डम्पिंग बॉक्स  

ऍम्ब्रॉशिया ……..

कोपऱ्यातलं टेबल, …… ते दोघेच बसले होते

कितीतरी महिन्यांनी …….. पण कधीही आलं तरी ते टेबल त्यांना मिळायचंच.

समोरून दिसायचं नाही, …… पहाटेपर्यंत बसले तरी नो डिस्टर्ब.

स्कॉच……

मंद प्रकाश ……. माफक आवाजात गझल, ……. ,

“बात निकलेगी तो, दूर तलक जायेगी …….”

पण बात निघतच नव्हती ना भाऊ…..

दोघे गप्पच, ……. खरंतर लंगोटी यार,…… हॉस्टेलपासूनचे…

काहीच बोलत नव्हते दोघेही, विषयच तसा गहन होता.

“तिचं सध्या काय चाललंय…..”

तिचं लग्न होऊन खरंतर आता बारा वर्ष आणि अलीकडेच एक मुलगाही झाला होता. पण काही विषयच असे असतात, मिठासारखे, ….. झिजवणारे पण नमकीन.

नितीन …… कॉलेजमध्ये असतानाच तिच्या प्रेमात, निकामी झालेला, आनंद मात्र शुद्ध देसी मैत्री टाईपात अजूनही अडकलेला.

एक दोन सीपनंतर, नितीन बोलू लागला,

“हल्ली कधी भेट झाली होती ?”

“सहा महिने झाले असतील, त्या रात्री, सयाजीला भेटलो होतो, …… ती नवऱ्याशी भांडून आली होती.”

खरंतर तिचा नवरा, प्रचंड यशस्वी, अलीकडे चांगलाच ओळखीचा झालेला,  हुशार होता, मल्टिनॅशनल मधलं करिअर, ……. सहाजिकच होतं, ….. ती त्याच्या प्रेमात पडली…… किमान तिला तसं वाटलं, अन लग्नासाठी घरच्यांना हट्टानं तयार केलं.

………………………………….

“मग, पुढं काय झालं, …… ?” नितीनने प्रश्नावली कन्टिन्यू केली.

“खूप रडत होती, मांडीत डोकं ठेवून ….. ती पस्तावली आहे, त्याच्याशी लग्न करून.”

“हे होणारच होतं, …… ”

“हं, पण त्या दिवशी ती खूप काही बोलून गेली,….. अगदी पहाटेपर्यंत, गप्पा मारत होतो आम्ही, …..मनातली गुड फ्रेंडची डेफिनेशन मात्र त्या रात्री कशी कोलमडली, माझं मलाही कळलं नाही. पण तुझं एक अढळ स्थान आहे तिच्या मनात, ……अजूनही. पण….”

“पण ….. ती तुलाच नेहमी जवळचा मानत आली. अगदी तिला मी आवडतो, हेही तुलाच सांगितलं होतं सर्वात आधी…… आणि त्यामुळंच तू गुड फ्रेंडची भूमिका निवडलीस.”

“कदाचित, ……. तसंही असेल कदाचित. ………. पण त्यामुळं मी नेहमीच तिच्या जवळ राहिलो, …… तिचं सुखदुःख जवळून अनुभवत राहिलो. एक समांतर, सहानुभूतीसह आयुष्य जगत राहिलो.”

“अं, सेकंड पेग ?….. थांब मी भरतो…… आता आसपास वेटरही नको….. काही खायचं सांगायचं असेल तर आताच सांगून टाकू, ….. नंतर डिस्टर्ब नको.”

………………….

“तू कॉलेजला असताना कधी जवळ आला होतास तिच्या? …. गैरसमज करून घेऊ नको, ……. सहजच विचारतोय.” आनंदच्या या प्रश्नानं मात्र, नितीनला भूतकाळात ढकलून दिलं.

“फॉर्मल होतोय आता तू, मैत्रीत……. होस्टेलच्या शिव्याद्यायला लावू नको रे आता तू ?…… आणि तुझ्यापासून काय लपलंय ? कॉलेजला असेपर्यंत मूग गिळून प्रेम करत होतो, हे तुलाही माहीत आहे. तिचं लग्न झाल्यावर एक दोन वेळा भेट झाली , तेव्हा इच्छा व्यक्त केली होती मी …… मी नाकारत नाही, माझ्या इच्छा, पण तिने एकांतात भेटायला नकार दिला……. मी ही नैतिक अनैतिकतेच्या विचारात पडलो…. अन सगळंच बारगळलं.”

“म्हणजे ती खरं बोलत होती तर? ….. हेच सांगितलं तिनेही.”

“तू मित्र , सखा, फिलॉसॉफर गाईड वगैरे वगैरे …… सगळं काही. तुझ्याशी कशी खोटं बोलेल, बाबा.”

“पण मी नाही इच्छा व्यक्त करू शकणार ……. बहुतेक माझ्यासोबतच मरतील इच्छा साऱ्या.”

“विकेट गेली लेका आंदया तुझी, …..” नित्या हसत म्हणाला, “सांभाळ स्वतःला, …… एक तो बुढापे का प्यार है तेरा.”

“फोर्टी फक्त …….”

“बुढापे की पहली पायदान.”

दोघेही खळखळून हसले. हसता हसता आंदयाच्या डोळ्यात खळकन पाणी आलं, ……… जखम अजून ओली होती ना.

नितीननं खांद्यावर हात ठेवला, ……. जखम तीच , ….. देणारीही तीच, …… काही वर्षांपूर्वी, पहिल्याच्या हृदयावर होती…… आता दुसऱ्याच्या हृदयावर……  खपली धरेल, ….. तोवर धीर धर, कदाचित, तो इतकंच सुचवत होता.

दोघे एकीच्याच प्रेमात, ……. दर्दे दिल झालेले,

“बोलुन दाखवल्यास का फिलिंग्ज मग, …….. त्या रात्री.”

“नाही, ……. एखादं महिन्यापूर्वी फोन आला होता, ……. मध्यरात्री.”

“ओह, …. मग वहिनींनी पाहिला?”

“नाही, …… सायलेंट वर होता, मी टेरेसवर जाऊन बोललो.”

“काय म्हणाली ?”

“ती घटस्फोट घेणार म्हणाली ……..”

………………………………..

बराच वेळ निरव शांतता , ……. फक्त ओतण्याचा आवाज,…. तिसरा पेग …… On the rocks …….

“तुला तिची आठवण नाही येत ? ……. कॉलेजपासून मरत होतास, …. तिच्या समांतर बेंचवर बसायला किती धडपडायचास.” आंदयाचा पुन्हा भूतकाळात ढकलणारा प्रश्न.

“हं, ……. मी समांतर बेंचवर बसता बसता, तिला क्रॉस गेलो, आणि तु तिच्या मागेच बसूनही, समांतर आयुष्य जगत राहिलास. माझ्यापेक्षा तुझ्याकडेच जास्त आठवणी असतील ना तिच्या…… Don’t worry, I am not jealous ….. But just thinking , …… What matters, is only your role, ….. Otherwise …….. आपल्या तिघांचीही आयुष्यं तिच्याच वेणीत गुंतलेली आहेत.

“तिघांची नाही, ……… बहुतेक चौघांची ……”

“What ?”

“घटस्फोटानंतर ती लिव्ह इन मध्ये राहणार म्हणत होती, ……. पुन्हा लग्नात अडकायचं नाही……. म्हणून” निर्विकार चेहऱ्यानं आंदयानं माहिती पुरवली.

“पण कोण?” चेहऱ्यावरचं क्लिष्ट आठयांचं जाळं शक्य तितकं लपवलं  त्यानं.

“आहे कुणीतरी, भेट घालून देईन म्हणत होती……”

……… पुन्हा निरव शांतता, ……… सिगारेटचे दोन तीन झुरके …

“तिला आवडतो तो? ” नित्याचं कुतूहल अजून संपत नव्हतं.

“अर्थात…..”

“आणि त्याला ती ? ……”

“बहुतेक …..”

“तसा या गोष्टीचा विचार करण्याचा आपला अधिकार नाही म्हणा, …. निदान मलातरी. एकदा खपल्या दगडापेक्षा कठीण झाल्यावर, पुन्हा संवेदनशील होण्याची गरजही नाही अन अधिकारही……. ”

“पण मित्र म्हणून, तिला सल्ला देण्यासाठी, तिच्यासाठी योग्य अयोग्य बघत राहण्यासाठी, ……. त्यात गुंतत राहण्याशिवाय माझ्याकडे मात्र पर्याय नाही.”

“हं ….. अवघड रोल स्वीकारलास….. ” असं म्हणत, नित्यानं दोघांसाठी चौथा पेग भरला.

“बघ ना, मित्र म्हणून तुझ्या भावनांची तू देवाणघेवाण करत राहिलास माझ्याशीच, …….. तिचे तिच्या प्रियकरासोबतचे नाजूक क्षण  तिने शेअर केले माझ्याशीच, ….. लग्न झाल्यावर तुझ्याविषयीची भावनाही उघडून दाखवली मलाच, …… त्या दिवशी, मी माझ्या भावनांना कुलूप लावलं ते आजतागायत….. तुझ्या जखमा ओल्या होत्या, भळभळून वहायच्याही माझ्याजवळच….. खपली धरली, …… तू दगड झालास, तेव्हाही कधी वैतागून आपटलास, तरी लागायचं मलाच…… आणि आता, सर्वात मोठा कळस हा की, …… लिव्ह इन मधल्या पार्टनरलाही भेटायला मलाच बोलावतेय……. …………………………… अरे मित्र आहे की इमोशनल डम्पिंग बॉक्स ? ……   तूच फक्त पहिल्यांदा माझ्या भावना ओळखल्या, माझं तिच्यावरचं प्रेम ओळखलं,….”

“तुझं तिच्यावरचं प्रेम, तिचं लग्न ठरलं तेव्हाच मी तुझ्या चेहऱ्यावर वाचलं होतं खरंतर, …….. पण तु स्वतःच ओळख दाखवत नव्हतास तुझ्या भावनांना, ……मग उगाच त्या जीवघेण्या भावनांमध्ये तुला नको गुंतवायला ….. म्हणून गप्प होतो, …… इतकी वर्षे…..

या वाक्यासरशी आंदया अनावर झाला, अन नित्याच्या मिठीत शिरून, ओक्साबोक्शी रडू लागला.

आणि डम्पिंग बॉक्सचा साइन बोर्ड, आता नित्याच्या हाती आला.

Image by Catkin from Pixabay 

B_R Pawar
Latest posts by B_R Pawar (see all)

B_R Pawar

बी आर पवार , भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये नोकरी. शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनिअर आहे. त्याखेरीज कथा, कविता, चित्रकलेत रमतो. जीवनानुभव शब्दात चितारायला आवडतो.

4 thoughts on “डम्पिंग बॉक्स  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!