प्रगती – भाग १

“आपण खाऊन पिऊन सुखी तेच बरंय. निदान रात्री शांतपणे झोपू तरी शकतो. करायचेत काय ते बंगले आणि गाड्या? माणसं महत्त्वाची… ती जोडलीयत ना आपण?…” 
 
आईच्या तोंडाची टकळी चालूच होती. त्यानं सहज कविताकडे पाहिलं तर ती आईकडेच नजर लावून बसली होती. एक वेगळीच तृप्ततेची साय तिच्या चेहर्यावर पसरली होती. ‘म्हणजे आईचं बोलणं पटतंय हीला’, त्याला वाटून गेलं.
 
अंगावर एक विटका ड्रेस, केसांना कुठलंस रबर लावून वर बांधलेले केस, थोड्या वाढलेल्या आय ब्रोज, किंचित वाढलेल्या, शेप न दिलेल्या नखांवरचं काही ठीकाणी उरलेलं स्वस्तातलं नेलपेंट दातांनी, नखानी टोकरत कविता पेपर वाचत होती. तिच्यासमोर पसरलेल्या पेपरच्या पहिल्याच गुळगुळीत पानावरची  कुठलाशा माॅलची आकर्षक जाहिरात तिने पाहून न पाहिल्यासारखी करत पलटली आणि निरजने तिच्यावरची आपली नजर वळवली.
 
रविवारची सुटी असूनही मैत्रिणींबरोबर बाहेर वगैरे न जाता घरातच आईला मदत कर, कुठे पेपर वाच, कपाटच आवर अशा कामात रमलेल्या, नुकत्याच नोकरीला लागलेल्या आपल्या बहिणीकडे पाहून निरजला नेहमी पडायचा तोच प्रश्न पुन्हा पडला,
‘अशी कशी ही? हीला वाटतच नसेल का स्वतःसाठी गाडी घ्यावी, मैत्रिणींबरोबर थोडं भटकावं, रविवारी एखादा पिक्चर, हाॅटेलिंग, शाॅपिंग करावं. पार्लरला भेट द्यावी.’ 
 
इतक्यात कसलंस सामान आणायला गेलेले बाबा घरी आले. आईच्या हातात पिशवी देता देता, ‘महागाई कशी वाढलीये, गरजेच्या वस्तू लोकांनी घ्याव्या तरी कशा?…. आपलं बरंय आपण चादर पाहून पाय पसरतो …’ वगैरे वगैरे त्यांचं बोलण्याचं गुर्हाळ चालू झालं आणि तिच ती विशिष्ट तृप्ततेची साय तोंडावर चढवून आई आणि कविता माना डोलवू लागल्या…
 
हे सगळंच निरजला असह्य होत होतं. नेहमी सारखंच त्याला त्यांचं वागणं बोलणं बेगडी, ओढून ताणून केलेलं वाटू लागलं. नेहमीचा प्रश्न त्याला पुन्हा छळू लागला. ‘यांना श्रीमंत असणं, छानछोकीत राहणं म्हणजे पाप का वाटतं? कशावरून श्रीमंत लोक रात्री शांतपणे झोपत नसतील? या असल्या आदर्शवादांचा कंटाळा कसा येत नाही यांना? सतत हे असंच बोलून तर आपण मध्यमवर्गीय रहात नसू ना? असंही त्याला वाटून गेलं. विचारांच्या नादात त्याच्या हातातलं इंजिनियरिंगसाठीचं इन्स्ट्रुमेंट कट्कन तुटलं आणि त्या आवाजाने घरातले इतर सहा डोळे त्याच्यावर रोखले गेले. 
 
निरजने डोळे मिटून घेतले. आता कसले लेक्चर सुरू होणार याची त्याला पुरेपूर कल्पना होती. ‘कविता उत्तम मार्क्स मिळवूनही केवळ इंजिनियरिंगची फी वाचवण्यासाठी कशी बी.एस्सी. झाली. लगेच नोकरी कशी पकडली. काटकसरीने कशी राहते. वस्तू कशा काळजीपूर्वक वापरते. निरजने कसं वागायला हवं.’ हे सतत ऐकून पाठ झालेलं लेक्चर त्याच्या अपेक्षेप्रमाणेच सुरू झालं आणि या लोकांशी एक शब्दही न बोलता तडक घराबाहेर निघून जावंस निरजला वाटू लागलं…
 
… निरज तटकन् उठला… कुणी काही बोलून अडवायच्या आत त्याला घराबाहेर पडायचं होतं. दरवाजा जवळचं लाकडी कपाट उघडू त्यानं स्लीपर खाली टाकल्या आणि पायात सरकवून, कपाटाचं दार तसच सताड उघडं ठेवून तो फट्फट् आवाज करत जिना उतरत निघूनही गेला. 
 
सगळे हतबुद्ध होत एकमेकांकडं पहातच राहिलेले त्याला पाठमोरं असूनही जाणवत होतं. आता एकदम शांत होईल घर. आई मुकाट्यानं कामं उरकत राहील, बाबा पेपरात डोकं घालतील आणि कविता ‘शहाणे’ मानभावीपणे चप्पलच्या कपाटाचं दार लावून पुढच्या कामांना लागतील. कविताला ‘शहाणे’ हे नाव निरजनेच बहाल केलेलं होतं. त्याचं त्याला आत्ताही हसू आलं. ‘आपण काही कविताचा दुस्वास करत नाही, पण सख्खी भावंडं असूनही आपले स्वभाव जुळत नाहीत हेच खरं’ हे त्याला पुन्हा एकदा जाणवलं. 
 
मग पाय नेतील तिकडे तो चालत राहीला. मधेच  अडचणीच्या जागेतून कार बाहेर काढणार्या माणसाला हात दाखवत त्याने गाडी बाहेर काढायला मदत केली आणि नकळत श्रेड्याच्या घराच्या दिशेनं त्याची पावलं पडू लागली. 
 
चांगले मित्र झाल्यावर शिरोडकरचा श्रेड्या कधी झाला ते त्याचे त्यालाही कळलं नव्हतं. इतकंच काय श्रेड्याचं पहिलं नावही त्यांच्या मित्रांपैकी कोणाला चटकन आठवत नसे. श्रेड्याचं पहिलं नाव आठवायच्या आत तो त्याच्या घरात उभा होता. 
 
हाॅलमध्ये सिनियर श्रेड्या पेपरात डोकं खूपसून होता आणि त्याची आई हातातली प्लेट पुसत त्यांना काही सांगत होती. श्रेड्याच्या बापाचं बिलकूल लक्ष नव्हतं तिच्याकडे. इतक्यात त्या दोघांच निरजकडे लक्ष गेलं. त्यांच्याकडे पहात, “काकू, श्रेड्या?” इतकच विचारून तो थांबला आणि त्याची आई “चैतन्यऽऽऽऽ” अशी हाक मारत आत गेली. 
 
‘आयला …. चांगलं आहे की श्रेड्याचं नाव’ असा विचार करता करता त्याचं श्रेड्याच्या बाबांकडे लक्ष गेलं … ढेरपोटे, जाडे, श्रेड्याचे बाबा, बनियन पोटावरून वर घेऊन, चाळीशी डोक्यावर चढवून, डोळे बारीक करून पेपरातलं कसलंस टेंडर वाचत होते. यांचे दोन चार वेगवेगळे बिझनेस होते पण नेमका कसला बिझनेस ते काही श्रेड्या कधी बोलला नव्हता. पण कधीही श्रेड्याच्या घरी आलं तरी त्याचे बाबा याच अवतारात सोफ्यावर बसलेले असायचे आणि त्याची आई काहीतरी छानसं बनवत, त्यांना प्रश्न विचारत, त्यांच्याशी बोलत असे. या माणसानं मात्र कधीही तोंड उघडून उत्तर दिल्याचं निरजनं पाहिलं नव्हतं. त्यांच्या सोफ्यावर बसण्याच्या पद्धतीवरून, एकंदरच अटीट्यूडवरून निरजला वाटून जायचं, ‘काय दरारा आहे या माणसाचा घरात. पण शिष्टच वाटतात थोडे.’ इतक्यांदा निरजचं त्यांच्या घरी येणं व्हायचं पण निरजशी सोडा श्रेड्याशी सुद्धा बोललेलं निरजनी त्यांना कधी पाहिलेलं नव्हतं. ‘त्यामानानं श्रेड्याची आई किती चांगली आहे. हसतमुख आणि गप्पिष्ट… काकूंना आवडत तरी असतील का हे?’  हा विचार मनात यायला आणि श्रेड्याच्या वडिलांनी मान उचलून निरजकडे पहायला एकच गाठ पडली आणि निरज गांगरला. 
…श्रेड्याच्या वडिलांनी मान उचलून निरजकडे पहायला एकच गाठ पडली आणि निरज गांगरला. उगाचच इकडे तिकडे पाहू लागला. 
 
आपल्या डोक्यात इतके विचार कसे काय फिरत असतात याचं त्याला परत एकदा आश्चर्य वाटलं आणि परत एकदा “निरजचं डोकं म्हणजे मशिन आहे मशिन. सतत विचारांची चक्रं फिरत असतात याच्या डोक्यात.” हे आईचं वाक्य आठवलं.
 इतक्यात श्रेड्यानंच बाहेर येऊन चप्पल घालत, “चल रे” म्हणत त्याची सुटका केली.
 
“काय मग स्काॅलर? सकाळी सकाळी काय काम काढलंत?” श्रेड्या विचारत होता. निरजच्या उत्तराची थोडा वेळ वाट पाहून “चल सायलीकडे चक्कर मारून येऊ” म्हणत त्याने गाडी काढली. हे एक श्रेड्याचं बरं होतं. प्रश्नाला उत्तर दिलं नाही तरी श्रेड्या फारसं मनावर घ्यायचा नाही. त्यामुळंच अबोल निरज आणि बोलघेवडा श्रेड्या यांच्या मैत्रीचं जगाला अप्रुप असलं तरी या दोघांना नव्हतं. 
 
सायलीच्या घरासमोर गाडी थांबवून श्रेड्यानं त्याची ठराविक शिट्टी वाजवताच सायली खाली आली. “हाय निरज” असं थोडक्यात ग्रीट करून डोळे मोठे करत ती श्रेड्याला काहीतरी सांगू लागली. बोलताना मानेच्या हिसक्या बरोबर हलणारे तिचे कानातले आणि गळ्यात रुळणारे केस खूपच आकर्षक दिसत होते. पण सध्यातरी निरजला सगळ्यात जास्त आकर्षण लवकरात लवकर पैसे मिळवण्याचं होतं. मुलींच्या गप्पांपेक्षा कॅम्पस इंटरव्ह्यू, प्लेसमेंट, अॅन्युअल पॅकेज अशा गप्पा ऐकण्यात त्याला जास्त इंटरेस्ट वाटत असे.
 
एव्हाना पोटात कावळे कोकलायला लागले होते. खिशात पुरेसे पैसे नसल्यानं घरी जाण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. श्रेड्यानं त्याच्या गाडीवरून ड्राॅप केल्यावर निरज घरात शिरला तर कविता ताटंच घेत होती. हातपाय धुवून तो मुकाट्यानं टेबलवर जाऊन बसला. पानात वाढल्या वाढल्या भराभर जेवू लागला. 
 
इतक्यात कवितानं बोलायला सुरूवात केली, “सकाळी वागलास तसं संध्याकाळी वागू नकोस म्हणजे झालं.” 
“म्हणजे? काय वागलो मी?”, निरज आता खरंच तडकला. वातावरण पेटायच्या आत आई म्हणाली, “आज संध्याकाळी कुठे बाहेर जाऊ नकोस. घरी पाहुणे यायचेत.” 
“कोण पाहुणे? आणि मी का थांबायचं मग?” या निरजच्या बोलण्यावर “तुला जितकं सांगितलंय तितकच कर” या वाक्यानं बाबांनी बोळा फिरवला. मग पानात वाढलेलं कसंबसं संपवून जरा वैतागूनच निरज उठला. 
 
यावेळी मात्र आईनं त्याची बाजू घेत “घरात आल्या आल्या कटकट करत जाऊ नको गं त्याला” असं कविताला डाफरलेलं त्यानं ऐकलं आणि एक पुस्तक डोळ्यासमोर धरून तो वाचत बसला.
 
मागचं आवरून आई त्याच्याजवळ येऊन बसली. निरजच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, “भांडू नका रे एकमेकांशी. आता काही दिवसांचीच पाहुणी आहे ताई आपल्या घरी.”
“म्हणजे?” आईच्या अनपेक्षित वाक्यानं निरज गांगरून म्हणाला…
 
 
क्रमशः
 
Image by mehedi9419 from Pixabay 

Sanika Wadekar
Latest posts by Sanika Wadekar (see all)

Sanika Wadekar

लेखन वाचनाची आवड. व्यवसाय - पुस्तक प्रकाशन पुस्तक प्रकाशनाच्या संदर्भात कोणतीही शंका असेल तर निःसंकोच पणे विचारा.

6 thoughts on “प्रगती – भाग १

  • July 24, 2020 at 1:21 pm
    Permalink

    Interesting survat

    Reply
  • July 24, 2020 at 6:53 pm
    Permalink

    Background is building up properly for the story, waiting eagerly for next part.

    Reply
  • July 26, 2020 at 8:32 pm
    Permalink

    साधे साधे बारकावे गुंतवून टाकतात ….मस्तं ..

    Reply
  • July 27, 2020 at 8:55 pm
    Permalink

    Chhan survaat.. pudhe vachayala aavadel

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!