नियती …..
रोजच्या प्रमाणेच नियती सगळे आवरून तिच्या नेहमीच्या आवडत्या जागेवर …. खिडकीजवळच्या खुर्चीत येऊन बसली . आज तिला भयंकर थकवा जाणवत होता . पण खिडकीत येऊन बसल्याशिवाय तिचा एकही दिवस आजपर्यंत पुढे गेला नव्हता .नियती … साधारण दीड दोन महिन्यांची असतानाच ह्या अनाथाश्रमात आली होती . एका दुपट्यात गुंडाळलेली निरागस नियती …. कसलाही अपराध नसताना … कोणाच्यातरी पापाची शिक्षा भोगणारी नियती … ती आश्रमात आल्यावर रुटीन प्रमाणे तिच्या सगळ्या टेस्ट केल्या गेल्या तेव्हा कळले की तिला ‘एड्स’ झाला आहे ….. आणि म्हणूनच तिच्या जन्मदात्यांनी तिला नाकरून , नको असलेले एक निष्पाप बालक ह्या अनाथालयाच्या पायरीवर आणून ठेवले आहे .
राधिका ताई अनाथालयाच्या सर्वोसर्वा …. त्यांनी ठरवले की हिचा आजार कोणालाही सांगायचा नाही … कारण आपला समाज कितीही पुढारलेला असला तरीही ह्या आजाराला अजून सगळे बिचकून आहेत … तसेही त्यांना कोणी जाब विचाणारे नव्हते की ह्या मुलीला का दाखल केले आहे इथे आपण ? . कारण सगळेच निराधार निष्पाप , अनाथ जाब कोण कोणाला विचारणार ?.
साधारण तीस ते पंचवीस अनाथ मुले आणि मुली असलेला हा अनाथाश्रम एका ट्रस्ट मार्फत चालवला जात होता . आणि राधिकाताई त्याच्या मुख्य ट्रस्टी होत्या. अतिशय गोड स्वभावाच्या , हसत खेळत सर्वांशी आपलेपणाने बोलणाऱ्या राधिका ताईनी लग्नही केले नव्हते . आपले सारे जीवन त्या समाजासाठीच आणि मुखत्वे करून अनाथ बालकांसाठीच खर्ची करणार होत्या .
नियती ….. पाच वर्षांची गोड मुलगी … गोरी गोरी , कुरळ्या केसांची, आश्रमातील सगळ्यांच्या गळ्यातील ताईत बनली होती . तिचे बोलणे इतके लाघवी होते की काही ना काही कारणाने जो तो तिच्या खोलीत येऊन तिची विचारपूस करायच्या निमित्ताने तिच्याशी बोलायला यायचा . गेल्या एक वर्षापासून नियतीला अस्थमाचा त्रास व्हायला लागला होता . एड्स सारखा आजार . तो ही जन्मतःच .. डोके वर काढणारच ना ….डॉक्टरी उपाय , निरनिराळी औषधे ह्या मार्फत ती एक एक महिना पुढे ढकलत होती …. पण हा आजार बरा होण्यातील नव्हता आणि हे सगळ्यांनाच ज्ञात होते …. पण तिला ह्याची कोणीही पुसटशीही जाणीवही करून दिली नव्हती …. “ अग सर्दी खोकला असतो ना तसेच आहे हे बाळा, तू नक्की बरी होणार आणि लवकरच बाहेर अंगणात सगळ्यांबरोबर पहिल्या सारखी खेळायला लागणार बघ ! ” असे तिला वारंवार समजावून सांगताना राधिका ताईच्या मनाला अतोनात यातना व्हायच्या डोळ्यात अश्रू यायचे , ते तिच्यापासून लपावयाला सुद्धा किती कठीण जायचे आणि नकळत तिच्या जन्मादात्यांसाठी शाप बाहेर पडायचे .
गेले काही दिवस नियती तिला श्वास घेताना होणाऱ्या त्रासामुळे तिच्या खोलीबाहेर पडत नव्हती … त्यामुळे तिला एक छंद लागला होता ह्या दिवसांत … तिच्या खोलीत एक खिडकी होती ….ज्यातून तिला बाहेरील रस्त्यावरील सर्व दृश्य दिसत असे …. एक देऊळ होते गणपतीचे जवळच …. त्याच्याबाहेर हार पेढे विकणारी एक बाई …. त्याच्या बाजूला एक चप्पल आणि बुट दुरुस्त आणि पोलिश करणारा एक लहान मुलगा …. कोपर्यावर एक रंगीबेरंगी बांगड्या , पिना , कानातले वैगरे विकणारी बाई …. आणि त्याच्यासमोर एक वडापावची गाडी असणारा दादा …. गेल्या काहीं दिवसांत हेच आता नियतीचे विश्व झाले होते … सकाळपासून त्यांची चालू असलेली लगबग ….उन्हातान्हात उभे राहून ते करत असलेले कष्ट …. त्यांच्यात आपापसात कधी कधी होणारी भांडणे …
सगळे सगळे तिला आवडायला लागले होते . ते सर्व तिच्या जीवनाचा जणू अविभाज्य भागच बनले होते .
रोज सगळे आवरून खिडकीत येऊन बसायचे आणि अगदी दुपार होई पर्यंत त्यांचे निरीक्षण करायचे . मग परत जेऊन झोप वैगरे झाल्यावर परत ती खिडकी तिला बोलवायची . ते अगदी अंधार पडेपर्यंत आणि ते सर्व घरी जाईपर्यंत ती खिडकी सोडायची नाही … तिचा असा आनंदात वेळ जायचा की आपल्या आजाराचाही तिला विसर पडायचा .
एक दिवस नियतीने अलकाला म्हणजे जी सर्व मुला मुलींची काळजी घ्यायची तिला बाहेर जाऊन त्या गाडीवरचा वडा पाव आणायला सांगितले … खरे तर तिच्या तब्येतीसाठी तो चांगला नाहीच हे कळून सुद्धा … केवळ नियतीची इच्छा पूर्ण करायला हवी ह्या भावनेतून तिने तिला आणूनही दिला फक्त आधी राधिका ताईची परवानगी घेऊन . त्या रात्री तिला खूप त्रास झाला . आणि राधिका ताई थोड्या तिच्यावर रागावल्या “पिल्लू , तू असे का केलेस… आपल्याला लवकर बरे व्हायचे आहे की नाही ?. म असे बाहेरील खाद्यपदार्थ खाऊन कसे चालतील …”
“माई , मला ना रोज तो वास येतो वड्याचा … खूप इच्छा होते रोज वडा खायची … काल तर अगदी तोंडाला पाणी सुटले ग … आणि काही दिवसांनी मी देवबाप्पा कडे जाणार तर खाऊ दे की ग मला “… राधिका ताईनी तिला कडकडून मिठी मारली आणि अश्रू लपवत ओरडल्या, आणि रागावल्या सारखे बोलत म्हणल्या “ गप्प बैस बघू ….अज्जिबात असे बोलायचे नाही … कोण म्हणाले तू देवबाप्पा कडे जाणार आहेस ? सांग बघू मला त्याचे नाव ? आत्ता घेते फैलावर ““माई कोणीच नाही ग … सगळेच खूप खूप छान आहेत इथे … मीच चार दिवसांपूर्वी अलकाला तुमच्याशी बोलताना ऐकले .. सॉरी. असे दुसर्याचे बोलणे ऐकायचे नसते माहित आहे , पण ऐकू आले ग ..
“हे बघ बाळा असे काहीही नाहीये , आपण डॉक्टर , औषधे सगळे उपाय करत आहोत आणि तू बरी होणार आहेस , तो शंकर नाही , का तुझा मित्र , तो कसा बरा झाला, तस्शीच तू हि बरी होणार आहेस ग बाळा… फक्त थोडे आमचे ऐकायचे ….
दुसऱ्या दिवशी फुलवाल्या मावशी सकाळी सकाळी नियतीसाठी मोगर्याची आणि चाफ्याची फुले घेऊन आल्या ….. “हे बघ बाळ, तुझ्यासाठी सुंदर सुंदर फुल आणली आहेत … त्या टवळ्याचा वडापाव खाऊन आजारी पडलीस ना ?…. त्याला तर मी बघतेच … पण हि माझी ताजी ताजी फुल जवळ ठेव … बघ कशी ताजी तवानी होशील त्यांच्यावानी” “ अय्या मावशी कित्ती सुंदर आहेत हि फुले , आणि वास पण किती मस्त …. मला खूप खूप आवडली …. धन्यवाद”“तुला आवडली ना …. मी आता रोज आणीन बघ तुझ्यासाठी ….” “पण मावशी आधी माईना विचारा … तुमचे पैसे वैगरे लागतील ना द्यायला … “ अग gap गप गं ह्याचे कसले पैसे … दिले तरी घ्यायची नाही मी … इतक्या गोड पिल्लासाठी चार फुले आणली तर काय नुसकान व्हायचे नाही माझे” असे म्हणून ती तिथे फुले ठेऊन निघूनहि गेली … तो दिवस नियतीसाठी सुगंधित झाला
दुसर्या दिवशी वडेवाला दादा आणि पिना कानातले वाली मावशी तिला भेटायला आले . “ दीदी लई लई स्वारी बघ … माझ्या तेलकट वड्याने तुला लई त्रास झाला ना …. ती मावशी केकलत होती माझ्या नावाने …. तेव्हा कळले …. खूप त्रास झाला का ग बायो …. हि मावशी बघ तुला काय काय घेऊन आली आहे” असे म्हणून मावशीने तिच्या हातात एक पिशवी ठवली …. “अग उघड बाळा, तुझ्यासाठी मस्त मस्त कानातले अन पिना बी हायेत … देऊ नको बर कोणाला …. ती अलका सटवी लंपास करेल सगळे … निट ठेव आणि रोज घाल ह्यातले …. तुला लई गोड दिसतील बघ” असे म्हणून ते दोघे तिला भेटून निघून गेले .
तिसऱ्या दिवशी बूट पोलिशवाला नंदूही येऊन तिच्यासाठी गोष्टीचे पुस्तक भेट देऊन गेला ..
“ माई … मी आता जास्त दिवस नाहीये का ग … सगळे मला भेटून का जात आहेत … छान छान गिफ्ट्स पण देत आहेत … “पिल्लू …. नाही ग बाळा, त्यांना तू आवडतेस ना म्हणून येतात ते भेटायला तुला” काय आणि किती खोटे बोलायचे राधिका ताईना कळतच नव्हते …. पण धीर तर द्यायला हवा होता …. नियती जास्तीत जास्त दिवस त्याना आपल्या सोबत हवी होती ….
चार पाच दिवसांनी नियतीची तब्येत खूपच बिघडली … ऑक्सिजन लावला …. पण तरीही प्रकृती खालावातच होती …. गणपती मंदिरात अहो रात्र जप चालू होता सगळ्यांचा …. प्रयत्न फोल ठरणार आहेत माहित असूनही …. जो तो नियतीच्या प्रेमापोटी देवाला साकडे घालत होता .
माई …. माई … ऐक ना ग …. आज फुलवाल्या मावशीनी फुले आणलेली कोमेजून गेली ग लवकर … मला ताजी फुले हवी आहेत….मला खूप त्रास होत आहे ग माई …. कोणीतरी मला बोलवत आहे … ओढत आहे असे वाटत आहे ….आणि मला जाताना मोगरा आणि चाफा घेऊन जायचा आहे ….. खूप त्रास होत होता नियतीला बोलताना …. “ पिल्ला आणते ह्म …. असे म्हणून राधिका ताई बाहेर जाऊन हमसाहमशी रडायला लागल्या …. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांची … सगळ्यांची लाडकी नियती हळू हळू विझत चालली होती … त्यांच्या हातात काहीच नव्हते … फक्त बघायचे सोडून …
अलकाचा जोरात …. नियती बाळा असा आक्रोश सगळ्या आश्रमात भरून गेला आणि सगळा आश्रम दु:खाच्या सागरात बुडून गेला . एक सुंदर फुल कोमेजून गेले सोबत ताजी फुले …. आणि सुगंध घेऊन
चार पाच दिवसांनी अलका राधिका ताई नियतीच्या खोलीत उभ्या असताना तिथे आली “माई आपण रंगवलेली खिडकी … पिल्लूला काही दिवस तरी आपल्याजवळ रोखून ठेऊ शकली … तिचा वेळ गेला … आणि आपल्या ओळखीच्या लोकांनी सुद्धा आपल्याला किती मदत केली देखावा उभारायला “ “ होय अलका मला अचानक त्या दिवशी कल्पना सुचली की नियतीसाठी आपण काय करू शकतो ? तर मला तिच्या खोलीमधील खिडकी दिसली आणि ठरवले … हि खिडकी जिवंत करायची आपल्या पिल्लू साठी …. आणि जेवढे जमले तेवढे केले … मला ओळखीच्या लोकांनीही खूप मदत केली …. खिडकी रंगवायला …. हीच ना ग ती खिडकी … बघ कशी भकास दिसत्ये आहे …. फक्त समोरचे ते गणपती मंदिर आणि त्यात मंद तेवणारी मोठी समई बस्स एवढेच जिवंत ….. बघ माझ्या पिल्लूचा प्रकाश जाणवत आहे … त्या मंद दिव्यातून …. पिल्लू ….माझी पिल्लू…
- शर्वरी…(कथा संग्रह) - September 12, 2022
- निसरडी वाट- 1 - September 17, 2021
- फिरुनी नवी जन्मेन मी ….२ - July 27, 2021
खूप छान
छानच
👌👌