मंगल 

खास रूप नाही, उंची पण बेताचीच, रंग गोरा नाही पण काळासावळाही नाही, गहूवर्ण कसा असतो हे मला तिच्याकडे पाहून समजलं. पण तरीदेखील सगळ्या मुलींमध्ये उठून दिसायची ती. आमच्या घराशेजारी एका फ्लॅटमध्ये फार्मसी शिकणाऱ्या तीनचार मुली फ्लॅटमेट्स म्हणून राहायच्या. तीसेक वर्षांपूर्वी कराडसारख्या छोट्या गावात परगावच्या मुलींनी एकत्र फ्लॅटमध्ये स्वतंत्र राहणे ही गोष्ट नवीन होती. आमच्यासारख्या धड ना लहान धड ना मोठ्या मुलींसाठी ही फार अप्रुपाची बाब होती. आमचं सतत  लक्ष असायचं या मुलींकडे. त्या कधी येतात, कधी जातात, कॉलेजला जाताना कोणते कपडे घालतात, त्या नटतात कशा, त्यांना भेटायला कोण कोण येतं, त्यातले मुलगे किती असतात, कोण असतात या सगळ्यावर आम्ही डोळा ठेऊन असायचो. नववीदहावीतल्या मुली आम्ही, या मोठ्या मुलींचं मोकळं वागणं बोलणं, त्यांचं स्वातंत्र्य, त्यांची मुलांशी असलेली मैत्री किंचित असूयेने, किंचित आदराने पाहायचो.
त्या मुलींपैकी एक मंगल होती. अगदी साधीशी मुलगी होती. साधी असून पहिल्यापाहिल्या डोळ्यात भरण्याचं एकच कारण होतं, ते म्हणजे तिचे घनदाट लांब केस. दोन घट्ट पेडाच्या वेण्या घालून त्यादेखील ती वर बांधायची, कारण खाली बांधल्या तर केस जमिनीला टेकायचे. इतके सुंदर, लांब, काळेभोर आणि घनदाट केस असलेली मुलगी मी आयुष्यात पहिल्यांदा पहिली होती. लांब केसांचं फार अप्रूप होतं मला, त्याच कारणाने मग मंगलचंही. ती कॉलेजला कधी जाते म्हणून जिन्यात बसून तिच्या वाटेकडे मी डोळे लावून बसायचे. माझ्याबरोबर दोनचार चिंगू मैत्रिणीसुद्धा असायच्या. काय करायचो आम्ही? तर फक्त मंगल आली की ती दिसेनाशी होईपर्यंत तिच्या केसांकडे पहात राहायचं. ते घट्ट पेड, काळेभोर केस डोळ्यात भरून घ्यायचो.
रविवार आमच्या सर्वात आवडीचा वार असायचा, कारण त्यादिवशी मंगल साग्रसंगीत न्हाऊन आमच्या रस्त्यावरून तिच्या मेसकडे जायची. इतके लांब ओले केस ती मोकळे कसे सोडणार यावर मी विचार करत असतानाच मंगल दिसायची. केसांसाठी तिने एक कल्पना अंमलात आणली होती. धुतलेले मोकळे केस एका हाताला छान गुंडाळून घेतलेले असायचे. जाड गुंडाळी दिसायची तिच्या हाताला. एखादा नाग वेटोळं घालून बसला असेल अशी! कोणी ते केस मोकळे पाहायला नको, की कोणाची दृष्ट लागायला नको!
आम्ही मुली अनिमिष नेत्रांनी मंगलचे केस पाहत असू. एकदा तर चक्क तिच्या मेसमध्ये गेलो, ती केस कसे मॅनेज करत जेवते ते पाहायला. तर तिने सगळे केस गुंडाळी करून मांडीवर ठेवले होते.  तिच्याविषयी कोण कोण काहीबाही सांगायचं. केस तिला एकटीला धुवायला यायचे नाहीत. ती स्टुलावर बसून एका मैत्रिणीच्या मदतीने धुवायची. तिची रुममेट आनंदाने मदत करायची. इतक्या लांब केसांची उठाठेव कशी करत असेल बिचारी? ते धुवायचे, वाळवायचे, बांधायचे…मला नको ते प्रश्न पडायचे.
एव्हाना मंगलला आम्ही गल्लीतल्या मुली माहीत झालो होतो. येताजाता कधी रस्त्यात दिसलो तर आमच्याकडे बघून हसायची. लोक तिच्याकडे बघतच राहायचे, तिच्या केसांमुळे. तिलाही याची सवय झालेली असावी. याचदरम्यान मी कधीतरी महाभारत वाचलं होतं. त्यात द्रौपदीचे केस लांब होते असंही वाचलं.  ते वाचून मला मंगलचेच केस डोळ्यासमोर यायचे. असाच सुरेख केशसंभार असेल द्रौपदीचा! इतकाच दाट, काळाभोर, बराच काळ मोकळा सोडलेला, सोडावा लागलेला.
दिवस भराभर उडून गेले. शिक्षण संपवून मंगल बहुदा परत तिच्या घरी गेली. मी ही माझं गाव बदललं. मधे बराच काळ लोटला. एकदा सुट्टीत घरी आलेले असताना आईने सहजच बोलता बोलता विचारलं “मंगल आठवते का ग तुला?” मंगल म्हणल्यावर बराच काळ विस्मृतीत गेले ते सुंदर केस, त्या दोन घट्ट वेण्या आठवल्या. “हो, ती गल्लीत होती ती मंगल ना? लांब केसांची?” आई “हो” म्हणाली आणि एकदम शांत झाली. “गेली ग ती.” आई म्हणाली. माझ्या हातातलं सामान गळून पडलं. “काय? कधी? कुठे? तुला काय माहीत?”
आई सांगू लागली, “इथे बातमी आली होती पेपरात. सासरच्यांनी फार छळलं म्हणे तिला. कसं नशीब बघ पोरीचं इतकं वाईट!” माझ्या पोटात लककन काहीतरी हललयासारखं झालं.  मी आईला विचारलं, “झालं काय पण नक्की? इतकी छान, लांब केसांची, शिकलेली मुलगी, तिला छळलं?”
“हो ग. भयंकर वाईट होती सासू तिची. फार छळायची. मानसिक त्रासही खूप दिला तिला, आणि…आई चुळबूळ करत थांबली. मला पुढचं सांगावं की नाही हा प्रश्न पडला तिला.
“काय ग? आणि काय?”
“ती झोपेत असताना तिचे केस कापले सासूने. फार वाईट झालं.”
माझा कानावर विश्वास बसेना. हे कसं काय शक्य आहे? इतके वाईट लोक असतात जगात? त्या मुलीचं सगळं सौंदर्य, तिच्यापाशी जे स्वतःचं होतं, खास होतं, जे इतर कोणापाशीही अगदी अभावानेच असेल, अशी गोष्ट काढून घेतली?! इतक्या विकृतपणे?
“तिच्या माहेरचे तिला पहायला आले, तेव्हा अगदी मरणाच्या दारात होती. तिचे केस मात्र आईने स्वतःकडे ठेऊन घेतले. तिची आठवण म्हणून. भयंकर झालं खरं. असं कोणाहीबाबतीत होऊ नये.” एक उसासा सोडून आई शांत बसली.
माझ्या डोळ्यांसमोरून त्यादिवशी लांब केस हाताला गुंडाळून चाललेली मंगल सरत नव्हती. रात्री स्वप्नातही तीच आली. जणू सांगत होती, “जे आपलं आहे, त्याला कायम जपावं. मग तो स्वाभिमान असो की कर्तृत्व. मग ते आपण स्वतः मिळवलेलं असो की दुसऱ्याकडून देणं म्हणून आलेलं असो. माझ्यासारखी हार कधी मानू नकोस, पड खाऊ नकोस.”
आजकाल लांब केस असलेल्या बायका, मुली अगदी अभावाने दिसतात, मंगलसारख्या लांब केस असलेल्या तर अगदी हजारात एखादी दिसते. पण असे लांब केस जेव्हा जेव्हा दृष्टीस पडतात तेव्हा तेव्हा हृदयात एक हलकी कळ उठल्याशिवाय कधीही राहत नाही. मंगलसारख्या अनेक मुलींना मनातल्या मनात नमस्कार केल्याशिवाय मी राहत नाही!
Image by Adina Voicu from Pixabay 
Gauri Brahme
Latest posts by Gauri Brahme (see all)

Gauri Brahme

गेली वीस वर्षे पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागात जर्मन भाषेची अध्यापिका म्हणून काम करते. अमराठी लोकांना मराठी शिकवते. भरपूर लिहिते, वाचते, कलाकुसरीच्या वस्तू बनवते, खादाडी करते, इतरांना खिलवते. लेखिका म्हणून नावावर २ पुस्तकं जमा आहेत.

12 thoughts on “मंगल 

  • July 29, 2020 at 7:51 pm
    Permalink

    जे आपलं आहे, त्याला कायम जपाव… 👍👍

    Reply
    • July 30, 2020 at 4:43 pm
      Permalink

      जे आपलं आहे, ते कायम जपावं!👍
      👌👌

      Reply
  • July 30, 2020 at 4:11 pm
    Permalink

    मनाला चटका लावून जाणारी कथा

    Reply
  • July 30, 2020 at 9:23 pm
    Permalink

    Nice message from the story 👍👍

    Reply
  • July 31, 2020 at 12:57 pm
    Permalink

    👌👍 thought for the day.. Apala ahe te apanach japava.

    Reply
  • August 1, 2020 at 10:33 am
    Permalink

    Like the message.. you are always good in story telling 👍

    Reply
  • January 3, 2021 at 9:24 am
    Permalink

    आई ग 😞

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!