व्हर्जिन…

“तू व्हर्जिन आहेस?”

माझ्या तोंडून बाणासारखा सुटलेला प्रश्न औपचारिकतेची उरलीसुरली वलयं भेदून थेट तिच्या मेंदूत जातो. मोजून सेकंदभर किंचित हलल्यासारखी वाटते ती, आणि परत तिचा चेहरा कोरा होतो. ती हळूच आजूबाजूला बघते. हो, सुपर मार्केट मध्ये हा प्रश्न विचारणं म्हणजे जरा अतीच नाही का! पण माझ्या डोक्यात चाललेल्या गोंधळात हा प्रश्न मी अचानक आत्ता आणि इथे का विचारला हे माझं मलाही कळत नाही.

“तुझी व्हर्जिन ची डेफिनेशन काय आहे ?” ती अगदी सहज विचारते.

“इतके लहान नाही आपण” माझा तिच्यावरच पलटवार. ती हातात पिशव्या घेऊन सामान बघत चालते आहे.

“तसं असेल तर नाही , मी व्हर्जिन नाही. पण व्हर्जिनिटी एकाच पद्धतीची असते असं नाही त्यामुळे हो, मी अजूनही व्हर्जिन आहे” ती हातात डाळ घेत चाचपून बघतीये. माझं एकंदरीत तिच्याकडे लक्ष देऊन बघतो. परत एकदा. असं काही फार विशेष वगैरे असावं असं काही आहे का तिच्यात ? मी शोधण्याचा प्रयत्न करतो. इतके वर्ष आपल्या शेजारी राहणारी हि एकटी बाई. कधी समोर बघून साधं हसून ग्रीट हि न करणारी. हिने आपल्या आजारपणात आपली मदत करायचं काही कारण नव्हतं खरं तर.

आम्ही सामान घेऊन घरी येतो. मी घराचं दार उघडून आधी फॅन लावतो. ती २ मिनिट टेकण्यासाठी म्हणून आत येऊन बसते. तोवर तिने पर्स मधली किल्ली शोधून काढून ठेवली आहे.

ती उठून स्वतः  फ्रिज मधली पाण्याची बाटली घेते आणि घटाघट पिऊन संपवते. “हं , आता बोल, काय म्हणत होतास?” ती विचारते. मी अजूनही तिच्याकडे बघतोय. हळूहळू मला तिच्याभोवती किंचित गूढ , असं वलय दिसतंय. काही लोक उगाच भारलेले वाटतात तशी ती मला वाटते. म्हणजे लहानपणी नवरात्रात एक जोगतीण यायची जोगवा मागायला, तिच्यासारखी. गूढ. खूप काहीतरी माहित असणारी. मला उगाच तिची भीती वाटली. तिला ते कळलं. ती एकदम फिस्सकन हसली. हसताना ती अगदी लहान मुलीसारखी दिसली. पण माझं लक्ष तिच्या चेहऱ्याकडे नव्हतं. माझं लक्ष तिच्या सर्वांगावरुन फिरत होतं. एखाद्या बाई ने ती व्हर्जिन नाही म्हंटल्यावर एका पुरुषाच्या डोक्यात जे काही यायला हवं हे सगळं माझ्या डोक्यात येत होतं , नजरेला दिसत होतं .. नव्हे अगदी समोर अनुभवत होतो मी हे सगळं.

ती किंचित झुकून गुढग्यांवर कोपरे ठेवून वाकून बसली. तिच्या टी शर्ट बराच खाली आला आहे. मला कळतंय. तिलाही कळतंय. पण तिला फरक पडत नाहीये. मला पडतोय. कारण अजून मी पुरुष याच पायरीवर उभा आहे. पुढचं सगळं तिच्या टी शर्ट मधून अर्धवट दिसणाऱ्या स्तनांमुळे अगदी अंधुक होऊन गेलंय.

ती काही वेळ माझ्याकडे बघत राहते. मी काय बघतोय हे बघत. यात माझी तंद्री तुटते. मी उगाच ओशाळतो. खरंतर मला गिल्ट आलं नाहीये. का यावं ? तिला झाकता येत नाही, मला बघताना का गिल्ट यावी? पण पद्धत असते असं उगाच ओशाळायची. बिनमतलब बिनकामाची. म्हणून मी ते करतो.

“व्हर्जिनिटी म्हणजे कौमार्य. हा कौमार्यभंग होऊन आपण आपल्या पुढच्या दिशेला जाणं म्हणजे आपली व्हर्जिनिटी , आपलं कोवळेपण संपणं. यात आपल्याला एक अनुभव मिळतो जो आधी मिळालेला नसतो. तो परत मिळाला तरी त्याची किंमत नसते. मग हि व्हर्जिनिटी एकाच पद्धतीची असावी का ? म्हणजे भूक जशी शारिरीक , मानसिक, भावनिक, लैंगिक , आर्थिक असते तशी व्हर्जिनिटी नसते? मला वाटतं असते. म्हणून मी बऱ्याच गोष्टींमध्ये व्हर्जिन आहे अजून. ” ती बोलते. मला कळत नाही. माझी नजर अजून ती शर्ट मधून दिसणाऱ्या घळीमध्येच अडकली आहे.

मला आठवतं मी आजारी असताना तिने मला टी शर्ट बदलायला मदत केली होती. जसा स्त्रियांना स्पर्श कळतो तसा पुरुषांनाही कळतो. मला त्यात एक प्रकारची भूक स्पष्ट जाणवली. याचा सरळ अर्थ “सिग्नल” असा घेतला जातो हे मी लहानपणापासून शिकत आलोय. आताही मला सिग्नल मिळतोय. टी – शर्ट मधून.

“तुझं लक्ष कुठंय हे मला चांगलंच कळतंय. त्यात काही वावगं हि नाही. तुझ्या वयाला तर नाहीच.” असं म्हणून ती माझ्या शेजारी येऊन बसते. माझा हात हातात घेते.

आजपर्यंत बघितलेल्या असंख्य फिल्म्स आणि मित्रांकडून ऐकलेली वर्णनं माझ्या डोळ्यासमोरून तरळून जातात.

पण , हा स्पर्श वेगळा आहे. कोणासारखा ? आठवत नाहीये पण वेगळा आहे.

“तुझ्यासारख्याच कोणाच्या तरी प्रेमात होते मी. ज्याचं लक्ष तुझं आहे तिथेच होतं. आम्ही शरीराने जवळ आलो पण तो माझ्या मनाला स्पर्श करू शकला नाही. म्हणजे माझी खरी गरज तो समजू शकला नाही. नाहीच असं नाही पण त्यातलं कोवळेपण संपवून तो मला त्यात प्रगल्भ करू शकला नाही. त्यामुळे टेक्निकली मी व्हर्जिन नसले तरी अजूनही व्हर्जिन आहे असं तू म्हणू शकतोस.” ती म्हणते. मला काहीच कळत नाही.

मला एकच गोष्ट माहित आहे. त्या काळसर गुंत्यात मला पडायचं नाही.

“कधीही , शरीराची व्हर्जिनिटी मोडण्याआधी मुलीच्या मनाच्या व्हर्जिनिटी चा विचार करून बघ. इमरोज ची खूप छान कविता आहे.

हर किसी को नही
मन चाहे को हि पुरी औरत मिलती है
कुंवारापन औरत कि मर्जी होती है
कुंवारापन जिस्मनी हालत नही
ये मन कि हालत भी होती है
औरत अपना आप और अपना कुंवारापन
किसी भी सिर्फ सोने वाले मर्द को नही देती
अपनी मर्जी से जिस मर्द के साथ जगकर जिना है
उसको हि वो आपण कुंवारापन देती है
सिर्फ मन चाहे मर्द को हि पुरी औरत मिळती है
और किसीको नही “

मी ऐकून उगाचच माझ्या डोळ्यात पाणी येत. कोण असेल हिच्यासोबत असं वागलेला असं उगाच वाटून जात.

ती एकदम हिमालयासारखी दिसायला लागते.

आणि डोळ्यासमोर उगाचच आकार येत राहतात वेगवेगळ्या शरीरांचे. ज्याच्या मागे असलेलं खोल , विशाल काहीतरी कधी बघितलं गेलं नाही.

ती पुन्हा माझ्या हातावर हात ठेवते. मला आठवतं , माझ्या पहिलीतल्या बाई – त्यांच्या स्पर्श होता अगदी असाच , निरश्या दुधासारखा !

ती उठते , माझ्या डोळ्यात बघत टी शर्ट नीट करते. मी ओशाळतो. खरंच ओशाळतो. यावेळी मला अभिनय करावा लागत नाही.

ती उठून सामान घेऊन निघून जाते. आता मला त्या शरीराचा आकार दिसत नाही.

दिसते फक्त एक विलक्षण आकृती, पाठमोरी जाताना.

पूर्णपणे व्हर्जिन असणारी.

-पूजा

Image by Christoph from Pixabay 

Pooja Pathak
Latest posts by Pooja Pathak (see all)

Pooja Pathak

कम्प्युटर इंजिनियर, सध्या ह्युमन रिसोर्स विभागात कार्यरत. वाचनाची आणि लिखाणाची प्रचंड आवड. इतरही बरेच छंद - गायन, चित्रकला, मिमिक्री, स्केचिंग. क्रिएटिव्हिटी ला वाव असणाऱ्या सगळ्या गोष्टी करायला आवडतात. पेनपूजा हे स्वतः साजे लिखाण असणारे फेसबुक पेज Oct 2018 पासून चालवत आहे.

11 thoughts on “व्हर्जिन…

  • June 18, 2020 at 5:29 am
    Permalink

    Sundar Shabdat mandale aahes

    Reply
    • June 20, 2020 at 2:58 am
      Permalink

      व्वा, परफेक्ट

      Reply
    • June 28, 2020 at 5:57 am
      Permalink

      छान आहे 👌

      Reply
  • June 18, 2020 at 1:22 pm
    Permalink

    सुरेख,👌👌

    Reply
    • September 23, 2020 at 1:06 pm
      Permalink

      Perfect….

      Reply
  • June 22, 2020 at 9:21 am
    Permalink

    Mast ch nehmipramne arthpurn…

    Reply
  • July 2, 2020 at 6:12 am
    Permalink

    Good one Pooja. keep it up.

    Reply
  • July 9, 2020 at 12:26 pm
    Permalink

    Wah Pooja, masta ch….Imroj chi kavita adhi hi vachliye..

    Reply
  • July 16, 2020 at 1:43 pm
    Permalink

    Great
    The definition, what one want in life, imroj all great

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!