरीकडे जाईन . नमस्कार करतो. ”

जया  ऑफिस मधून आली तर घर सुरेल स्वरांनी दरवळत होते .

” अरे वाह ! बाबा , काय बनवलंय ? मस्तं खमंग वास येतोय .”

” मी फणसाची भाजी केलीय बघ …आवडेल तुला. सारंग भेटला का ग  ? ”

” आज निरोप दिला त्याला .  तो आता नाशिक ला असणार आहे बाबा .  काय माणूस आहे न?  जिवंत ! त्याने  इथून जावंच. त्याची गरज आहे माझ्यासारख्या अनेक जयांना. अनेक वठलेल्या  झाडांना पुन्हा पालवी फुटायची आहे . ”

Image by Schwoaze from Pixabay 

Aparna Deshpande
Latest posts by Aparna Deshpande (see all)

Aparna Deshpande

अपर्णा देशपांडे - (B.E E&TC , M.A soc ) एक अभियांत्रिकी प्राध्यापिका . समाज माध्यमं आणि वर्तमानपत्रात नियमित लेखन . वाचन आणि चित्रकारितेची विशेष आवड .

9 thoughts on “पालवी

  • June 11, 2020 at 5:31 am
    Permalink

    खूपच सुरेख!!
    अजून मोठी चालली असती

    Reply
  • June 12, 2020 at 11:41 am
    Permalink

    वाह
    कथेचा आशय फारच सुंदर 👌👌

    Reply
    • June 12, 2020 at 1:48 pm
      Permalink

      थँक्स अपर्णा , छान वाटलं

      Reply
  • June 12, 2020 at 1:06 pm
    Permalink

    Kadaaaak! Ugach nehmichya vatene na janara, jara vegla shevat dokyat , vicharat swataha chi jaga tayar karun gela .

    Reply
    • June 13, 2020 at 7:15 am
      Permalink

      धन्यवाद

      Reply
  • June 16, 2020 at 9:59 am
    Permalink

    chan lihili ahe gosht

    Reply
    • August 23, 2020 at 4:03 am
      Permalink

      खूप छान

      Reply
  • June 17, 2020 at 5:20 am
    Permalink

    धन्यवाद .

    Reply
  • July 21, 2020 at 12:27 pm
    Permalink

    आनंद देणारे लोक आजूबाजूला सतत मिळाले तर आयुष्य किती सुंदर होईल, हे जग ही सुंदर होईल ,अप्रतिम वहिनी.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!