नाना मामा..
पावसाळ्याचे दिवस. चिखल तुडवीत नाना मामांनी बस थांबा गाठला. आठची गाडी गेली तर १० शिवाय पुन्हा गाडी नाही म्हणून मग न्याहारी न करताच घरातून बाहेर पडले. कुसुम मागे लागलेली, मामा खाउन बाहेर पडा पण ऐकतील ते नाना कसले. “हं इथे न्याहारी करत बसतो अन आठाची गाडी गेली निघून तर? आज मला तालुक्यास जाऊन यावयास हवे”
नाना मामा हे व्यक्तिमत्वच वेगळे. अखंड कार्यरत राहणे, कुठल्याही कामाचा आळस न करणे. जे उद्या करायचे असेल ते आज करू, आज करायचे ते आत्ता ह्या बाण्याचा हा माणूस. एखाद्या तरुणाला लाजवेल असा त्यांचा उत्साह असायचा. म्हणजे मनानी ते तसे चीरतरुण आहेत पण वय बघितले तर फक्त ६५. पाच सव्वा पाच फुटाच्या आसपास उंची, स्थूल शरीरयष्टी, गव्हाळ वर्ण, भरगोस कपाळ, गोल चेहरेपट्टी, लांबसडक नाक, अन मोठे काळेभोर डोळे असे नाना मामा मी गेली कित्येक वर्षे पाहत आलो आहे. पांढरा किंवा बदामी रंगाचा नेहरू शर्ट खाली, खाली पांढरा लेंगा, डोक्यावर काळ्या रंगाची टोपी. डोक्याचे केस उडून गेलेले फक्त टोपीच्या कडेला लागून कानावर अन पाठीमागे असे काही केस शिल्लक. हातात लाकडी मुठीची मोठी छत्री. माझ्या इतक्या वर्षांच्या पाहण्यात त्यांच्या ह्या वेशात फरक नाही फार फार तर शर्ट बदामी ऐवजी फिकट निळ्या रंगाचा, एवढाच काय तो बदल.
आज ते तालुक्याच्या गावाला निघाले होते. कुसुमच कुठे लग्न जमतंय काय हे बघायचं होतं म्हणून. कुणीतरी एका चांगल्या स्थळाचा पत्ता काल रात्री दिला काय अन आज सकाळी हे निघाले काय? वास्तविक हि कुसुम कोण त्यांची? तशी भाच्ची पण म्हणजे खूप वर्षांपूर्वी मामांच्या शेजारी राहणारा सदाशिव शेतात आंब्यावरून पडला अन जागीच गेला. त्याच्या बायकोला, म्हणजे सुमनला मामांनी बहिण मानले अन हि भाच्ची त्यांनी संभाळली. अर्थात मामा गावात कोणा अडल्या नडलेल्याच्या मदतीला धावून गेले नाहीत असे आजवर झाले नाही. मग वरच्या आळीतला हरी असू, सदा लोहार असू कि काशिनाथ सोनार असू. प्रत्येकवेळी पैशानीच माणसांच्या गरजा भागतात असे नाही. कधी कधी मनुष्यबळ लागते, मानसिक आधार लागतो किंवा वडिलकीचा सल्ला लागतो. हि सगळी कामे हाडाचे शिक्षक असेलेल नाना मामा आवडीनि आणि आपुलकीने करीत. नाना जेव्हा गावच्या शाळेवर शिक्षक होते तेव्हा त्यांनी कित्येक मुलांना शिकवून, संस्कार देऊन आयुष्याच्या पुढच्या वाटेला लावले होते. कित्येकजण त्यांची आठवण ठेऊन त्यांना भेटत त्यांची विचारपूस करीत. आता एकटेच असलेल्या नाना मामांना त्यांच्या मानलेल्या बहिणीचा अन तिच्या मुलीचाच आधार होता.
नेहमी चालण्याची सवय, निर्व्यसनी राहणीमान त्यामुळे ह्या वयातही ते निरोगी होते त्यामुळे बरोबर गाडी पोहोचायच्या आत ते बस थांब्यावर येउन पोहचले देखील होते. आता पाउस थांबला होता बस थांब्याच्या गळक्या पत्र्यांवरून पाणी निथळत होते. काही वेळातच बस आली अन नाना मामा गाडीत चढले. तालुक्याचे तिकीट काढले अन डोळे मिटून बसून राहिले. तासाभरानी गाडी तालुक्याला पोहचली. मग नानांनी शबनम मधून त्यांची छोटी डायरी काढली माधव कुलकर्णींचा पत्ता शोधला अन कोणालातरी सहवास सोसायटी आनंदनगरला कसे जायचे विचारले. अंतर जास्त आहे रिक्षा करून जा असे कळल्यावर नानांनी रिक्षा केली आणि २०व्या मिनिटाला रिक्षा कुलकर्ण्यांच्या आनंदवन बंगल्यासमोर उभी राहिली. “शिंचे हे कसले लांब अंतर”? असे म्हणून नानांनी पैसे दिले आणि आत गेले.
सुनील आवरून बाहेर पडण्याच्या तयारीत होता. नानांना पाहून त्यांनी कोण हवय हे विचारले. माधव कुलकर्णी विचारता त्यांनी आत मध्ये वळून ” बाबा ” अशी हक मारली अन “कोणीतरी भेटायला आलय” असे सांगितले. तो पर्यंत त्यांनी नानांना सोफ्यावर बसायला सांगितले. रामला पाणी आणून दे अशी सूचना दिली. पाणी घेऊन नाना जरा तरतरीत झाले तोच माधव कुलकर्णी आले. नमस्कार वगैरे झाले नानांनी वेळ न दवडता माझ्या भाची साठी स्थळ शोधत असता तुमचा मुलगा लग्नाचा आहे असे कळले म्हणून आलो असे सांगितले. तेवढ्यात राम चहा आणि फराळाचे पदार्थ घेऊन आला ते सगळे समोरच्या काचेच्या टीपॉय वर ठेऊन तो गेला. आता सुनील आणि त्याची आई बाहेर येउन बसले. नानांनी आपली ओळख करून दिली. कुसुमचे आई वडील यांच्या बद्दल माहिती दिली. कुसुम दिसायला नक्षत्रासारखी आहे, पदवीधर आहे हे सांगितले. पण हे सगळे ऐकताना माधवजी हरवल्या सारखे वाटले.
मधेच त्यांनी मामांना अरविंद कुलकर्णी त्यांचा विद्यार्थी होता का ते विचारले. थोडं आठवून नाना म्हणाले “अरविंद, म्हणजे हरी कुलकर्णीचा का” ? माधवजी हो म्हणाले. नानांनी त्यांना कसे ओळखता असे विचारले असता माधवजिनी उठून नानांना वाकून नमस्कार केला. नाना गडबडले. मग माधवाजीनी बोलायला सुरुवात केली “अरविंद माझा मावस भाऊ. त्याच्याकडून तुमच्या बद्दल अन शामल काकुंबद्दल खूप ऐकलं होतं. त्यांची परिस्थिती हालाकीची असताना तुम्ही आणि शामल काकुनी किती मदत केली होती ते त्यांनी सांगितले होते. त्याला तुम्ही वेळो वेळी पुस्तके पुरवलीत, घरी अभ्यासाला बोलावून काकू त्याला जेवायला घालीत. ह्याच्या कितीतरी गोष्टी त्यांनी मला सांगितल्या आहेत. तो आता मुंबई ला असतो. पण तो तुम्हाला, तुमच्या श्रीधरला अन काकुना विसरला नाही अजून. कश्या आहेत काकू अन श्रीधर”?
नानांनी शांतपणे ऐकून घेतले त्यांचे डोळे अश्रुनी डबडबलेले होते “अरविंद, हम्म्म खूप चांगला अन हुशार विद्यार्थी हो माझा. तो २० वर्षांपूर्वी गाव सोडून बाहेर पडला काय अन आमच्या श्रीला तापाचे निमित्त झाले काय. ताप डोक्यात गेला काय अन तो बेशुद्ध झाला काय. तो काही परत उठलाच नाही.
श्री गेला अन सहा महिन्यात आमच्या हिने आमची साथ सोडली. एक उसासा टाकून नाना म्हणाले तेव्हा पासून गावाची सेवा हीच ईश्वर सेवा मानत आलो. अशातच हि बहिण मिळाली अन कुसुम भाच्ची म्हणून लाभली. परमेश्वरानी दोन व्यक्ती काढून नेल्या अन ह्या दोन पदरी टाकल्या. जमेल तशी पोरीला वाढवली पदवीधर केली. चांगले संस्कार द्यायचा प्रयत्न केला. असो आता जी काही परमेश्वराची इच्छा असेल तसे होऊ द्यावे.
माधवजी म्हणाले “काकू अन श्री बद्दल ऐकून वाईट वाटले. मला माफ करा मला माहित नव्हते”. नानांनी हलकेच मन हलवली अन डोळे टिपले. माधवजी म्हणाले “आमची काहीच अपेक्षा नाही. देवाच्या कृपेने घरात सगळे आहे. मुलगा हाच इथे तुमच्या समोर आहे. सुनीलकडे हात करून माधवजी म्हणाले. कमावता आहे. फक्त चांगली सून मिळावी हीच अपेक्षा. सुनील माझ्या व्यवसायात मला मदत करत आहे अन सुनेची इच्छा असेल तर तिलाही ऑफिस जॉईन करायला सांगणार आहे. कुसुमला आणि तिच्या आईना घेऊन या एक दोन दिवसात. मुलांची जर पसंती असेल तर माझी काहीच हरकत नाही असे म्हणून सुनीलच्या आई कडे पहिले अन त्याही निखळ हसून हो म्हणाल्या.
आता काय काय विचार नानांच्या मनात येत होते. किती प्रयत्न केले हिच्या लग्नासाठी पण दर वेळी काही न काही विघ्न येतच होते. कुठल्या चांगली कर्माची फळे परमेश्वर कधी अन कशी देईल हे सांगता येत नाही. नानांचे डोळे भरून आले त्यांनी हात जोडले अन उठले. एक – दोन दिवसात भेटू असे ठरले अन नाना परतीच्या प्रवासाला लागले.
…. आज कुसुम अन सुनीलचा विवाह पार पडलाय. माधवजीनी कशाचीही कमतरता पडून दिली नाही. कुसुम तिची आई आणि नाना मामा ह्यांचा योग्य मान राखला होता. त्यांच्यावर कुठल्याच प्रकारचा ताण पडू दिला नव्हता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. आज खऱ्या अर्थानी माधव कुलकर्णींचा आनंदवन बहरला होता. सगळ्यांना कुसुम खूप आवडली आहे. नटलेली, मुंडावळ्या बांधलेली, भरजरी शालू नेसून वधू वेषातली कुसुम बघून थकल्या भागल्या सुमन काकुना आज खरच भरून आले. किती काळ मध्ये लोटला, किती संकटे आली पण सगळे मार्गी लागले. नियतीनी संकटे आणली पण परमेश्वरानी नानांसारखा भाऊ दिला.
सुमन काकू मनात म्हणत होत्या, खरंच कितीही संकटे आली तरी असे नानांसारखे परिस म्हणा किंवा देवदूत म्हणा आपले जीवन सोनेरी करायला येतच राहतात… नाही का?
शुभम भवतु …
©अभिजीत अशोक इनामदार
Image by Clker-Free-Vector-Images from Pixabay
- पाऊस - July 30, 2021
- बडी ताकत के साथ… बहोत बडी जिम्मेदारी भी आती है - May 11, 2021
- आठवणींच्या_पटलावर - April 20, 2021
खूप छान….चांगल्या कर्माची फळे पण चांगलीच असतात हेच खरं
Kharach… Thank you!
👌👌👌
Thank you!!
Very nice
Thank you!!