रिले कथा- लॉकडाऊन… अनलॉक नव्या आयुष्याचा- भाग ४
भाग – ४
“समीर जेवण तयार आहे रे. येतोस ना पटकन” आईच्या या आवाजाने समीर भानावर आला. सखा मामाने त्याच्यासाठी तयार केलेल्या त्याच्या नेचर अॉफिस मधून तो उठला. नेचर अॉफिस म्हणजे मागच्या अंगणात झाडाखाली लावलेले टेबल, खुर्ची, लॅपटॉप चार्जींगसाठी इलेक्ट्रिक कनेक्शन, दुपारच्या उन्हाचा वेळेसाठी बॅटरीवर चालणारा छोटासा टेबलफॅन, दुपारी उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून चादर टाकून मंडपासारखी केलेली व्यवस्था. हे सगळे पाहून सगळ्यांनी त्याला नेचर अॉफिस असे नाव दिले होते.
हात पाय धुवून तो घरात गेला. जेवणात आज डाळिंबीची उसळ, आईच्या हातच्या गरमागरम घडीच्या पोळ्या पाहून तो क्षणभर बाकी सगळे विसरला आणि जेवण करु लागला. त्याला असे मनापासून जेवण करताना पाहून आई आणि रखमा दोघीही सुखावल्या. त्यांचं ते कौतुकाने पाहणे कोणाला आवडत नव्हते ते मधुराला. तेवढ्यात मीहीरही जेवायला आला. त्यालाही तेवढ्यात प्रेमाने वाढणार्या आई पाहून मात्र तिला बरे वाटले.
जेवण करुन समीर आणि मीहीर दोघेही उठले. दोघे बाहेर ओसरीवरच्या झोपाळ्यावर बसले. समीर जमीनीची तसेच वाडीत असलेल्या घराची परिस्थिती कशी आहे हे आज अचानक का विचारतो आहे हे मीहीरला कळत नव्हते. पण मिहीरने सगळे मनमोकळ्या पणाने सांगितले. त्यानंतर तो थोडावेळ पडला. समीर मागच्या अंगणात आला आणि अॉफिसमधे जाऊन बसला. आजच्या मिटींग्ज संपल्या होत्या. विशेष असे काम नव्हते. काहीतरी सुचले म्हणून तो उठला आणि बाहेर पडला.
सखा मामला सोबत घेऊन तो वाडीकडे निघाला. वाडीमधे आल्यावर तो घराकडे वळला तसा मामा म्हणाला “तिकडे खंय चाललास बाला”?
समीर “हे घर कसं आहे ते बघायचं आहे मामा”
आत जाऊन त्याने दार उघडून घर पाहिलं. बरेच दिवस कोणी आले नसल्याचे लगेच जाणवत होते. पण झाडलोट केली तर अगदी लगेच वापरात येण्यासारखे घर. गावातल्या घराएवढेच हे पण घर. तसेच मागेपुढे अंगण. फक्त थोड्याफार सोयीसुविधा कमी कारण इथे कोणी कायमस्वरूपी येऊन राहिले नव्हते. मागचे अंगण वगैरे सगळे पाहून बाहेर आलेल्या समीरच्या डोक्यात काहीतरी चालू आहे हे सखा मामाने लगेच ओळखले. पण त्याने काही सांगितल्या शिवाय काही विचारायला नको म्हणून तो गप्प बसला.
तेवढ्यात समीरचा फोन वाजला. सौम्याचा फोन होता. त्याने फोन उचलला.
सौम्या “काय रे जेवण करुन फोन करणार होतास. काय झाले? आणि अॉनलाईन दिसला नाहीस म्हणून मग फोन करावा. बाकी माहेरी जाऊन आईच्या हातचं जेऊन बायको मुलाची आठवण पण येत नाही का?”
समीर “नाही गं. तसं काही नाही गं. पण एक काम होते म्हणून वाडीत आलो होतो. त्यामुळे अॉनलाईन नाही.”
सौम्या “का रे अचानक वाडीत”
समीर “काही नाही गं. जरा अॉफिसच्या कलीग्जना वाडीतले फोटो हवे होते. कालच्या कॉलमधे बॉसपण म्हणाला होता म्हणून आलो होतो.”
सौम्या “त्या बाबतीत तू लकी आहेस. इथे सगळे अवघड होत चालले आहे.”
समीर “मी कशाच्या बाबतीत लकी आहे?”
सौम्या “अरे तुला तिथे जास्त टेन्शन नाही. आई बाबा, सखाराम मामा आणि मामी, भाऊजी मधुरा आहेत. तुला विशेष काम नसेल. इथे काम करुन करुन माझी परिस्थिती अवघड झाली आहे.”
समीर “मला काम करावे लागते मॅडम. मी पाणी भरतो. मागचे अंगण कम अॉफिस मीच साफ करतो. म्हणजे आधी मधुरा किंवा मामाच करायचे पण मीच म्हणालो अरे मला काही तरी करु द्या. नुसते बसून बसून वाट लागेल माझी.”
सौम्या “मला तर घरातले आवरुन परत अॉफिसचे काम. मी आणि मनु देखील तिकडे यायला हवे होते असे आता वाटायला लागले आहे. तिथे निसर्गाच्या सान्निध्यात आणि महत्वाचे म्हणजे आपण सगळे एकत्र असतो तर किती बरे झाले असते”
समीर “माझ्या पण मनात पण हाच विचार आला होता आत्ता. पण काय गं इथेच रहायला असतो आपण तर?”
सौम्या “तर खरंच आवडले असते. आता हे दगदगीचे आयुष्य नको वाटते आहे”
समीर “आता या परिस्थितीत ठीक आहे गं. पण तिथली सगळी लाईफस्टाईल सोडून इकडे यायचे म्हटले तर बर्याच काही गोष्टी सोडायला लागतील.”
सौम्या “हो ते तर झालेच. लेकीन कुछ पाने के लिये कुछ खोना तो पडता है.”
समीर “यू सिरीयस सौम्या? म्हणजे समजा आता कोरोनाचे निमित्ताने सोडून दे. पण सगळे नॉर्मल झाल्यावर सुद्धा मुंबई सोडून इथे येऊन रहायला आवडेल? इथे ना मॉल्स, मुंबई सारखी हॉटेल्स, मल्टिप्लेक्स ना इतर काही सुविधा”
सौम्या “खरं तर नाही माहित मला. पण कधी कधी तीकडची लाईफस्टाईल बरी वाटते. पण मग आता तू म्हणालास तशी इकडच्या लाईफस्टाईलची सवय कशी सुटणार? अन एक मिनीट… तू हे असे का विचारतो आहेस? तू असे काही करणार आहेस का?”
समीर “अगं सहज विषय निघाला म्हणून विचारले. अन तुला माहिती आहे का परवा शेजारच्या गावात पुण्यातून आलेले दोघे पॉझिटिव्ह निघालेत. म्हणजे आता कोकणात पण शिरकाव झाला आहे या कोरोनाचा. शिवाय परवा मावशी म्हणाली रत्नागिरीत देखील काही रुग्ण सापडलेत. एकुणच अवघड होत चालले आहे. त्यामुळे आता इथे सगळे सेफ आहे असे काही नाही”
सौम्या “बापरे म्हणजे अवघडच आहे. पण तू काळजी घे. अन आता बाहेर फिरु नको. अन काय रे वाडीतले घर कसे आहे रे? आपण लग्नानंतर त्या घरात राहिलो होतो ते अजूनही आठवते.”
समीर “अगं आता तेच घर पाहिले. पहिल्या सारखे तसेच आहे घर. ऐक मी तुमची इकडे यायची व्यवस्था होते का ते पाहतो.”
सौम्या “बघ ना प्लीज. आय एम मिसिंग यू लॉट”
समीर “बघतो आणि कळवतो”
फोन ठेवून तो आणि सखा मामा घराकडे गेले. समीर मागच्या अंगणात आहे हे पाहून सखा मामाने समीरच्या बाबांना आता वाडीत काय झाले ते सांगितले. समीरचे बाबा आश्चर्यचकित झाले. समीरच्या डोक्यात काय चालू आहे हे कळायला मार्ग नव्हता. तिकडे समीर त्याच्या कलीग्जना वाडीचे आणि वाडीतील घराचे फोटो दाखवत होता. या सगळ्यात जास्त कोणी अस्वस्थ झाले असेल तर मधुरा.
जे केवळ वर्षाकाठी ८ – १५ दिवस गावाकडे येतात ते जर इकडे येऊन राहिले तर? आपली सगळी सत्ता जाणार? अन आपल्या शौर्यचे कसे होणार? मारे ऐटीत सांगितले होते भाऊजींनी बारावीनंतर तुला मुंबईला कॉलेजला अॅडमिशन घेऊ. आता तेच इकडे आले तर माझा शौर्य कसा राहील तिकडे. तो इथे गावात राहिला वाढला आहे. त्याचे मुंबईत कसे होईल? किंवा आता त्याला इथेच शिक्षण घ्यावे लागेल? त्यांचा मनु जाईल पुढे शिक्षण घ्यायला परदेशी माझ्या मुलाचे काय? अन मिहीरतर काय कशात नसल्यासारखेच राहतात. आज रात्री बोललेच पाहिजे त्यांच्याशी.
रात्री जेवणं झाल्यावर मधुरा मीहीरला मागच्या अंगणात घेऊन गेली. हे जरा समीर आणि आईला खटकले तरी सखा मामाला आणि समीरच्या बाबांना समजले. पण जोपर्यंत समीर ठोस काही बोलत नाही तोपर्यंत आपण मधे काही बोलायचे नाही हे त्यांनी ठरवले होते.
मधुरा “अहो घरात काय चालले आहे त्याबद्दल काही माहिती आहे का”?
मिहीर “कशाबद्दल बोलते आहेस?”
मधुरा “छान. अहो तुमचे दादा इथेच कायमस्वरूपी रहायचा विचार करत आहेत असे ऐकले मी”
मिहीर “तो म्हणाला का तुला?”
मधुरा “ते कशाला सांगतील मला. मामा बाबांना म्हणत होते ते ऐकले मी.”
मिहीर “बरं.”
मधुरा “फक्त बरं. अहो मग आपलं कसं होणार? आपल्या मुलाचं कसं होणार? त्याला मुंबईला शिक्षणाला कसे पाठवणार? अन सगळे इथे येऊन राहिले तर कसं होणार? अन सगळ्या गोष्टी शेअर करायला लागतील”
मिहीर “अगं हे बघ दादाने खरंच ठरवलं असेल तर कायद्याने आपण काही अडवू नाही शकणार. पण त्यातून त्याने काही सांगितल्या शिवाय आपण काही बोलायचे नाही. अन मला नाही वाटत वहिनी अन मनु इकडे इकडे येतील. अन दादा तरी इथे येऊन काय करणार? आता हा कोरोनाचा प्रॉब्लेम आहे म्हणून नाही तर दादाचे अॉफिस तरी त्याला इथून काम थोडीच करु देणार आहे? तू नको काळजी करु”
मधुरा “तुम्ही बसा वाट बघत दादा कधी सांगतोय त्याची” एवढं बोलून मधुरा चिडून निघून गेली.
तिकडे टीव्हीवर एक चांगली बातमी दाखवत होते ती म्हणजे मुंबईत अडकलेल्या लोकांना सरकारने अॉनलाईन अर्ज करायला सांगितले होते. एक एक करुन गावी जाण्यासाठी परमिशन द्यायला आता सुरुवात झाली होती. समीरला आणा डोळ्यासमोर फक्त सौम्या आणि मनूच दिसत होते.
– अभिजीत इनामदार
Image by mohamed Hassan from Pixabay
- पाऊस - July 30, 2021
- बडी ताकत के साथ… बहोत बडी जिम्मेदारी भी आती है - May 11, 2021
- आठवणींच्या_पटलावर - April 20, 2021
Good going…
मस्त
एकदम परफेक्ट वर्णन आहे भावनांचं
सुरेख कथा