रिले कथा- “बी पाॅझीटीव्ह” – भाग १
हे कधीतरी होणारच होतं.
पानी में रेह के मगरमच्छसे बैर ?
नाॅट पाॅसीबल.
समतानगर.
खरंच श्रीमंत.
काऽऽय ?
दारिद्रय, अस्वच्छता आणि रोगराई.
ही श्रीमंती ओसंडून वाहणारी.
जागोजागी कचर्याचे डोंगर.
ऊघडी गटारं.
भटकी कुत्री.
काळीकुट्ट डुकरं आणि त्यांची गुलाबी पिल्लावळ.
डास, ढेकूण , झुरळं आणि लाखो किटाणू.
आणि तरीही जिवंत राहणारी भरमसाठ माणसं.
डेंगू, मलेरिया ईथे पाचवीला पुजलेला.
पत्र्याच्या, पिटाच्या, प्लॅस्टिकच्या, बांबूच्या झोपड्या.
एकमजली, दोनमजली.
दाटीवाटीने ऊभ्या राहिलेल्या.
एका झोपडीला सर्दी झाली,
तर लगेच दुसरीला शिंक यायची.
तिसरीला ताप भरायचा.
ईतक्या सगळ्या जवळच्या.
सगळ्यात मागे शहरातला फेमस वाहता नाला.
24×7 सुगंधी दर्प.
कुणालाच त्रास नाही या वासाचा.
मजदूर आणि मजबूर सगळे ईथलेच.
पूर्वी गंगेच्या काठानं गावं वसली म्हणे.
ईथे महानगरात नाल्याच्या काठी झोपडपट्टी वसते म्हणे.
ईथे बर्याच लोकांचे दोन वेळच्या जेवायचे वांदे.
पिणारे मात्र भरपूर.
भांडणं, शिव्या, मारामार्या, झोपडपट्टी दादा आणि…
क्वचित कधीतरी एखादा खून.
ईथं सगळं रूटीन आहे.
स्टेशनच्या मागच्या बाजूला.
समतानगरची मोठ्ठी कमान आहे.
तिथून आत शिरायचं.
ऊजव्या बाजूला संज्याचं भंगारचं दुकान.
शेजारी पक्क्या विटांचं बांधकाम केलेल्या दोन खोल्या.
ईथला हा परिसर जरासा स्वच्छ.
झाडलोट केलेला.
समतानगरात याशिवाय दुसरं पक्कं बांधकाम नाही.
खोलीवर डाॅ. रूस्तम दारूवाला अशी पाटी दिसेल.
बाहेरच्या खोलीत वेटींग.
आतली खोली डाॅक्टरांची.
बाहेर गर्दीसागर.
पाऊल ठेवायला जागा नाही.
नुस्ते पिचके रडके आजारी चेहरे.
तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका.
डाॅक्टरांशी बोलणं झालंय ?
भेटायची वेळ ठरलीय ना ?
मग सरळ आतल्या खोलीत जा.
ईथे कुणालाच काही वाटायचं नाही..
आत गेलात की पेशंट तपासणारे डाॅक्टर दिसतील.
“एवढा पेशंट तपासतो.
मग बोलू आपण…”
सहज तुमचं भिंतीकडे लक्ष जातं.
एम. बी. बी. एस.
एम. डी. मेडीसीन.
गोल्ड मेडलिस्ट.
वेडा आहे का हा माणूस ?
हा ईथे काय करतोय ?
तुम्ही डाॅक्टरांची केस स्टडी करायला घेता.
गोरा पान.
ईतका गोरा की जरा नख लावलं की तांबडा पडायचा.
रूंद कपाळ.
गरूडचोच नाक.
चेक्सचा शर्ट.
काळी पँट.
अघळपघळ सुटेलू पोट.
ससपेंडर्सने पँट शर्टावर लटकवलेली.
डोक्यावर काळी पारशी टोपी.
अतिप्रमेळ निळेभोर डोळे.
पन्नाशीच्या आसपास वय.
तरीही ऊत्साहाचा नायगारा.
तुमचा कुठला तरी जुनाट आजार.
कुणीतरी या पारशीबावाचा नाव सांगितलेला.
याचा डायग्नोसिस एकदम परफेक्ट.
म्हणून तुम्हाला ईथं यावं लागलं.
तुम्ही डाॅक्टरशी बोलता.
डाॅक्टर एकदम छान मराठी बोलतात.
गुजराती आणि ईंग्लीश सुद्धा.
चाॅईस ईज युवर्स.
डाॅक्टर तुम्हाला चेक करतात.
दोन औषधं लिहून देतात.
किती द्यायचे ?
दहा रूपये.
काय ?
ईथला हाच रेट आहे.
यकीन नही आता…
येडा आहे हा.
डाॅक्टरला काही कमी नाही.
दारूवाला.
खरंच त्याचा पिढीजात धंदा होता हा.
त्याचा भाऊ हाच धंदा करायचा पूर्वी.
काही वर्षांपूर्वी मात्र बंद केलेला.
कल्याणीनगरला मोठ्ठा बंगला आहे त्याचा.
त्याची बायडीही डाॅक्टर आहे.
डाॅ. शिरीन दारूवाला.
याच्यासारखीच पागल.
डिट्टो.
मेड फाॅर ईच आदर.
ती तिकडे जनता दरबारला दवाखाना चालवते.
सायरस.
त्यांचा डिकरा.
तोही डाॅक्टर. पीजी करतोय.
तो पुढे काय करेल माहित नाही.
तो सुद्धा असंच काहीतरी करेल.
मॅड फॅमिली आहे झालं.
तर काय सांगत होतो ?
महिनाभरात तुमच्या एक दोन चकरा होतील.
दुखणं गायब.
चला गोया छे !
डाॅक्टर दारूवाला जादूगार वाटायला लागतो.
डाॅक्टरवर तुमचा जबरदस्त विश्वास बसतो.
तुम्ही अजून कुणाला तरी..
ईथं पांढरपेशी गर्दी वाढू लागते.
डाॅक्टर हुशार.
डायग्नोसिस परफेक्ट.
लोकांच्या ऊपयोगी पडावं याचंच वेड.
Hide quoted text
अशा माणसानं डाॅक्टरच व्हायला हवं.
समतानगरसारख्या कुठल्यातरी गरीब वस्तीत जायला हवं.
तसंच झालंय.
डाॅक्टर दारूवाला आहे म्हणून…
सध्या ईथं आलबेल आहे.
पब्लिक शहाणं झालंय.
डाॅक्टरच्या ऐकण्यातलं आहे.
तोंड झाकून वावरतायेत सगळे.
कुणी गर्दी करत नाही.
साबणानं हात धुतायेत.
पब्लीक टाॅयलेट साफ ठेवलंय.
डाॅक्टर सॅनिटायझरच्या बाटल्या वाटतोय.
दोन महिन्यात फक्त सहा केसेस.
त्यातले चार बरेही झाले.
एकही दिवस दवाखाना बंद नाही.
आज बंद.
काल रात्रीपासून.
डाॅक्टरची तबीयत बरी नाही.
खोकला.
ताप.
डाॅक्टर खूप काळजी घ्यायचे..
तरीही.
डाॅक्टरने लगेच बायडीला वरच्या मजल्यावर पाठवली.
फोन केला.
अॅम्ब्युलन्स आली.
बाहेर पडताना तो बायडीला भेटला सुद्धा नाही.
पोरगा पीजी करायला हॉस्पिटलच्या हाॅस्टेलला
हा ससूनला निघाला.
Hide quoted text
डाॅक्टरचा पेशंट झालेला.
चेहर्यावर काळजी.
“पाॅझीटीव्ह ?
माझं काय होणार ?
माझी बायडी ?
माझा डिकरा ?
कुनाची बी फिकीर नाही.
दोन चार दिन रोयेगा.
रूस्तम चांगला होता साला.
मेला बेचारा…
मर माजा दवाखाना ?
समतानगरचा काय होयेगा ?
तिकडे कुनी बी जायला तैयार नाय..
डाॅक्टर दारूवाला गेहरी सोच में.
शिरीनला सांगितला तर ?
तिचा जनतामदला दवाखाना ?
माॅर्निंगला समतानगरला.
ईव्हिनिंगला जनतादरबारला.
ये जमेगा…
शिरीनला मेसेज टाकायला हवा.
मला काय जाला तर ?
मी पाॅजीटीव आला तर…
हे असं कर.
ती नाय न्हाई बोलनार.
साॅरी शिरीन…
तुज्याबरोबर सायरसच्या काॅनव्होकेशनला जायचा होता.
आन तुला घेवून ऊदवाडच्या अग्यारीला बी जायचाय..
या जनममंदी न्हाई जमला तर नेक्स्ट टटाईम पक्का.
सायरस..
डिकरा चाॅईस ईज युवर्स.
तुला कल्याणीनगरला हाॅस्पीटल खोलायचा असेल तर..
वांदो नथी.
आपला जागा हाई.
तुझ्या अंकलशी बोलून कन्स्ट्रक्शन चालू करना बावा.
नाहीतर समतानगर जिंदाबाद.
ए खुदाई…
मनासारखं जगायला मिळाला.
तेरा लाख लाख शुकर…
बाय शिरीन.
बाय सायरस.”
……कौस्तुभ केळकर नगरवाला
Image by mohamed Hassan from Pixabay
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)
- घरघर….. - October 4, 2021
- ‘स्कूल चले हम ! - September 22, 2021
- चष्मा - July 12, 2021
Too good.. Kiti chhan lihilat.
👌👌