बार्बी गर्ल

रोजच्याप्रमाणे सुनिल गोडाऊन वर पोहोचला. तसा उशीरच झालेला त्याला. एक तर दिवाळीचा सीझन चालु होता. म्हणजे दिवाळी अजून यायची होती. पण “बिग बोनांझा दिवाळी ऑफर” सुरू झालेली. त्या निळ्या कलरच्या सॅगमध्ये त्याने सगळ्या वस्तू भरल्या. वस्तू तरी कुठे एक सारख्या होत्या. कोण लॅपटॉप मागवतंय, कोण मोबाईल मागवतंय, तर कोणी लिपस्टिक, डिओ मागवतंय. ह्या वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू एकत्र बसवायच्या म्हणजे कसरतच असायची रोजची. त्यात सीझन सुरू झाल्यामुळे, आणखीन वजन, आणखीन फिरणं आलं. सॅग कसली ते तर पोतडंच होतं. रोज पाठीला अडकवायचं आणि चालू पडायचं. नाही म्हणायला बाईकच्या सीटचा आधार मिळायचा. कारण वजनच इतकं व्हायचं की ते सगळं पोतडं सीटवर यायचं खालपर्यंत.

” कोण कोण काय काय मागवतंय. ऑनलाइन शॉपिंग आहे म्हणून काहीही मागवायचं घरबसल्या. सुया, रबरबॅण्ड! इथं आम्ही मरमर मरतोय, वणवण हिंडतोय, यांच्या वस्तू, यांची स्वप्नं यांच्या हातात पोहोचवण्यासाठी. कुणाच्या खांद्यावरं कुणाचे ओझे!” खरंतर त्याचा हा राग परिस्थितीजन्य होता. डायरेक्ट कस्टमरवर त्याचा राग नव्हताच कधी. एखादा ब्रँडेड मोबाईल कस्टमरच्या हातात दिल्यावर त्याला त्यांच्या चेहऱ्यावरची उत्सुकता, खुशी दिसायची. मग त्याला जाणवायचं, आपण या ब्रँडेड वस्तू पोहोचवतो सगळीकडे पण आपल्याकडे काय!परिस्थितीमुळे जास्त शिक्षण घेता आलं नाही, घरची गरिबी! मग ही नोकरी पत्करली. तरी बरं शालूची साथ आहे. पण तिच्याही काही ईच्छाआकांक्षा असतीलच की आणि छोटी इरा तिनं तर लिस्टच देऊन ठेवलीये यावेळेस. वर म्हणते कशी ,”बाबा, तुम्ही लोकांसाठी वस्तू घेऊन जाता, वेळेवर पोहोचवता आणि मी मागितलेलं नेहमी विसरता.”

“तिचा तरी काय दोष आहे म्हणा. तिचं वयच आहे हट्ट करायचं. या मुलींना बाहुल्या एक फार आवडतात. कुठल्यातरी मैत्रिणीकडे दिसली ती “बार्बी गर्ल” आणि तेव्हापासून हट्टच धरला. खेळण्याच्या दुकानात घेऊन गेलो खरा तिला. म्हटलं असेल चार-पाचशे पर्यंत. पण किंमत ऐकून चाटच पडलो. दुकानदाराने दुसरी दाखवलेली, तशीच दिसणारी पण डुप्लिकेट.” मग म्हणते कशी ,”मला पहिलीवालीच पाहिजे म्हणून.” बिचारी घरी येईपर्यंत रडत होती.

“पण काहीही होवो. दिवाळीपर्यंत कुठल्याही परिस्थितीत इराला तिला हवी असलेली “बार्बी गर्ल” आणून द्यायची. ओव्हरटाईम करीन, जास्तीत जास्त डिलिव्हरी करीन, म्हणजे इंसेंटिव्ह पण मिळेल. मग त्या पैशातूनच तिचा हट्ट पूर्ण करू. ठरलं तर.” सुनिलनं चांगलंच मनावर घेतलं.

दुसऱ्या दिवसापासून सुनिल आणखी जोमानं कामाला लागला. दिवसभरात जास्तीत जास्त डिलिव्हरी कशी होईल हे बघू लागला. सकाळी जरा आणखीन लवकर निघू लागला. यायला मात्र उशीर होत होता त्याला. बरेचदा इरा वाट पाहून झोपी जायची. शालू म्हणाली सुद्धा,”अहो, किती राबताय. जरा तब्येतीकडे पण लक्ष द्या. एवढे कष्ट करून काय आजारी पडायचंय का ऐन दिवाळीत. लहान मुलांना काय कळतंय. जरा कुठे नवीन वस्तू, खेळणं दिसलं की हट्टाला पेटतात. उठसुठ सगळे हट्ट पुरवायचे नसतात त्यांचे.”

“अगं पण, त्या दिवशी किती रडत होती पाहिलंस ना. आपण रिकाम्या हातानेच परत आलो त्या खेळण्याच्या दुकानातनं” सुनिल सांगत होता आणि शालूचा मात्र डोळा लागलेला.

आज सुनिल भलताच खूश होता. कारणही तसंच होतं. टार्गेट पूर्ण केल्यामुळे त्याला बऱ्यापैकी इंसेंटिवही मिळाला होता. गोडाऊनवरच्या साहेबांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन तो तडक खेळण्यांच्या दुकानात गेला. कोऱ्या करकरीत नोटा दुकानदारासमोर ठेऊन त्यानं ती “बार्बी गर्ल” बाहुली पॅक करून घेतली. आता मस्तपैकी इराला सरप्राईज द्यायचं!

गाडी चालवतानादेखील इराच्या चेहऱ्यावरचं हसूच दिसत होतं फक्त त्याला. त्या विचारांच्या धुंदीत असतानाच अचानक एक म्हातारी बाई समोर आल्यामुळे तो गडबडला आणि तिला वाचवण्याच्या नादात गाडीवरून घसरून पडला. थोडं खरचटलं त्याला आणि गुडघ्याला थोडा मुका मारंही लागला त्याच्या.

“थोडक्यात निभावलं” त्याच्या मनात विचार येऊन गेला.

आणि पुन्हा गाडीवर बसणार इतक्यात त्याच्या लक्षात आलं,”अरे, तो पॅक केलेला बॉक्स कुठे गेला”.

बॉक्सचा चुराडा झाला होता. तो तसाच खिन्न नजरेने घरी यायला निघाला.

” किती खूश झाली असती इरा, “बार्बी गर्लला” बघून. सगळ्यावर पाणी पडलं. कष्ट, पैसे सगळंच वाया गेलं” असं म्हणत त्यानं वरती आभाळाकडे बघितलं.

“शालूला तरी काय सांगणार आहोत आपण आता?”

सुनिलनं दारावर टकटक केलं आणि आत शिरताच इरा त्याला बिलगली ,”थँक यू बाबू,किती छान आहे तू दिलेली बाहुली, अगदी मला पाहिजे होती तशी माझी” बार्बी गर्ल”! आणि तिनं तिच्या बाबूच्या गालाचा पा घेतला.

सुनिलला काही कळेना. त्यानं हळूच शालूकडे बघितलं.

“अहो, ते काकतकर आजीआजोबा नाहीत का नवजीवन सोसायटीतले, ज्यांच्याकडे मी पोळ्या करायला जाते. त्यांनीच दिली ही” बार्बी गर्ल”. त्यांनी त्यांच्या नातीसाठी आणली होती खास. त्यांचा मुलगा बेंगलोरला असतो ना. तो आणि त्याची फॅमिली सगळे दिवाळीसाठी येणार होते इकडे. पण ऐनवेळी कॅन्सल झालं त्यांचं. मग मला म्हणाले,”नात काही आता पुढच्या वर्षीखेरीज यायची नाही. इरासुद्धा नातीसारखीच आहे मला. तिलाच ठेव ही बाहुली आणि हो, मी दिलीये असं सांगू नकोस. लहान मुलं हुशार आहेत आजकालची. सगळं कळतं हो त्यांना.”

सुनिल काय समजायचं ते समजून गेला. त्याच्या वेदना आता कुठल्या कुठे पळून गेल्या होत्या. इरा आणि शालूच्या चेहऱ्यावरचा आनंद, समाधान हेच त्याच्यासाठी सगळं काही होतं. झाल्या प्रकाराची वाच्यता न करताच त्यानं दोघींना कडकडून मिठी मारली.

Image by Alexas_Fotos from Pixabay 

Mahesh Kale

Mahesh Kale

नाव - महेश काळे शिक्षण - डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनीअरिंग, ऍडव्हान्स डिप्लोमा इन जर्मन लँग्वेज मॅक्सम्युलर मधून जर्मन लँग्वेज B2 लेव्हल सध्या "सँडविक एशिया लिमिटेड" पुणे येथे नोकरीस लेखनाची, कविता करण्याची आवड कलेच्या विविध प्रांतात संचार करायला आवडते.

10 thoughts on “बार्बी गर्ल

    • July 11, 2020 at 5:36 pm
      Permalink

      छान कथा आहे महेश👍
      Welcome to lekhak online.

      Reply
  • July 12, 2020 at 4:41 am
    Permalink

    मस्त कथा, आई वडिलांची मुलांचे हट्ट पुरवताना होणारी कसरत पण छान साकारली आहे मनाला भिडते गोष्ट…..

    Reply
    • August 5, 2020 at 3:10 pm
      Permalink

      सुंदर कथा

      Reply
  • July 12, 2020 at 4:57 am
    Permalink

    छान सुरुवात

    Reply
  • July 19, 2020 at 10:26 am
    Permalink

    Mast 👌

    Reply
  • July 19, 2020 at 10:51 am
    Permalink

    Chan hrudaysparshi gosht

    Reply
  • August 7, 2020 at 10:50 am
    Permalink

    Chan Katha Mahesh!! Keep it up!

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!