कुंकू…
अक्का लेकाकडे शहरात आली आणि पुरती भांबावून गेली. टकमक डोळ्यांनी इथे तिथे बघत ती गावची वाघीण अगदी गरीब मांजर होऊन गेली होती. पावलोपावली तिला आधार लागत होता. कधी लेकाचा, कधी सुनेचा तर कधी कॉलेज ला जाणाऱ्या नातीचा!
हळूहळू अक्का घरात रुळली. निसरड्या फरशीवरून न घाबरता पावलं टाकू लागली. लिफ्ट ने खाली उतरून सोसायटीतल्या मंदिरात जाऊ लागली. इंटरकॉम ऑपरेट करू लागली.
अक्का तशी होतीच हुशार! तिचं लग्न झालं असेल जेमतेम चौदाव्या वर्षी. तिची तिच्या लग्नाची आठवण म्हणजे एकच – तिला तिच्या मोठ्या आत्याकडेच दिली होती. आत्याचा हिच्यावर जीव, आणि आत्याकडे जायचं म्हणून हि खुश!
ते बाकी नवरा वगैरे काही खिजगणतीत नसण्याचं ते वय.
आत्याने हीचा संसार सांभाळून घेतला. पण अचानक आत्या आणि नवरा, दोघेही हिला सोडून कायमचे निघून गेले. पोटात बाळ. तशात अक्काच्या मदतीला आली तिची आजेसासू. तिने अक्काला सावरलं, मुलाच्या शिक्षणाची सोय केली आणि निजधामाला निघून गेली.
इकडे अक्का आजेसासूच्या कडक तालमीत चांगलीच तयार झाली होती. शेती, खटल्याचं घर, भाचे पुतणे, सगळं बघून सांभाळून सावरून ती आता हळूहळू निवृत्तीकडे झुकू लागली होती.
लेक आता तिला चार सुखाचे दिवस दाखवण्यासाठी शहरात घेऊन आला होता. बाकी सगळं स्वातंत्र्य दिलेलं असलं तरी सून मात्र अक्काने अगदी स्वतः पारखून घेतली होती. घरात तिची उठबस व्यवस्थित होत होती.
खरंतर अक्काला सकाळी सकाळी शेतात फेरफटका मारायची सवय. गोठ्यातल्या गायींना गोंजारल्याशिवाय तिचा दिवस सुरु व्हायचा नाही, आणि स्वतः पडवीत जाऊन चारीठाव नजर टाकून शेवटला दिवा मावळेपर्यंत संपायचा नाही. इकडे तिचा जीव लागेना, पण आहे त्यात असं मस्तपैकी मिसळून जाण्याची सवय असलेल्या अक्काला शहर आवडू लागलं!
तिची नातं आता मोठी होत होती. तिचा नट्टापट्टा , नखरे, सगळं अक्का अगदी कौतुकाने बघायची! तिचे रंगीबेरंगी ड्रेस, ओढण्या, क्लिपा, लिपस्टिक, काजळ , यावरून अगदी अप्रूपाने हात फिरवायची.
एकदा घाबरत घाबरत सुनबाईंनी घरी पिझ्झा मागवला. आणि अक्काला पिझ्झा जाम आवडला! कित्तीतरी वर्षांनी जिभेवर ती आंबटगोड चव आली! मग अधूनमधून पाणी पुरी, पिझ्झा, पाव भाजी – अक्का अगदी लहान होऊन गेली होती !
तिला जाणवलं कि कित्येक वर्षात तिने असं कधी चवीढवीचं धड खाल्लं च नव्हतं. म्हणजे घरात उंदीर लोळ होतील इतकं अन्न , पण आल्यागेल्याचं बघून, गड्यांकडून कामं उरकून घेऊन, पुरुष मंडळी, लहान मुलासुनांना जेवू खाऊ घालून मग ती कसे बसे २ घास पोटात ढकलायची. अन्न हि इतकी सुख देणारी गोष्ट असते हे हल्लीच कळलं तिला.
अक्का आता मस्त मनाप्रमाणे वागून घेत होती. जुने राहिलेले दिवस जगून घेत होती.
एकदा दुपारी घरात कोणीच नसताना अक्का फिरत फिरत नातीच्या खोलीत आली. जिकडे तिकडे वह्या , पुस्तकं , नट नट्यांचे फोटो, कपडे, सगळं अस्ताव्यस्त पडलं होतं. अक्का तिथेच बसून राहिली. त्या खोलीत तिला फार जिवंतपणा, फार आपलेपणा वाटत होता.
खोलीत भलामोठा आरसा होता. पुरुषभर उंचीचा. अक्का सहज आरश्यासमोर जाऊन बसली. कितीतरी वेळ स्वतः लाच बघत बसली.
बाकी तिला खाणं पिणं कपडेलत्ते यात काही कमी पडलं नाही, पण अवखळ अक्काची नटण्यामुरडण्याची हौस मात्र तशीच राहून गेली होती. आजेसासूचा या बाबतीत कडक दंडक होता.
तिला आठवलं, नवीन लग्न झालं तेव्हा तिची आत्या तिला शेजारी बसवून लाकडी पेटीतल्या मेण आणि कुंकुवाने सुंदर गोल गरगरीत कुंकू लावायची तिच्या आणि स्वतः च्या कपाळावर. सकाळी अंघोळ झाली कि हा तिचा आवडता कार्यक्रम असायचा. आत्या तिला कुंकू लावत असताना तिच्या हाताला येणारा मेणाचा, आणि खोबरेल तेलाचा वास अजून तिच्या नाकात रेंगाळत होता. जेमतेम वयात येऊ घातलेली गोरीपान अक्का त्या ठसठशीत कुंकुवाने अजूनच खुलून दिसायची!
आपल्या रिकाम्या चेहऱ्यात काय हरवलंय ते एकदम दिसल्यासारखी अक्का ताडकन उठली. देवासमोरून करंडा आणला..
कितीतरी वेळ त्या करंड्याकडे बघत राहिली.. थरथरत्या हातांनी तिने कुंकू घेतलं आणि गच्च डोळे मिटून बोट कपाळावर लावलं ..
अक्काच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येऊ लागलं ..
चिमूटभर कुंकुवाने अक्काला जणू दोरीने बांधून ठेवलं होतं .. कपाळावर कुंकू बघून अक्काने समाधानाने डोळे मिटले ..
बाहेरचा आवाज हळूहळू विरळ होत गेला .. संवेदना बधिर होत गेल्या .. दूर कुठेतरी बेल वाजल्याचा आवाज येत राहिला ..
अक्का मात्र आयुष्यभराचं समाधान घेऊन गाढ झोपी गेली होती ..
Latest posts by Pooja Pathak (see all)
- दिवाळी २०२० स्पेशल- १९ - November 27, 2020
- दिवाळी २०२० स्पेशल- ३ - November 13, 2020
- पाडस - October 23, 2020
मस्त…
छान👌👌
छान👌👌
सुंदर👌👌