बेडी
” ****ची अवलाद साली ! उठ !” नामदेव चा नेहमीचा रासवट बेमुरव्वत आवाज आलाच . गोधडीत आत टक्क जागी असलेल्या गौरा नं आपले कोरडे , चिरा पडलेले ओठ घट्ट दाबून धरले तसे ते आणखी चर्रकन तडकले . एक अपेक्षित लाथ पोटात बसली , तसं उठावच लागलं तिला .
ह्या लाथेनेच तर तिचं तीन महिन्याचं …त्या दिवशी खूप रडली होती गौरा … आतून वाईट वाटलं होतं ; पण मग खालच्या गल्लीच्या बेबीनं झालं ते कसं बरंच झालं हे तिच्या अर्वाच्य भाषेत समजावलं , अन सुटल्यागत झालं होतं गौरा ला. तिच्या डोळ्यात एक विलक्षण चमक आली होती तेव्हा …वाटलं , खरंच …किती बरोबर आहे . कशाला आणखीन एका जीवाला पुन्हा हेच भोग भोगायला जन्माला घालायचं , आणि त्याच्या बेड्या आयुष्यभर वागवत पुन्हा सुटण्याची धडपडच करायची? किती उरफाटा न्याय असतो माणसाच्या मायेचा?
मग वेटाळ्यातील डॉ . बाईंकडे गुपचूप जाऊन आली ती . केव्हा न केव्हा नामदेव च्या लक्षात येणारच होतं ; पण परिणामाची चिंता न करता गौरा ठाम होती ‘ ह्याच्या सारखा आणखी एक जीव जन्माला घालायचं पाप माझ्या माथी नको ‘ म्हणून स्वतःची समजूत काढली होती तिनं . एक माय होती , तिला गेल्या वर्षी टी .बी नं गिळलं होतं . बाप तर कुठल्याश्या रोगानं आधीच गेला होता. दोन बहिणी होत्या मोठ्या , पण दोन बीजवरांशी दोघींचं लग्न लावून मोकळी झाली होती माय . तेव्हा गौरा फक्त आठ वर्षाची होती . बहिणी नाही शिकल्या , पण गौराच्या नशिबात निदान ती तरी एक चांगली गोष्ट घडली होती .नववी पर्यंत मायनं शिकवलं हेच खूप होतं . अभ्यासात हुशार होती ती . भाषा पण चॅन स्वच्छ होती . आवडायचं तिला शाळेत जायला .
तिच्या बहिणी कुठं बाजूच्याच गावात असतात असं म्हणत होता तो कळश्या . तिथं जायचं म्हणजे चार पैसे लागतील …तसं चांगलं मिळवत होती गौरा .. वस्ती पल्याड इमारतीत पाच घरचं धुणं भांडं होतंच , पैसे मिळत बऱ्यापैकी .. पण पगार मिळाला की आधी पहिला
चुंगी नाका म्हणजे दिवसभर खाट अडवून बसलेली म्हातारी … मग दुसरा नाका म्हणजे दारूच्या भापकारऱ्यात शिव्यांची माळ तोंडात घेऊन फिरणारा नामदेव . फ्लॅट वाल्या मॅडम तिच्या मागे लागून काही रक्कम मुद्दाम नामदेव पासून चोरून स्वतःकडे ठेवत . तेव्हढीच काय ती तिची ‘जमा पुंजी’ .
सकाळी सकाळी म्हातारी ची बडबड सुरू झाली होती . महिना संपून दोन दिवस झाले तरी गौरा ने हातावर काही टेकवलं नव्हतं . एकदा का पैसे मिळाले की वाण्याच्या फळकुटावरून शेव पुडा , गूळ , पावडर , मिश्रि ..असली काय काय खरेदी व्हायची म्हातारीची .गौरा ला मधेच कीव यायची तिची . पण ती फार कमी टीकायची , कारण नामदेव घरात असला की तिचं रूपच बदलायचं . अंगात आणि तोंडात खूप जोर चढायचा तिला . फाटक्या चिंध्या जोडून छान गोधडी शिवायची ती , पण माणसाला जोडणं जमलंच नाही कधी .आपल्याला नातवाचं तोंड अजून बघायला मिळालं नाही याच्या मागे गौरा च्या फ्लॅटवाल्यां मड्डमांची फूस आहे , असं बडबडायची ती . मग नामदेव सगळा राग तिच्यावर काढून तिचे हाडं सडकून काढे . कधी ती उलटून चवताळून त्याला प्रतिकार करे तर कधी मुकाट मार सोसत राही . गौरा हे एक अजब रसायन होतं .
आताशा दोघा माय लेकाला पूर्ण संशय आला होता की गौरा ने डॉक्टर कडून काहीतरी नक्की करून घेतलंय …नाहीतरी कमल ला कसं लगेच एका मागं एक लेकरं झाली होती .गौरा ला वाटायचं, ‘सूटली बिचारी . दोन पोरं घेऊन कुठे गेली देव जाणे , पण ह्या हराम्याच्यातावडीतून तर सुटली ..’ गौरा ने एक दीर्घ सुस्कारा सोडला . फळीवरचे दोन फुटके कप खांगाळून घेतले . पातेल्यावरच्या माश्या उडवल्या तसा मागून आवाज आलाच ..
” च्या दे ग लवकर ! अन त्याला जर राकेल चा वास आला न , तर तोंडावर फेकीन तो च्या तुझ्या ! “
तिला वाटलं , हे सगळं भांडं तिच्या डोक्यावर उपडं करावं . माझ्याजागी बेबी असती तर नक्की असंच केलं असतं .
संध्याकाळ ची दोन कामं रस्त्यापल्याड च्या इमारतीत होती , म्हणून चहा नावाचं फुळकट गरम पाणी घशाखाली ओतून गौरा निघाली . दारातच तोल सावरत नामदेव ! आता तर दिवस रात्र असा फरकच उरला नव्हता . कायम पिऊन तर्र !
” कामावरून काढलं की काय ? ह्या वेळेला पण लावून आलाय?” तिनं विचारलं , तसं तिला ढकलत तो आत शिरला . ती आपल्या खिचगिणतीतही नाही असं दाखवत भांडं उघडून बघत असतांना म्हातारी ओरडली .
” जेवायला घाल की त्याला . सकाळ धरून खाल्लं नाहीये . “
” काय शिजवून घालू? माझी हाडं?” तिचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच नामदेव नं पवित्रा बदलला आणि हातातील ताट तिच्या दिशेनं भिरकावलं . कपाळाला खोक पडून रक्त यायला लागलं , तसं शांतपणे गौरानं ताट उचललं . दारातून आत फेकलं .
“ए , जाती कूटं ? पैसे दे की ! “
” लाज आहे का तुला ? रस्त्याच्या कडेला पिऊन पडला होता ..डोळे फिरवले होते . दोन दिवस ऍडमिट केलं होतं ..ते पैसे कुठनं आले होते? माझी हाडं पिळून जमवलेले सगळे पैसे घातले तिथं ! ” केस बांधत ती पोटतिडकीनं म्हणाली .
एरवी एक घाणेरडी शिवी फेकून नामदेव नं तिच्या केसांना पकडून आत खेचलं असतं , पण आता काही न बोलताच तोल जाऊन तो जमिनीवर आडवा पडला. म्हातारी संबंध नसल्यासारखी दारातून बाहेर नजर फिरवली आणि गौरा पाठ वळवून चालायला लागली .
फ्लॅट वर आज बाईंकडे हळदी कुंकू होतं , तिला मदत करायची होती .
” ए s s , चालली कुठं ? पुन्हा वापस घरात घेणार नाही ! याद राख ! ” असं काहीसं ऐकू येत होतं , पण पदराने जखम पुसत ती न थांबता भराभर निघून गेली. आज तिच्या मनानी बंड पुकारलं होतं .
‘ का थांबलो आपण अजून? ह्या षंढ , निर्लज्ज आणि नालायक माणसासोबत का संसार ओढतोय? कामातून मिळालेल्या पैशातून एकटीचं जगणं कसं मस्तं होईल ….त्या शाह भाभी तर इथंच राहून काम कर म्हणून मागे लागल्यात …कुणाकडेही राहू …ही खोली सरकारनं दिलीय नामदेव ला …त्याच्या नावची आहे . आपल्या राशन कार्डावर पण तर हाच तर पत्ता आहे ….कोण आहोत आपण? माणूस आहोत की नुसता एक पत्ता ?कैद्याला देतात तसा एक आकडा? …का कुण्या एका नामदेवांनं आपल्या जिंदगीशी कसंही खेळावं असं एक खेळणं ?
फ्लॅटवरचा सगळा कार्यक्रम झाला. तिच्या कपाळावरची जखम ओलीच होती . त्याला औषध लावलं होतं मॅडमनी. गौरा चं स्वच्छ बोलणं , नीट काम करणं हे आवडायचं फ्लॅट मधील बायकांना. मॅडम नि तिला डबा भरून काय काय दिलं होतं . वर पैसे पण दिले .
” गौरा , जरा आरशात बघ स्वतःला. थोडं लक्ष दिलस नं , तर हिरॉईन दिसशील अगदी . ” मॅडम चं हे बोलणं मनात घोळतच ती कोपऱ्यावरच्या दुकानात गेली .
आज गौराला पहिल्यांदा त्या पैशाचं आकर्षण वाटलं. छोटासा पावडर चा डबा , काजळ असं काहीसं घेतलं .. एक छानसं लिपस्टिक पाहून उगाच मोहरल्या सारखं झालं तिला . कुणासाठी कधी नटावं , कुणी प्रेमानं फुंकर घालून आपल्या रूपाची पावती द्यावी …असं कधी घडलंच नाही . सगळा फक्त शरीराचा व्यवहार ! शाळेतील बाईंनी काय काय समजावून सांगितलं होतं , म्हणून अबोध वयातही ‘लग्नाच्या नवऱ्याशी’ जुळवून घ्यायला गेलो …पण कर्म तिथंही आडवं ..जनावरांचा शृंगार बराच म्हणायचा .. तिला उन्मळून आलं एकदम . हातातील लिपस्टिक वापस ठेवून बाकी पैसे चुकते करून ती वळली , तर तिच्या मागेच बेबी उभी होती .
” बया ! मोप चोपडी चं सामान घेतलंय ! काय इरादा आहे ? ” तिला चिडवत बेबी म्हणाली .
” मॅडम म्हटल्या , थोडं छान राहून तर बघ . थोडे वरचे पैसे मिळालेत ..म्हणून ..जरा ..”
” काय उपेग ? त्या भाडखाऊ साठी नटतीस की ? उलट मार खाशील ! पैसे कुटून आनले म्हनून ! गौरे , चल तमाशा बघायला जाऊ . लै मस्त नाचती ग ती .”
एकदम विषय बदलत बेबी चं तिसरच काहीतरी .
” तुझ्या सारखी मोकळ्या सांडा ची जिंदगी थोडीच आहे माझी . हातात दोन पैसे जास्तीचे आलेत , कालवण करते घरी जाऊन .”
” जा बये , पन उद्या हिरवी निळी होऊन येऊ नकोस ग माझे बाय ! “
पाठमोऱ्या गौरा कडे बघून मागून ओरडली बेबी . बेबी नं लहान वयातच सगळं जग बघितलं होतं . तिच्या अंदाजानुसारच झालं . सकाळी पारावरच्या गणपती जवळ तिची गाठ गौराशी पडलीच . अंगावर अनेक खुणा , हिरवे निळे डाग बघून तिनं गौराला पारावर बसवलं .
” शिकल्या पोरीची काय मजबुरी हाय , ते न्हाय म्हैत मला . का सइन करतीस ग? मूडदा पडला मेल्याचा ! ती कमळी बघ ! गेली न त्याच्या तावडीतून पळून ? परवा पिऊन येत होता हरामी .मला मनला ठेवून घेतो तुला , रायतीस का ? “
” तुला म्हणाला ? ..मग ? ” दुखऱ्या अंगावरून पदर गुंडाळत गौरा नं विचारलं .
” सोताला ईष खायला पैसं न्हाईत , बायकू , म्हंजी तू कमावतीस , अन मला ठिवतो म्हनं ! हातातल्या झाडूनीच हाणला त्याला .”
” डोक्यावर छप्पर असतं न , तर केव्हाच सोडलं असतं ग ह्याला . पण सरकारी खोली त्याच्या नावावर आहे न ! कुठं जाऊ ? आज नावाला का होईना , नवरा तर आहे … बाकी कावळे टोचायला तयारच असतात नाहीतर . “
” तो जिता असन तर नं घर त्याचं ! नाहीतर ?” हे विचारताना तिचा चेहरा वेगळाच झाला होता .
गौरा चमकली . म्हणजे बेबी आज रहाते ती खोली बेबीच्या नावावर झाली आहे म्हणजे ….बापरे ! म्हणजे कोलू पाण्यात बुडून मेला , की बेबी नं त्याला …बेबी च्या डोळ्यात आज एक वेगळीच झाक दिसली तिला …ही बेबी नवीनच होती तिच्यासाठी .
” बेबी !! कोलू नक्की पाण्यात बुडूनच मेला न ग ?”
” नसत्या चवकश्या कशाला ग तुला ? तुज्या डोसक्यावर छप्पर कसं येईन ते बग की !” मग गौरा च्या आणखी जवळ येऊन कानात बोलली ,
“नाम्या पासनं मोकळं करते तुला . उद्या वढ्यापाशी ये सकाळच्याला .” आणि गौरा काही बोलायच्या आत निघून गेली .
काही क्षण गुंग होऊन तिथेच उभी राहिली गौरा . आणि मग भानावर येऊन सरसरून काटा आला तिच्या अंगावर .
‘काय म्हणाली बेबी?
‘ मोकळं करते ?’ म्हणजे ?’ तिला शाळेच्या बाई आठवल्या .
खूप काय काय छान छान बोलायच्या .’फ्लॅट च्या मॅडम पण परवा म्हणत होत्या
डीवर्स का देवर्स असं काहीतरीI . म्हणजे कागदावर लिहून नवऱ्याला सोडून द्यायचं ..असं काहीसं . असं कुठं जमतं होय? त्या 304 फ्लॅट च्या मॅडम पण वेगळं रहातात न . त्यांनी पण केला असेल का देवर्स ? त्या तर दोन पोरींना घेऊन रहातात की एकट्या . ती कस्तुरी म्हणत होती की मारत होता नवरा त्यांना . माझ्या आधी तीच होती तिथं कामाला . शिकलेले नवरे पण मारतात बायकोला ? म्हणजे ते आणि नामदेव सारखेच की ! ‘
रात्रीला माश्याचं कालवण केलं तिनं. संध्याकाळी शुद्ध घालवून बसलेला नामदेव जाग येऊन तिथंच खाली बसला होता . अजून पूर्ण उतरली नसावी . तिनं नकळत कपाळाला हात लावला . दुखऱ्या जखमेने तिच्या वास्तवाची जाणीव दिली तिला. तिनं एक कटाक्ष टाकला नामदेव वर .तो भुकेने म्लान झाला होता . तिच्या पोटात ढवळलं .
‘ किती हाल करून घेतले ह्या माणसाने दारू पायी ? उद्या मुकदमा कडे जाऊन
पाय धरते …ह्याला पुन्हा कामावर घे बाबा म्हणून . ही बेबी काही पण सांगत असते . घर तुझ्या नावावर करून घे म्हणे ! असं कुठं असतं का ?’
” ए अवदसे !! लक्ष्य कुठे तुझं ? ते चुलीवर काय उतू चाललंय बघ की
*** ”
त्या कर्कश्य आवाजाने ती वास्तवात आली . म्हातारी मागून ओरडत होती .
तिनं एक प्रेमळ कटाक्ष नवऱ्यावर टाकला . आज आपण इतक्या छान तयार झालो आहोत , नवरा मायेने बघेल असं वाटत असतांनाच अचानक तो उठला .
खसकन तिला ओढून तिचे केस पकडून ओरडला , ” काय डोळे वटारतीस ग ? उतरवू का सगळा माज तुझा ? कुठं जाती नटून थटून ? त्या फ्लॅट वाल्या सायबाची गर्मी आवडती व्हय तुला ? “
म्हातारी गालातल्या गालात हसत होती . हा गलिच्छ अपमान सहन न होऊन गौरा ताडकन उठली .तिनं सगळी ताकद लावून त्याला ढकललं ..चुलीतलं जळकं लाकूड हातात घेतलं , आणि सपकन हातावर मारलं त्याच्या . तो भेसुर ओरडला .त्याला खाली पाडून तिने लाथा घालायला सुरुवात केली . माहीत असलेल्या सगळ्या शिव्या घालत तिने त्याला बडवलं. .
” बास झालं ! आपल्या औकातीत रहायचं !! जित्ता नाही ठेवणार पुन्हा बोललास तर ! याद राखा दोघं ! मला त्रास दिला तर पोलिसात देईन तुम्हाला , मॅडम चे भाऊ मोठे पोलीस आफीसर आहेत . जिंदगीभर तिथंच सडा मग .”
तिचं हे रूप म्हातारी ला नवीन होतं . आधीच गळालेला नामदेव आता निपचित पडला होता .
गौरानं म्हातारी कडे एक जळजळीत नजर टाकली . तिच्या नवीन अवताराने म्हातारी अचंबित झाली होती . तिला भूक लागली होती .
” थोडं कालवण देतीस का ? ” म्हणत तिने गौराकडे बघितलं , आणि
“असु दे बाय मी सोता घेते .” असं नारमाईनं म्हणत खाटेवरून उतरली . दोन ताटात
भाकरी आणि कालवण घालून एक तिच्या पुढे करत म्हणाली ,
” बाय , मला तू घरा भाईर त न्हाई काडणार न ?”
गौरा फक्त गालात हसली . तिच्या आयुष्याची बेडी तिनेच थोडी सैलावून घेतली होती .
आता बेबी च्या कानमंत्रासाठी ओढ्यावर जाण्याची गरज पडणार नव्हती .
Image by Лечение наркомании from Pixabay
- आत्तु-भाग ३ (शेवटचा भाग) - June 17, 2022
- आत्तु- भाग २ - June 7, 2022
- आत्तू- भाग १ - June 3, 2022
Bhari …… ekdum inspiring … ashya kititari jani aahet bedit adaklelya …
धन्यवाद , कळवल्या बद्दल
मस्त
हेच प्रकार सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या पांढरपेशा समाजातही आहेत
पण बायका मी एकटी काय करू अस म्हणून गप्प राहतात
हो , उलट पांढरपेशा समाजात जास्त सहन केल्या जातं . सगळं गमावून बसण्याची भीती असते .
फारच सुरेख कथा .
अभिमान वाटतो तुझा .
मस्त..
धन्यवाद केतकी
थँक्स डिअर
स्वाभिमानाने जगाव सर्व स्त्रियांनी, खूप छान लेख,
खूप छान
धन्यवाद
barik nirikshan
धन्यवाद
गौरा छान सादर केलीत…खुप छान
थँक्स डिअर