रिले कथा- लॉकडाऊन… अनलॉक नव्या आयुष्याचा- भाग २

भाग – २

समीरने तोंड धुतले आणि स्वयंपाकघरात गेला. त्याची आई नाष्ट्याची तयारी करत होती. रखमाबाई त्यांना मदत करत होत्या. समीरची चाहूल लागताच मधुरा म्हणजे मिहीरची बायको म्हणाली

“झाली का झोप भाऊजी? शांत झोप लागली ना”?

समीर “हो छान झोप लागली. बर्‍याच दिवसांनी बाबांच्या स्तोत्रपठणाने जाग आली. मस्त सुरुवात झाली सकाळची”

तेवढ्यात बाबा बाहेर आले आणि म्हणाले “अच्छा म्हणजे आमच्यामुळे झोपमोड झाली का साहेबांची?”

बाबांच्या मिश्कील बोलण्याने समीर म्हणाला “नाही हो बाबा. उलट छान फ्रेश सुरुवात झालेली आहे दिवसाची”

तेवढ्यात मधुरा म्हणाली “भाऊजी बसा हं झोपल्यावर. मी पटकन तुम्हाला चहा करुन देते”

समीर बाहेर जाऊन झोपाळ्यावर बसला. मीहीरची दुकानावर जायची गडबड सुरू होती. समीरला पाहून तो म्हणाला “अरे दादा उठलास लवकर. झोपायचेस ना जरा. तुला मुंबईत नेहमी घड्याळाच्या काट्यावर पळावे लागते ना”

समीर “ते तर आहेच रे. पण इथे झोप शांत झाली. त्यामुळे जाग आली”

तेवढ्यात मधुरा चहा आणि खारी घेऊन आली. समीर आणि मीहीर दोघांनी चहा आणि खारी घेतली. मीहीर दुकानात निघून गेला.

समीर आंघोळीला गेला. आंघोळ करुन तयार होऊनच बाहेर आला. तेवढ्यात त्याची आई म्हणाली

“अरे आवरुन कुठे जायची तयारी? तुझा आवडीचा नाष्टा तयार आहे”

समीर “अगं जरा शेताकडे फेरफटका मारुन येतो. तिकडे मुंबईत घराच्या बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. इथे निदान ते तरी सुख आहे. बरं नाष्टा काय बनवलं आहेस”

आई “अरे म्हटलं ना तुझ्या आवडीचा नाष्टा आहे. गुरगुट्या भात, तूप, पोह्याचा पापड आणि लिंबाचं लोणचं”

समीर “अरे वा मस्तच. फक्त एक चुकलं गं आई. मला लिंबाचं लोणचं नाही, कैरीचं लोणचं आवडतं. विसरलीस काय? मीहीरला लिंबाचं लोणचं आवडतं”

आई “अरे हो खरंच की. आता म्हातारी झाले बघ मी”

असे म्हणताच सगळे हसले. समीरने आईची लोणच्याच्या बाबतीत निदर्शनास आणून दिलेली चूक पाहून मधुराची एक भुवई किंचीत वर गेली. आता या पुढे इथे आहेत तोपर्यंत आणखी हे काय काय बोलतात असा त्याचा आतला अर्थ होता पण ती पटकन म्हणाली

मधुरा “थांबा आई मी वाढते कैरीचं लोणचं”.

समीरने नाष्टा केला आणि जरा टीव्ही वरती बातम्या पाहू लागला. शहरातील सगळे सुनसान रस्ते पाहून ही तीच शहरं आहेत का जी दिवसरात्र धावत असतात असा त्याला प्रश्न पडला. रामायणची वेळ झाली म्हणून बाबांनी दूरदर्शन लावले आणि समीरने सौम्याला फोन लावला आणि तिथली परिस्थिती काय आहे हे विचारले. सोसायटीने बाहेरुन येणार्‍या कामवाल्या मावशी किंवा पेपरवाले किंवा इणर कोणत्याही कामाला येणाऱ्या सर्वांना सोसायटी मधे प्रवेश बंदी केली होती. अर्थात एका परीने हा निर्णय सर्वांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्यच होता.

फोन झाला आणि तो सखा मामासोबत शेताकडे चक्कर मारायला गेला. वाडीतून शेताकडे जाताना त्याला इकडे तसा कोरोनाचा प्रादुर्भाव आहे असे जाणवलं. आपण सुरक्षित ठिकाणी आहोत हे जाणवले. आंब्याच्या आणि सुपारीच्या बागेतून चक्कर मारताना त्याला बालपणीच्या असंख्य आठवणी त्याला आठवत होत्या.

समीर “मामा तुला आठवतंय या कलमांच्या बागेत मिहीर आणि मी किती वेळ खेळत बसायचो. कित्येकदा तू रागावून आम्हाला घरी न्यायचास.”

“व्हय तर बाला. सगला सगला आठवतय. तुज काय आवडता अन काय नाय ता का काय माज ठाऊक नाय व्हय ?” मामाच्या त्या प्रेमळ बोलण्याने समीर खुलला. कित्येक दिवसांनी तो ते गावाकडील लोकांचे प्रेम आणि त्यांच्या बोलण्यातील गोडवा अनुभवत होता. हे सारं त्याला हवहवसं वाटत होतं.

मामासोबत गप्पा रंगल्या आणि कधी दुपार झाली ते कळलंच नाही. मग मामा आणि तो घराकडे निघाले. घरी पोहचले तोच आई म्हणाली, “पहिले हात पाय धुवा रे. अन साबणाने हात धुवा”

समीरने मान डोलावली आणि हात पाय धुवून आत गेला. पाहतो तो शौर्य त्याच्याकडे पाहून हसत होता.

समीर “काय रे? का हसतोस?”

शौर्य “काही नाही काकासाहेब तुमचे काम झाले”

समीर “म्हणजे?”

शौर्यने त्याच्या मित्राचा लॅपटॉप, चार्जींग केबल टेबलवर ठेवलेला दाखवला. त्याच्याचजवळ एक वही, लिहायला पेन, पेन्सिल वहीच्या आतल्या पानावर  वायफायचा पासवर्ड. ही सगळी जय्यत तयारी बघून समीर खुपच खुश झाला.

समीर “अरे व्वा शौर्य. तुला एक छान गिफ्ट आता माझ्या कडून”

ते ऐकून मधुराने लगेच कान टवकारले.

समीर “शौर्य मला वायफायची कुठे रेंज येते मागच्या अंगणात ते दाखवशील? अन मला टेबल मागे न्यायला मदत करशील?

सखा मामा म्हणाला “काही चिंता नको करु. मी तुझं आफिस शेट अप करुन देताव”

समीर “अरे व्वा मामा. तुला तर अॉफिस सेटअप वगैरे सगळं माहीत आहे? लॉकडाऊन संपला की मुंबईला चल माझ्याबरोबर!”

ते ऐकुन मधुरा म्हणाली “अहो भाऊजी एकवेळ शौर्यला घेवून जा. मामा काय करणार तिकडे”

मी तिकडे गेलाव तर हितलं कसं व्हयाचं म्हणून म्हणत्येस ना ग बाय माझी?”

सगळे मोठ्याने हसले. मधुराची एक भुवई मात्र ताडकन वरती गेली.

जेवण तयार असल्याची वर्दी आल्यावर सगळे स्वयंपाक घराकडे गेले.

– अभिजीत इनामदार

Image by mohamed Hassan from Pixabay

Abhijit Inamdar

Abhijit Inamdar

लेखक परिचय : नाव- अभिजित अशोक इनामदार. सातारा जिल्ह्यातील म्हासुर्णे माझे बालपण हे (वयाची पहिली १४ - १५ वर्षे) हे खेडेगावामध्ये गेले. मी इंजिनिअरिंग केले असून एमबीए इंटरनॅशनल मार्केटिंग मध्ये केले आहे. नोकरीनिमित्त बऱ्याच ठिकाणी फिरून झाल्यानंतर सध्या पुणे येथे वास्तव्यास आहे. लहानपणापासूनच मला कला क्षेत्राबद्दल जिव्हाळा आहे. काही नाट्यप्रयोग तर काही म्युझिकल शोज चे अँकरिंग केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आपणही काहीतरी लिहू शकतो याची मनाला आस लागून राहिली होती अन म्हणूनच मग फेसबुक वर २०१२ पासून लिखाण सुरु केले. माझे क्षेत्र जरी यांत्रिकी असले तरी लिखाणामुळे नवी उर्जा मिळते.

One thought on “रिले कथा- लॉकडाऊन… अनलॉक नव्या आयुष्याचा- भाग २

  • June 22, 2020 at 1:28 pm
    Permalink

    मस्त आहे कथा 👌

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!