मला भेटलेले(?!) सेलिब्रिटी.. २

फर्ग्युसनचं लेडीजहॉस्टेल थेट वैशालीच्या समोर आहे. ऐन फर्ग्युसन रोडवर मध्यावर असूनही या हॉस्टेलच्या आजूबाजूला गर्द झाडी आहे त्यामुळे कोणाला पत्ताही लागत नाही की इथे आत एवढी मोठी इमारत आहे. आत जायला चिंचोळी वाट आहे आणि वाटेत दोन अगदी जुने दगडी बंगले आहेत. आमचं हॉस्टेलही दगडी असल्याने इथे कायम थंड असायचं. उन्हाळ्यातही आम्हाला इथे कधी फार गरम झालं नाही.
वैशालीच्या थेट समोर राहत असूनसुद्धा तिथे जायचे आमचे योग फार कमी यायचे. कारण अर्थातच पैश्याची चणचण. हॉस्टेलमधल्या इतर अनेक मुली तिथे बऱ्याचदा जायच्या. आम्ही काही मैत्रिणी मात्र महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एकदा ठरवून, पैसे साठवून मग वैशालीत जायची. जातानाच काय खायचं हे ठरवून जायचो, शक्यतो मसाला दोसाच ठरवलेला असायचा. फक्त तोच परवडायचा. त्यावर ज्यूस किंवा मिल्कशेक म्हणजे आमच्या चैनीची परिसीमा! तो एक दिवस काय आनंदाचा असायचा आमच्यासाठी! त्या नंतर अनेक वेळा वैशालीत जायचा योग आला, आताही अनेकदा जाते. पण काय कोणास ठाऊक, “त्या” पैसे साठवून साठवून मैत्रिणींबरोबर हसत खिदळत खाल्लेल्या दोस्यासारखी चव आता लागत नाही.
अशीच आमची महिन्यातली ठरवून केलेली वैशालीची एक ट्रिप होती. त्यावेळी गर्दी असायची पण फार वेटिंग नसायचं.आम्ही मैत्रिणी दोसा खात होतो. शेजारच्या टेबलवर एक माणूस येऊन बसला. अंगकाठी अगदी बारीक, अंगावर साधा झब्बा अडकवलेला, थोडीशी दाढी वाढलेली, नजर शून्यात आणि मुख्य म्हणजे पायात चप्पल नाही, अनवाणी. फर्ग्युसनमध्ये मी तोवर रुळले होते. असे अनेक झक्कड तिथे दिसायचे, लेखक, कवी, फिल्ममेकर. पण त्यातही हा मनुष्य जरा वेगळाच वाटला. मला त्याच्या पायांकडे बघून आश्चर्य वाटलं. मैत्रिणींना म्हणलं सुद्धा, या माणसाच्या पायात चप्पल का नाही? एकजण म्हणाली, अग आपल्याला वैशाली परवडत नाही, त्याला चप्पल परवडत नसेल. ख्याख्या हसून आम्ही खाण्याकडे वळलो. हा माणूस शून्यात नजर लावून कॉफी पिऊन निघूनही गेला. मला उगाचच का कोणास ठाऊक वाटलं की वेटर जरा जास्तच अदबीने बोलत होता या माणसाशी.
हा प्रसंग मी विसरून गेले पण अनवाणी माणूस लक्षात राहिला. फर्ग्युसनच्या आवारात पहिल्या लेखात सांगितल्याप्रमाणे Imdr हे मॅनेजमेंटचे कॉलेज आहे. या कॉलेजच्या प्रवेश द्वारापाशी पूर्वी मोठं आवार होतं, आता नाहीये. या आवारात अनेक छोटे मोठे सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. दुपारी तीनची वेळ असावी. मी या आवाराच्या शेजारून कॉलेजकडे निघाले होते. एकटीच होते. सगळीकडे दुपारची पुणेरी सामसूम होती. येताजाता या आवारात सहज डोकावून काही कार्यक्रम आहे का हे पहायची आम्हाला सवय होती. आवारात जरा हालचाल दिसली म्हणून मी आत गेले. तर तिथे बरंच सामान दिसलं. बहुदा कुठल्या तरी चित्र प्रदर्शनाची तयारी चाललेली दिसत होती. बरेच कॅनव्हास दिसत होते. मी कुतूहलाने एका नीट ठेवलेल्या कॅनव्हासकडे पाहू लागले, तेवढ्यात Come in असा आवाज ऐकू आला. त्या दिशेने बघते तर तोच तो वैशालीमधला अनवाणी झक्कड. हा काय करतोय इथे असा विचार मनात येत असतानाच समोरचं एक चित्र पाहून माझ्या डोक्यातल्या सगळ्या ट्युबा लकालक पेटल्या! हे साक्षात एम एफ हुसेन होते आणि चित्रप्रदर्शन होतं गजगामीनी.
हम आपके है कौन चे दिवस होते ते. हुसेन त्यावेळी माधुरीमुळे अत्यंत भारावून गेले होते. त्याच कैफात त्यांनी तिची अनेक चित्रं काढून त्याचं पहिलंवाहिलं प्रदर्शन Imdrच्या या आवारात लावलं होतं. मला सगळं कोडं पटकन उलगडलं आणि आपण एका फार महत्त्वाच्या प्रदर्शनाचे पहिले पाहुणे आहोत हे उमजायला लागलं.
Come in हुसेन मला म्हणत होते. प्रदर्शनाची तयारी सुरू होती. एकेक चित्र भिंतीवर लागत होती. त्या दिवशी संध्याकाळी ऑफिशियल ओपनिंग होतं. मी बिचकत आत गेले. Do you study here? त्यांनी मंदस्मित करत मला विचारलं. मी काहीतरी गुळमुळीत हो नाही असं म्हणाले. म्हणजे मला म्हणायचं होतं की मी फर्ग्युसनमध्ये शिकते, Imdr मध्ये नाही. पण तोंडातून शब्द फुटायला हवा ना! अर्धी चित्रं भिंतीवर लावून झाली होती. हुसेन जातीने कोणतं चित्र कुठे लावायचं ते पाहत होते. अचानक एका चित्राकडे बोट दाखवत मला ते खूप काही सांगायला लागले. आत्ता काही फारसं आठवत नाही पण एक्सप्रेशन, elephant, इमोशन्स इन हर आईज असलं काय काय ते बोलत होते ते मात्र आठवतं.  मी चक्क गजगामिनीची चित्रं ऑफिशियल ओपनिंगच्या आधी पाहत होते, ते सुद्धा खुद्द एम एफ हुसेन या चित्रकाराबरोबर, हेच मुळी माझ्या पचनी पडत नव्हतं. बराच वेळ ते बोलले, मी ऐकत होते. माझ्या जागी एखादा चित्रकलेचा विद्यार्थी असता तर त्याची लॉटरीच लागली असती. पण मी पडले एक सामान्य माणूस, जिला आधी हे प्रसिद्ध चित्रकार हुसेन आहेत हेच माहीत नाही, चित्र कळण्याची गोष्ट तर फार लांब राहिली. मला खरंच चित्रांमधलं काही कळत नाही. म्हणजे साधी, abstract, portrait, landscape इतपत समजावं इतकीच माझी झेप होती, आहे. मग या माणसाने का बरं मला त्याचं चित्र समजवावं? पण या अश्या जिनियस माणसांना समोर कोण आहे याचा फरक पडत नसावा. ते त्यांच्या तंद्रीत बोलत होते, स्वतःमधली सर्जनशीलता उलगडून दाखवत होते, बस. एका कलाकाराबरोबर असा अनुभव घेणे म्हणजे माझ्यासाठी पर्वणी होती.
त्यांचं बोलणं झालं आणि मी thank you Sir म्हणून निघाले. पण त्यांचं लक्षच नव्हतं, ते अजूनही वेगळ्याच जगात होते. कलाकार मंडळी ही अशीच असतात. मला मात्र एका passionate कलाकाराबरोबर काही सुंदर क्षण अनुभवायला मिळाले याचा खूप आनंद झाला होता.
अक्षरशः उड्या मारत मी हॉस्टेलमध्ये आले आणि सगळ्या मैत्रिणींना हुसेनच्या संध्याकाळच्या प्रदर्शनाबद्दल सांगितलं. संध्याकाळी परत आम्ही सगळे गजगामिनीचं प्रदर्शन पहायला गेलो. हुसेन यांच्या समोरून मी गेले पण तोपर्यंत ते मला विसरले देखील होते. मला मात्र आयुष्यभरासाठी एक सुंदर आठवण त्यांनी दिली.
पुढे हुसेन बरेच वाहवत गेले, विवादात अडकले. त्यांच्या चप्पल न घालण्याचं कारण त्यांची जगातल्या गरीब लोकांबद्दल असलेली आस्था, अनुकंपा होती, हे ही मला नंतर समजलं. त्यांनी नंतर उठसुठ अनेक नायिकांची चित्र काढली, पण गजगामिनी कायम त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठीही खास राहिली.
आयुष्यात अनेक लोक आपल्याला भेटत असतात, पण खरे सेलिब्रिटी वेगळेच असतात हे मात्र आपल्याला नंतर समजतं.
क्रमशः
Image by Free-Photos from Pixabay
Gauri Brahme
Latest posts by Gauri Brahme (see all)

Gauri Brahme

गेली वीस वर्षे पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागात जर्मन भाषेची अध्यापिका म्हणून काम करते. अमराठी लोकांना मराठी शिकवते. भरपूर लिहिते, वाचते, कलाकुसरीच्या वस्तू बनवते, खादाडी करते, इतरांना खिलवते. लेखिका म्हणून नावावर २ पुस्तकं जमा आहेत.

7 thoughts on “मला भेटलेले(?!) सेलिब्रिटी.. २

  • June 27, 2020 at 4:21 pm
    Permalink

    Nice experience… Nice narration…

    Reply
  • June 27, 2020 at 4:37 pm
    Permalink

    सुंदर लिहिलय…. दोन्ही भेटी छान लिहिल्या आहेत

    Reply
  • June 27, 2020 at 6:08 pm
    Permalink

    Last sentence makes me eager to know… real celebrities in u r life

    Reply
  • November 9, 2020 at 7:02 pm
    Permalink

    Mast lihilay tumhi

    Reply
  • January 3, 2021 at 9:31 am
    Permalink

    सुंदर 👌👌👌

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!