आठवणींची कातरवेळ – कल्लोळ भावनांचा_८
चार मिस्ड कॉल? उगाच प्यायलो एवढी. नेमकी अनु पण नाही इथे. कितीदा ओरडते ती लिमिट बाहेर पीत जाऊ नकोस.
च्यायला कोणाचे फोन होते एवढे काय माहीत. शेखरच असणार, उद्या त्याच्या कामाची डेडलाईन आहे. मरो, आत्ता डोकं प्रचंड दुखतंय. उद्या सकाळी निघायचं आहे आणि आत्ता माझी ही अवस्था आहे. अनूला कळलं तर चिडेल माझ्यावर. कातरवेळ खूप आवडते तिला. यावेळी सुंदर गाणी ऐकत, हलकीशी वाईन घेत अनुसोबत वेळ घालवणं म्हणजे जणू स्वर्गसुख. ती नसताना तिच्या आठवणीत तिच्यासाठी नवनवीन सरप्राईजेस प्लॅन करत निवांतपणे बसून रेड वाईन आणि जुनी गाणी अहाहा.. काय अल्टीमेट कॉम्बिनेशन. पण आज मात्र यातलं काहीही न करता मी फक्त ढोसत राहिलो.
जाऊ दे आत्ता फोन न करणंच योग्य. फोन अनुचा तर नसेल? संध्याकाळी तिचा फोन आउट ऑफ कव्हरेज म्हणून घरी फोन लावला तर, तिची आई म्हणाली बाहेर गेलेय. बाहेर म्हणजे कुठे गेली असेल? समुद्रावर? कातरवेळी समुद्रावर जायचं धाडस केलं असेल अनुने?
उद्या जायचंच आहे म्हणा तिकडे. तरीही मला का एवढी हुरहूर लागली त्यावेळी? पेग वर पेग रिचवत गेलो. भानच राहीलं नाही.
तुझ्या बाबतीत मी खूप पझेसिव्ह आहे ग अनु. लग्नाआधी तू आधीच्या रिलेशनशिप बद्दल सगळं सांगितलं होतंस. त्याचक्षणी प्रेमात पडलो तुझ्या. आपल्या मतांशी प्रामाणिक आणि आपल्या निर्णयाशी खंबीर राहणारी तू मला पहिल्याच भेटीत आवडून गेलीस. त्यावेळी तू जर तुझ्या पूर्वायुष्याबद्दल सांगितलं नसतंस, तर मी होकार दिला असता का तुला? तुझं स्थळ मावशीने सांगितलं तेव्हा माझा लग्नाचा अजिबात विचार नव्हता. केवळ फॉर्मलिटी म्हणून स्थळ बघायला गेलो. अगदी शेविंग पण केलं नव्हतं. तसंही नकारच द्यायचा आहे तर, कशाला आवरून तयार व्हा म्हणून शर्टही हाताला आला तोच निवडला. पण आपल्याला एकत्र बोलायला वेळ दिला तेव्हा तुझं करारी बोलणं, तुझा प्रामाणिकपणा सगळं काही आवडलं. आणि नकार द्यायच्या इराद्याने तुला बघायला आलेला हा मुलगा लग्नाची तारीख पक्की करूनच परत आला. पण तुझं काय अनु? तू स्वीकारलंस का कधी मला मनापासून?
तुझा स्वभाव बघता तू मला मनाविरुद्ध स्वीकारलेलं नाहीस, हे मी नक्की सांगू शकतो, पण तरीही तू मनापासून स्वीकारलंस का? हा प्रश्न उरतोच.
तुझ्या मनाच्या एका कोपऱ्यात आजही कुठेतरी “त्याचं” अस्तित्व आहे. मी तुला कधी याबद्दल विचारलं नाही आणि तू ते सांगितलंही नाहीस. तू नेहमीच डोक्याने विचार करणारी आणि मी मनाचा आवाज ऐकणारा. तू तुझ्या डोक्यातून त्याला दूर केलंस अनु पण मनातून नाही करू शकलीस.
मला खात्री आहे आजही तू त्याच्या आठवणीत समुद्रावरच गेली असशील.
हाच… हाच तो विचार ज्यामुळे आत्ता मी ड्रिंक घेतलं. तुझ्या बाबतीत मी खूप पझेसिव्ह झालोय अनू. तू दुसऱ्या कोणाचा विचार करणंही मान्य नाही मला.
शेखर ..साला त्याची प्रेयसी गेली म्हणून दुःखी आहे. पण जवळ असूनही दुराव्याची होणारी जाणीव खूप त्रास देते. अनु तू पूर्णपणे माझी कधी होशील ग. तुझ्या मनाचा कोपरान कोपरा मला हवाय. तू माझी आहेस अनू फक्त माझी….
नाही… आता पुन्हा दारू नको. मला वाटतं उद्या तिकडे जातोच आहे तर तिथे असेपर्यंत किमान एकातरी संध्याकाळी अनूबरोबर समुद्रावर जाईन. तिथे गेल्यावरच ती त्याला मनातून पूर्णपणे बाहेर काढू शकेल.
पण अनू येईल? ती नेहमी म्हणते तिला ज्या गोष्टींची भीती वाटते त्या गोष्टी ती आवर्जून करते. बस याच गोष्टीचा फायदा करून घ्यायचा. पुन्हा समुद्रावर जायचं तिला त्या जागेच्या आठवणींतून बाहेर काढायचं असेल तर त्याच ठिकाणी नवीन आठवणी निर्माण कराव्या लागतील. येस… हेच परफेक्ट आहे.
मी येतोय अनू, नवीन स्वप्न घेऊन तुझ्या आणि माझ्याही आयुष्यातल्या या दुःखाला दूर करायचं आहे मला…. आणि मी ते करणारच!
– समाप्त
- माझी होशील का? - October 1, 2021
- काव्यांजली- शेवटचा भाग - February 12, 2021
- काव्यांजली- ४ - February 2, 2021
Awesome story 👌