रिले कथा- “बी पाॅझीटीव्ह” – भाग २
मेसेज टिंगटिंगला
‘सॉरी शिरीन…
तुज्याबरोबर सायरसच्या कॉनव्होकेशनला जायचा होता.
आन तुला घेऊन ऊदवाडच्या अग्यारीला बी जायचाय..
या जनममंदी न्हाई जमला तर नेक्स्ट टाईम पक्का….’
पुढची अक्षरं…
शिरीनला दिसलीच नाहीत.
थरथरत्या हातातून आधी मोबाईल पडला
आणि मग….
शिरीन कोसळली…
ऊंच, गोऱ्यापान, सुंदर शिरीनच्या
चेहऱ्यावरचा रंग उडाला
काळेभोर डोळे उघडलेच नाहीत
जनता दरबार भरलेला
बाया बापड्या शिरीनला देवी मानणाऱ्या
त्यांची देवीच कोसळल्यावर एकच गोंधळ उडाला
सिस्टर्स आणि रुस्तमचा भाऊ धावत आले
टेम्परेचर, हार्ट बिट्स चेक केले गेले
तापाने फणफणली होती शिरीन
नर्सने ऑक्सिमिटर लावला
तो ऐंशी पार होईना
जनता दरबारच्या गर्दीत प्रसाद मिळाला?
अम्ब्युलन्सचा सायरन किंचाळला
शिरीन ससूनला…
ज्याची भीती होती तेच झालं
शिरीन… पॉझिटिव्ह…
ग्लानीत शिरीनला बीजे दिसत होतं
एम.बी.बी.एस.चं शेवटचं वर्ष
लिस्टला पहिलं नाव
रूस्तम दारूवाला
दुसरं नाव
शिरीन बाटलीवाला
कॉनव्होकेशनला नावं पुकारली गेली
स्टेजवरून उतरताना
नजरे मिली दिल धडका…
काँग्रेट्स करताना रुस्तमने धाडस केलं…
‘शिरीन….
आय लाईक यू….’
शिरीनने वर पाहिलं
निळ्याशार डोळ्यांच्या समुद्रात बुडाली
रूस्तुमनं एम.डी. मेडिसीन केलं
शिरीननं एम.एस. गायनेक
दोघंही परत बिजेलाच
अडीच वर्षात
हम बने तुम बने
एक दुजे के लिये
हे दोघांनाही चांगलंच समजलेलं
पीजीच्या कॉनव्होकेशनला
रूस्तमचा अगला सवाल
‘शिरीन…
लग्न करशील माझ्याशी?’
आता शब्दांची गरज होती?
पण गुलाबाच्या पाकळ्या उलगडल्यागत
शिरीनने ओठ हलवले
‘एक अट आहे…’
‘कोणती?’
रूस्तमची धडधड वाढली
‘समाजसेवा करायची नाही’,
असं म्हटली तर???
तर…. विसरून जायचं….
पण…
ती शिरीन होती…
‘दारुवाल्याचा’ ‘औषधवाला’ होशील?
तिनं आर्जव केलं
म्हणजे? तो गोंधळला
म्हणजे दारूचा व्यवसाय बंद.
माझं हॉस्पिटल झाल्यावर
तुझा भाऊ मला मदत करेल
ठरलं…
भावालाही आवडलं.
पापाचा धंदा बंद.
पैसा??? तो कोणाला हवा होता?
प्रेम आणि विश्वास पुरेसं आहे की!
शुभ मंगल सावधान!!!
दारूवाला फक्त नावापुरता उरला.
तो कधीच शिरीनच्या बाटलीत उतरला.
दोनच वर्षात छोट्या रूस्तमचं
सायरसचं आगमन.
दिवस भुर्रर्रर्रर्र उडाले.
पुढच्या आठवड्यात सायरसचं
कॉन्व्होकेशन.
एम.डी. मेडिसीनचं.
पण लॉक डाऊनमुळे
पोस्टपोनलेलं.
ग्लानीत पडल्या पडल्या शिरीनला हे आठवलं.
डोळ्यातून दोन थेंब ओघळले.
कोणीतरी पुटपुटलं
रूस्तम आय.सी.यू. मध्ये…
व्हेंटिलेटरवर… शिरीन बेशुद्ध…
बिच्चारा सायरस…
आई वडील दोघेही पॉझिटिव्ह…
शिरीनला निळेशार डोळे आठवले. रूस्तमचे.
ते डोळे…
त्यातलं प्रेम दिसणार नसेल
तर कशाला जगायचं?
सायरस तरुण आहे
त्याला जोडीदार मिळेल
विसरेल तो सगळं
‘सॉरी सायरस…
तुझ्या कॉनव्होकेशनला
नाही येऊ शकत आम्ही…
पण तू हिंमत नाही हरायची….
समता नगर आणि जनता दरबार
हीच दोन आता तुझी घरं
तू नक्की तुझ्या घरच्यांची काळजी घेशील
गुड बाय डिकरा…’
शिरीनची ऑक्सिजन लेवल कमी होत चाललेली
व्हेंटिलेटर चालू झाला
तातडीने उपचार सुरू झाले
दोन दिवसांनी शिरीनने
डोळे किलकिले केले
तेच निळेशार डोळे….
तिच्याकडे अत्यंत प्रेमाने बघत होते…
“रूस्तम…..”
पी.पी.ई. किट मधल्या रुस्तमने तिला शांत राहण्याची खूण केली.
तिचे डोळे पाझरू लागले.
निळ्या डोळ्यातून समुद्र वाहू लागला.
रूस्तम दिसल्यावर
शिरीनला यमाची सुद्धा भीती नव्हती.
निळ्या डोळ्यांनी जादू केली.
झपाट्याने शिरीन बरी झाली.
तिसऱ्या दिवशी चालायला लागली.
सकाळीच रूस्तम पी.पी.ई. किट घालून हजर
आज त्याचे निळे डोळे प्रेमळ नव्हते…
का???
काळजीत वाटतोय का तो?
शिरीन कन्फ्युजली…
रूस्तम तिला हाताला धरून
आय.सी.यु.च्या समोर गेला.
काचेतून शिरीनने पाहिलं.
बेडवर व्हेंटिलेटर लावलेला रूस्तम.
धपापत झोपलेला.
म्हणजे हा???
आपल्या शेजारी आहे तो??
“सायरस”
ती अस्फुट ओरडली.
“मी ससूनमध्ये कोविड सेक्शनला आहे हे विसरलीस का?”
मिस्कील हसत सायरस म्हणाला
निळ्या डोळ्यांनी धीर दिला.
तिच्यासमोर पी.पी.ई. किट धरलं.
“पप्पाला बरं करून बाहेर आण”
सायरस ठामपणे म्हणाला.
किट चढवून शिरीन आयसीयूत गेली
“रूस्तम….”
हळुवार हाक ऐकताच
पापण्यांच्या फटीतून निळे डोळे लुकलूकले
अजून फक्त तीन दिवस…
रूस्तम बाहेर यायलाच हवा
समता नगर आणि जनता दरबारला
पोरकं करून कसं चालेल?
झालंही तेच….
चारच दिवसात…
शिरीनच्या दोन
काळ्याभोर डोळ्यांबरोबर
चार निळे डोळेही
आनंदाने हसत होते…
“बी पॉझिटिव्ह” म्हणत होते…
सानिका वाडेकर …..
Image by mohamed Hassan from Pixabay
Latest posts by Sanika Wadekar (see all)
- प्रगती भाग ८ – शेवटचा भाग - September 10, 2020
- प्रगती भाग ७ - September 7, 2020
- प्रगती- भाग ६ - September 4, 2020
Afalatun…
निःशब्द….काय लिहिता राव…!!
मस्तच
Maat