सोहळा

गेले कित्येक दिवस त्यांच्या समोरचं घर रिकामं होतं. तिला फार कुतूहल वाटायचं त्या घराचं. इतकं छान छोटेखानी घर आहे. इथे कोणी राहायला का येत नाही? आपल्यालाही जरा सोबत झाली असती. समोर सतत रिकामं, उजाड पडलेलं घर पाहायला नको वाटायचं. या लॉकडाऊनमधे तर नाहीच नाही.
आज अनेक दिवसांनी तिथे जराशी हालचाल दिसली. या दिवसांत कोण कसं राहायला आलं इथे? तिला प्रश्न पडला. असतील कोणीतरी म्हणून तिने फार विचार केला नाही. पण मनातून तिला बरं वाटलं. त्या भकास घराऐवजी निदान माणसं तरी दिसतील समोर!
तिच्या स्वयंपाकघरातून थेट त्यांची खिडकी दिसायची. जराशी वर होती खिडकी, पण मोठी होती. घरात काम करताकरता ती खिडकीत पाहत होती. एक आजीआजोबा दिसले आणि एक नवराबायको. चौकोनी कुटुंब होतं तर. तिचं घर खाली आणि त्यांचं घर, खिडकी जराशी वर असल्याने घरातल्या लोकांचे फक्त खांद्यापर्यंतचे भाग दिसायचे. लोकं हालचाल करताना, गप्पा मारताना दिसायचे. हळूहळू तिथून कुकरच्या शिट्ट्या, टीव्हीचे आवाज, भांडी हलवल्याचा आवाज येऊ लागले. घरात जीव आल्यासारखं झालं. तिला बरं वाटलं. त्यानिमित्ताने चैतन्य आलं होतं, रिकामपणा हटला होता. तिचा आणि त्या घराचाही.
मग तिला नादच लागला,  एकीकडे काम करताकरता त्या घरातल्या हालचाली पाहायचा. भोचकपणा म्हणून नव्हे तर कुतूहल म्हणून, मनाला थोडासा विरंगुळा म्हणून. आजी काहीतरी कामात असायच्या, आजोबांचा पेपर वाचतानाचा पेपर दिसायचा, नवराबायको हसतखेळत कधी गप्पा मारताना, कधी बोलताना दिसायचे. बायकोचा चेहरा विशेष सुंदर होता, तिच्या चाणाक्ष नजरेनं टिपलं.
एक दिवस सकाळी उठून सवयीप्रमाणे तिने समोरच्या खिडकीत पाहिलं तर सगळीकडे अचानक सामसूम. अचानक रात्रीतून कुठे गेले हे लोक? घर सोडून गेले? लॉकडाऊनमधे सगळे एकदम जाणार कुठे आणि का? तिला प्रश्न पडला. तो दिवस जरा उदासच गेला. या लॉकडाऊनमुळे ना आपलं डोकं फिरलं आहे. स्वतःच्या घरात लक्ष द्यायचं सोडून आपण ह्या दुसऱ्यांच्या घरात काय अडकलो आहे? तिने स्वतःलाच टपली मारली. पण माणसाला सोबत म्हणून शेवटी माणूसच लागतं ना? झाडा, पक्ष्या, फुलांशी किती वेळ बोलणार?
संध्याकाळी ती परत स्वयंपाकघरात आली तर समोरच्या घरात दिवा लावलेला दिसला, जराशी हालचाल दिसली. तिला जरा बरं वाटलं. गेले नाहीयेत तर कुठे हे लोक, इथेच आहेत, चला, बरं झालं! असा विचार मनात येऊन तिला उगाचच हायसं झालं. परत ते घर रिकामं बघायची तिची तयारी नव्हती, विशेषतः आजूबाजूला इतकी सामसूम, निर्जीव शांतता असताना.
घरात आजोबा आणि नवरा दोघंच दिसत होते. म्हणजे आजी आणि बायको बाहेर गेल्या होत्या तर. कुठे गेल्या असतील? त्या जाताना आपल्याला दिसल्या कशा नाहीत? तिच्या रिकाम्या डोक्यात विविध शंका येऊन गेल्या. घरात फक्त पुरुष असले की कसलं आलंय घरपण त्या घराला? फक्त शांतता नांदायची तिथे. दोघं टेबलावर जेवताना दिसायचे, कधी टीव्हीचा आवाज यायचा बस! चार दिवस हेच सुरू होतं.
त्या मध्यरात्री तिला दूर वरून कुठेतरी बाळाच्या रडण्याचा आवाज आला. इथे आसपास कुठेच बाळ नाहीये, तिला माहीत होतं. मग आवाज कुठून येतोय? तिने उठून घरभर चक्कर मारली. खिडकीतून बाहेर पाहिलं, कुठुन आवाज येत होता काही समजलं नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी तिने सवयीप्रमाणे समोरच्या खिडकीत पाहिलं अन तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही. खिडकीत चार छोटे लंगोट वाळत घातले होते. म्हणजे काल रात्री बाळाचा आवाज इथूनच येत होता तर! म्हणजे आजी आणि बायको दवाखान्यात होते ते चार दिवस! अच्छा. असा मामला होता तर. बायको विशेष सुंदर का दिसत होती याचं गुपित तिला कळून चुकलं.
नंतरच्या दिवसांत घरात आजींची लगबग दिसायची. कधीकधी बाबा, आजोबा बाळाला खेळवताना दिसायचे. हे पाहून तिला फार आनंद व्हायचा. रात्री बाळाच्या रडण्याचे आवाज यायचे. आजूबाजूला निर्जीव शांतता, अनिश्चितता, बेकारी, नकारात्मकता भरून राहिली असताना, एका छोट्या जीवाच्या जन्माचा सोहळा किती आनंद देऊ शकतो हे ती अनुभवत होती. तिला स्वतःचा आठवणी उफाळून येत होत्या. तिचा लेक नेमका रात्रीच प्रचंड रडायचा. काही केल्या थांबायचा नाही. आई होण्याचा पहिलाच अनुभव असल्याने ती भांबावून जायची, काय करावं समजायचं नाही. घरातले मदतीला असले, तरी जागरणं, बाळाची भूक, झोप आईलाच पाहावी लागते. जागूनजागून जीव कावून गेलेला असायचा. रात्री तो टिपेच्या सुरात रडत असताना, आपल्या घराच्या आजूबाजूला राहत असलेल्यांचीही किती झोपमोड होत असेल हा विचार मनात येऊन तिला कानकोंडं व्हायचं.
लेक चार महिन्याचा असताना त्याला थोडं फिरवून आणायला म्हणून बाहेर पडली होती. रस्त्यात त्यांच्याच जवळ राहणारे आजोबा भेटले होते. त्यांनी थांबून लेकाची चौकशी सुरू केली. ‘अगदी सुरात रडतो हो’ ते मिश्किलपणे म्हणाले होते. तिने कानकोंडं होऊन ‘हो, जरा जास्तच रडतो. सॉरी, तुमची रात्रीच्या वेळी झोपमोड होत असेल तर.’ आजोबा मंद हसत म्हणाले होते, ‘असू दे हो, रडू दे. लहान बाळांच्यात परमेश्वराचं अस्तित्व असतं. त्यांचं रडणं म्हणजे त्यानं स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देणे. रडू दे काय रडायचाय तो. आम्हाला नाही त्रास होत.’ त्यांच्या या चार शब्दांनी जादू केली अन त्यादिवशीपासून तिला लेकाचा रडण्याचा होणारा त्रास व्हायचा बंद झाला. आई असण्याचा स्ट्रेस ती कमी घेऊ लागली. तिच्यातली आई मोठी झाली. हळूहळू लेक मोठा झाला, जागरणं मागे पडली.
दोन महिने होत आले होते. समोरच्या घरातून आता बाळाचे आवाज चांगलेच मोठे यायला लागले होते. रात्री बऱ्याचदा त्याचं रडणंही ऐकू येई. त्यादिवशी ती स्वयंपाकघरात गेली आणि समोरच्या खिडकीत पाहिलं तर बाळाची आई बाळाला घेऊन खिडकीत उभी होती. तिने पहिल्यांदाच बाळाला पाहिलं. बिटीबीटी डोळे असलेले, अंगडंटोपडं घातलेलं बाळ अगदी गोड होतं. बाळं सगळीच गोड असतात पण आजूबाजूच्या निरसतेत आनंद शिंपडणारं हे बाळ जरा जास्तच गोड होतं.
बाळाच्या आईचं लक्ष आज पहिल्यांदा तिच्याकडे गेलं. तिने स्मितहास्य केलं. बाळाची आई देखील ओळखीचं हसली. तिच्याकडे पाहून खिडकीतून मोठ्याने म्हणाली,  ‘रडते ही रात्री फार. सॉरी तुमची झोपमोड होत असेल तर, पण काय करावं समजत नाही.’ उत्तरादाखल ती हसून म्हणाली, ‘असू दे हो. रडू दे. परमेश्वर वसत असतो लहान बाळांच्यात. त्याचं अस्तित्व जाणवून देत असतो तो आपल्याला. होईल हळूहळू कमी रडणं.’ आईने हसून मान डोलावली. बाळ सुद्धा खुदकन हसल्याचा भास झाला तिला.
त्या बाळात तिला खरंच परमेश्वर दिसला होता. किती सुसह्य केलं होतं त्याने आत्ताचं तणाव पूर्ण वातावरण ! तिने देवाचे मनापासून आभार मानले. मात्र तिला हे माहीत नव्हतं की नकळत तिच्यातली मोठी झालेली आई आज एका दुसऱ्या आईला मोठं करत होती.Image by Regina Petkovic from Pixabay 
Gauri Brahme
Latest posts by Gauri Brahme (see all)

Gauri Brahme

गेली वीस वर्षे पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागात जर्मन भाषेची अध्यापिका म्हणून काम करते. अमराठी लोकांना मराठी शिकवते. भरपूर लिहिते, वाचते, कलाकुसरीच्या वस्तू बनवते, खादाडी करते, इतरांना खिलवते. लेखिका म्हणून नावावर २ पुस्तकं जमा आहेत.

23 thoughts on “सोहळा

    • July 22, 2020 at 9:21 am
      Permalink

      सुरेख 👌🏻👌🏻♥️♥️

      Reply
  • July 21, 2020 at 9:30 am
    Permalink

    ❤️❤️ छोटी मस्त कथा . आपल्याला जे मिळते तेच आपण दुसऱ्याला देतो. ❤️❤️

    Reply
  • July 21, 2020 at 11:02 am
    Permalink

    गोड 😍

    Reply
    • July 22, 2020 at 5:32 pm
      Permalink

      ❤️❤️❤️

      Reply
    • January 5, 2021 at 8:36 am
      Permalink

      मस्त 👌👌❤️

      Reply
  • July 22, 2020 at 6:48 am
    Permalink

    Last line 👌🏻👌🏻❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    Reply
  • July 22, 2020 at 5:13 pm
    Permalink

    Nice one… 👍👍

    Reply
  • July 23, 2020 at 12:34 pm
    Permalink

    खूप छान लिहिलय 👌👍🏼😊

    Reply
    • July 27, 2020 at 6:06 am
      Permalink

      खूप गोड ❤

      Reply
  • July 26, 2020 at 4:30 pm
    Permalink

    ❤️❤️❤️

    Reply
  • July 28, 2020 at 9:32 am
    Permalink

    धन्यवाद🙏

    Reply
  • July 30, 2020 at 4:30 am
    Permalink

    सुरेख

    बिटीबीटी …. भारीए

    Reply
  • August 9, 2020 at 11:41 am
    Permalink

    Wow loved it ❤️❤️❤️

    Reply
  • August 13, 2020 at 5:41 pm
    Permalink

    मस्त😍😍😍

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!