मला भेटलेले सेलिब्रिटी… ४

मला भेटलेले सेलिब्रिटी… ४
माझ्या लहानपणीची गोष्ट आहे. आई व्यवसाय करत असल्याने सकाळी साडेआठला जायची ती संध्याकाळी घरी परत यायची. शाळा झाल्यावर घरात मी आणि माझा धाकटा भाऊ दोघच असायचो. आई जाताना दहा वेळा सांगून जायची, घरात कोणालाही घ्यायचं नाही. आधी दार किलकीलं करायचं, कोण आहे, काय काम आहे विचारायचं आणि मगच आत घ्यायचं नाहीतर सरळ त्या व्यक्तीला कटवायचं. अनोळखी लोकांना मुळीच घरात घ्यायचं नाही हे तिचं वाक्य मला तोंडपाठ झालेलं होतं. भाऊ धाकटा असल्याने शाळेतून आल्याआल्या खेळायला धूम ठोकायचा. दुपारी घरात मी एकटीच असायचे. असल्याच तर शेजारपाजारच्या मैत्रिणी असायच्या.
आमच्या घरी पुस्तकांचं भांडार वगेरे नव्हतं. निवडक पण चांगली मोजकी पुस्तकं मात्र होती. आईला वाचनाची आवड होती. आमच्या जन्मानंतर तिने हिंदीत एम.ए केलं होतं. त्यामुळे हिंदी कविता, प्रेमचंदांचं गोदान घरी होतं. मी वाचायचा प्रयत्न करायचे पण काही समजायचं नाही. मला वाचनाची प्रचंड आवड होती, अगदी लहानपणापासून. पुस्तकं संपायची पण माझं वाचन संपायचं नाही. आई सांगते, एकदा घरातली सगळी पुस्तकं वाचून संपली तर मी चक्क भगवद्गीता वाचायला घेतली होती! ओ का ठो समजलं नव्हतं हा भाग वेगळा.
तर असंच एका दुपारी मी काहीतरी वाचत लोळत पडले होते. आठवी नववीत असेन. घराची कडी वाजली. माझ्या वाचनसमाधीत व्यत्यय आल्याने जराशी वैतागले होते.  दारापाशी गेले आणि आईने सांगितल्याप्रमाणे दार किलकीलं करून कोण आलंय ते पाहिलं. दारात एक तरुण माणूस. साधे कपडे, हातात छोटीशी कापडी पिशवी. चेहऱ्यावर अगदी बारीकसं हसू. मी विचारलं, कोण हवंय?  ते म्हणाले, “तू गौरी का?” मी हो म्हणाले पण दार अजिबात उघडलं नाही. आईची ताकीद. परत विचारलं, “कोण हवंय?” त्यांनी विचारलं, “आई आहे का?” मी नाही म्हणाले. तरी ते दारातच उभे. मी पण इकडे किलकिल्या दाराच्या बाजूला उभी. त्यांची बहुतेक अपेक्षा असावी, मी त्यांना आत घ्यावं. पण आईची ताकीद होती ना, आत कोणालाही घ्यायचं नाही. मी परत विचारलं, “काही काम आहे का?” त्यांना बहुदा काही सुचेना. मी तर दार उघडायला तयार नव्हते. शेवटी पिशवीतून एक पुस्तक काढत म्हणाले, “हे पुस्तक तेवढं आईला देशील का?” मी येऊन गेलो म्हणून सांग.” मी ठीक आहे म्हणाले. दाराच्या फटीतूनच पुस्तक घेतलं. ते एक दोन मिनिटं घुटमळले मग निघून गेले. ते गेल्यागेल्या मी दार लावून घेतलं आणि एकदम डोक्यात लकक प्रकाश पडला, हे होते तरी कोण? आपण नावही विचारलं नाही. मी येऊन गेलो सांग म्हणाले, पण मी म्हणजे कोण? आता आई नक्की ओरडणार, “कार्टे, नाव विचारता येत नाही का?” असं म्हणणार याची खात्री मला वाटायला लागली. आईच्या ओरड्याला तोंड कसं द्यायचं हा विचार करतच मी सहज हातातलं पुस्तक उघडलं. अगदी नवकोरं पुस्तक होतं. मुखपृष्ठही छान होतं.  पुस्तकाचं नाव वनवास आणि लेखक प्रकाश संत. मी पुस्तक बाजूला ठेऊन दिलं आणि आईची वाट पाहू लागले. सुदैवाने ती ओरडली नाही पण अग निदान पाणी तरी विचारायचस म्हणाली. त्या एका रात्रीत तिने ते संपूर्ण पुस्तक “वनवास” वाचून काढलं.
हे दारावर येऊन परत गेलेले, मला, तू गौरी ना? विचारणारे प्रख्यात लेखक प्रकाश संत होते. वनवास मी थोड्या उशिरा, म्हणजे कॉलेजमध्ये गेल्यावर वाचलं. आणि या पुस्तकानी तमाम लोकांवर गारुड केलं तसच माझ्यावरही केलं. त्यातले लंपन, सुमी हे कितीतरी वर्ष मनात सोबती म्हणून राहिले. एकशेचोपन वेळा तरी वाचलं असेल मी ते पुस्तक त्यानंतर! वनवास ज्यांनी वाचलं आहे त्यांना मी काय म्हणते आहे ते लगेच समजलं असेल. ज्यांनी वाचलं नसेल त्यांनी अवश्य वाचा. मराठी साहित्यातला एक उत्तम ठेवा आहे प्रकाश संत या माणसाचं लेखन!
ते त्यादिवशी आमच्या घरी का आले होते? याची गोष्ट फार मजेदार आहे. संत कऱ्हाडचे आहेत. एका वृत्तपत्राच्या माध्यमातून माझ्या आईला त्यांचा पत्ता मिळाला आणि आईने सहज त्यांना तुमचा लेख आवडला अश्या आशयाचं पत्र लिहिलं. आश्चर्य म्हणजे संतांनी पत्राला उत्तर दिलं. आईने परत एक पत्र लिहिलं आणि त्यांचा नियमित पत्रव्यवहार सुरू झाला. प्रकाश संतांची अनेक पत्रं आजही आईकडे आहेत. एक लेखक आणि एका वाचकाची साधीसुधी पत्रं. आई तो अनमोल ठेवा मला कधीतरी वाचायला देईल, प्रकाशित करेल अशी आशा ठेऊन मी आहे. हे सगळं अर्थातच मला आईने फार नंतर सांगितलं. सहज म्हणून सुरू झालेला पत्रव्यवहार एका मोठ्या, नावाजलेल्या लेखकाशी सुरू आहे याची तिलाही फार उशिरा कल्पना आली.
त्या दिवसाचं मला आजही अप्रूप वाटतं. इतका मोठा साहित्यिक आमच्या घरी आला, पुढे अनेक पुरस्कार मिळवणारं त्याचं पुस्तक मला स्वहस्ते सुपूर्द करून गेला आणि मला पत्ताही नाही. माहीत असतं तरी मी काय बोलले असते? साहित्यिकांशी, त्यांच्या पुस्तकांशी जितकं बोलता येतं तितकं प्रत्यक्षात बोलता येत असेल? लेखकमंडळी जितकं रसपूर्ण लिहितात तसेच रसपूर्ण संवाद सुद्धा ते साधत असतील काय? काय माहीत!
प्रकाश संत हे लेखक अनेकांना आजही माहीत नसतील पण माझं वाचनविश्व, आयुष्य समृद्ध करणाऱ्या लेखकांपैकी ते एक आहेत त्यामुळे ते माझ्याकरता ते नक्कीच एक सेलिब्रिटी आहेत, कायम राहतील.
Image by Free-Photos from Pixabay
Gauri Brahme
Latest posts by Gauri Brahme (see all)

Gauri Brahme

गेली वीस वर्षे पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागात जर्मन भाषेची अध्यापिका म्हणून काम करते. अमराठी लोकांना मराठी शिकवते. भरपूर लिहिते, वाचते, कलाकुसरीच्या वस्तू बनवते, खादाडी करते, इतरांना खिलवते. लेखिका म्हणून नावावर २ पुस्तकं जमा आहेत.

13 thoughts on “मला भेटलेले सेलिब्रिटी… ४

  • July 2, 2020 at 5:03 am
    Permalink

    ही सिरीज खूपच छान सुरू आहे.
    किती मस्त अनुभव आहेत तुमच्या कडे. 🙂

    Reply
  • July 2, 2020 at 6:05 am
    Permalink

    Too good Gauritaai!. I have all his books. Pankha is my all time favourite. Lampan tar khup awdto tuzyasarkhach me te 132 wela wachaly..

    Reply
    • July 2, 2020 at 6:17 am
      Permalink

      Sayali, ha ha! You got it. 🙂

      Reply
    • July 2, 2020 at 7:02 am
      Permalink

      खूपच खास👌👌👌मला तुमचं लिखाण खूपच आवडतं, कारण ते नेहमी सहज असतं. वाचताना प्रत्येक गोष्ट समोर उभी राहते. एखादा सिनेमा बघितल्यासारखं. हा तुमचा प्रत्यक्ष अनुभव वाचताना सुद्धा अगदी तस्संच झालं. वनवास मी नक्की वाचेन आणि तुम्हाला कळवीन.👍

      Reply
      • August 1, 2020 at 12:26 pm
        Permalink

        Thanks Trupti 🙂

        Reply
  • July 2, 2020 at 6:36 pm
    Permalink

    Nice experiences… Happy to read them… Keep sharing…

    Reply
    • July 15, 2020 at 6:21 pm
      Permalink

      लहानपणच्या mad वयात आपल्याला काही नीटस सुधारत नसत आणि या बद्दल आपण अनेकदा मोठ्या माणसांच्या बोलण्याचे किलोमीटर च्या किलोमीटर पट्टे एकून घेतो!
      बाकी लंपन बेस्टच!

      Reply
  • July 2, 2020 at 6:42 pm
    Permalink

    नमस्कार, तुमचे ‘ मला भेटलेले सेलिब्रिटी ‘ हे भाग वाचत असताना मला खूप प्रेरणा मिळाली. त्यामुळे मी ही माझे अनुभव लिहिले. बऱ्याच वर्षां नंतर मी लिहिती झाले. लिखाणातला आनंद मी परत अनुभवते आहे. त्यासाठी तुम्हांला मनःपूर्वक धन्यवाद.

    Reply
  • July 2, 2020 at 8:13 pm
    Permalink

    हे सगळ्यात मोठे सेलिब्रिटी तुम्हाला भेटलेले, आणि अशी पुस्तके सुचवत जा
    शोधणार आता हे ‘ वनवास पुस्तक

    Reply
  • August 1, 2020 at 10:46 am
    Permalink

    Very inspiring

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!