मत्स्यगंधा
पुण्यावरून मुंबईकडे येता येता, हवेतला गारवा कमी होत जातो अन दमटपणा वाढत जातो.
हवेतल्या आर्द्रतेसोबत, इतर भाषिकांनी संस्कारित केलेली आपलीच भाषा, आपल्या श्वासात भिनायला लागते.
पुणेरी मिसळ, उसळ होत जाते, . ….
बरेच शाकाहारी, मांसाहारी होत जातात, ……
इथं मासे नॉन व्हेज मध्ये गणले जात नाहीत,
आणि ते जेवणात नसले तरी उपवासाचं पुण्य पदरी पडतं, . . . . . बस इतकं सोपं गणित असतं,. …..
बॉम्बे च्या बोंबील पासून ते खाडीतल्या मांदेली, पापलेट, बांगड्या पर्यंत,
अन फाईव्ह स्टार टेबलावर रमणाऱ्या लॉबस्टर पासून ते खिसा रिकामा करणाऱ्या सुरमई हलव्यापर्यंतचा, हा सगळा ऐवज बाळगणारी मत्स्यगंधा ही मुंबईच्या सांस्कृतिक दालनामधल्या हॉल ऑफ फेमची प्रमुख नायिका आहे हे नक्की.
तिच्यासमोर तुमचं मत्स्य विभागातलं ज्ञान तुम्ही दाखवू शकता, तिला इम्प्रेस करण्याचा खुजा प्रयत्न करू शकता, पण त्यामुळं काहीही पदरात पडणार नसतं.
उगाच माश्याचे कल्ले दाबून पारंगत असल्याचा आव आणणारे आणि नुसत्या खवल्यांच्या चकाकी वरून मासे पसंत करणारे यातला फरक ती ओळखते.
गिर्हाईक म्हणून काही डिस्काउंट तिच्याकडून अपेक्षित करत असाल तर तुम्ही मत्स्य खरेदीत अजून बालवाडीत आहात.
तुमच्या एकंदर बोलचालीवरून तुमच्या खिशातून कितीची नोट बाहेर काढायची हे तिला चांगलं माहीत आहे, त्यामुळं ती डिस्काउंट न देता, एखादं पापलेट किंवा दोन बोंबील जास्त टाकेल, पण खिसा हलका करण्याचं टार्गेट पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही.
बराच वेळ डोळेझाकु बगळ्यासारखे उगाच दुसऱ्यांच्या खरेदीवर नजर ठेवणारे गिऱ्हाईक देखील फायद्यात सौदा करू शकेल ही खात्री नाही.
तुम्हाला आवडीचे मासे, मनातल्या भावात मिळवायचे असतील तर, फक्त आणि फक्त गोड बोलण्याखेरीज पर्याय नाही.
ही मत्स्यगंधा समोर ठेवलेल्या त्या सागर संपत्ती सह साक्षात लक्ष्मी भासते, पण एरव्ही तिच्या लोकलच्या प्रवासात, ती फेरीवाल्यांच्या डब्यात असली तरी, मागच्या डब्यातल्या दारातही उभं राहणं कुणाकुणाला शक्यही होत नाही. त्यासाठी तुम्ही टोकाचे मत्स्यभक्त असणं गरजेचं आहे.
ती सुंदर असू शकते किंवा नसुही शकते, पण बऱ्यापैकी कपड्यांच्या बाबतीत गबाळी राहणं तिला आवडतं अन तिच्या व्यवसायाला पूरक ही असतं.
बऱ्याचदया सुंदर मासेवाली दिसताच तिच्या आसपास विनाकारण चार बोंबलांच निमित्त करून घुटमळणारी गिर्हाईके असतात, पण अशा स्वतःच्या जीवावर उठलेल्या प्राण्यांनी,. . . . . तिच्या दर मिनिटाला एका माशाचा कोथळा बाहेर काढणाऱ्या हातात एक, अन पायाजवळ एक एक्सट्रा धार लावलेला कोयता असतो हे भान बाळगणं गरजेचं असतं.
इतकं सगळं असलं तरीही खरी मत्स्यप्रेमी मंडळी या मत्स्यगंधेच्याही प्रेमात पडतात. पण पाठीमागे तिच्या गोड हसण्याची चर्चा करणारी ही मंडळी तिच्या तोंडावर मात्र फारतर तिच्या माश्यांचीच स्तुती करण्याचं धाडस करू शकतात. फार लाडात येणाऱ्याला “भाऊ” “मामा” अशी संबोधनं लावून एका फटक्यात तोंडावर पाडते.
याचा अर्थ ही मत्स्यगंधा कुणावर प्रेम करतच नाही असं नाही. तिच्या आसपास तिच्या सारखेच फटकळ असलेले मत्स्यगंधर्व असतातच की. त्यातला जो आवडेल तोच अन त्याच्याशीच लग्न करण्याइतका ठाम आत्मविश्वास तिच्यात असतो, मग तो वाळू कामगार असो की दुसऱ्यांच्या बोटीवर हजेरीवर जाणारा साधा कोळी असो. ती संसार यशस्वी करून दाखवते.
काही मत्स्यगंधा परप्रांतीयांच्याही प्रेमात पडलेल्या दिसतात. पण त्या परकियाचा प्रामाणिकपणा अन तिच्या संस्कृतीशी एकरूप होण्याचं प्रतिज्ञापत्र तिनं कोयत्याच्या धारेवर परजून घेतलेलं असतं.
अन मग नांदायला आलेला ‘भैय्या’ एका महिन्यातच,
“म्हावरं, येकदम फ्रेस हाय बगा सायेब, म्हणू लागतो.”
एकूणच मत्स्यगंधा प्रेमात पडणं इतकी सहजसाध्य गोष्ट नसली तरी, त्या निर्णयानंतरच्या आयुष्याची जबाबदारी तिनं अगदी शिवधनुष्याच्या भावभक्तीनं उचललेली असते.
पाटीतले मासे संपवून फक्त, रॉकेलचा दिवा अन रिकामी पाटी एवढंच घरी घेऊन जाणं इतकं सरळ साधं स्वप्न असतं तिच्या रोजच्या आयुष्याचं. रोजचा विचार रोज करणारी, ती अत्यंत जमिनीवर असलेली व्यक्ती असते. तिला मोठी स्वप्न पाहायलाही वेळ नसतो, तरीही, खाडीवर टाईल्सनी सजवलेलं तिचं घर तुमच्या हेव्याचं कारण बनू शकतं, अन तिच्या अंगावरचे, तिने बिनधास्त स्टाईलमध्ये ल्यायलेले दागिने बायकांच्या असूयेचं कारण बनू शकते. हा कॉम्प्लेक्स तुम्हाला सहज देण्यामागे तिचा भरगच्च पाप्लेटसारखा आत्मविश्वास कारणीभूत असतो हे नक्की.
घरच्या…. नोकरीतल्या टेन्शनने ओढलेल्या चेहऱ्याच्या एखाद्या ताईला हाक मारून,
” सुरमई घेऊन जा ताई, आज घरी, मग बघ मूड कसा खुललं.”
असा आगाऊ सल्ला देऊन तिची तंद्री भंग करण्याइतपत तरी , ….. तिच्यात मानसोपचारतज्ञ भरलेला असतो.
आजची स्त्री स्वातंत्र्यात की पारतंत्र्यात असे परिसंवाद झडत असलेल्या काळात, आणि बरंच काळाच्या पुढं आल्यानंतर स्त्री ला इतकं स्वातंत्र्य नको असं सांगणाऱ्या नव्या स्त्री समाजसुधारकांच्या काळात, ……. ती मात्र काळाच्या कित्येक अंशी पुढे जात, होडीवर जाणाऱ्या नवऱ्याची वाट पहात, घरातल्या मुलाबाळांची, म्हाताऱ्या कोताऱ्याची काळजी घेत, कधीच उंबऱ्याबाहेर पडलीये.
मुंबईच्या मूळ संस्कृतीचा कणा असलेली ती मत्स्यगंधा, शाकाहार मांसाहार वाद असो किंवा स्थानिक परप्रांतीय वाद असो, हातातला कोयता सरसावून स्वतःच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी, पूर्वीइतकीच ठाम आणि तत्पर आहे.
तिला स्त्री स्वातंत्र्याच्या धडयांची गरज नाही, तिला संस्कृतिरक्षणाचे पाठ शिकण्याची गरज नाही. कधी खडकाळ, कधी रेताड, तर कधी खाजण , अशा जमिनीशी जिथे जसे नाते जोडता येईल, तसे जोडत, तिचा बाप, सागर त्याच्या साचलेपणातही प्रवाही राहण्याचा प्रयत्न करत राहतो.
अगदी तसेच तीही आपल्या जीवनाशी प्रामाणिक राहात, कुठल्याही विश्वविद्यापीठात न जाता, स्वतःच्या स्वातंत्र्याच्या मर्यादा कधी वाढवत कधी थांबवत, पण जीवनाशी अविरत नातं जोडत राहाते.
अन मग मुंबईत भरवस्तीतल्या, आपापल्या फ्लॅटच्या अंडा सेलमध्ये, एकलकोंड्या झालेल्या, पॉलिश चेहऱ्याच्या मनुष्यप्राण्याच्या डोक्याला झिणझिण्या आणत जमिनीवर यायला लावणारी तारस्वरातली हाक येते,
” ताई sssssss, म्हावरं आणलंय , म्हावरं !!!”
Image by Free-Photos from Pixabay
- Poked you …… - July 31, 2023
- एमएटी - June 10, 2022
- पत्रास कारण की… - April 21, 2022
Off..ohh.. मत्स्य गंधा नाव वाचून मी अगदी मदल सालस लोभस कोमल स्त्री ची, यौवन ची कहाणी वाचायला मिळेल ..म्हणून वाचायला आली…हा..हा…गा…
तुम्ही मासे पुराण मात्र मस्त मुरवल आहे मुंबई चे मानलं….,
मी असेच एक पुस्तक वाचले होते पूर्वी…नेने लेखक होते…ते माधुरी दीक्षित चे दिर, मुळ पुण्याचे,आता लंडन का वास्तव्य,जगभरात फिरून मासे खाल्ले..आणि इतक्या सुंदर,वर्णन सहित ते लिहिले आहे की सर्व रेसिपी ,व त्या स्टाईल सह खायची इच्छा होतेच…अमेझॉन वर असेल हे पुस्तक…असो…just enjoy to read matsygandha…yess
धन्यवाद
छान बी आर… मुंबई मधे भायंदर ला आपण पाहीलेली मासेवाली आठवली… 👌👌👌👏👏👏
हो आठवलं, कॅरॅक्टर स्केच वलयाकार आडव्यातीडव्या रेषांनी कर, किंवा शब्दात पण स्केचिंग चालूच राहिलं पाहिजे. कुठेही ….. कधीही.
मस्त लिहिलं आहे
धन्यवाद
chhan