ट्रोलिंग…
ऑफिस मधून निघायला नेहमीप्रमाणंच उशीर झाला. जेव्हापासून ऑफिस या आयटी पार्कमध्ये शिफ्ट झालं होतं तेव्हापासून लेट वर्कींग हे रोजचं मरण झालं होतं. रोज रात्री साडे नऊ, दहा तर होऊन जायचेच. तरी बरं परागनं त्याची अलिशान कार तिच्यासाठी ठेवली होती. साक्षीला परागची अगदी तीव्रतेनं आठवण आली.
गच्चकन गचका देत लिफ्ट बेसमेंट पार्किंगला थांबली, लॅपटॉप बॅग सांभाळत गाडीची किल्ली हातात घट्ट धरून साक्षी लिफ्ट मधून बाहेर पडली आणि जेमतेम चार पाच गाड्या असलेलं ते अवाढव्य रिकामं पार्किंग बघून तिच्या घशाला कोरड पडली, हाताच्या तळव्यांना घाम फुटला. सकाळी नेमकी गाडी पार्क कुठे केलीय ते तिला जाम आठवेना. खरंतर या नवीन बिल्डींगमध्ये कारसाठी दोन बेसमेंट पार्किंग होते. ग्राउंडच्या खालचं “बेसमेंट-वन” छोट्या कार्ससाठी आणि मोठ्या कार्ससाठी बेसमेंट-वनच्याही खाली असलेलं हे “बेसमेंट-टू” पार्किंग. “आता काय पराग साहेबांनी इतकी आलिशान गाडी हातात दिल्यावर हेच तर पार्किंग मिळणार होतं.” असं मनातल्या मनात म्हणत, जड होत असलेली लॅपटॉप बॅग सांभाळत ती तिची कार शोधत चालू लागली.
खरं तर ते दोघं, म्हणजेच पराग आणि साक्षी तिच्यासाठी एक छोटी कार बघतच होते. पण तितक्यात परागचं जपानला जायचं ठरलं आणि कॉम्प्युटर इंजिनिअर असलेल्या साक्षीचं गाड्यांचं ज्ञान अगाध असल्यामुळं शेवटी तिनं तीन वर्ष परागची कार वापरायची आणि तो परत आल्यावर काय ते बघू असं दोघांनी ठरवून टाकलं होतं.
इतक्यात साक्षीला तिची कार दिसली. पटापट चालत किल्ली परजत ती कारपाशी आली. कार उघडणार तोच तिला वेगळ्याच रंगाचे सीट कव्हर दिसले तशी ही आपली कार नाही हे कळून ती झटकन त्या गाडीपासून लांब झाली. समोर बघताच तिला थोड्याच अंतरावर असलेली तिची कार दिसली आणि हायसं वाटून ती तिकडे धावली.
मागच्या सीटवर जड लॅपटॉप बॅग टाकून पुढे येऊन बसत तिनं गाडी चालू केली. एसी आणि मुझिक प्लेअर चालू झाल्यावर ती थोडी कंफर्टेबल झाली. मगाशी आपण वेंधळेपणानं चुकीच्या कारपाशी जाऊन अनलॉक करत होतो ते आठवून ती स्वतःशीच खुदकन हसली आणि कारवरून झालेलं त्या दोघांचं लुटूपुटूचं भांडण तिला आठवलं.
पराग – “इतकं कसं कळत नाही गं तुला गाडीतलं? आणि इतकी शिकलेली असून वेंधळी कशी तू?”
“अरे… कळतं की थोडं थोडं आणि काही वेंधळी बिंधळी नाही हां मी” साक्षीनं स्वतःचा बचाव करायचा प्रयत्न करत म्हटलं.
“डोंबल तुझं… साधारण आकार आणि रंग बघून आपली गाडी कोणती ते ठरवतेस तू. तुला साधा होंडा सिटी आणि अमेझमधला फरक कळत नाही. कठीण आहेस. छोट्या छोट्या मुलांनासुद्धा कारच्या कंपन्या आणि मेक माहिती असतात.” परागचं नेहमीचं लेक्चर सुरू झालं.
“असू दे रे. तु आहेस की एवढा मेकॅनिकल इंजिनिअर. तुला माहिती आहे ना त्यातलं सगळं? मग झालं तर…” साक्षीनं उडवून लावलं.
आणि मग “अगं तुलाही माहिती नको का या सगळ्याची…” असा एकदम मृदू स्वर लावत परागनं त्याची नेहमीची “निदान गाडीचा नंबर तरी लक्षात ठेवत जा…” वगैरे बडबड गिळून टाकली आणि “आता जपानला जाण्यासाठी फक्त आठवडा उरला आहे. तीन वर्षांचा विरह सहन करायचा आहे मॅडम… या सात दिवसात मला तुझ्याशी अजिबात भांडायचं नाहीये.” म्हणत तिला जवळ ओढलं होतं आणि त्या छोट्याशा भांडणाचा गोड शेवट केला होता.
सगळं आठवून साक्षी लाजून स्वतःशीच हसली. तीन वर्ष पूर्ण झाली की बघता बघता आता थोडेच दिवस मग येईलच पराग.
“हुश्श!” म्हणत साक्षी अजून थोडी सैलावली आणि तिचे पुढचे विचार सुरू झाले. ‘अजून एक अर्ध्या तासात घरी पोहोचू. आज शुक्रवार. म्हणजे उद्या परवा सुट्टी.’ या विचारानं तिच्या चेहऱ्यावर हसू पसरणार तोच तिला आठवलं की रविवारी संध्याकाळी हॉटेल इम्पेरियल मध्ये पार्टी आहे. तिच्याच ग्रुपच्या सॉफ्टवेअरच्या लाँचची पार्टी असल्यानं जाणं मस्टच होतं. पण सोमवारी सुट्टी डिक्लेयर झाली होती हे आठवून ती रिलॅक्स झाली आणि पार्टीसाठी काय घालावं याचा विचार करत घरी पोहोचली.
घरी आल्यावर वॉश घेऊन ती फ्रेश झाली. तिच्याकडे स्वैपाक करणाऱ्या मावशींना तिनं सांगितल्याप्रमाणे सकाळीच त्यांनी रात्रीचाही स्वैपाक करून ठेवला होता. खरंतर ते गारढोण अन्न पाहून साक्षीला जेवावसं वाटेना. पण ‘काही दिवसच अशी अॅडजस्टमेंट करावी लागेल. पराग परत आला की होईल सुरळीत रुटीन.’ अशी मनाची समजूत घालत तिनं मायक्रोवेवला सगळं गरम करायला ठेवलं.
हे असं एकटं राहणं जाम बोअर व्हायचं तिला. दिवसभर ऑफिसमध्ये वेळ भुर्रकन उडून जायचा. घरी आल्यावर मात्र रात्र खायला उठायची. याचमुळं साक्षी अलीकडे फेसबुकवर विशेष अॅक्टिव झाली होती. पराग त्याच्या प्रोजेक्ट निमित्त परदेश दौऱ्यावर गेला की एकटेपणा विसरण्यासाठी फेसबुकचा विरंगुळा तिला मदत करत असे.
गेल्या तीन वर्षात तिचे चार एक हजार फ्रेंड्स आणि अनेक फॉलोवर्स झाले होते.
इतरांचे लेख वाचण्यात, स्वतःचं काही शेयर करण्यात साक्षीचा वेळ चांगला जात असे. लोकांनाही तिचं लिखाण आवडत होतं. त्यांच्या प्रोत्साहनाने ती अजुनच अॅक्टिव राहून तिचे विचार पोस्टमध्ये व्यक्त करत असे. तासाभराच्या या विरंगुळ्याचे रूपांतर रोजच्या सवयीत कसे झाले याचा साक्षीला पत्ता देखील लागला नाही. अर्थात याच व्यासपीठावर तिला तिच्यातली लेखिका गवसल्यामुळे तिला याबद्दल मुळीच वाईट वाटत नसे.
जेवण करून, टेबल वगैरे आवरून साक्षी बेडवर पडली. एसी ऑन करून तिनं मोबाईल हातात घेतला आणि ती नोटिफिकेशन्स चेक करू लागली. काल रात्री तिनं पोस्ट केलेल्या लेखाला आठशे लाईक्स आणि शेकड्याने कॉमेंट्स आल्या होत्या. सगळ्यांना तिची ती “कॉर्पोरेट ड्रेसिंग सेन्स” वरची पोस्ट प्रचंड आवडली होती. नाही म्हटलं तरी आपलं लिखाण खूप लोकांना आवडतं या विचारानं साक्षीच्या मनाला गुदगुल्या झाल्या. तिनं कॉमेंट्स मध्ये विचारलेल्या प्रश्नांना रिप्लाय द्यायला सुरुवात केली. मग दीड दोन तासांनी कंटाळा आल्यावर मोबाईल चार्जिंगला लावून ती झोपली.
दुसऱ्या दिवशी साक्षीला जाग आली तीच मुळी परागच्या फोन कॉल मुळे. त्याच्या, “आज सुट्टीच्या दिवशी काय करणार राणी सरकार?” या प्रश्नावर, “अरे आज मी उद्याच्या पार्टीसाठी थोडं शॉपिंग आणि पार्लर मध्ये जावून यावं असा विचार करतेय” असं म्हणताच पराग म्हणाला, “हो हो, जाऊन ये. एन्जॉय युवर डे.” आणि एकमेकांना बाय करून ते आपापल्या कामात बिझी झाले.
संध्याकाळी परागशी स्काईपवर गप्पा मारून, फेसबुकवर थोडा टाईमपास करत साक्षी उशिरा झोपली. साहजिकच रविवारी उठायला तिला उशीर झाला. मग मात्र झटपट आवरून, जेवण करून आणि झक्कास आवरून संध्याकाळी ती हॉटेल इम्पेरियलला पोहोचली.
आज पार्टीमध्ये भारतातील प्रसिद्ध आणि सचोटीचे व्यावसायिक भरत शहा चीफ गेस्ट होते त्यामुळे त्यांच्या आणि तिच्या कंपनीच्या बड्या धेंडांच्या सरबराईत हॉटेल मॅनेजमेंट व्यस्त झालं होतं. त्यामुळं वॅले पार्किंगची सोय सगळ्यांनाच उपलब्ध होऊ शकली नाही. “चलता है” म्हणत तिने हॉटेलच्या बेसमेंटला गाडी पार्क केली आणि बॅंक्वेट हॉल मध्ये येऊन तिच्या कलिग्जमध्ये मिसळून गेली. सोशल मीडियावर तिचे काही सेल्फी, कलिग्ज बरोबरचे फोटो आणि लोकशन शेअर करून ती पार्टीचा आनंद घेऊ लागली.
थोड्या वेळाने नोटिफिकेशन वाजले म्हणून तिनं मोबाईल पहिला. परागनं तिच्या फोटोवर काहीतरी कॉमेंट केल्याचं नोटिफिकेशन तिला दिसलं. फेसबुक उघडताच काही शे लोकांनी केलेल्या कॉमेंट मध्येच परागची, “लुकींग जोर्जिअस” ही कमेंट वाचून ती लाजली. “खरं तर आत्ता जपानमध्ये रात्रीचा एक वाजला आहे. तरी रात्री एक वाजता देखील पराग आपल्यासाठी जागा आहे.” हे जाणवून तिला खूप आनंद झाला. आनंदाच्या भरात ती परागला फोन लावणार तोच अवॉर्ड डिस्ट्रीब्यूशनची अनाउन्समेंट झाली आणि साक्षीनं फोन सायलेंट केला.
या सॉफ्टवेअरसाठी तिनं भरघोस काम केल्यामुळे जरी या जॉब मध्ये दोनच वर्ष झाली असली तरी अगदी अवॉर्ड नाही पण निदान आपलं नाव घेऊन आपल्या कामाची दखल नक्कीच घेतली जाईल असं तिला वाटत होतं.
इतक्यात साक्षीच्या नावाची अनाउन्समेंट झाली. त्या वर्षीचा “थ्री चीयर्स अवॉर्ड” कंपनीनं तिला देऊ केला. कलिग्जचे अभिनंदन स्वीकारत टाळ्यांच्या गजरात स्टेजवर जाऊन साक्षीनं अवॉर्ड घेतलं आणि भरल्या गळ्यानं थॅंक्स गिविंगचे दोन शब्द कसेबसे बोलून ती स्टेज वरून उतरली. तिच्याभोवती अभिनंदन करण्यासाठी सगळ्यांचा गराडा पडला. पण तिला मात्र परागला ही बातमी सांगायची होती. सगळ्यांचं अभिनंदन घेत ती थोडी आडोशाला आली. मोबाईल काढताच त्यावर तिला परागचे दहा बारा कॉल दिसले. मग मात्र न राहवून तिने त्याला व्हिडिओ कॉल लावला.
एक रिंग पूर्ण व्हायच्या आतच फोन उचलला गेला आणि पराग लगेचच, “अगं किती सुंदर फोटो टाकलेस फेसबुकवर… किती सुरेख दिसतेयस… असं वाटतंय की आत्ताच्या आत्ता तिथे येऊन….” त्याला मध्येच तोडत साक्षीनं तिला अवॉर्ड मिळाल्याचं परागला सांगितलं आणि पराग, “काँग्रॅटस् माय लव्ह… यू डिजर्व इट…” इतकं बोलेपर्यंत साक्षीचे मित्र मैत्रिणी फोनमध्ये डोकावले. “हे… हाय पराग… कसा आहेस…?” वगैरे विचारत ते पराग बरोबर साक्षीची चेष्टामस्करी करू लागले. खरंतर परागला आणि साक्षीला एकमेकांशी खूप बोलायचं होतं पण यारी दोस्ती में ये सब चलता है म्हणून दोघेही चिडवून घेत होते. अखेर तासाभराने साक्षीच्या हातात फोन आल्यावर परागने तिला, “जेवून वेळेत घरी जा. मला उद्या ऑफिसला लवकर पोहोचायचं आहे. मी मोबाईल स्वीच ऑफ करून झोपतो आता… आणि हो गुरुवारी परत इंडियात येतोच आहे तेव्हा मस्त सेलिब्रेट करू… ठेवू फोन? गुड नाईट” असं सांगून फोन कट केला.
सगळ्यांबरोबर बफे घेऊन निघेपर्यंत पावणे बारा वाजले होते. लिफ्टने डायरेक्ट बेसमेंटमध्ये येत साक्षीनं सफाईदारपणे गाडी काढली. ती दोनेक किलोमीटर जात नाहीये तोच पोलिसांची जीप आणि दोन तीन इतर गाड्यांनी तिची गाडी अडवली. तिला गाडीत बघून दोन महिला पोलिस पुढे आल्या आणि तिला गाडीतून बाहेर येण्याचा इशारा त्यांनी केला. बावचळलेली आणि घाबरलेली साक्षी बाहेर येताच दोन तीन कॅमेरे लखलखले आणि तिचे फोटो काढले गेले. या प्रकाराने तर साक्षी पारच घाबरली. काय चाललं आहे तिला काहीच समजेना. त्या फोटोग्राफर्सना बाजूला करत एक इन्स्पेक्टर साक्षी समोर येत तिला म्हणाला, “काय बाई… गाडी कोणाची आहे?”
“… माझी… आय मीन… माझ्या नवऱ्याची…” हे म्हणत असतानाच गाडीकडे लक्ष जाऊन साक्षीला जाणवलं की काहीतरी चुकतंय… ही गाडी परागची नाहीये ..
तिच्या रडवेल्या चेहऱ्याकडे पाहून इन्स्पेक्टरला तिची दया आली असावी. तो तिथल्याच एका माणसाला म्हणाला, “जा तुमची गाडी घेऊन. मी फोन करतो साहेबांना” आणि साक्षीकडे बघून म्हणाला, “मॅडम… तुम्ही बसा जीपमध्ये.”
अत्यंत वेगाने घडणाऱ्या या घटनांनी साक्षी पूर्णपणे हादरून गेली होती. पोलिस स्टेशनला पोहोचल्यावर तिला उलगडा झाला की, तिने तिच्या गाडी ऐवजी चुकुन चीफ गेस्ट आणि प्रसिद्ध उद्योगपती भरत शहा यांचीच गाडी आणली होती. हे सगळं चक्रावून टाकणारं होतं. साक्षीच्या डोक्यात विचारांचं वादळ माजलं होतं. तिच्या
गाडीची किल्ली त्या ड्रायव्हरने नेलेल्या गाडीतच राहिली होती. माझ्या गाडीच्या किल्लीने शहांची गाडी अनलॉक झाली कशी? या विचारानं साक्षीचं डोकं भणभणत होतं. पोलिस प्रश्न विचारून बेजार करत होते, परागचा फोन स्विच ऑफ असल्यानं त्याच्याशी संपर्क होत नव्हता आणि कलिग्ज पार्टीत असल्यामुळे त्यांचे फोन वाजलेले गोंधळात त्यांना ऐकू येत नव्हते. अखेर साक्षी एकेक घटना आठवून, संदर्भ लावून नेमकं काय झालं याचा विचार करू लागली. तिनं त्या इन्स्पेक्टरना पार्टीतून निघाल्यापासूनच्या सगळ्या घटना सांगितल्या आणि तिच्याच गाडीच्या किल्लीनं मिस्टर शहांची गाडी अनलॉक आणि स्टार्ट झाली हे सांगितलं. यावर अर्थातच पोलिसांचा विश्वास बसला नाही. मग रात्रभर पोलिसांच्या प्रश्नांना जमतील तशी उत्तरं दिल्यावर पहाटे साडेसहाला पोलिसांनी तिला घरी सोडलं.
झाल्या प्रकाराने पूर्णपणे गोंधळलेली साक्षी दरवाजाचं लॅच उघडत असतानाच शेजारचे काका म्हणाले, “अहो तुमचा फोटो आला आहे पेपरात.” साक्षी चरकली. तिच्या डोळ्यासमोर कालचा कॅमेऱ्यांचा लखलखाट आला. तिनं काकांच्या हातून पेपर घेतला तशी त्यांनी आतल्या पानावरची ती बातमी दाखवली.
“इंजिनिअर तरुणीला कार चोरी करताना पकडले… ” बातमी खाली तिचा फोटो आणि पूर्ण नाव होतं.
साक्षी अगदी गर्भगळीत झाली. परागला फोन करण्यासाठी तिनं मोबाईल काढला. तेवढ्यात तिच्या एका कलिगचा तिला फोन आला.
“हॅलो… अगं साक्षी हे काय चाललंय? पेपरला काय बातमी आहे? तू पाहिलीस का?”
“अरे काय घडतंय मलाच कळत नाहीये. पेपरवाले शहानिशा न करता अशी बातमी कशी छापू शकतात?” काल रात्रीपासूनच हा सगळा ताण सहन न होऊन साक्षी स्फुंदून रडत विचारू लागली.
“थांब. काळजी करू नकोस. आम्ही येतो तुझ्या घरी.” तिच्या मित्रानं समजावलं.
पराग चारच दिवसात भारतात येणार होता, तेवढ्यात हे काय घडलं? असा विचार करत साक्षी परत पेपरमधली ती बातमी वाचू लागली. त्यात ‘तिनं कार का चोरली असेल?’ यावरून ‘ती मनोरुग्ण असावी’ पासून ‘तिला व्यसनासाठी पैसे कमी पडत असावे’ इथपर्यंत असंख्य तर्क लढवले होते. संतापाने साक्षी थरथरू लागली. पेपर खपवण्यासाठी हे लोक वाट्टेल तो मीठमसाला लावून बातम्या छापू शकतात मग यात एखाद्याच्या आयुष्याचं नुकसान का होईना… या विचारानं ती अजुनच अगतिक झाली.
तितक्यात तिचे मित्र मैत्रिणी आले. त्यांनी सांगितलं की जे काही काल घडलं त्यासाठी तिचा बॉस आणि अजून एक ऑफिसर शहांकडे जाऊन आले. तू काळजी करू नकोस. साक्षीला धीर देऊन सगळे आपापल्या घरी गेले.
ते सगळे गेल्यावर साक्षीने टीव्ही लावला तर तिथेही बातम्यांमध्ये हेच सुरू होतं. निवेदक किंचाळून “एका इंजिनिअर तरुणीने चोरी का केली असावी?” यावर भन्नाट कल्पना लढवत होता. दुसऱ्या चॅनल वर शहरामध्ये चोऱ्यांच प्रमाण वाढलं असून सुशिक्षित लोकही यात मागे नाहीत असं सांगत तिचं उदाहरण देत होते.
सगळ्याच चॅनल वर चटपटीत मसाला लावून हीच बातमी सांगितली जात होती शिवाय पुढच्या अपडेट साठी टीव्हीचं चॅनल बदलू नका हेही सांगत होते.
काही चॅनल नी तर कार चोरीची अॅनिमेटेड फिल्म बनवली होती. ज्यात एक मुलगी पार्टीचे कपडे घालून कारची चोरी करताना दाखवली होती. सगळं बघून साक्षीला हसावं की रडावं तेच समजेना.
एव्हाना सकाळचे अकरा वाजले होते. साक्षीनं परागशी बोलण्यासाठी फोन हातात घेतला. त्यावर मेसेज बॉक्समध्ये परागचा मेसेज होता, “आज सकाळी उठायला उशीरच झाला. आवरून कंपनीत आलो. दिवसभर मीटिंगज् आणि प्रोजेक्ट बाईंडींग अपची कामं आहेत म्हणून फोन दिवसभर स्विच ऑफ राहील. लव यू… मिस यु”
मेसेज वाचल्यावर साक्षीला अगदी एकटं वाटलं. तिचा मूड ऑफ झाला. इतक्यात फेसबुकचं नोटिफिकेशन वाजलं. साक्षीनं फेसबुक उघडलं आणि तिला धक्काच बसला.
फेसबुक आणि ट्विटरवर तिच्याविरुद्ध जणू काही मोहीमच उघडली गेली होती. अगदी कालपर्यंत तिच्या पोस्ट्सना बदाम, लाईक देणारे तिची स्तुती करणारे तिचे फॉलॉवर्स आणि त्या आभासी जगातले फ्रेंड्स यांनी तिच्याबद्दल बोलताना ताळतंत्र सोडला होता.
एका माणसाने न्युज चॅनलचा हवाला देत म्हटलं होतं की ही तरुणी जरी सुशिक्षित आणि उच्चभ्रु सोसायटीतली असली तरी मनोरुग्ण आहे. हीनंच शहांच्या ड्रायव्हर बरोबर गोड बोलत सापळा रचला आणि किल्ली गाडीलाच आहे हे पाहिल्यावर गाडी घेऊन पोबारा केला.
एका बाईंनी चक्क तिचं पूर्ण नाव घेऊन तिच्याबद्दल छातीठोकपणे चुकीची माहिती दिली होती. इतकंच नाही तर साक्षी रात्री पबमध्ये पार्टी करून प्रचंड दारू प्यायली होती आणि त्या नशेच्या अंमलाखाली तिनं गाडीची चोरी केली हे ही लिहिलं होतं.
एका तरुणाने तर अर्वाच्य शब्दात तिचं आणि शहांच्या ड्रायव्हरचं काहीतरी मेतकूट असावं नाहीतर अशी गाडी कोणी चोरूच कसं शकतं वगैरे अकलेचे तारे तोडले होते.
तिच्या शिक्षणापासून, दिसणं, जात, आय टी इंडस्ट्री अशा प्रत्येक गोष्टीवर चर्चा रंगल्या होत्या, काही जणांनी तिचे संस्कार काढले होते, काहींनी तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले होते तर काहींनी तिच्या व्यसनाधीनतेबद्दल अगदी खात्रीपूर्वक लिहिलं होतं. काहीजणांनी तिच्यावर जोक्स, मिम् बनवले होते. काहींनी तिनं आयुष्यात कधी ऐकल्या नाहीत अशा शिव्या देत तिच्याबाबत अश्लील कॉमेंट्स केल्या होत्या.
साक्षीचे डोळे भरून आले. चार दोन लेख, एखादी जमलेली रेसिपी आणि विशेष प्रसंगी काढलेले फोटो पोस्ट करण्यापलीकडे तिने फेसबुकवर लोकांच्या भावना दुखावतील असं काहीही लिहिलं नव्हतं. लोक मात्र पेपरमधल्या एकाच बातमी वरून तिच्याबद्दल वाट्टेल ते बरळत होते.
एका पोस्टमध्ये साक्षीचं नाव घेऊन “हीचा पत्ता शोधून काढू आणि घरी जाऊन तिला ठोकू” वगैरे अत्यंत शिवराळ भाषा वापरली होती. अशी भाषा साक्षीनं उभ्या आयुष्यात ऐकली नव्हती.
ट्विटरवर पण काही वेगळं चित्र नव्हतं. काही मोठ्या सेलिब्रिटींनी “शहांसारख्या मोठ्या उद्यागपतीची गाडी चोरीला जाते यावरून शहराची सुरक्षा व्यवस्था किती धोक्यात आहे” असं ट्विट केलं होतं. तर काहींनी साक्षीच्या कंपनीला यासाठी जबाबदार धरलं होतं. काहींनी हॉटेलवर ताशेरे ओढले होते.
एका राजकारणी व्यक्तीनं तर “शहा साबसाठी आमी काय पन करू शकतो. हे बिजिनेस लॉबी मदला राजकारन हाय आनी साक्षी बाई मोहोरा हाये..” असं वाट्टेल ते खरडलं होतं.
आता जमाव किंवा समूह किती वेडा असू शकतो याचा पुरेपूर कटू अनुभव साक्षीला आला होता. दिवसभर सोशल मीडियावर लोकांच्या भडक पोस्ट आणि प्रतिक्रिया वाचून ती माॅब सायकाॅलाॅजी आणि त्यांची हरॅसमेंट, त्यांचा विखार अनुभवत होती. संपूर्ण जग आपल्या विरुद्ध आहे, काहीतरी भयंकर चूक आपण केली आहे, हे प्रकरण थोडक्यात बंद होणारं नाही. माझ्या एका चुकीमुळे माझ्या बरोबरच परागला देखील या सगळ्याचे परिणाम भोगावे लागतील अशा नकारात्मक विचारांनी साक्षीचं मन पुरतं सैरभैर झालं. एका बेसावध क्षणी तिनं स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. घळघळा वाहणारे अश्रू पुसत ती उभी राहिली. बेडवर पडलेली ओढणी उचलून तिनं पंख्याला बांधली. आता एका क्षणभराची वेदना आणि सगळ्यातून मुक्ती असा वेडा विचार करून ओढणीचा फास तिनं गळ्याभोवती टाकला. पण सारासार विचार करण्याची शक्ती गमावून बसलेल्या साक्षीच्या लक्षात आलं की बेडवर उभी राहिल्यावर जवळजवळ पंख्यापर्यंत तिचं डोकं जात असल्यानं फास घेणं निव्वळ अशक्य होतं. असहाय्य होऊन साक्षीनं स्वतःला बेडवर झोकून दिलं आणि ती एखाद्या लहान मुलीसारखी ओक्साबोक्शी रडू लागली.
इतक्यात फोन वाजला. अचानक झालेल्या त्या आवाजानं साक्षी दचकली. तिचं घड्याळाकडे लक्ष गेलं. संध्याकाळचे सहा वाजले होते. म्हणजे जपानला रात्रीचे साडेनऊ वाजले असणार. म्हणजेच पराग ऑफिसमधून घरी पोहोचला असणार. परागचा फोन. साक्षीनं अक्षरशः झडप घालून फोन उचलला. परागनं ‘हॅलो साक्षी” म्हणताच ती पराग असं ओरडून जोरजोरात रडू लागली. परागने तिला समजावत, चुचकारत शांत केलं.
ती शांत झाल्यावर पराग म्हणाला, “गुड गर्ल. पण साक्षी काल रात्री नेमकं काय घडलं मला सांगशील?”
साक्षीनं आश्चर्यानं विचारलं, “तुझा फोन तर स्विच ऑफ होता ना? मग तुला कसं समजलं काही घडलंय ते?”
“अगं आत्ता घरी आलो आणि फोन स्विच ऑन केला तर नोटिफिकेशन वाजले. सहज फेसबुक उघडून पाहिलं तर तुला ट्रोलिंग होत असलेलं पाहिलं. ट्विटर, इंस्टा, इंडियन टीव्हीवरच्या बातम्या सगळीकडे तेच चालू होतं. पण माझी खात्री होती की तू कोणत्याही प्रकारचं गैरकृत्य करू शकणारच नाहीस म्हणून लगेच तुला फोन केला. आता सांगशील का काय घडलं ते.’
परागचं ते आश्वासक बोलणं आणि आपुलकीचा प्रेमळ आवाज ऐकून साक्षीचा जीवात जीव आला. ती बरीच शांत झाली. तिनं आदल्या दिवशी सकाळपासूनच काय काय घडलं ते बारीक सारीक तपशील देत परागला सांगितलं. तिला बोलणं पूर्ण करून देत परागनं ते सगळं लक्षपूर्वक ऐकून घेतलं आणि तो म्हणाला, “ह्म््म…
पण साक्षी तुझ्या एक लक्षात आलं का? तुला धोका आहे तिथं एकटं राहण्यात. एक लक्षात ठेव जमाव हा नेहमी वेडा असतो पण या जमावाची मेमरी अतिशय कमी असते. त्यामुळं अजिबात घाबरु नको पण घराबाहेर पडलीस तर स्कार्फने चेहरा झाकून मगच बाहेर पड.”
परागशी बोलल्यावर साक्षीला खूप बरं वाटलं. त्याला गुड नाईट म्हणून तिनं फोन बंद केला. सहजच तिचं लक्ष पंख्याकडे गेलं. त्यावर अजूनही ओढणी लोंबकळत होती. भावनेच्या भरात आपण काय वेडेपणा केला असता, परागला कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं असतं हे लक्षात येऊन साक्षी शहारली. तिनं ती ओढणी खेचून घेतली आणि तशीच न खाता पिता बेडवर पडून राहिली.
रात्रभर तिच्या डोक्यात विचारचक्र सुरू होतं. पहाटे उठून साक्षीनं स्वतःशीच काहीतरी ठरवलं. गुगलवरून कोणता तरी अॅड्रेस मिळवून सेव केला. स्वच्छ आवरून, ब्रेकफास्ट करून ती घराबाहेर पडली.
नेहरू रोडवर आल्यावर मोबाईलमध्ये तिनं मिळवलेला अॅड्रेस ती वाचत होती तोपर्यंत कोणीतरी बोललं, “आज कोणाची कार चोरायचा विचार आहे?” शॉक बसून तिनं आजूबाजूला पाहिलं तर बाजूलाच बुलेटवर बसून एक तरुण हसत होता. “कोण रे तू? आणि काय माहिती आहे तुला माझ्याबद्दल..?” विचारत साक्षी संतापाच्या भरात त्याच्या अंगावर धावून गेली. यावर बचावासाठी हाताचा क्रॉस करत तो म्हणाला, “होल्ड ऑन साक्षी मॅडम… रागावू नका मी गंमत करतोय.”
साक्षी घाबरून म्हणाली, “तुला माझं नाव कसं माहिती?” तिला वाटलं कालच्या बातमीमुळे आणि सोशल मीडियामुळे तिची किती ठिकाणी बदनामी झाली आहे कोणास ठावूक.
तो तरुण हसत म्हणाला, “अहो, मी राहुल पागे. तुमचा फेसबुक फ्रेंड. मला एकूण तुमच्या प्रोफाईल वरून वाटतच होतं की तुम्ही चोरी वगैरे काही करणार नाही. पण झालंय काय नेमकं? आणि माझी मदत हवी असेल तर… बंदा हाजिर है”
“अच्छा राहुल… चल तर मग माझ्याबरोबर” बुडत्याला काडीचा आधार या न्यायाने साक्षी बोलून गेली.
राहुल आणि साक्षी शहांच्या ऑफिस मधील भव्य रिसेप्शनमध्ये बसले होते. तासाभरात त्यांना एका केबिनमध्ये बोलावलं गेलं. तिथं परवा चौकीत तिची चौकशी करणारे इन्स्पेक्टर, साक्षीचे बॉस आणि अजून दोनजण बसले होते. स्वतः भरत शहा समोरच्या उंच आणि गुबगुबीत खुर्चीत बसले होते. त्या दोघांना बसायची खुण करत त्यांनी बोलायला सुरुवात केली.
“साक्षी… राईट?? मला पूर्ण आणि खरी परिस्थिती समजली आहे. पोलिसांनी तुझ्या गाडीच्या किल्लीने माझी गाडी अनलॉक करून पाहिली. हे आपल्या गाडीच्या ब्रँडचे इंजिनीअर्स आहेत. त्यांना आत्ता मी हेच विचारलं की, “एका कारच्या किज वापरून त्याच मेकची दुसरी कार अनलॉक करता येते का? आता त्यांचं उत्तर तू त्यांच्याच तोंडून ऐक.” एवढं बोलून शहा शांत बसले आणि बाजूच्या खुर्चीत बसलेले दोन इंजिनीअर्स शहांकडे बघत बोलू लागले, “सर, इतर अनेक कार मनुफॅक्चरर्स प्रमाणेच आपल्या कंपनीचे देखील साधारण ३५,००० लॉक कॉम्बिनेशनस् आहेत. त्यामुळं एका कारची किल्ली दुसऱ्या कारला मॅच होऊन इग्निशनला सुद्धा मॅच होणे अशी घटना लाखात एखादी होऊ शकते. हे दुर्मिळ असलं तरी अशक्य नाहीये हे आम्ही मान्य करतो.
दुर्दैवानं काल जे घडलं ती अशीच लाखात एक केस होती. यात तुम्हाला जो काही त्रास झाला त्याबद्दल कंपनीकडून दिलगिरी व्यक्त करतो.
सर, आम्ही आत्ता सोबत आमची त्याच मेकची ब्रँड न्यू कार ट्रान्सपाॅन्डर कीज सकट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. डॉक्युमेंट्स पण रेडी आहेत सर. फक्त एकच रिक्वेस्ट आहे. झाल्या प्रकाराची कुठे वाच्यता करू नका. आम्हाला आमचा बिझिनेस बंद करावा लागेल.”
आणि लगेचच त्यातला एकजण साक्षी कडे बघत म्हणाला, “मॅडम, यात तुमची काहीही चूक नाही. लाखात एखाद्या केसमध्ये असं घडू शकतं. आता आमची लॉकिंग सिस्टिम अजुनच अॅक्युरेट होईल. पण आमची तुम्हाला सुद्धा हीच विनंती आहे की याबद्दल तुम्ही बाहेर काही वाच्यता करू नका.”
साक्षी म्हणाली, “तुमची बाजू बरोबर आहे. पण जे काही घडलं आहे त्यामुळं लोक मला प्रचंड प्रमाणात ट्रोल करत आहेत. मग शहांकडे वळून ती म्हणाली, शहा सर तुम्ही देशातली एक प्रतिष्ठित आणि आदरणीय व्यक्ती आहात तर मला वाटतं तुम्ही याबद्दल तुमच्या सोशल मीडिया अकाउंट वर काही लिहिलं तर मला होणारा त्रास थांबू शकेल.”
शहा तिच्यासमोर जरी, “मी बघतो” म्हणाले असले तरी ते असा खुलासा करतील की नाही याबद्दल साक्षी साशंक होती. तिच्या बॉसने तिच्या हातावर थोपटून आश्वस्त केलं आणि सगळे केबिन मधून बाहेर आले.
यातून आपल्यासाठी काही निष्पन्न होणार की नाही हाच विचार करत साक्षी चालत होती. तेवढ्यात राहुल म्हणाला, “तुझ्या बाबतीतल्या काही पोस्टवर मीही पूर्वग्रहदूषित रिअॅक्ट झालो आहे. ती चूक सुधारण्याची संधी मी आता घेतो. ट्रोलींगचा एखाद्याला किती त्रास होऊ शकतो हे माझ्या चांगलंच लक्षात आलं आहे.”
राहुल निघून गेला.
साक्षी घरी आल्यावर तिनं परागला फोन करून इत्यंभूत माहिती दिली आणि ती म्हणाली, “पराग माझ्या बाजूने तरी मी जितकं करता येईल तितकं केलं. आता जर त्या भरत शहांनी या गोष्टीवर काही प्रकाश पाडला तरच हे लोक गप्प बसतील. नाहीतर मला इथं राहणं मुश्किल होईल.”
यावर तिला समजावत पराग म्हणाला, “सगळं नीट होईल. काळजी करू नको. तू कधी कोणाचं वाईट केलंस का? नाही ना? मग तुझंही सगळं चांगलंच होईल. आणि ऐक मी माझ्या कंपनीत बोललो आहे. तुझ्यासाठी मी तीन दिवस आधीच येतो आहे. आत्ता एअरपोर्टवर चेक इन करतो आहे. रात्री उशिरा घरी येईन. पण तोपर्यंत बी ब्रेव. आता ठेवू फोन?”
“हो” म्हणत साक्षीने फोन कट केला. परागच्या बोलण्यानं तिच्या मनावरचं मळभ, टेंशन क्षणार्धात नाहीसं झालं. तिला वाटलं, किती लकी आहोत आपण… आपल्याला पराग सारखा समजूतदार, सांभाळून घेणारा नवरा, चांगले बॉस, चांगले मित्र मैत्रिणी मिळाले आहेत. ज्यांच्या जवळ असे सहृदय नसतील त्यांना या ट्रोलिंगसारख्या प्रकाराला सामोरं जावं लागलं तर ते उन्मळून पडतील, उध्वस्त होतील. आदल्या दिवशीचा तो ओढणीचा प्रसंग आठवून ती पुन्हा शहारली.
पण आता तिला बरंच मोकळं आणि प्रसन्न वाटत होतं. एक दीर्घ श्वास घेऊन तिनं तिचं फेसबुक अकाऊंट शांतपणे डिअॅक्टिवेट केलं. फोन बाजूला ठेवून दिला आणि ती परागच्या स्वागताच्या तयारीला लागली. घर स्वच्छ आवरून थोडीफार सजावट करून ती डिनरच्या तयारीला लागली. परागच्या आवडीचा स्वैपाक करून तिनं टेबल सजवलं आणि ती परागची आतुरतेनं वाट पाहू लागली.
रात्री पराग आल्याबरोबर तिने त्याला घट्ट मिठी मारली. आता मात्र तिचा संयमाचा बांध ढासळला आणि परागच्या खांद्यावर डोकं ठेवून तिनं मुक्तपणे अश्रू वाहू दिले. पराग तासभर फक्त तिला थोपटत राहिला मग हलकेच म्हणाला, “वेडा बाई, त्या भरत शहांनी काय ट्विट केलंय ते पाहिलंस का? त्यांनी तुझं नाव घेऊन, तुझी काहीही चूक नाही आणि छोट्याशा टेक्निकल प्रॉब्लेममुळे काही गैरसमज झाले यासाठी कृपया साक्षीला ट्रोल करू नये असा स्पष्ट मेसेज दिला आहे. शिवाय हा तुझा फ्रेंड राहुल पागे कोण आहे. त्यानं देखील भली मोठी पोस्ट लिहून तुला सपोर्ट केलं आहे. आता तुझं फेसबुक अॅक्टिवेट करून तुझ्या वॉलवर भरत शहांची पोस्ट शेअर कर.”
खरंतर आता साक्षीला त्या सोशल मीडियाची काही पडली नव्हती. तिनं परागला हातपाय धुवून घे आपण दोघे जेवायला बसू असं सांगत जेवण गरम करायला सुरुवात केली.
मग परागनेच तिचा मोबाईल घेऊन फेसबुक चालू करून तिच्या वॉलवर भरत शहांचं ट्विट पेस्ट करून “मी निर्दोष आहे” अशी पोस्ट टाकून दिली आणि तीन वर्षांनी भेटलेलं ते जोडपं एकमेकांच्या बाहुपाशात विसावून अखंड प्रेमात बुडालं.
सकाळी उशिरा उठल्यावर परागने मोबाईल हातात घेतला आणि तो आश्चर्याने ओरडला, “ओ मॅडम, उठा… तुमच्या पोस्टला पाच हजार लाईक आणि दोन हजार कमेंट्स आहेत. “साक्षी वी आर विथ यू” म्हणून लोक सपोर्ट करतायत. रातोरात स्टार झालात मॅडम तुम्ही तर.”
यावर साक्षीने परागकडून मोबाईल काढून घेत तो स्वीच ऑफ करत बाजूला ठेऊन दिला आणि त्याच्या छातीवर हनुवटी टेकवून त्याच्या डोळ्यात प्रेमानं बघत ती म्हणाली, “फक्त तू सोबत असशील ना तर मला कोणत्याही स्टारडमची गरज नाही.” अचानक ती गंभीर झाली. तिचे मोठे डोळे पाण्याने भरून गेले. तिच्या पाठीवरून हात फिरवत परागनं विचारलं, “काय झालं? अजुनही तुझ्या डोळ्यात पाणी? काय झालं रडायला?”
साक्षी उठून बसली. डोळे पुसत म्हणाली, “पराग, मी तुझी गुन्हेगार आहे. ऑफिसमध्ये तू कामात असताना तुझा मोबाईल स्विच ऑफ होता. पेपर, ट्विटर, फेसबुक, टीव्ही या सगळ्या सोशल मीडिया वाल्यांनी माझी बातमी उचलून धरली होती. लोक मला शिव्या देत ट्रोलींग करत होते. आणि एका कमकुवत क्षणी मी खचले. ओढणी पंख्याला लटकवून….”
पराग झटकन उठून बसला. त्यानं साक्षीच्या तोंडावर हात ठेवत नकारार्थी मान हलवली. “असं अभद्र बोलू नको साक्षी.” त्याचे डोळे पाण्याने भरले. “अगं तुझ्याशिवाय मी कसा जगलो असतो? हे कोण कुठले सोशल मीडियावर बडबड करणारे लोक. यांच्यासाठी तू स्वतःचा मौल्यवान जीव देणार होतीस? माझं आयुष्य उद्ध्वस्त करणार होतीस?”
साक्षीनं न राहवून परागला मिठी मारली. ती मिठी परागनं अजुनच घट्ट केली. मग थोड्या वेळानं मिठी सोडून तिला सामोरं धरत तिच्या डोळ्यात बघत पराग म्हणाला, ” ते काही नाही. आत्ताच्या आत्ता मी फेसबुक, ट्विटर, इंस्टा वरचे आपल्या दोघांचेही अकाउंट्स डिलीट करतो.” हे म्हणत त्यानं दोघांचे मोबाईल हातात घेतले.
ते त्याच्या हातातून शांतपणे काढून घेत साक्षी म्हणाली, “पराग, मला तुझी खंबीर साथ आहे म्हणून मी ट्रोलिंगच्या या दिव्यातून बाहेर पडू शकले. पण असे आणखी कितीतरी साक्षी आणि पराग असतील जे एकटे असतील. ट्रोलिंगच्या त्रासाला कंटाळून एक तर जीव देत असतील किंवा समाजाला घाबरून दिवभिता सारखे जगत असतील. त्यांना कोण आधार देईल? ट्रोलींग वाईट आहे हे या सोशल मीडिया वरच्या लोकांना कोण समजावेल? प्रत्येकजण फक्त स्वतःचा विचार करत राहिला तर परिवर्तन कधी आणि कसे घडेल? आपणच हे काम करू. सोशल मीडिया वरचं ट्रोलिंग आणि या सगळ्याचा बागुलबुवा आपण दोघे मिळून नष्ट करू. आपण लोकांना समजावून सांगू की उगाच अनुमान लावून अंदाज किंवा तर्क वितर्क करत एखाद्यावर चिखलफेक करू नका. खरी परिस्थिती समजून मगच बोला. पुरावा हातात असेल तेव्हाच लिहा. तुमचा संबंध असेल, राष्ट्र हिताचा, मनुष्य हिताचा संबंध असेल तेव्हाच व्यक्त व्हा. बोल ना, पटतंय ना मी काय म्हणतेय ते?”
पराग दोन मिनिटं अवाक् होऊन साक्षीकडं पहातच राहिला आणि साक्षीनं त्याला खांदे धरून हलवल्यावर म्हणाला, “अरेच्चा… या प्रसंगातून माझी साक्षी किती प्रगल्भ आहे मनानं किती चांगली आहे हे कळलं मला. जशी तुमची आज्ञा राणी सरकार…. उद्यापासून आपली मोहीम ट्रोलींगच्या विरोधात पण आज मात्र लव बर्ड्स डे” असं म्हणत परागने साक्षीवर चुंबनांचा वर्षाव केला.
© सानिका वाडेकर
Image by Gerd Altmann from Pixabay
Latest posts by Sanika Wadekar (see all)
- प्रगती भाग ८ – शेवटचा भाग - September 10, 2020
- प्रगती भाग ७ - September 7, 2020
- प्रगती- भाग ६ - September 4, 2020
खूप छान लिहिलंय
नुकतंच केतकी चितळे च्या पोस्ट वरून उठलेलं वादळ आठवलं, अर्थात काही लोक या ट्रोलींग चा फायदा ही करून घेतात, पण बहुतांशी ट्रोलिंग फार त्रासदायक ठरतं लेखकाला. फ्रीडम ऑफ स्पीच चं घाणेरडं व्हर्जन आहे ट्रोलिंग
खूप संवेदनशील पण दुर्लक्षित विषय मस्तं हाताळला आहे ..👍👍👍
खूप छान आणि खर आहे.
खूप छान. खरचं ही वस्तुस्थिती आहे.
Very nice
Awesome
Please write more
आवडलं…
Gd 1
एक वेगळा विषय घेऊन त्यावर सुंदर कथा लिहिली आहेस सानिका ताई 😊👍🏻👌
khup chaan
Khupach chaan hatalalay ha vishay. Kharach social mdeidavar kahihi lihitana hajarvela vichar karayla lagato.