दादा
नेहाची आज प्रचंड धावपळ सुरू होती. धाकट्या निरजचं आवरून तिला रोहनच्या शाळेत नऊच्या ठोक्याला हजर व्हायचं होतं. रोहन आता फर्स्ट स्टॅंडर्ड मध्ये गेला होता. या वर्षीची ही पहिलीच मीटिंग. उशीर नको व्हायला. नेहा विचार करत होती.
“बाप रे … अजुन आईचा पत्ता नाही… कुठे अडकली असेल?” स्वतःशीच बडबड करत नेहानं बाहेर पडायची तयारी केली.
“रोहन, आजीला त्रास नको देऊ हां… ती फक्त निरजला सांभाळणार आहे. तू मोठा आहेस ना? मग आजीला मदत करायची.” तिच्या या बोलण्याकडे लक्ष न देता रोहन खेळण्यात मग्न झालेला पाहून नेहा किंचित आवाज चढवून म्हणाली, “कळतंय का मी काय बोलतेय ते?”
इतक्यात तिला सोसायटीच्या गेटजवळ रिक्षा थांबल्याचा आवाज ऐकू आला. तिनं खिडकीतून डोकावलं. आईला रिक्षातून उतरताना पाहून नेहाचा जीव भांड्यात पडला.
“आलीये बरं का आजी, रोहन. निरजला त्रास देऊ नको. दादा ना तू त्याचा?” इतकं बोलेपर्यंत बेल वाजली. नेहानं दार उघडलं.
आई आत येऊन बसली. घाम पुसत, “काय गं ट्रॅफिक हा रस्त्यावर. इंचाइंचाने रिक्षा पुढे सरकत होती.” असं बोलत आईनं नेहानं दिलेला पाण्याचा ग्लास हातात घेतला आणि म्हणाली, “निघ तू. तुला उशीर झाला असेल. मी बघते आता या दोघांकडे.”
पडत्या फळाची आज्ञा घेऊन नेहा झटपट निघाली.
रोहनच्या शाळेजवळ कसंबसं पार्किंग मिळवून मीटिंगला पोहोचेपर्यंत तिला अर्धा तास उशीरच झाला होता.
तिनं थोडं धास्तावूनच टीचरकडे पाहिलं. एरवी एक मिनिटाचाही उशीर खपवून न घेण्याबद्दल प्रसिद्ध असलेली रोहनची टीचर नेहाकडे पाहून चक्क हसली आणि तिने नेहाला तिच्या समोरच्या खुर्चीत येऊन बसण्याची खूण केली.
खुर्चीत बसल्या बसल्या नेहानं उशीरा आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत बोलायला सुरुवात केली, “सॉरी टीचर… निरजचं आवरून निघायला थोडा उशीरच झाला मला…” पण हात वर करून तिला मध्येच थांबवत टीचर म्हणाल्या, “इट्स अॅबसोल्युटली अलराईट. एका ऑटिस्टिक मुलाला सांभाळणं किती वेदनादायक आणि कठीण असतं याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. तरीही रोहनकडे पण थोडं लक्ष द्या… त्याला घरात इतकी कामं करायला लावू नका… अहो, तोही लहानच आहे की..”
“एक मिनिट टीचर” टीचरचं बोलणं ऐकून धक्का बसलेली नेहा त्यांना मध्येच तोडत म्हणाली, “ऑटिस्टिक मुलगा कोण आहे? तुम्ही कोणाबद्दल बोलता आहात?”
“अहो, रोहनचा छोटा भाऊ ऑटिस्टिक आहे ना?”
“नाही. हे कोणी सांगितलं तुम्हाला?” आता नेहा चांगलीच चक्रावली.
“अर्थातच रोहनने. तो तसा आहे म्हणूनच रोहनला घरात खूप कामं करावी लागतात ना?” टीचर आश्चर्यानं विचारत होत्या.
“तसं काहीही नाहीये. रोहनचा धाकटा भाऊ नीरज नुकताच एक वर्षाचा झाला आहे आणि अगदी नॉर्मल आहे. आम्ही रोहनला कोणतंही काम सांगत नाही. त्याला पूर्वी इतका वेळ देऊ शकत नाही हे मात्र खरं. पण तुम्ही काळजी करू नका. मी रोहनशी बोलते याबद्दल.” असं त्यांना समजावून नेहा शाळेतून बाहेर पडली. गाडीवरून घरी पोहोचेपर्यंत तिच्या डोक्यात रोहनने असं का सांगितलं असेल हाच विचार होता.
नीरज जन्माला आल्यावर झालेली रोहनची प्रतिक्रिया तिला आठवली, “शी… कित्ती घाण आहे हे बेबी… मला नाही आवडलं.” आणि पाठोपाठ निरजला घेतलं म्हणून रडलेला रोहन, अचानक हट्टी झालेला रोहन, अजून काही त्या वेळी लक्षात न आलेल्या, फारशा न खटकलेल्या बारीक सारीक घटना नेहाला आठवल्या. “खरं तर… रोहनकडे आपण दोघांनीही नीट लक्ष दिलं आहे… आता छोट्या बाळाचं साहजिकच जास्त करावं लागतं हे रोहनला कळायला हवं… शिवाय धाकट्या भावंडाबद्दल प्रेम वाटायला हवंच ना…” असे उलट सुलट विचार नेहाच्या मनात थैमान घालत होते.
विचारांच्या नादात आज बेल न वाजवता स्वतः जवळच्या किल्लीनं लॅच उघडून नेहा घरात आली. लॉबी मधल्या शू रॅक मध्ये सॅन्डल ठेवत असताना, रोहन आणि आजीच्या बोलण्याचा आवाज ऐकू आल्यावर तिथेच थबकली.
“हे बघ रोहन, सोसायटीच्या बागेपाशी पळताना थोडं लक्ष ठेव बरं का. परवाच्या पावसामुळे तिथं शेवाळं झालं आहे. घसरून पडशील.” आजी रोहनला समजावून सांगत होती.
“शेवाळं म्हणजे?” रोहनने निरागसपणे विचारलं.
“अरे… पावसामुळे ते गिळगिळीत हिरव्या रंगाचं साठतं ना जमिनीवर… त्याला शेवाळं म्हणतात. घसरडं असतं ते.” आजीनं स्पष्टीकरण दिलं.
“हो … मी पाहिलंय ते शेवाळं.. आजी… आपण ना… त्या शेवाळ्यात निरजला टाकू.” असं बोलून रोहन हसत होता.
नेहा रोहनवर चिडलीच. काय कमी केलं आपण ह्याला? नीरजसारख्या गोजिरवाण्या लेकराचा का तिरस्कार करत असेल रोहन? सख्ख्या भावाचा इतका तिरस्कार???
विचारांच्या नादात रोहनला जाब विचारण्यासाठी ती तिरमिरित हॉल मध्ये आली तर रोहन तिथे नव्हताच. आई एकटीच मटार सोलत बसलेली नेहाला दिसली.
“आई… आत्ता रोहन इथेच होता ना? कुठे गेला तो?” पर्स सोफ्यावर फेकत इकडे तिकडे नजर फिरवत नेहानं विचारलं.
“अगं निरजचा आवाज आला ना… त्याला पहायला गेला तो. बस तू. चहा टाकते तुझा…..” पण आईचं वाक्य पूर्ण होऊ न देताच नेहा बेडरूमकडे धावली.
निरजला रोहन काही अपाय तर करणार नाही ना अशी भीती तिला वाटत होती. थोडं पळत पळतच ती बेडरूम कडे गेली आणि दारातच थबकली….
नीरज पहिल्यांदाच बेडवरून खाली उतरण्याचा प्रयत्न करत होता. चिमुकल्या हातांनी त्यानं बेडशीट घट्ट पकडून ठेवलं होतं… पाय बेडवरून खाली सोडले होते…. त्या उंच बेडवरून त्याचे पाय जमिनीवर पोहोचत नव्हते… आणि …. बेडलगत छोटुकला रोहन ओणवा बसला होता…. निरजला बेडवरून उतरता यावं म्हणून त्यानं आपल्या पाठीची जणू काही पायरीच तयार केली होती. त्याच्या तीनही बाजूला त्यानं उशा टाकल्या होत्या. म्हणजे उतरताना निरज पडला तरी त्याला लागणार नाही.
ते गोजिरवाणं दृश्य पाहून नेहाच्या डोळ्यात पाणीच आलं. आत्ता रागाच्या भरात आपण नको ते बोलून रोहन आणि नीरज मध्ये दरी निर्माण केली असती याची तिची तिलाच लाज वाटली. हे दृश्य दाखवून तिचे डोळे उघडल्याबद्दल तिनं परमेश्वराचे आभार मानले… आणि हळूच बेडरूम मधून बाहेर येऊन ती भिंतीला पाठ टेकवून उभी राहिली. डोळे बंद करत आपले अश्रू तिनं मुक्तपणे गालावरून ओघळू दिले.
डोळे उघडताना तिला तिचं आणि तिच्या धाकट्या बहिणीचं नातं आठवलं. एरवी आपण दोघी भांडत असू, एकमेकींच्या अक्षरशः जीवावर उठत असू… पण बाहेरच्या लोकांसमोर किंवा बहीण अडचणीत असताना आपण दोघीच एकमेकींच्या सपोर्ट सिस्टिम होतो हे आठवून नेहाच्या चेहऱ्यावर हसू उमललं.
रोहन आणि निरजच्या नात्यात निखळ प्रेमच आहे कुठेही तिरस्कार किंवा इर्षा नाही याची तिला मनोमन खात्री पटली.
एकदा सहज बेडरूम मध्ये डोकावल्यावर नीरज आणि रोहन उशांवर खेळताना तिला दिसले….
… आणि ती प्रसन्नपणे आईनं बनवलेला चहा प्यायला किचनमध्ये गेली.
Image by Виктория Бородинова from Pixabay
Latest posts by Sanika Wadekar (see all)
- प्रगती भाग ८ – शेवटचा भाग - September 10, 2020
- प्रगती भाग ७ - September 7, 2020
- प्रगती- भाग ६ - September 4, 2020
किती छान, गोड कथा 🙂
छानच
Sweet fresh story just like u ❤️
♥️♥️♥️
गोड कथा, छान👌👌❤️
सुंदर कथा आहे, भावा भावां मधलं लहान पणातल अव्यक्त नात, बहिणींंचं ही तसच असत की. प्रसन्न वाटलं दादा ही कथा वाचून. पण रोहन शाळेत शिक्षिकेला त्याच्या भावाबद्दल अस का सांगतो, सॉरी मला समजलं नाही म्हणून विचारतोय. भावाबद्दल थोडा राग म्हणून, त्याच्याकडे (रोहन) दुर्लक्ष होतंय म्हणून?