दत्तक

“ आई आपण शेजारच्या आजी आजोबांना दत्तक घेऊया ?”

ओमचा हा अचानक आलेला प्रश्न ऐकून अनिताला प्रथम काहीच कळले नाही  .

“काय ?, दत्तक ? ………. म्हणजे रे?”

आपल्या नुकत्याच पहिलीत जाणा-या मुलाचे हे असे म्हणणे ऐकून अनिताला सर्वात प्रथम आश्चर्य आणि नंतर त्या विचारांचे कौतुकच  वाटले .

“अगं आई , म्हणजे ते लहान बाळांना आणतात ना दत्तक , ज्यांना कोणी नसतं  , तसंच आपल्या शेजारचे आजी आजोबा सुद्धा नाहीत का एकटे राहत ?”

अनिताला त्याच्या म्हणण्याचा रोख कळला .

“तर आपण त्यांना आपल्या घरी आणुयात……आई  तुला ना काही म्हणजे काहीच कळत नाही ” असे म्हणून अगदी विचारी माणसासारखे तोंड करून ओम अनिताकडे बघत उत्तराची वाट बघू लागला .

“अरे ओम त्यांना एक मुलगा आहे बाळा , अरे तो नाही का रोहितकाका  , तुला खूप चॉकलेट्स पाठवतो नेहमी , गेल्या वर्षी खेळणी पण पाठवली होती , तर तो अमेरिकेत राहतो , तो त्यांचा मुलगा””

“अरे पण आई , मी जसा तुझ्याजवळ राहतो , तू मला जसं प्रेम करते , कौतुक करते , तर तसं त्यांना करायला  तो नाहीये ना इथे ! , आणि मी त्यांच्या घरी गेलेलो ना काल तर ते आजोबा ना एकटे एकटे रडत होते , मला खूप sad वाटले ते , तर ना मला खुप्प वाईट वाटलं , म्हणून त्यांना happy  करायला आपल्याकडे आणूया , म्हणजे आपल्या आज्जीला पण दोन फ्रेंड्स मिळतील”

अनिता खरंच विचारात पडली , इतक्या लहान वयात इतकी प्रगल्भता कुठून आली आपल्या पिल्लात? तिला ह्याची जाणीव होती  की हे सगळं काही शिकवावे लागत नाही , केवळ आपल्या वागणुकीतून आणि नात्यांमधील प्रेमातून  अपोआप घडलेले संस्कारच कारणीभूत आहेत ओमच्या ह्या मागणीला , आणि हे तिच्यापेक्षा जास्त कोणाला कळणार होते ?

“अगं आई कित्ती विचार करते , आपण काय पुअर आहोत का ? येऊ देत ना गं ते आपल्याकडे रहायला , मी तर बाबांना सुद्धा सांगणार आहे आज ” असं म्हणून तो तिथून पळत त्याच्या रूम मध्ये निघून गेला .

अनिता नंतर कामाच्या गडबडीत हे सगळे विसरून गेली .

दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये गेल्या गेल्या ऑफिसमधली तिची एक मैत्रीण नेहा तिच्याजवळ आली “अनिता जरा वेळ आहे का गं?”

“आहे, पण कामं पण आहेत फार आज , पण बोल , पाच मिनिटांत”

आणि तिने जे सासू पुराण सुरु केले ते पाच मिनिटे होऊन गेली तरी थांबायला तयार होईना . एक एक तक्रारी , कटकटी ती अनिताला सांगत होती

“ काय त्या आमच्या सासूबाई , तो चांदोबा , राम कृष्ण आणि कसल्या कसल्या जुन्या जुन्या गोष्टी सांगत बसतात माझ्या मुलाला यशला  .त्याला काय श्रावणबाळ करायचा आहे का? , मला अज्जिबात आवडत नाहीत त्यांचे जुनाट बुरसटलेले विचार”

काल तर यशच म्हणाला आजीला की “आजी तू किती ओल्ड आहेस , मला आता Harry Potter वैगरे आवडतं, ऐकायला , टीव्ही वर बघायला , मला नकोत तुझ्या ह्या ओल्ड स्टोरीज”

“कित्ती त्रास होतो काय सांगू त्यांचा , मी म्हंटल त्यांना माझ्या मुलावर संस्कार वगैरे नका करायला  जाऊ , त्याला तुमच्या मुलासारखे बावळट नाहीये करायचे … बघेन बघेन नाहीतर टाकेन वृद्धाश्रमात , त्यांचा तो खोकला , ते गोधडी and all , कस्सं बेअर करते मी , माझं मला माहित”

अनिता चाटच पडली हे तिचे बोलणे ऐकून . ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला , लहानाचे मोठे केले , आपल्याला घडवले त्यांच्या बाबतीत ही बाई असे म्हणते ?

“नेहा , तुला एक भाऊ आहे ना गं? “

“ हो , त्याचे काय इथे आता ?”

“तुझ्या आईला तुझ्या भावाने टाकले वृद्धाश्रमात असे तर चालेल तुला?”

“काहीही काय बोलतेस , माझी आई अशी मुळीच ढवळाढवळ नाही करत त्यांच्या संसारात  त्यामुळे प्रश्नच नाही येणार तिला कुठेही टाकायचा”

असे म्हणून नेहा तिथून रागाने निघून गेली . तिला राग आलेला दिसत होता ,पण तिला वास्तवाची जाणीव करूनच द्यायलाच  हवी होती .

त्या दिवशी ऑफिस मध्ये अनिताला खूप कामे होती , ती ते सर्व विचार दूर सारायचा प्रयत्न करत होती , पण कालचा ओमने काढलेला विषय आणि आज नेहाने काढलेला विषय ह्यांचा परस्पर विरोधी संबंध बघून तिला खरोखर आश्चर्य वाटले की , वयात अंतर असून सुद्धा केवळ संस्कार किती कारणीभूत ठरतात चांगले आणि  वाईट विचार करण्यासाठी .

संध्याकाळी ऑफिस मधून अनिता घरी आली  तेव्हा घरातून तिला शुभंकरोती म्हंटल्याचा संमिश्र आवाज आला . ती ही चपला काढून , पर्स वगैरे ठेऊन , पाय धुऊन देवघरात गेली तेव्हा देवासमोर शेजारचे आजी आजोबा आणि तिच्या सासूबाई ओमला शेजारी घेऊन हात जोडून शुभंकरोती म्हणत होत्या . तिचा नवरा अमोल तिच्या बाजूला येऊन उभा राहिला “ अनिता मी ओमचा हट्ट ऐकला आणि मी भरून पावलो , आणि आणलं मी शेजारच्या आजी आजोबांना आपल्या घरी , प्रथम नाही नको असेच म्हणत होते दोघेही  , पण बालहट्ट त्यांनाही मोडवेना . बघ ना देव्हाऱ्यातील देव सुद्धा आज किती आनंदी  भासत आहेत , आणि देव्हारा सौख्याने उजळला आहे . आपले संस्कार नक्की आपल्या ओमला भरपूर यश देणार”

“अमोल , खरंच आपण किती रे भाग्यवान आहोत , आपल्याला ओम सारखा गुणी आणि आचार विचारांनी आत्तापासूनच प्रगल्भ असलेला मुलगा आहे”

“अनिता , ह्यात तुझा महत्वाचा वाटा आहे , तू नेहमी आईला जितके प्रेम दिलेस , तितकाच तिचा , तिच्या विचारांचा  मान ठेवलास , तिचाच  सतत विचार करत आलीस , मला तर माझ्या कामामुळे वेळही मिळत नाही , पण तू हे घर उत्तमरित्या सांभाळत आहेस”

“अमोल , हे जरी खरं असलं तरी , तू मला सतत उभारी दिलीस प्रत्येक गोष्टीत , चांगल्या गोष्टीना प्रोत्साहन दिलेस , तू ही ह्या आदर्श घराच्या उभारणीला कारणीभूत आहेस” .

हे त्यांचे बोलणे चालू असताना शेजारच्या आजी त्यांच्या समोर येऊन उभ्या राहिल्या

“बाळानो तुम्ही किती रे गुणाची मुलं आहात . तुम्ही दोघे एकाच अनाथाश्रमातील , तिथेच एकत्र वाढलात , मोठे झालात . परिस्थितीवर मात करून दोघे खूप शिकलात , उत्तम नोकरीला लागुन लग्न केलेत”

“ह्या सगळ्याचा एक सोनेरी कळस गाठ्लात तो म्हणजे ह्या आज्जीना वृद्धाश्रामातून घरी घेऊन आलात, त्याना आईचे प्रेम दिलेत , मान दिलात , का तर तुम्हाला आई आणि तुमच्या मुलाला आजी हवी म्हणून !”

“एकीकडे मुलं आपली सख्खी असलेली नाती तोडत आहेत , आई वडिलांना बेवारश्यासारखे आश्रमात टाकत आहेत , आणि तुम्ही मात्र नाती जोडत आहात , जपत आहात”

“मुलगा आहे आम्हाला , पण तो तिकडे सातासमुद्रापार , कधी जवळ घ्यावेसे वाटले प्रेम करावेसे वाटले तरी काहीही करता येत नाही , पैसे कमी नाहीत आमच्याकडे , दर महिन्याला चिक्कार पाठवतो तो  , पण माया , प्रेम…. ते नाही ना बँकेत जमा करता येत आणि पाठवता येत ?, पैसा काय करायचा आहे आम्हाला त्याचा , ह्यांना पेन्शन मिळते तेच पुरते , पण ह्या वयात प्रेम लागतं, आपुलकी लागते , ते नाही कळत त्याला ते नाही कळत ….”

“आज एकच मागितले देवाकडे,  की पुढच्या जन्मी एकवेळ अनाथ कर पण अगतिक आई किंवा बाप करू नकोस !”

अनिताने आणि अमोलने डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहणाऱ्या अज्जीना जवळ घेतले , आजोबांना जवळ बोलावले

“आम्ही आहोत ना आता तुमची मुलं, आम्हाला हवे आहे प्रेम , आम्हाला हवे आहेत तुमचे आशिर्वाद , आई …. बाबा द्याल ना?” असे म्हणून अनिता , अमोल आणि सगळ्यांच्याच डोळ्यांतून अनांदाश्रू  वहायला लागले .

समईच्या उजेडातला न्हाऊन निघालेला देव्हारा नात्यांचे अभूतपूर्व मिलन बघून अजूनच उजळला .

Image by Sabine van Erp from Pixabay 

Chapekar Manasi

Chapekar Manasi

कविता ,लेख ,ललित आणि कथा लिखाण,नवीन पदार्थ तयार करणे आणि खिलवणे म्हणजेच एकंदर स्वयंपाकाची आवड , अभिवाचन, आणि गाण्याची आवड आहे ,आणि हे उत्तम जमते . ओंजळीतील शब्दफुले ह्या स्वलिखित आणि स्वरचित कवितांच्या कार्यक्रमाचे 40 कार्यक्रम संपन्न अनेक कवी संमेलनात आमंत्रण आणि कथेला बक्षिसे प्रभात वृत्तपत्रात दर शुक्रवारी अस्मिता ह्या सदरात लेख प्रकाशित .तसेच अनेक वृत्तपत्र आणि मासिकांत लेख ,कथा ,कविता प्रसिद्ध निसर्गाचे फोटो काढण्याची आवड ,कारण फोटो ग्राफरची नजर लाभली आहे.

2 thoughts on “दत्तक

  • July 29, 2020 at 6:07 pm
    Permalink

    ♥️♥️♥️

    Reply
  • July 30, 2020 at 6:46 pm
    Permalink

    Sunder katha👌👌

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!