मला भेटलेले(?!) सेलिब्रिटी…(१)
आपल्याला कित्येक लोक भेटत असतात, काही लोक लक्षात राहतात, काही काळाच्या ओघात विसरून जातात. काही लोक खास असतात, प्रसिद्ध असतात, यांना सेलिब्रिटी असं म्हणलं जातं. सेलिब्रिटींची भेट ही कायम लक्षात राहते कारण या लोकांभोवती कायम एक वलय असतं. खरंतर माणसासारखी माणसं, त्यात काय इतकं यांच्या भेटीचं कौतुक करायचं? पण आपल्याला काही लोकं भेटली, जी त्यांच्या कामामुळे लोकांना माहित असतील, ओळखली जात असतील याचं एक अप्रूप असतंच. या लेखमालेत मी मला भेटलेल्या काही प्रसिद्ध लोकांबद्दल लिहिणार आहे. या लोकांना मी कशी भेटले, मग मी त्यांची सही कशी घेतली, सेल्फी कसे घेतले, काय गप्पा मारल्या अश्याप्रकारचे हे लेख नक्कीच नाहीत. कारण मजा अशी आहे, की या लोकांना मी जेव्हा भेटले तेव्हा मला हे लोक प्रसिद्ध आहेत किंवा कालांतराने प्रसिद्ध होणार आहेत हेच मुळी मला माहित नव्हतं. त्यामुळे आता जेव्हा या भेटी आठवतात तेव्हा फार मजा वाटते.
बावीस एक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी तेव्हा फर्ग्युसनच्या लेडीज होस्टेलमध्ये राहत होते. लेडीज हॉस्टेल्स बहुतकरून वाईट गोष्टीकरताच प्रसिद्ध असतात. आमचं हॉस्टेलही त्याला अपवाद नव्हतं. पण आपण स्वतः जेव्हा अनुभव घेतो तेव्हा खऱ्याखोट्याची मीमांसा जास्त चांगल्या प्रकारे करू शकतो. खरंतर आमचं हॉस्टेल अतिशय हुशार मुलींनी संपन्न होतं. भारतातील सर्व राज्यांमधून इथे मुली यायच्या आणि शक्यतो सगळ्य जणी फक्त आणि फक्त मार्कांच्या निकषावरच प्रवेश मिळवून यायच्या. अनेक चांगल्या गायिका, वैज्ञानिक, शास्त्रद्न्य, फॅशन मॉडेल्स मला इथे पाहायला मिळाल्या. पुढे त्यातल्या काही खूप प्रसिद्ध झाल्या. माझी एक मैत्रीण आत्ता इस्रो मधे काम करते तर एक NDTVची हेड आहे. बाहेर हॉस्टेलबद्दल कितीही काहीही बोललं जात असलं तरी आम्हा आतल्या लोकांना इथल्या मुली कश्या आहेत याची पुरेपूर कल्पना होती. काही ढालगज मुलीही होत्या, पण त्या कुठे नसतात?
तर त्या दिवशी संध्याकाळ होत आली होती. आमच्या हॉस्टेलचा नियम होता, रात्री ९ च्या आत मुलींनी हॉस्टेलच्या आत असायला हवं. यात बाहेरच्या लोकांनी मुलींना भेटायची वेळ संध्याकाळी ६ ते ८. मी साडेआठ वाजता होस्टेलच्या गेटमधून आत येऊन माझ्या रूमकडे जायला निघाले. लांबूनच एक मुलगा गेटवर ताटकळत असलेला दिसला. कोणा तरी मुलीला भेटायचं असणार, पण भेटायची वेळ संपली म्हणून बाहेर थांबला असणार, मी अंदाज लावला. मी गेटपाशी येताच तो चटकन जवळ आला आणि Excuse me म्हणाला. त्या चिंचोळ्या रस्त्यावर फक्त तो आणि मी दोघच. आमच्या होस्टेलवर हे खूपदा व्हायचं. भेटायची वेळ संपलेली असायची आणि मित्र, ओळखीचे लोक, बॉयफ्रेंड्स बाहेर येऊन उभे राहायचे. मग आत जाणाऱ्या एखाद्या मुलीला पकडून, प्लिज अमुक अमुक रूम नंबरवालीला बाहेर यायला सांगाल का? असं विचारायचे. सेलफोन तेव्हा अजून जन्माला आले नव्हते. त्यामुळे आम्ही बाहेर येणाऱ्या जाणाऱ्या मुलीच मेसेंजरचं काम करायचो. मुलगा सावळासा होता. फार उंच नव्हता. गालाला बारीकशी खळी पण पडत होती. इंग्रजी मात्र अगदी अस्खलीत. Will you please tell xxx that I am waiting for her outside? Its urgent. असं म्हणाला. मी त्याला Yes sure. I will tell her, but if she isn’t in the room you will just have to wait here. तात्पर्य काय, तर ती मुलगी नसेल तर मी तुला परत येऊन ती खोलीत नाहीये हे सांगणार नाही. म्हणजे मेसेज द्यायचं काम करेन पण त्याच मेसेजला उत्तर म्हणून मी परत येणार नाही, असं मला त्याला सांगायचं होतं. काय डोक्यात आलं असेल तेव्हा माझ्या कोणास ठाऊक पण मी फार मदतीच्या मूडमधे नव्हते. तो म्हणाला, हां चलेगा ना. मै वेट करता हुं, आप बस उसे बताइये, मेरा नाम XXX है. मी ठीक है म्हणाले आणि निघाले.
मी हॉस्टेलमधे नवीन होते. त्यात आमच्याकडे सिनियर, ज्युनियर विंग्स वेगळ्या. मी अकरावीत होते, म्हणजे ज्युनियर, ही सिनियर मुलगी असावी. तिच्या विंगेत जाऊन मला तिला बोलवावं लागणार होतं. दारावरच्या बॉयफ्रेंड्सना फार वेळ ताटकळवायचं नाही अशी ताकीद आम्हाला सिनियर मुलींनी आधीच एका रॅगिंग नाईटमधे दिली होती. जाताजाता या मुलाला कुठे बघितलंय म्हणून आठवायचा प्रयत्न करत होते. पण काही केल्या आठवत नव्हतं. क्षणभर त्या मुलीचा हेवाही वाटला. कसला गोड मुलगा भेटायला आला आहे. नाहीतर आम्ही!! आम्हाला भेटायला धेबेवाडीचे मामा नाहीतर नोट्स घ्यायला जाड काचांचे चष्मे असलेले वर्गमित्र… असे विचार कितीही चूक असतील तरी त्या वयात मनात येतातच. मी विंगमध्ये येऊन त्या अमुक मुलीला हाक मारली आणि सांगितलं तुला कोणीतरी बाहेर भेटायला आलंय. मुलीनी विचारलं, कोण? नाव काय? मी त्याने जे नाव मला सांगितलं होतं ते सांगितलं,” Some माधवन”! मुलगी ओके म्हणून तडक त्याला भेटायला बाहेर निघाली.
मला चक्क आर माधवन भेटला होता आणि तो ही अनवधानाने. तो त्याकाळी फर्ग्युसच्या शेजारच्या IMDR या मनेजमेंटच्या कॉलेजमध्ये तो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे वर्कशॉप्स घ्यायचा. त्यामुळे त्या परिसरात त्याचं बरच येणजाणं असायचं. नंतर त्याला थोडीशी प्रसिद्धी मिळाली तेव्हा मी त्याला ओळखलं, अरे हाच की तो!! म्हणून.. मैत्रिणींना सांगितलं तर सगळ्याजणी “ किती मूर्ख आहेस ग, त्याला attitude दाखवलास? असं बोलून ओरडायला लागल्या. पण मला काय स्वप्न पडलं होतं, मला निरोप द्यायला सांगणारा हा मुलगा पुढे जाऊन मोठा स्टार होणार आहे ते. नंतर माधवन दिसला तो एकदम बिग स्क्रीन वर! “रहना है तेरे दिल में” मधे. या खळीदार मुलाला त्या मोठ्या पडद्यावर पाहून माझी ती इवलूशी भेट आठवली. फार मजा वाटली. जरा जरा बहकता है हे गाणं पाहताना मला तीच ती संध्याकाळ आठवत होती. थोडी अजून बोलले असते तर? थोडी अजून मैत्री वाढवली असती तर? त्याच्या मैत्रिणीला गळ घालून त्याची अजून एकदा भेट घेतली असती तर? असे अनेक विचार मनात येऊन गेले. पण असलं काही होत नसतं. In fact अश्या ओळखी होत नाहीत हेच चांगलं असतं. कारण फार नंतर आपल्याला समजणार असतं, आपल्या आयुष्यातले खरे सेलिब्रिटी वेगळेच असतात…
क्रमशः
Image by Free-Photos from Pixabay
- समीर – अनयाच्या वॉट्सऍप गोष्टी - September 26, 2022
- कच्चा लिंबू - June 20, 2022
- आई - January 21, 2022
Mastach…..
Khalidar bhet… mastach
Gd 1
Thanks
Last line best…
Khup mast… last line awadali… sunder lihale ahe
भन्नाट…
Wow, madhvan ani rahna hai tere Dil Mai che sagle songs .👌👌👌
Wow, madhvan ani rahna hai tere Dil Mai che sagle songs .👌👌👌 Surkh lihilays gauri tai
हवा का झोका
Kiti lucky ahat tumhi ….madhavan kasala mast anubhav …
Amazing…
Wow .. lucky you