क्वारन्टाईन आजी
आजची ताजी गोष्ट.
अगदी तासाभरापूर्वीची.
लाॅ काॅलेज रोडवरनं मी सुसाट घरी निघालेलो.
कोरोनाकृपेमुळे सगळे रस्ते,
आजकाल डायेटींगवर असतात.
पोटात काही नसल्यासारखे रिकामे.
फिल्म ईन्स्टीट्यूटपाशी पोचलो असेन.
तिथं एक बसस्टाॅप आहे.
बसस्टाॅपशेजारी एक आजी ऊभ्या होत्या.
प्रचंड अस्वस्थ.
अगदी अत्यवस्थ म्हणलं तरी चालेल.
बसेस बंद.
आजींनी ऊजवा हात आडवा करून ठेवलेला.
येणार्या प्रत्येक रिक्षाला हात करून झाला.
काहीही ऊपयोग झाला नाही.
सेकंद बाय सेकंद आजीची अस्वस्थता वाढत चाललेली.
आता जर हिच्यासाठी कुणी थांबलं नाही ना..
ईथल्या ईथं अॅटॅक येऊन मरून जायची बहुतेक.
तिला कुठं तरी जायचं होतं.
अगदी अर्जंट.
काय करू ?
लिफ्ट द्यायला आवडतं मला.
नाहीतरी गाडी रिकामीच चाललेली असते.
वाटेत एखाद्याला ड्राॅप करता आलं तर..
पेट्रोलचे पैसे वसूल झाल्याचा फील येतो.
ऊतरणारा मनापासून थँक्स म्हणतो…
भारी वाटतं एकदम.
मला असं थेंब थेंब पुण्य गोळा करायला फार आवडतं.
पण आता..
या आफ्टरकोरोना लाईफमधे हे फार रिस्की.
मी तसाच निर्लज्जासारखं पुढे सटकलो.
पाच एक मीटर पुढे गेलो असेन…
गाडी ब्रेक मारून स्वतःची स्वतः थांबली.
जाऊ दे.
झाला कोरोना तर होवू देत.
मी खाली ऊतरलो.
आजीचा झाकलेल्या चेहर्यावर,
आशेचा सूर्य ऊगवलेला मला स्पष्ट दिसला.
“कुठं जायचंय आजी तुम्हाला ?”
”बधाई स्वीटपाशी.
कुणी रिक्षावाला थांबतच नाहीये.”
‘चला.
मी सोडतो तुम्हाला.
मला तिथंच जायचंय पुढे रोहन प्रार्थनामधे.’
आजी आनंदानं गाडीत मागे बसली…
तरीही…
मी तिच्या हातांवर सॅनिटायझरचा प्रसाद दिला.
कोरोनादैवाय नमः !
आजी मधनं मधनं पदरानं डोळे पुसत होती.
“काय झालं आजी ?”
‘काय सांगू बाबा तुला ?
प्लेगसारखा बिथरलाय कोरोना तुझा.
माझ्या लेकाला आणि सुनबाईला.
दोघांनाही धरलाय त्यानं.
दोघही पाॅझीटीव्ह आलीयेत.
हाॅस्पीटलात अॅडमीट केलंय दोघांनाही.
सहा वर्षाचा नातू तेवढा निगेटिव्ह.
विश्वेश्वरा सांभाळ रे बाबा सगळ्यांना.
जाता जाता सूनबाईनं शेजार्याकडं ठेवलाय नातवाला.
तिथनं फोन आला.
म्हणून निघालेय तिकडे.”
मी रूटीनप्रमाणे च्च केलं.
बाप्पांना फ्रेन्डरिक्वेस्ट पाठवली.
लवकर बरं कर रे बाप्पा सगळ्यांना.
“देवासारखा भेटलास अगदी.
पोरा एक सांगशील ?
क्वारन्टाईन म्हणजे काय रे ?”
‘काही नाही हो आजी.
कोरोना पाॅझीटीव्ह झालेल्यांना,
वेगळं ठेवतात काही दिवस.
त्यालाच क्वारन्टाईन म्हणतात.
क्वारन्टाईन केलं की पेशंट लवकर बरा होतो.’
आजीनं भक्तीभावानं मान डोलावली.
मला आरशातनं दिसलं तसं.
“शेजारीण सांगत होती.
सूनबाई आभाळभर रडली,
हाॅस्पीटलात जाताना.
माझ्या पोराचं कसं होणार ?
काही काळजी करू नकोस गं बयो.
आजी जिवंत आहे अजून त्याची.
सांभाळीन हो मी वेवस्थित त्याला..”
आजी बहुतेक हे स्वतःलाच सांगत असावी.
कर्वे रोड सुद्धा हे सगळं कान देऊन ऐकत होता.
दहा मिनटात आम्ही बधाईपाशी पोचलो.
“बस ईथंच थांबव.. “
डुगडुगत आजी खाली ऊतरली.
“खूप कौतुक वाटलं पोरा तुझं.
असाच लोकांच्या ऊपयोगी पडत जा.
काही काळजी करू नकोस.
तुम्हा कणाला नाही होत हा कोरोना.
आशीर्वाद आहे माझा.”
आजीनं माझ्याकडे बघत बोटं मोडली.
“डोन्ट वरी आजी.
सगळं ठीक होईल.
स्वामी सगळं सांभाळून घेतील.
आजो, अगं तुझं नाव तर सांग”
मी हसत हसत म्हणलं.
आजी खिन्न हसली.
“माझं नाव,
माझं नाव क्वारन्टाईन आजी.
आत्ताच बारसं केलंय मी माझं.
सुनबाईनं क्वारन्टाईन करून ठेवलंय मला.
गेली सात वर्ष.
वृद्धाश्रमात होते तिकडे.
ही जबाबदारी संपली की जाईन परत.
एक सांगू..?
कशातही गुंतून पडायचं नाही.
कशी का असेना सून आहे हो माझी.
मला जायलाच हवं.
लेकापासून लांब राहण्याची सवय नाहीये हो तिला.”
मी फ्रीज्ड.
पाठमोर्या क्वारन्टाईन आजीकडे बघत बसलो.
काळाचं घड्याळ बंद पडलेलं.
माझ्या काळजालाच कोरोना झालेला.
अजूनही यावर औषध सापडलं नाहीये म्हणे.
…….कौस्तुभ केळकर नगरवाला.
Image by Sabine van Erp from Pixabay
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)
- घरघर….. - October 4, 2021
- ‘स्कूल चले हम ! - September 22, 2021
- चष्मा - July 12, 2021
Superb
👌👌👌
Khoop Chhan
khup chhan
खूप सुंदर…..
Sundar👌👌
असे बरेच जणांना हा फायदा मिळो