होम क्वारंटाईन ……
“चंदरे, किती येळ मशेरी लावतीस ? …. संपली तर परत मिळायची न्हाय.”
बिडी न मिळाल्यामुळं, कुठलीशी काडी दातात धरून बिडीचा फील घेत बसलेला, शिवा चंद्रिवर ओरडला.
“न्हाय संपत, म्हस किलोभर बनवून आणलीय. नुसत्या माशा मारत बसण्या परास, कुटं कोण काय खायाला वाटायलंय का बगून या जावा.” डोक्यावरचा चिरटलेला पदर बळंच सारखा करत चंद्री बोलली.
“नगं, काल गेलतो त्या सिंधी कालनीकडं …… तिथं वाटत हुती, पर तिथवर पोचायच्या आदीच पोलीस गाडी आली, ……. ढुंगणाव लय फटकं मारत्यात पोलीस.”
तोवर, रेल्वेच्या भिंतीजवळ मोकळं होऊन आलेलं, अन भुकेची जाणीव झालेलं लेकरू, चंद्रिला येऊन चिकटलं. तशी चंद्रि व्हसकली, “जा, मर तिकडं, कशाला पॉट मोकळं करून आला, …. आज काय मिळंल का न्हाय म्हाइत न्हाय.”
बांदरयातल्या कलानगर जवळ एका उंच भिंतीला चिकटून, कचऱ्याच्या ढिगाजवळ एक पाल उभं होतं. एका झाडोऱ्याचा आडोसा अन सावली. शिवाचं म्हातारं, ….. मुटकुळं करून आत पडलं होतं. कार्ट …. नाक पुसत, ….. हायवेनी जाणाऱ्या गाड्यांकडं आशेनं पहात होतं. काल असंच एक पाकीट आलं, …… कचऱ्याच्या ढिगाकडं फेकल्यालं …… बारक्यानं झेललं …… त्याची सोय झाली. बाकीची कालपासून उपाशीच. एखादं दुसरीच कार रस्त्याला, ….. नाहीतर पोलिसाच्या गाड्या. कुणीतरी ब्रेक लावून गाडी थांबवल अन एखादं खायाचं पाकीट देऊन जाईल, एवढीच त्याची आशा.
ज्याच्या जिवावर अख्ख कुटुंब दरवर्षी मुंबईत येऊन पैका कमवायचं, तो भोलानाथ, कचऱ्याच्या ढिगावर तुटून पडलेला. नशीब कचऱ्यात टाकण्याइतकं या फ्लॅटवाल्यांना तरी मिळत होतं. त्या नंदयाची झुल, पायातली झान्जरं, अंगावरचे गोंडे, कधीच गुंडाळून ठेवली होती. शिंगावरच्या सोनेरी शेंब्या तेवढ्या काढायच्या बाकी होत्या…… बानं मना केली होती, म्हणाला, ” राहू दे, नंदी हाय, समजलं पायजेल, न्हायतर, मोकाट जनावर म्हणून कापून टाकत्याल.”
तिकडं, हायवेच्या कडंला, दगडावर बसून, शिवा अदमास घेत बसला होता……. पोटाचा, …… आजच्या दिसाचा ……. आन ….. आन कसलाबी न्हाय. फार लांबचा विचार करण्याएवढी ताकद राहिली नव्हती. राहून राहून चंद्रिचं, गावावरून निघायच्या आधीचं बोलणं त्याला आठवत होतं. दिवाळी झाल्यावर, निघतानाच तिनं नाट लावला होता,…… ममईला जायला. त्यानं झणकन येक लावून दिली होती. पण तिचाच सिग्नल बरोबर निघाला.
………………………………………………………………..
दीड महिना झाला, …… जाग्यावर गप पडली हुती सगळी. ना भोलानाथाचा खेळ, ….. ना कमाई ….. कुणी दिली आणून भीक तर ठीक, न्हायतर तेवडी पण न्हाई. नंदया पण ढोर झालाय, सगळं शिकवलेलं इसरून गेला. गावाकडंच ऱ्हायलो असतो तर, ज्वारी उपटायची तरी कामं मिळाली असती. काय काम नसतं तरी, कमीत कमी पाटलांनं खाऊपिऊ तरी घातलं असतं. हितं कुणी कुत्रं ईचरना….. अन पोलीस हलू पण दिना. कसला रोग आलाय, कुणास ठाऊक, समदं बंद, एकदाचा रोग झालेला परवडला, कमीत कमी इस्पितळात खायाला तरी देत्याल. सुरुवातीला लय समाजसेवक आलं, खायाला देत हुतं. पण जसजसा वखत गेला, आता कुणी ईना झालं. कधी पोलिसांनाच आठवण झाली तर दिउन जात्यात काय बाय. नंदयाचं कचऱ्याच्या ढिगावर चाललंय. त्याचं आपलं बरं हुतं, कितीही सजवला, ……. लोकांचं भविष्य सांगितलं तरी ……. तरी त्यो बैल हुता, …… हे इसरला नव्हता.
………………………………………………………………….
बराच वेळ विचार करत डोकं खाजवून, शिवा थकला. तरी काहीतरी विचार करूनच पालाजवळ आला. आज काहीच खायला नाही मिळालं, …. तर रातचंच पाल गुंडाळायचं ….. जवळजवळ त्यानं पक्कं केलं. अन झालंही तसंच. अंधार पडेपर्यंत, त्यानं वाट पाहिली. काहीच मिळत नाही. रस्त्यावरच्या दिव्यालाही ते अंधारातलं झोपडं दिसणार नव्हतं तर कुणा अन्नदात्याला कुठून दिसणार.
शिवा ताडकन उठला,
“आवरा ……”
सगळ्यांच्याच चेहऱ्यावर प्रश्न उभे ……
“आवरा म्हणतुय नव्हं ….. मग आवरा…… बास झाली ममई….. मार खात जाऊ कसबी ….. पर जाऊ गावाकडं.
नंदीवाल्याचं पाल ते, …. गुंडाळायला कितीक वेळ लागणार.
“जय शिव शंभो …..” चा नारा दिला न निघालं बिऱ्हाड रात्रीचंच. लिंक रोडला पूर्ण शांतता…… कुत्री पण भुंकत नव्हती.
“चल झाप झाप नंदया, ….. लेका कुत्रंबी ईचरना तुला हित.”
नंदयानं पण कळल्या सारखं केलं अन मान हलवली.
रात्रीच्या अंधारात, मुंबईतून बाहेर पडू असा विचार करत झपझप पावलं पडत होती. लेकरू निवांत नंदयाचा पाठीवर. पेंगुन पडू नये म्हणून म्हाताऱ्यानं धरलेलं.
एक पोलीस पेट्रोलिंगची व्हॅन आली. सायरन ऐकला न छातीत धस्स झालं, शिवाच्या. फुटपाथ जवळ सगळे पुतळ्यासारखे उभे राहिले…… जाणाऱ्या पोलीस व्हॅन कडे बघत. पण सायरन वाजवत गाडी पुढं निघून गेली. सायनच्या पुढं चौकात पोलीस होते. पहारे देऊन कंटाळलेले. करोनाने जीव आधी जाईल की नोकरी आधी जाईल या विवंचनेत उभे. शिवानं हात जोडायला सुरुवात केली. हवालदाराने बघून दुर्लक्ष केलं अन हात सॅनिटीझरने साफ करू लागला. बाकीच्यांना पुढं जायची खूण करत शिवा हात जोडून तिथंच उभा. हवालदारानं आता तंबाखू मळायला घेतली. मळता मळता शिवाकडं बघत म्हणाला, ” कशाला थांबलाय ? ….. तंबाखू पाह्यजे ? …. चल पळ निघ.”
पडत्या फळाची आज्ञा घेत शिव्या पळालं. धापलतच गाठलं बाकीच्यांना. पहिली सुटका झाली होती. पावलांना अजून वेग आला. एरव्ही झगमगाटातली , लगबगीतली पण आता सुन्न झालेली मुंबई खूप एकटी आणि भयाण वाटत होती.
……………………………………………………………
चांद माथ्यावर येईस्तोवर, बारकं झोपलं नंदयाचा पाठीवर. त्याला शेल्यानं वशिंडाला बांधलं होतं. नंदीबैलांच्या जीवावर सात पिढया जगल्या होत्या. अन आता त्याच्या हलत्या वशींडावर त्या लेकराचीही स्वप्नं झुलत होती.
आता, ….. मुंबईचा शेवटचा टोलनाका…… मोठा बंदोबस्त…… पोलीस …. एस आर पी सगळाच फौजफाटा.
शिट्ट्या घुमल्या टोलनाक्यावर. दोन दांडकेवाले आले समोर…… दांडके फिरवत.
“कुठं चालला ?”
“गावाला जी ….”
बोलेपर्यंत दोन दोन फटके शिवाला न त्याच्या बा ला पण पडले. नंदयाचा कासरा, चंद्रिच्या हातात होता. तिनं नंदयाला पुचकारत बाजूला नेलं. तसा तिसरा शिपाई खवळला.
“कुठून आणलं हे जनावर ?”
अन रागानं लाठी घेऊन धावलाच. तशी चंद्री मध्ये पडली.
“महादेवाचा नंदी हाय जी …… मारू नका …. मला मारा येक येळ पर त्याला नका हात लावू” चंद्री हातापाया पडत विनवू लागली. “आवो, सायेब, आमच्या जीवावर सोडला महादेवानं नंदी धरणी वर. पाया पडते पण त्याला नका मारू……”
चंद्रीचा एकूणच अवतार बघून, हवालदार थंडच पडला.
पण तरी चूक तर होतीच. मोठमोठे वशिलेबाजी असलेले घरी बसवलेत, परवान्याविना, ……. हे तर रस्त्यावरचे नंदिवाले.
“भडव्यांनो, कुणाच्या परवानगीने निघालात रे घरी? ” हवालदार दरडावला. तसं मघाची बुडाची कळ डोळ्यातून खळकन वाहिली बा च्या. रडवेल्या सुरात म्हातारं बोललं,
“पोट म्हणलं सायेब … चल गावाला. कालपासनं पोटात एक कण न्हाय.”
हवालदार अजूनच वरमला. कुठल्यातरी समाजसेवकानं आणून दिली होती,….. पुलावाची पाकिटं, ….पोलिसांसाठी ….. प्रत्येकी एक. चार काढून दिली.
“इतकी नको सायेब, भरल्या पोटानं चालवायचं न्हाय.” म्हणत चंद्रीनं दोनच घेतली.
सबइन्स्पेक्टरनं लिहून घ्यायला सुरुवात केली. त्यांची नावं, वय, त्यांचा नगर जिल्ह्यातला पत्ता , सगळी कुंडली उतरून घ्यायला सुरुवात केली.
“पत्त्यात नुसतं गाव काय सांगतोय, गल्ली, बोळ, काय हाय का नाही त्यात ?”
“गाव फिक्स हाय बगा पांगारं, पर कोण मळ्यात जागा दिल ततं झोपडं टाकायचं.”
स्पर्धा परीक्षेच्या इंटरव्ह्यू मध्ये, त्यानं उत्तर दिलं होतं, ‘तळागाळातील लोकांसाठी काम करीन.’ ती तळागाळातली माणसं त्या तरुण अधिकाऱ्याला पहिल्यांदा भेटली होती. सतत राजकीय, भाषिक, प्रांतीय नाहीतर आर्थिक माजाचे मुखवटे चढवून फिरणाऱ्या समाजात नीटसे पत्तेही नसलेली माणसं त्याच्या समोर उभी होती.
स्वतःला सावरत त्यानं सूचना दिली,
“तोंडावरची फडकी काढू नका रस्त्यात.”
आणि हवालदाराला, प्रत्येकाच्या हातावर शिक्के मारायची ऑर्डर दिली,
“HOME QUARANTINE.”
“सायेब, ह्यो कसला शिक्का, काय लिव्हलंय त्यात ? ” न राहवून म्हाताऱ्यानं विचारलं.
“गावी पोचल्यावर घरातच राहावं लागेल, चौदा दिवस …… असं लिहिलंय.”
तसं पुन्हा म्हाताऱ्याच्या डोळ्यात पाणी तरळलं. सबइन्स्पेक्टर निरखून पाहू लागला.
म्हातारं नंदया कडं वळलं अन त्याच्या कपाळावर डोकं टेकवत बोलू लागला,
“ऐकलं का म्हादेवा, सायेब म्हणत्यात घरातच राह्याचं, …… ”
नंदयानं मान हलवली…..
“नंदया, लका, आपल्या सात पिढ्याच्या हातावर घराची सादी रेघबी नव्हती, सायेबानी तर घराचा शिक्काच मारून टाकला बग.”
पण यावेळी मात्र नंदयानं, नेहमीप्रमाणं, मान काही डोलावली नाही. डोळं म्हाताऱ्याचं भरलं व्हतं, पण भरतं म्हादेवाला आलं जणू……
- Poked you …… - July 31, 2023
- एमएटी - June 10, 2022
- पत्रास कारण की… - April 21, 2022
क्लास 👌🏻👌🏻
धन्यवाद
सुंदर चित्रण… होम नसलेल्यांना ‘होम क्वारंटाईन’ केलंय …
मुंबईत अडकलेल्या हातावरचं पोट असलेल्या, लोकांचं दुःख अचूक शब्दात मांडल्या बद्दल तुमचं अभिनंदन
Khoop Chhan ….sadhyachya paristhichi vastavikata agadi yogya prakare mandali ahe
वास्तव चित्रण
धन्यवाद
खूप खूप धन्यवाद सानिका, 🙏
मयूर तुझ्या भरघोस कंमेंट बद्दल मनापासून धन्यवाद 🙏
धन्यवाद, नंदू अन ऋतुजा 🙏
Khup chhan lihile Reality of poor family in lockdown..
Nishabda😌😌