मला भेटलेले सेलिब्रिटी (?!) ३

मी तेव्हा पुणे विद्यापीठात मास्टर्स करत होते. आम्हाला एम.ए ला जी काही पुस्तकं, कथा, साहित्य वाचायला लागणार असायचं ते मला फार आवडायचं. मला असं प्रांजळपणे वाटतं की पदव्युत्तर शिक्षण घेताना आपण थोडेसे प्रगल्भ झालेले असतो, शिक्षणाचं महत्त्व, गांभीर्य आपल्याला व्यवस्थित समजलेलं असतं, कॉलेजलाईफ मधला टिपिकल उडाणटप्पूपणा मागे पडलेला असतो, आयुष्यात आपल्याला नक्की काय करायचं आहे, ते स्वच्छपणे समोर दिसायला लागलेलं असतं. या परिपक्वतेमुळे आपण शिक्षण हे खऱ्या अर्थाने एन्जॉय करायला लागलेले असतो.
वर्गात आम्ही फक्त सात टाळकी, आमचा मस्त ग्रुप जमला. खाणंपिणं, अभ्यास, धमाल, लेक्चर एकत्रित बंक करणे, पिक्चरला जाणे या सगळ्या गोष्टी आम्ही एकत्र करायला लागलो. आम्ही सहा मुली आणि एक मुलगा. त्या बिचाऱ्याचं आमच्या पुढे काही चालायचं नाही, पण आम्ही सातजण inseparable होते. स्पर्धा, ईर्ष्या अशी आमच्यात कधीच नव्हती. खऱ्या अर्थाने आम्ही “कॉलेजचे दिवस” उपभोगत होतो. अजूनही आम्ही सातजण एकमेकांच्या संपर्कात असतो, जमेल तेव्हा भेटतो, ते जुने दिवस परत अनुभवतो. आमच्या आताच्या वॉट्सऍप ग्रुपचं नावही परफेक्ट आहे, Group 007.
विद्यापीठात आमच्या शिक्षकांनाही माहीत होतं, हे सातजण कायम एकत्र असतात. सर्व प्राध्यापकांना आमच्या ग्रुपविषयी फार आस्था होती. आम्हाला लघुकथा हा साहित्यप्रकार शिकवणाऱ्या परांजपे मॅडम आमच्या सर्वांच्या आवडत्या होत्या. त्यांचा दरारा देखील तितकाच होता. जितकं आम्ही त्यांच्यापासून भारावलेले असायचो तितकेच त्यांना घाबरायचो देखील.  शिकवायच्या मात्र त्या टॉपक्लास!!
एका शनिवारी त्यांनी आम्हाला एक्सट्रा लेक्चरला बोलावलं. आम्ही वैतागलोच होतो. शनिवारचा मस्त कुठलातरी पिक्चर पाहू, भटकू असा विचार आम्ही सातहीजणांनी केला होता. पण मॅडमना कोण डावलणार? आमच्या कोणातही ती हिंमत नव्हती. त्यात आम्हा सातजणांची एक पॉलिसी होती, गेलो तर सगळे एकत्र नाहीतर मग कोणीच जायचं नाही. सगळ्यांनी “लेक्चरला जाऊ” असच ठरवलं. त्यामुळे लेक्चरला बसू आणि दीड वाजता तिथूनच पळ काढू असंही ठरवलं.
मॅडमचं लेक्चर सुरू झालं. तासभर झाला असेल नसेल तेवढ्यात आमच्या वर्गाच्या दारावर टकटक झाली. आम्ही सगळ्यांनी सूचकपणे एकमेकांकडे पाहिलं. देवा प्लिज यांना कुठल्यातरी मिटिंगचं बोलावणं तरी येऊ दे किंवा कुठेतरी अर्जंटली जायचं असू दे, म्हणजे आमचा पिक्चर प्लॅन आम्हाला पुढे नेता येईल अशी आम्ही सातहीजणांनी मनोमन प्रार्थना केली. मॅडमनी दार उघडलं आणि दारातल्या व्यक्तीला पाहून त्या प्रचंड आश्चर्याने “तू?” असं ओरडल्या. आम्हाला वाटलं चला बरं झालं यांची कोणीतरी मैत्रीण आली, आता या कटणार.
इकडे वर्गात आमची कुजबुज सुरू झाली, कसं सटकायचं, कुठे जायचं, काय खादडायचं वगैरे. तेवढ्यात परांजपे मॅडम “अरे ये ये, आत ये की, ही बघ आमची मुलं” अस म्हणत आत आल्या, त्यांच्या पाठोपाठ ती व्यक्ती. आमची कुजबुज क्षणार्धात थांबली, आणि आमच्या सातही जणांची तोंडं आ वासलेलीच राहिली. पांढरा शर्ट, मळकट जीन्स, चेहऱ्यावर तेच बेफिकीर हास्य घेऊन आमच्यासमोर चक्क नाना पाटेकर उभा होता. आम्हाला काय करावं सुचेना. हे स्वप्न आहे की सत्य? नाना पाटेकर आमच्या वर्गात कसा काय येईल? आज लेक्चर नव्हतंच का? हे सगळं आपण स्वप्नात तर बघत नाही ना? असा विचार आमच्या सातही जणांच्या मनात तत्क्क्षणी येऊन गेला. पण “काय पोरांनो, काय म्हणताय? असा आम्हाला खेळीमेळीत विचारणारा प्रसिद्ध सिनेस्टार नाना पाटेकर खरंच प्रत्यक्षात आमच्या समोर उभा होता.
परांजपे मॅडम या नाटक, सिनेमाप्रेमी आणि त्यात काम केलेल्या कलाकार. जैत रे जैत या चित्रपटामध्ये त्यांची छोटीशी भूमिकाही आहे. त्यामुळे त्यांच्या या सर्व कलाकारांशी ओळखी होत्या. आम्हाला त्यांची ही बाजू माहीतच नव्हती. प्रत्यक्ष नाना पाटेकर आमच्यासमोर येऊन उभा राहिला तेव्हा आम्हाला हे सर्व समजलं. दोघंही अगदी जुने मित्रांसारखे आमच्यासमोर गप्पा मारत होते आणि आम्ही हे सर्व अनिमिष नेत्रांनी पाहत होते. पिक्चर पहायला चाललेले आम्ही, अख्खा पिक्चरच आमच्यासमोर त्यादिवशी उभा येऊन ठाकला होता!
मग मात्र आमच्या गप्पा रंगल्या. आधी थोडासा बुजरेपणा होता, पण नानानी “अरे घाबरता काय मंजिरीला (मॅडमना) तुम्ही? तू बाहेर जा ग मंजिरी आणि मला एक कडक चहा पाठव” असं म्हणत चक्क त्यांना बाहेर पाठवलं आणि आमच्याशी धमाल गप्पा मारल्या. आम्हीही मग जरा खुललो. तुमचा आवडता पिक्चर कोणता, सध्या कोणतं शूटिंग सुरू आहे? मराठी पिक्चर करायला आवडतं की हिंदी? असे प्रश्न आम्ही विचारले. शेवटच्या प्रश्नाचं उत्तर त्याने हिंदी आणि हिंदीच असं सांगितलं. आम्ही का? असं विचारल्यावर त्याचं ४४० व्होल्टेचं हास्य करत म्हणाला ” अरे उधर पैसा मिलता है!” असं अगदी सहज म्हणाला. किती सहजपणे त्याने हे सत्य सांगितलं.
त्यादिवशी बऱ्याच चांगला मूडमध्ये होता नाना. बहुदा खूप दिवसांनी जुनी मैत्रीण भेटल्यामुळे असेल. ते दोघं टाळ्या देत होते, हसत खिदळत होते, विनोद करत होते. अगदी आम्ही सातजण जसे आता भेटल्यावर करतो तसेच. निखळ मैत्री काय असते हे त्यादिवशी आम्हाला पाहायला मिळालं. जेमतेम पंधरा मिनिटं गप्पा मारल्या असतील आम्ही पण तेवढा वेळ कसा गेला हेच आम्हाला समजलं नाही. लेक्चरला जायचं की नाही याबद्दल खात्री नसणारे आम्ही आता वर्गातून उठूच नये अशा स्थितीपर्यंत आलो होते. जॅकपॉट लागणे म्हणजे काय ते त्या दिवशी आम्हाला समजलं!
सेलिब्रिटी म्हणजे फक्त त्यांच्याभोवती एक विशिष्ट वलय असलेली माणसं. त्यांना पाहायला, भेटायला, त्यांच्याशी संवाद साधायला छान वाटतं. आपल्या आयुष्यातले खरे सलिब्रिटी वेगळेच असतात हे मात्र आपल्याला कालांतराने समजतं.
क्रमशः
Image by Free-Photos from Pixabay
Gauri Brahme
Latest posts by Gauri Brahme (see all)

Gauri Brahme

गेली वीस वर्षे पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागात जर्मन भाषेची अध्यापिका म्हणून काम करते. अमराठी लोकांना मराठी शिकवते. भरपूर लिहिते, वाचते, कलाकुसरीच्या वस्तू बनवते, खादाडी करते, इतरांना खिलवते. लेखिका म्हणून नावावर २ पुस्तकं जमा आहेत.

6 thoughts on “मला भेटलेले सेलिब्रिटी (?!) ३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!