असेन मी, दिसेन मी…
सॅल्यूट.
दिलसे..
हॅटस् आॅफ टू यू शेवते सर..
खरंच ग्रेट आहात तुम्ही.
हे म्हणजे एल. आय. सी. वाल्यांसारखं झालंय.
जिंदगी के साथ भी अन् जिंदगी के बाद भी !
आठवतोय तर..
तो काॅलेजचा पहिला दिवस.
एकदम मुन्नाभाईवाला अॅटमाॅसफीयर.
डर तो सबको लगता है !
ईथं आलोय खरं.
आगे ?
हे सगळं झेपणार का मला ?
की या ओझ्यापायी मी कायमचा झोपणार ?
जाम टेन्शन आलेलं.
तुम्ही असेंब्ली हाॅलमधे आलात.
पाचच मिनटं आमच्याशी बोललात.
और जादू चल गया !
पटलंच…
मी , तुम्ही,आम्ही, आपण सगळे कुणीतरी स्पेशल आहोत.
आॅलवेज आॅन ड्यूटीवाले.
तो पांढरा अॅपरन.
गळ्यातला स्टेथोस्कोप.
सगळं स्पेशलच.
दैवाशी लढायचं.
रोग्याला बरं करायचं.
पुन्हा रोगाची बाधा होऊच नये म्हणून काळजी घ्यायची.
रोगी निरोगी झाला की आपण जिंकलो.
या दैवी कार्यासाठी त्या परमेश्वराने आपली निवड केली…
म्हणून, म्हणूनच….
त्या देवदेवेश्वराचे मनापासून आभार मानायचे.
बाकी एरवी कशात गुंतून पडायचं नाही.
जन्म मृत्यु आपल्याला सगळे सारखेच.
आनंद नाही की दुःख नाही.
आपण आपली ड्युटी करायची.
ईन्हें दवाओंकी नही दुआओंकी जरूररत है !
हे फिल्मी डायलाॅग सिरीयसली नही लेनेका !
पेशंट कितीही सिरीयस असो…
आपण हिंमत हरायची नाही !
आखिरी दम तक !
डाॅक्टरकीच्या सिलॅबसमधे हे सगळं येतं बरं का …
जीवनदीप मेडिकल फाऊंडेशनचं हे मेडिकल काॅलेज.
पाच सहा वर्षांपूर्वीच सुरू झालंय.
आदिवासी पाड्यावरच.
या भागातलं पहिलंच.
समाजातल्या काही दानशूर लोकांच्या पाठिंब्यावर.
आणि थोडी फार सरकारी मदत.
सगळंच अपुरं आहे.
ईमारत, आॅपरेशन थिटेअर, एक्स रे, सीटी स्कॅन, वीजपुरवठा, ऊपकरणं, प्रयोगशाळा, सुविधा, स्टाफ आणि बरंच काही.
जे जे अत्यावश्यक आहे ते ते ईथं अपुरं आहे.
सरकारदरबारी आत्ता कुठं दखल घेतली गेलीय.
हळूहळू सरकारी मदतही मिळू लागलीय.
एवढं सगळं अपुरेपण असलं….
तरीही अपुरी नाही ती जिद्द.
स्वप्नांच्या हात धूवून धूवून मागे लागणं.
ती पुरी होईपर्यंत टाईमप्लीज न म्हणणं.
आणि चुकून एखादं स्वप्नं पुरं झालंच तर…
नव्याने नव्या स्वप्नाच्या मागे धावणं.
डाॅ. शेवते आयुष्यभर नुसते हे असे पळतायेत.
तुम्ही एकदा भेटाच त्यांना.
त्यांच्या डोळ्यात तुम्हाला ऊद्या दिसेल.
या आदिवासी पट्ट्यासाठी मोठं मेडिकल काॅलेज.
सुसज्ज हाॅस्पीटल आणि बरंच काही.
अभी तो शुरूआत है !
साथीचे रोग..
ईथे सहज पसरतात.
आम्ही सगळे बळी पडलोय.
आम्हाला सुद्धा ते आमचंच स्वप्नं वाटतंय.
खरं सांगतोय.
पाच वर्ष.
दिली…
आमच्या सगळ्यांचं ठरलंय.
दिलसे.
आम्ही सगळे डाॅक्टर झालो की,
पहिली पाच वर्ष ईथेच थांबणार.
कमीत कमी पाच वर्ष.
प्रत्येक बॅच.
हेच काॅपी पेस्ट करणार…
हा आदिवासी पट्टा पूर्णतः निरोगी, सुदृढ झाल्याशिवाय,
शेवते सरांना झोप यायची नाही.
ईथल्याच आदिवासी भागातला हा माणूस.
एवढा शिकलेला, डाॅक्टर झालेला पहिला माणूस.
गोल्डमेडलिस्ट.
मनात आणलं असतं तर…
पर नही.
मातीला नाही विसरला.
ईथे परत आला.
आमची माती, आमची माणसं…
रोजची नवी लढाई.
जिंकायचीच.
हरलोच तर पुन्हा जिंकायच्या तयारीनं.
पुन्हा ऊभं रहायचं.
ईथला मरणाचा पाऊस.
दारिद्रय, कुपोषण, रोगराई आणि..
हे अपुरं होतं म्हणून.
तो नव्याने जन्मलेला विषाणू.
आभाळच फाटलंय.
किती ठिगळं लावणार ?
लढतोय..
जमेल तितकी काळजी घेतोय.
ईथली खेड्यातली लोकं साधी भोळी.
बरंचसं ऐकतात.
सिच्यूएशन अंडर कंट्रोल..
अजून एकही बळी नाही.
असाच पाठीशी रहा रे देवा.
गेले सहा महिने.
आमचा एक प्राॅब्लेम झालाय.
सेकंड, थर्ड ईयरवाल्यांचा तर फारच प्राॅब्लेम झालाय.
बाॅडीच मिळत नाहीये.
डिसेक्शन रूम मरायला टेकलीय.
डेड बाॅडी असली तरी तिला जीव असतो.
एका लिमीटपेक्षा जास्त नाही.
नंतर डेड बाॅडी सुद्धा संपून जाते.
नवीन बाॅडी मिळायलाच हवी.
एक तर आमचं गाव आडरानातलं.
बेवारस, अॅक्सीडेन्ट फारसे नाहीत.
देहदानाविषयी जागृती नाही.
डाॅ. शेवते, ईतर स्टाफ आणि आम्ही.
आम्ही सगळ्यांनी देहदानाचा फाॅर्म भरलाय.
आता काय ?
कुणी जायची वाट बघायची काय ?
ऊसी के वास्ते…
साधारण महिन्यापूर्वी.
डाॅ.शेवते मुंबईला गेले.
परत आले मागच्या आठवड्यात..
नेहमीसारखा हसरा प्रसन्न चेहरा.
डोळे मिटलेले.
कायमचे.
म्हणजे…
त्यांची बाॅडी.
अॅनाटाॅमी डिपार्टमेंटला गिफ्ट.
गेला आठवडाभर…
सेकंड आणि थर्ड ईयरची प्रॅक्टीकल्स त्यामुळेच सुरू…
बाॅडी मिळाली नसती तर…?
खरंच ग्रेट आहेत सर..
म्हणजे होते..
नाही आहेत अजून.
फाॅरएव्हर.
म्हणून तर..
असेन मी , नसेन मी..
हॅटस् आॅफ टू हीम.
कालच त्यांचा मुलगा आलेला.
सगळे गळ्यात पडून रडलो त्याचा.
कुणाच्या तोंडातून शब्द फुटेना..
“सरांना ईथे परत पाठवताना काहीच वाटलं नाही ?”
भीत भीत विचारलं त्याला.
येडछाप.
तो बघतच बसला.
वेड्यासारखा.
त्याला काहीच कळेना.
वेडा कुठचा ?
त्याच्या डोळ्यात दिसलं आम्हाला.
त्याच्यासाठी..
त्याच्यासाठी आम्ही वेडे होतो.
घाबरत घाबरत एवढंच म्हणाला.
” मुंबई.
पुन्हा मुंबईचं तोंड नाही बघणार.
तिथंच विषाणूची लागण झाली बाबांना.
पंधरा दिवस लढत होते.
शेवटी हरले.
आठवड्याभरापूर्वीच वारले.
प्लॅस्टीकमधे गुंडाळलेली बाॅडी.
आम्हाला बघायला सुद्धा मिळाली नाही.
तिथंच स्मशानात नेऊन जाळली म्हणे..”
आमच्या कानात काहीच शिरत नव्हतं.
सगळं टॅन्जन्ट चाललेलं.
एवढ्यात अॅनाटाॅमी डिपार्टमेंटचा सदू धावत आला.
डिसेक्शन रूम तोच सांभाळायचा.
घाबरत घाबरत एवढंच म्हणाला.
” ती आठवडाभरापूर्वी आलेली बाॅडी..
सर, सर गायब झालेत “
तो तिथं तसाच ऊभ्या ऊभ्या कोसळला.
असेन मी, नसेन मी !
……कौस्तुभ केळकर नगरवाला.
Image by Gerd Altmann from Pixabay
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)
- घरघर….. - October 4, 2021
- ‘स्कूल चले हम ! - September 22, 2021
- चष्मा - July 12, 2021