चौकस चर्मकार
परवा माझ्या चप्पालचा अंगठा निघाला म्हणून शिवून घेण्यासाठी जवळच्याच चांभाराकडे गेलो होतो. तिथे झालेला संवाद काहीसा असा “बोलिये साहब क्या करणा है”?
हातातल्या लेडीज चपलेला खाली मान घालून नाजूक टाके घालत घालत अन वरती न बघता सुद्धा समोर कोणी साहेब आलाय कि साहेबीन आलीय हे बरोब्बर ओळखणाऱ्या त्या चर्मकाराचे खचितच नवल वाटले.
“ये जरा अंगुठा टूट गया है” मी उत्तरलो.
“रखिये ये पहले खतम करता हुं… फिर देखता हुं”
मग मी तिथल्या त्या बाकड्यावर जरा टेकलो. मला वेळ आहे असे समजून त्याने मग बोलणी सुरु केली “किधर रहते है आप? कौनसी सोसायटी में? का करते हो? ऑफिस कहा पे है”? वगैरे वगैरे
मी एक दोन उत्तरे दिली अन गप्प बसलो. मला जास्त बोलण्यात इंटरेस्ट नाही हे बघून त्याने आपल्या मावा भरल्या तोंडातून एक पिंक टाकली अन पुन्हा कामात गढून गेला.
मला एकदम माझ्या गावाची आठवण झाली. माझ्या लहानपणी गावात हाताच्या बोटावर मोजता येतील एवढी दुकाने होती. पिंपळाच्या पाराखाली शंकर चर्मकाराचे छोटेसे दुकान होते. नवीन चपला, जुन्या चपलांची दुरुस्ती अशी हि कामे तो करत असे. मी त्याला पाहिलेलं आठवतंय म्हणजे अंगात पांढरी दंडकी, पांढर धोतर, गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर गंधाचे अन बुक्क्याचे एका खाली एक असे दोन टिळे, कायम खुरटी दाढी वाढलेली, कानाच्या पाळीवर दोन्ही बाजूनी तुरा आल्यासारखे काही केस. अशा वेशातील शंकर आजही माझ्या डोळ्यासमोर लगेच उभा राहतो.
जाता येता तो नेहमी काहीतरी काम करताना दिसत असे. म्हणजे कुणाच्या चपलेचा अंगठा शिवत असे, तर कुणाच्या सोल उसवलेल्या बुटाचा सोल शिवत असे, कधी लेडीज चप्पलला शिलाई तर कधी कुणाच्या करकरीत कोल्हापुरीला रिबेट मारणे असे. गावातला एकुलता एक चर्मकार त्यामुळे काही ना काही काम रोज असेच. कोणाची काही कामे नसतील तर आपल्या हत्यारांना धार लावायच्या दगडावर घासून हत्यारांना धार लावत बसलेला असे. त्यावेळी मात्र पांडुरंग हारी पांडुरंग हारी असा मुखातून जयघोष चाललेला असे. त्याच्या समोर कोणीतरी उकिडवा बसून चप्पलला काय झालाय ते सांगत असे अन मग शंकर एखाद्या डॉक्टर प्रमाणे चप्पलची नाडी बघत असे. समोर कोणी नसताना पांडुरंग हारी करणारा शंकर… समोर बोलायला कोणी सापडले कि असा सुरु व्हायचा कि बास.
अन मग त्याच्या चौकश्या अश्या असत कि त्याच्या वैयक्तित आयुष्यात त्याला त्या गोष्टींचे काही घेणे देणे सुद्धा नसे, अन नाही त्या गोष्टीनी त्याला काही फरक पडत असे. पण गावाकडच्या माणसांची पद्धतच न्यारी त्यातून हे तर सातारा जिल्ह्यातील पाणी… म्हणजे काही औरच.
असेच एकदा खालच्या आळीतले तात्या त्याच्या दुकानात आलेले… त्या वेळचा प्रसंग आहे.
“आवं तात्या आजून किती येळा शिवायच हे पायतान चार दिसा आगुदरच तर चुका मारून दिल्या व्हत्या. माझं ऐका आता काय बी ऱ्हायल न्हाय बघा या पायतानात. घ्या नवीन आता” शंकर ने आपली आजून एक नवीन चप्पल खपवण्याचा प्रयत्न सुरु केला.
पण ऐकतील ते तात्या कुठले
“तर तर… लेका दर सहा महिन्याला पायतान बदलाय माझा बा ब्यारीश्टरच व्हता नव्ह का… अन आता पोरगा कलेक्ट्ररच हाय न्हवं माझा… म्हणं नवीन पायतान घ्या. गुमान नीट शिव आता… उगा चुका मारू नगो. शिलाई घाल”
आता बोला असली इरसाल गिर्हाईक असल्यावर काय करायचं? शंकर आपला गपचूप चप्पल शिवायला लागे. आपल्या त्या लोखंडी ठोकळ्यावर आधी लोखंडी गोल बत्त्यासारख्या हत्याराने चप्पल ठोकून मऊ करीत असे.
तात्या म्हणीत “लेका ठोकून ठोकून तोडशील पायतान”
मग शंकर चप्पल शिवायचा दोरा पाण्यात भिजवून घेई. चप्पल शिवायच्या सुईसारख्या हत्याराने चप्पल शीवणे सुरु होई.
मग आपल्या आवाजात मावळपणा आणत
“मंग अजून काय म्हणतायसा तात्या. काय गावाची खबरबात”?
तात्या “गावाची खबरबात माझ्याकडं काय असायची बाबा”
शंकर “आव त्या सदूची अन तुमची वळख हाय न्हवं. काय बाय कानाव येतंय म्हून म्हटला तुम्हास्नी ठाव असल”
तात्या “काय कानाव आलं तुझ्या”
शंकर “आव आता म्या काय दुकान सोडून कुठ जातुय बघा. उगा आपलं कुणीतरी कायतरी म्हटलं म्हून तुम्हास्नी इचारलं”.
तात्या पण एकदम बेरकी “व्हय पर काय कानव आलं ते तर सांगाशीला आधी”
इकडे तिकडे बघत शंकर “हेच कि सदू काय बायकुला नीट नांदवत न्हाय. बाहीर काय तरी झेंगाट हाय म्हणं.”
तात्या “तुला काय करायच्यात नसत्या चौकश्या”
शंकर “चिडताय कशा पायी? म्या आपलं तुम्हास्नी इचारलं. ते जाव द्या. आवं त्या नामा लाव्हाराच्या पोराला कसला रोग झालाय म्हणं. म्हुंबईस्न आलाय तवाधरन निजूनच हाय म्हण. खरय का व”?
तात्या “हुम्म्म. बिचार्या नामाच्या जीवात जीव न्हाय. तराणाताठा पोरगा निजून हाय. कुनास्नी बरं वाटल”?
शंकर “खरय बघा”
अन “त्यो दामू कालवड इकणारे म्हण खरय काय”?
तात्या “घेतूस का तू इकत”
शंकर “छ्या छ्या म्या घिउन काय करू? अन खायला काय घालू. हितलं चामडं का चुका. म्या आपलं इचारलं”
दोन मिनिट कोणी बोलत नाही. परत शंकरच बोलतो “तात्या त्या हरी बमानानी पोराला विंजेणर कालिजात घातला म्हणं. एवढा पैका कुठनं आला व”?
तात्या “का रं? तुझ्या बा ची ईश्टेट लुटली न्हवं त्यानं अन अजून तुला पत्ता न्हाय लागला व्हय”
शंकर “काय तात्या तुमी बी”
तात्या “मग लेका तुला का एवढ्या चौकश्या”
शंकर “ते जाव द्या तात्या. रखमा परटीनीच कळल ते”
त्याला वाक्य पुरं करू ना देताच तात्या बोलले “भाड्या सोताचं काम ऱ्हायल बाजूला. अन उगा गावभरच्या चौकश्या करतुयास. चलं आटप मल्हा रानात जायचं हाय”
बाकी तात्या बोलले ते खरच होतं. आपला काही संबंध असो कि नसो सगळ्यांबाबत खर्या खोट्या चौकश्या करतच शंकरचं आयुष्य गेलं. आम्ही लहान मुलं सुद्धा गेलो तरी शंकर आमच्या जवळ कसल्या ना कसल्या चौकश्या करत राहायचा
“मास्तर शाळात वेळेतच येतो का? त्याला तुम्हास्नी शिकवता येतं का? तुम्हास्नी मारतो का रे मास्तर? तुला इतिहास आवडतो का विज्ञान?” त्याचे प्रश्न म्हणजे रेल्वेने सटासट रूळ बदलावेत तसे विषय बदलत असत. त्या वेळी नको वाटायचे त्या प्रश्नांना उत्तर द्यायला. पण आता वाटते. आपल्याकडे आता करमणुकीची अनेक साधने आहेत. तेव्हा त्या काळी त्या शंकर सारख्या माणसांना कुठला विरंगुळा? माणसांशी संवाद हाच विरंगुळा.
प्रगतीचे वारे वाहू लागले. तंत्रज्ञान झपाट्याने बदलत गेले. बर्याच सोयी सुविधा आल्या. शहरांबरोबरच गावंही ओळखू न येण्याइतपत बदलली. बर्याच वर्षांनी गावी यात्रेला जायचा योग आला. गावामाधला बदल कोपर्या कोपर्यावर जाणवत होता. घरी पोहचेपर्यंतच अनेक नव-नवीन दुकानांची रेलचेल लक्ष वेधून घेत होती. संध्याकाळी सहज चक्कर मारायला म्हणून बाहेर पडलो. सकाळी येताना दोन तीन शु मार्ट दिसली होती. आपसूकच पिंपळाकडे पावले वळली. पिंपळाखाली आता शंकरचे ते जुने दुकान नव्हते. त्याजागी आता चकाचक, मोठी काच असलेले “सावनी फुट वेअर शॉप” उभे होते. मला वाटले शंकरने विकले वाटते दुकान. प्रगतीच्या वार्यात बाहेर फेकला गेला वाटते बिचारा.
पाठीमागे वळलो तेवढ्यात आवाज आला “काय पावणं? कोण गाव म्हणायचं? काय पायताण, बुट – बीट बघायचं काय”?
आवाज ओळखीचा वाटला म्हणून मग मी पुन्हा वळलो अन पाहतो तर काचेच्या मागे म्हातारा शंकर आपला लुकलुकणारा दात हलवीत माझ्याकडे पाहत होता. मी आत गेलो बसलो अन मी कोण ते सांगितले अन म्हातार्याचा चेहरा एकदम उजळला
“अरं माझ्या व्हागा. आप्पाचा पोरगा व्हय तू”
चष्मा वर करून माझ्याकडे बघत तो म्हणाला. आता मला त्यांना अरे तुरे करावेसे वाटले नाही. मी वाकून नमस्कार केला. तोंडातल्या तोंडात त्यांनी काहीतरी आशीर्वाद दिला अन पुन्हा बोलू लागले.
“अरं आप्पा लई सांगत्यात बघ तुझ्या बद्दल. लई मोठा झालास. कुठ अमेरिका अन जर्मनी आणि काय इटली बिटलीला अन कुठ कुठ जावून आलास म्हणं”.
नेहमी चौकशीच्या सुरात बोलणाऱ्या शंकरशेठना असे काळजी अन मायेच्या सुरात बोलताना बघून मला जरा बरे वाटले.
शंकरशेठ म्हणाले “वाइच च्या घेणार का”?
खरंतर इच्छा नव्हती पण त्यांचा आग्रह मोडवेना. मानेनीच हो म्हणालो. आपल्या मुलाकडे वळून शंकरशेठ म्हणाले “विन्या जरा च्या सांग. आप्पाचा ल्योक आलाय बघ”.
अन परत माझ्याकडे वळून “आन मंग काय म्हणती तुझी नोकरी? आनं तिकडं परदेशी सारखंच जावं लागतंय व्हयं? आन पर तिथ जावून काय काम करायचं असतंय म्हणतो म्या? अन त्यास्नी न्हायती येत व्हय ती कामं? सारखी आपल्याकडचीच माणसं लागत्यात व्हय? त्या हरीचा ल्योक बी गेलावता मागच्या टायमाला? अन तिथं जेवाय भेटतय काय आपल्यावानी”
अन अशा प्रकारे आपला पुर्वीचाच विरंगुळा सुरु केला.
Image by Dewald Van Rensburg from Pixabay
Latest posts by Abhijit Inamdar (see all)
- पाऊस - July 30, 2021
- बडी ताकत के साथ… बहोत बडी जिम्मेदारी भी आती है - May 11, 2021
- आठवणींच्या_पटलावर - April 20, 2021