रिले कथा- लॉकडाऊन… अनलॉक नव्या आयुष्याचा- भाग १

भाग – १

“बरं ठीक आहे.” असं म्हणून समीरने फोन कट केला आणि डाव्या हातची मूठ दारावर आटपून म्हणाला, “उगाच आलो इथे. सौम्या म्हणत होती तेच बरोबर होतं. आत्ता यायलाच नको होतं इथे. गेले चार दिवस मुंबईला परत जाण्यासाठी किमान १०० तरी कॉल केले असतील. आणि आज तर काय लॉकडाऊन डिक्लेअर झालं म्हणजे सगळ्याच आशा संपल्या. तरीही मी चार फोन केले.”

“हे बघ पोरा तू शांत हो बघू आदि उगा डोसक्यास तरास कशाला करून घेतोस”, रखमाबाई त्याला समजावत म्हणाल्या.

“ए अग येडी का खुळी तू आss. तो रानात पडला हाय नव्ह हिथ मंग तरास हुनारच ना त्यास.” सखाराम काहीसा चिडूनच म्हणाला.

अगदी २ वर्षांचा होता समीर तेव्हा रखमा आणि सखाराम हे जोडपं त्यांच्या घरी कामासाठी म्हणून आलं आणि घरातलंच बनून गेलं. त्यांना मुलबाळ नव्हतं. पण समीर आणि त्याचा धाकटा भाऊ मिहीर या दोघांवरही त्यांचं जीवापाड ओरम होतं. मिहिरचा जन्म झाला तेव्हा अवघा अडीच वर्षांचा होता समीर त्यामुळे आईपेक्षा जास्त तो रखमा आणि सखाराम या दोघांजवळच असे. समीर शिकून इंजिनिअर झाला आणि मुंबईला एका चांगल्या कंपनीत नोकरीला लागला, तर मिहीर शिक्षणात यथातथाच होता त्यात शेंडेफळ म्हणून लाडवलेला. कसाबसा ग्रॅज्युएट झाला आणि त्याने गावातच किराणा मालाचं दुकान टाकलं.

कोकणातल्या इनामदारांच्या घराण्याला पैशाची कमी कधीच नव्हती. पण कूळ कायद्यात एक एक करून जमिनी गेल्या आणि हळूहळू वैभवाला ओहोटी लागली. पण जी जमीन हातात होती ती देखील काही कमी नव्हती.  बारमाही पाणी असणाऱ्या दोन विहिरी. वर्षाकाठी हजारो रुपये मिळवून देणाऱ्या सुपारीच्या बागा, सत्तर ऐशी नारळाची झाडं, दोन एकरमध्ये शेती आणि ४०/५० आंब्याची कलमं आणि गोठयतल्या गाई- म्हशी एवढं वैभव असणाऱ्या इनामदारांच्या या पिढीला मात्र त्याची फारशी जाणीव नव्हती. शहरापासून बऱ्यापैकी लांब असणाऱ्या गावात इंटरनेट पासून सगळ्या सुविधा होत्या.

समीरच्या मुलाला गेल्यावर्षी बारावीला उत्तम मार्क्स मिळाले आणि लगेच त्याला हव्या त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अॅडमिशन देखील मिळाली, म्हणून खास ग्रामदेवतेच्या पालखीसाठी समीर घरी आला होता. पालखीनंतर तो लगेच निघणार होता. पण सर्व तिकिटे फुल होती त्यात २२ तारखेचा भारत बंद आणि लगेचच झालेला लॉकडाऊन यामुळे समीर याच गावात अडकून पडला होता.

“तरी सौम्या म्हणत होती, ‘आत्ता या वेळेला नको जाऊस. उगाच अडकून पडशील’, तिचं ऐकायला हवं होतं. माझंच चुकलं.” समीर.

“समीर बाळा ऐक माझं तू नको त्रास करून घेऊस होईल काहीतरी व्यवस्था आणि नाही झाली तर राहा की इथे आनंदाने तुझंच घर आहे ना हे” समीरची आई त्याला समजावत म्हणाली.

“आई, प्रश्न इथे रहायचा नाहीये. माझी नोकरी आहे तिकडे तिचं के करू.”

“ए पोरा आता सगला बंद हाय तर तुझं हाफीस काय मोदी येऊन उघडणार हायत काय” सखाराम.

“घरून काम करावं लागेल त्यासाठी लॅपटॉप लागेल. इंटरनेट लागेल. इथे धड मोबाईलला रेंज नसते. नेट कुठून आणू? जाऊदे तुला नाही समजायचं. नोकरी गेली तर काय करू मी..” समीर.

“काका लॅपटॉपची चिंता नको करुस माझ्या मित्राच्या भावाकडे आहे लॅपटॉप. तो यंदाच बारावीला बसला होता. पुढे इंजिनिअरिंग करणार म्हणून त्याच्या काकाने त्याला आधीच लॅपटॉप घेऊन दिला आहे. तो नक्की देईल तुला लॅपटॉप.  आणि पाठीमागच्या अंगणात पेरूच्या झाडाजवळ नेटला रेंज पण येते चांगली. आणि गावात कदमांकडे वाय फाय आहे त्यांचं घर आपल्या मागच्या अंगणाच्या पलीकडेच बघू उद्या काय होतंय.”  मिहीरचा मुलगा शौर्य समजूतदारपणे म्हणाला.

“भाऊजी तुम्हाला ओटीवर झोप येत नसेल तर आमच्या खोलीत झोपा. मी झोपेन माजघरात आणि हे ओटीवर झोपतील” मिहिरची बायको.

“ए पोरी हा सखाराम जिता हाय अजून. पाठीमागली बाळंतिणीची खोली साफसूफ करून मच्छरदाणी बांधून ठेवली हाय. समीर झोपल तिकडं. तुझ्या खोलीत झोपला तर, त्या सावंतांच्या कोंबडीच्या आवाजन मध्यरात्री बी जाग येईल त्येला.”

“सखाराम कधी केलंस हे सगळं” इतका वेळ शांत असणारे समीरच्या बाबांनी आश्चर्याने विचारलं.

“कधी म्हंजी काय एका रात्रीत व्हतंय व्हय सगला. २२ तारखेक बातम्या बघितल्या त्याच टाईमला अंदाज आला व्हता समीर काय आता इतक्यात जात न्हाय मुंबईक. तेव्हापासून सगली तयारी केली. आणि कोपऱ्यावरल्या सान्यांच्या घरसून आज मच्छरदाणी आणली.”

“बरं आता झोप तू समीर. अडचणी खूप आहेत पण मार्ग पण निघतील. निदान रस्ता तरी समोर दिसतोय.” आई.

“हं असं म्हणून समीर खोलीत जाऊन आडवा झाला. सखा मामाने तयार केलेला पलंग आणि एकूणच सगळी व्यवस्था बघून समीर हरखून गेला आणि आपल्या बालपणाच्या आठवणींमध्ये हरवला.

“काय चुकीचं म्हणत होता सखा मामा? खरंच आपल्या घरातच तर आहोत आपण. कुठेतरी जंगलात अडकल्यासारखं का रिऍक्ट होतोय मी? हे माझं घर आहे. इथे सगळी माझी माणसं आहेत. आयुष्यात कुठलीच गोष्ट कधीच विनाकारण घडत नाही. प्रत्येक गोष्टीमागे काहींना काही हेतू असतोच. तसंच कदाचित माझ्या इथे अडकून पडण्यामागे पण काहींना काही कारण असेल. आणि नसलं तरी हरकत नाही या गावात इतके दिवस मी मुद्दाम रहायला आलोच नसतो. त्या निमित्ताने हे घर, घरातली माणसं, हे गाव ज्यांच्यापासून मी कित्येक वर्ष दूर आहे त्यांना नव्याने समजून घेऊ.”

सकारात्मक विचारांमुळे समीरच्या मनावरचा ताण कमी झाला आणि त्याला शांत झोप लागली.

सकाळी बाबांच्या शुद्ध स्पष्ट आवाजातली स्तोत्र कानावर पडली आणि समीरला जाग आली. खोली देवघराला लागून नसली तरी देवघरातले आवाज स्पष्टपणे या खोलीत येत होते. एरवी देवघरला लागून असणाऱ्या माजघरात आणि पुढच्या ओटी पडवीत कधीही देवघरातला आवाज येत नाही पण इथे मात्र सुस्पष्ट आवाज येतोय. क्षणात त्याच्या मनात आलं, ही बाळंतिणीची खोली. घरात दोन वेळा होणाऱ्या पूजेच्या वेळचे मंत्रोच्चार स्पष्टपणे बाळाच्या कानावर पडावेत म्हणून तर अशी योजना केली नसेल?

“आज माझंच घर नव्याने समजतंय मला”. असं म्हणत उठून तो मोरीजवळ गेला. सखामामाने मोरी अगदी स्वच्छ धुतलेली होती त्यामध्ये तोंड धुण्यासाठी वेगळं आणि पाय धुण्यासाठी वेगवेगळी पिंप आणि भांडी ठेवली होती.

खरं हायजीन तर इथेच मेंटेन करतात लोकं. नाहीतर आमच्या सोसायटीच्या टाक्या महिन्या दोन महिन्यातून एकदा धुतात. तेच पाणी आम्ही वापरतो. इथे रोज स्वच्छ विहिरीचं पाणी. बऱ्याच गोष्टी नव्याने जाणवतायत. आज जरा शेतात फिरून यायला हवं कदाचित आजपर्यंत अहंकाररुपी अभिमानाच्या झापडांमुळे या  डोळ्यांना जे दिसलं नाही ते आज बघू शकेन.

Image by mohamed Hassan from Pixabay

Manasi Joshi
Latest posts by Manasi Joshi (see all)

Manasi Joshi

कायद्याची पदवी. सात वर्ष लीगल फिल्डमध्ये काम केल्यावर नंतर स्वखुशीने स्वीकारलेला 'हाऊस वाईफ'चा जॉब. आवड म्हणून सुरू केलेलं लिखाण आता प्रोफेशनमध्ये बदललं आहे. सध्या अर्थसाक्षर.कॉम या वेबसाईटसाठी एडिटर आणि कंटेंट मॅनेजमेंटचं काम करते. - मानसी जोशी

5 thoughts on “रिले कथा- लॉकडाऊन… अनलॉक नव्या आयुष्याचा- भाग १

  • June 19, 2020 at 6:00 am
    Permalink

    Kokani lokanche barik nirikshan kele aahe, mast

    Reply
  • June 19, 2020 at 6:08 am
    Permalink

    Nice starting of the new story

    Reply
  • June 19, 2020 at 8:50 am
    Permalink

    सुरवात छान 👌👌

    Reply
  • June 22, 2020 at 1:23 pm
    Permalink

    छान सुरुवात 👍

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!