भूल…
तो बोलण्याचा आवाज अजूनही लांबूनच येत होता. एक शंभर मीटर अंतरावर कोणीतरी बोलतंय , कोणीतरी हसतंय , असं अस्पष्ट ऐकू येत होतं. ती पळून पळून अगदी थकून गेली होती. कोणीतरी माणूस दिसेल , काहीतरी वस्ती लागेल म्हणून ती उर फुटेस्तोवर धावत इथवर आली होती.
तिने मागे वळून बघितलं. जिथून ती निघाली , त्या घराजवळच्या झाडाचा बुंधा अजूनही दिसत होता अंधुक अंधुक. हवेत गारवा असला तरी पळाल्याने कपाळावरून घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. हातानेच डोकं पुसून ती क्षणभर थांबली. क्लिप काढून केस गुंडाळून वर बांधले , आणि आजूबाजूला बघत राहिली. मानेला गार वाऱ्याचा स्पर्श झाला आणि तिला जरा हायसं वाटलं.
ती विचारात पडली. पुढे जावं कि नाही ? कितीतरी वेळ ती मागे पुढे बघत राहिली. आवाज अजूनही येत होता. तिने किंचित आवाजाचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला, शिव्या वगैरे ऐकू येतायेत का ? म्हणजे त्यावरून कळेलच माणसं कशी आहेत ते. नुसता अस्फुट हसण्याचा आवाज येत राहिला.
शेवटी तिने एकवार डोळे गच्च मिटले आणि ती पुढे निघाली. जे होईल ते होईल.
कितीतरी वेळ ती त्या नागमोडी रस्त्यावरून चालत राहिली. पाऊण तास ती नुसतीच चालत होती. बोलणारी माणसं जंगलात गायब झाली होती बहुतेक. त्याचा काहीच कानोसा नव्हता. नाही म्हणायला अगदी ५० मीटरांवर एखादी सायकल गेल्याचा आवाज एक दोनदा आला खरा, पण फुफाट्यात कशाला जा ? म्हणून ती पुढे चालत राहिली.
वेळ गोठल्यासारखी झाली होती. चंद्र अजूनही तिथेच, तसाच होता. वाराही तोच, तसाच. झुळूक. मोजून १२४ सेकंदांनी. हो, तिने मोजून ठेवलं होतं.
आपल्याला वेड लागलंय का ? तिला क्षणभर वाटलं. आता चालून चालून आपण चक्कर येऊन पडणार असं वाटत असताना समोर कंदिलाचा किंचित उजेड दिसला. भराभर पावलं पडली, आणि हो- ते घर च होतं !
चांगलं राहतं घर दिसत होत. बाहेर एक खाट होती, दारात सरपण , आणि अंगण चांगलं सारवलेलं होतं.दिवे बंद होते.
ती पळत अंगणात आली आणि दाराची कडी वाजवू लागली. अचानक आतून कडी उघडल्याचा आवाज आला.
तिने दार ढकललं. आत पूर्ण अंधार होता. समोर माजघर दिसत होतं. त्याचा उंबरा चंद्राच्या प्रकाशात चमकत होता. ती हळूहळू आत शिरली.
“येऊ का आत ? कोणी आहे का ?” विचारत ती एक एक पाऊल टाकू लागली.
माजघर पूर्ण अंधारलेलं होतं. आत जुनाट धान्य ठेवलेल्या पोत्याचा वास, कोंड्याचा धुरळा भरून राहिला होता. तिथून पुढे अजून एक खोली होती.
काहीवेळ असं च घरात फिरून झाल्यावर तिच्या डोक्यात वीज चमकली. “घरात कोणीच कसं नाही ? आणि मग दार कसं उघडलं?” अंधारात तिला विचाराने घाम फुटला. एक शिरशिरी थेट मेंदूत गेली.
मागे वळून बघितलं. सगळं अंधार होता. अंदाजाने ती जिथून आली तिथून मागे फिरली पण आता सगळीकडे अंधार होता. एका उंबऱ्यातून दुसऱ्या खोलीत, दुसऱ्यातून तिसऱ्या, अशी ती भिंतीच्या आधाराने जात राहिली.
आता तिला अगदी रडू यायला लागलं. कितीतरी वेळ ती तशीच बसून राहिली. इतक्यात तिला पायापाशी मऊसर हालचाल जाणवली.
जोरात किंचाळून तिने पाय जवळ ओढले , इतक्यात मांजराचा बारीक आवाज आला. ते मांजर तिच्या अंगाशी घुटमळू लागलं.
कोणीतरी सजीव आपल्या सोबत आहे, या विचारानेच तिने एक सुस्कारा सोडला. हलकेच मांजरीच्या पाठीवर हात ठेवला , तसं ते अजून जवळ आलं. पाठीवरून वर घेत घेत तिचा हात मांजराच्या डोक्यापाशी आला आणि ..
त्या मांजराला डोकं च नव्हतं.
तिच्या हाताला लागलं ते एक हाड. दुसऱ्या हाताने तिने चाचपून बघितलं. तिला त्याचा पाय लागले. मग ते ओरडतंय कुठून ? तिने आहे त्या शक्तीनिशी त्या मांजराला दूर ढकलले आणि घरात पळत सुटली. अस्ताव्यस्त, अंधाधुंद.
शेवटी एका खोलीतून तिला प्रकाशाचा कवडसा दिसला. ती त्या दिशेने धावत सुटली. हो, पलीकडच्या खोलीत दार उघडं होतं!
ती पळतच त्या दारातून बाहेर आली, आणि मागे न बघता पळू लागली …
काही अंतर गेल्यावर तिला काही माणसांचा आवाज आला. त्या दिशेने ती वेड्यासारखी धावत सुटली. बरंच अंतर झाल्यावर तिने वळून मागे बघितलं.
जिथून ती निघाली , त्या घराजवळच्या झाडाचा बुंधा अजूनही दिसत होता अंधुक अंधुक. हवेत गारवा असला तरी पळाल्याने कपाळावरून घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. हातानेच डोकं पुसून ती क्षणभर थांबली. क्लिप काढून केस गुंडाळून वर बांधले , आणि आजूबाजूला बघत राहिली. मानेला गार वाऱ्याचा स्पर्श झाला आणि तिला जरा हायसं वाटलं.
तिचं लक्ष आकाशाकडे गेलं. आकाशात चंद्र अजूनही तिथेच होता. दुरून माणसांचा आवाज येत होता. १०० मीटर वरून असेल. समोर नागमोडी रस्ता. इतक्यात वाऱ्याची झळुक आली.
ती डोळे बंद करून उभी राहिली. परत एकदा वाऱ्याची झुळूक आली. तिने घाबरून डोळे उघडले.
१२४ सेकंद झाले होते!
Image by Sergey Gricanov from Pixabay
- दिवाळी २०२० स्पेशल- १९ - November 27, 2020
- दिवाळी २०२० स्पेशल- ३ - November 13, 2020
- पाडस - October 23, 2020
mast.
मस्त