सेकंड होम – ३

भाग २ ची लिंक- सेकंड होम – २

सेकंड होम – ३

जयू ऑफिसमधून आली तीच मुळात आठच्या आसपास.ती प्रचंड थकलेली होती. अनिरुद्ध अजूनही आलेला नव्हता. तो हिंजवडीतून येणार म्हणजे त्याला वेळ लागणारच होता. ‘बसमधून जा कंपनीच्या’ असे ती त्याला नेहमी म्हणत असे. एका जागी नुसते बसून रहावे लागते बसमध्ये त्याचा कंटाळा येतो असे त्याचे म्हणणे होते. निदान ड्रायव्हिंगचा ताण तरी पडत नाही त्याच्यावर बसमध्ये तिच्या मनात कितव्यांदा तरी येऊन गेले. पण अनिरुद्ध ऐकणर नाही हेही तिला माहित होते. मुळात त्याला ड्रायव्हिंगची आवडही होती. त्याच्या मते तो गेल्या जन्मी सुकाणूच्या मागे उभा असणारा जहाजाचा कप्तान वगैरे असण्याची बरीच शक्यता होती. ती हौस भागली नाही म्हणू याही जन्मी तो चाकाच्या मागे आनंदाने बसतो असे त्याचे म्हणणे. जयू एकदा त्याला मजेत म्हणाली पण होती, हा असा ड्रायव्हिंग मध्ये रोजचा वेळ घालवणारा मुलगा आहे हे तिला कळले असते तर तिने लग्नाला नाहीच म्हणले असते म्हणून. पण हल्ली हल्ली त्याच्या ड्रायव्हिंगपेक्षा त्याला येणाऱ्या ताणाने तिची काळजी वाढत चालली होती. एरवी साडेसातच्या आसपास तो घरी येत असे. पण गेल्या सहा महिन्यात तो रीतसर नऊ वाजताच घरी येत होता. पुन्हा सकाळी उठून नेहमीच्या वेळेला पळत असे. ड्रायव्हिंग धरून तो चौदा सोळा तास काम करत होता. त्याची झोपही धड होत नव्हती.

सकाळी त्याला गाढ झोपलेले पाहून त्याला उठवायचे जयूच्या प्रचंड जीवावर आले. तिने कसेबसे स्वतःच्या मनावर दगड ठेऊन त्याला हाक मारली. तरीही तो उठेना म्हणल्यावर तिने जवळ जाऊन त्याच्या गालावर हात ठेवला. तिला चटका बसला. त्याला सणसणून ताप होता. आता मात्र तिने त्याला उठवायचे नाही असे ठरवले. तिने ऑफिसला घरून काम करते सांगून सुट्टी टाकली. ती आर्किटेक्ट असली तरी तिची आज क्लाएंट मिटिंग नव्हती. त्यामुळे घरून काम करते सांगितल्याने तिला कुणी नाही म्हणले नाही. अनिरुद्ध उठला तेव्हा साडेदहा वाजून गेले होते. ती शेजारच्या टेबलवर काम करत होती.

“किती वाजले?” त्याने तापाच्या आवाजात विचारले

“साडेदहा” जयूने मान वर न करता उत्तर दिले

अनिरुद्ध ताडकन उठून बसला

“जयती उठवायचे ना मला. क्लाएंट कॉल आहे आज माझा यार” तो चिडलाच.

जयूने लॅपटॉप वरून नजर काढली. तिने त्याच्याकडे बघितले. तो अस्ताव्यस्त दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर अजून झोपला असता तरी चालले असते त्याला हे स्पष्ट कळत होते. ती उठली. त्याच्या समोर येऊन उभी राहिली. तो अजूनही घुश्शातच होता.

“अनिरुद्ध तुला ताप आहे अंगात. तू आत्ता ऑफिसला जाणार नाहीयेस.” ती अधिकारानेच म्हणाली.

“जयती प्लीज. एव्हढ्याशा तापाने मला काही होत नाही.”

“नो अनिरुद्ध. तू घरी थांबणार आहेस आज. घरून काम कर. आज मीही तुला बरं नाहीये म्हणून घरून काम करतेय. प्लीज माझे ऐक जरा” तिचा आवाज शेवटच्या वाक्याला कळवळला.

अनिरुद्ध वरमला. तिच्या चेहऱ्यावर त्याची काळजी त्याला वाचता येत होती. तो पुढे काही बोलला नाही फार. त्याचे आवरून खाऊन पिऊन होईपर्यंत तिचेही बरेचसे काम मार्गी लागले होते. त्याने ऑफिसला येत नाही म्हणून कळवले. दोघेही बेडरूम मध्ये आपापले लॅपटॉप उघडून त्यात डोके घालून बसले. जेवायचे सांगायला आई आत आल्या तेव्हा दोघेही लॅपटॉपमध्ये हरवलेले पाहून त्यांना हसूच आले.

“अरे तुम्ही एकमेकांसाठी ना रजा घेतलीत?” त्या पलंगाच्या काठावर बसत म्हणाल्या.

“हो आई पण अगं कामच संपत नाही” अनिरुद्ध हेडफोन काढत म्हणाला

“ती संपत नाहीतच मेली कधी” त्या हसून म्हणाल्या “माझी शाळेतली नोकरी अशीच होती. तुझ्या बाबांना वेळ मिळाला की माझ्याकडे पेपर यायचे तपासायला. ते म्हणायचे पण आपण कामांच्या मध्ये भेटून घेतो एकमेकांना दहा पाच मिनिटे म्हणून”

जयू हसायला लागली. अनिरुद्धच्या चेहऱ्यावरही हसू उमटले.

“चला जेवायला” त्या पलंगावरून उठत उठत म्हणाल्या. जयूही उठली. पटकन जाऊन तिने टेबलवर पाने मांडली. चौघेही शांत जेवले. अनिरुद्धला गुंगी यायला लागली होती. मागचे आवरून तापाची गोळी घेऊन तो बेडरूम मध्ये आला. पाठोपाठ जयूही आलीच.

“औषध घेतलस का रे?” तिने त्याला मागून विळखा घालत विचारले

“हो घेतले.झोप येतेय मला खूप पण”

“अरे विश्रांती नाही मिळत तुला. आता शरीर विश्रांती वसूल करतंय. झोप तू. मीही काम आवरते माझे.” ती वळली तशी त्याने तिला थांबवले

“थांब ना”

ती जवळ आली

“काय रे?”

तो आडवा झाला. त्याच्या अंगावर पांघरूण घालून ती त्याच्या शेजारी आडवी झाली. तो लहान मुलासारखा तिच्या कुशीत शिरला. थोड्याच वेळात त्याला गाढ झोप लागली. त्याने झोपेतही तिचा हात धरून ठेवला होता. तिचे डोळे भरले. ती बराच वेळ त्याला मायेने थोपटत राहिली.

संध्याकाळी त्याला जाग आल्यावर तो बराच फ्रेश दिसत होता. जयूचे कामही संपत आले होते. तिने स्वयंपाकघरात डोकावून बघितले. बाबा नेहमीप्रमाणे आईंसाठी चहा करत होते. तिला बघून त्यांनी तुला हवा आहे का असे खुणेनेच विचारले. तिनेही खुणेनेच अर्धा कप असे म्हणल्यावर ते हसले. संध्याकाळी ते आणि आई एक कप चहा एकत्र घेत असत. त्यांचा नियमच होता तसा. फार काही बोलत असेही नसे. पण दोघेही हॉलच्या टेरेसमध्ये खुर्च्या टाकून तासभर बसत आणि चहा घेत. जयूच्या मागून अनिरुद्धनेही बाबांना अर्धा कप अशी खूण केली. त्यांनी हसून मान डोलावल्यावर काय झाले म्हणून जयूने मागे वळून बघितले. अनिरुद्धने तिच्या कमरेभोवती हात घातला होता. दोघेही भिंतीच्या आड होते. त्याने तिला मागे ओढले. तिचा तोल गेला. तिने त्याच्याकडे बघून काय हे असा चेहरा केला. त्याने मागच्या मागे तिचा हात धरून तिला बेडरूममध्ये ओढले.

“अनि अरे काय” ती पुटपुटली. त्याने तिला पुढचे काही बोलूच दिले नाही.

“जयू” बाबंनी हाक मारली तशी ती सुटायला धडपडली. त्याची पकड अजूनच घट्ट झाली

“जाऊ दे ना अनि” ती कुजबुजली

त्याने तिच्या मानेवरून खांद्यावर ओठ टेकले.

“लवकर ये. सुट्टी सत्कारणी नको लावायला का?”

ती शहारली

“सुट्टी घ्यायचीच नव्हती तुला” खोट्या रागाने ती त्याच्याकडे बघत म्हणाली.

“बायकोचे म्हणणे मोडू नये म्हणून घेतली” त्याने परत तिला किस करत उत्तर दिले.

“अनिरुद्ध” बाबांची दुसरी हाक आली

“जाऊ दे ना रे मला” जयूचा अवघडलेला आवाज आला.

त्याने तिला सोडले. ती लांब गेली तशी त्याने परत तिला जवळ ओढले.

“लवकर ये” तो क्षणभर तिला घट्ट पकडत म्हणाला.

ती रूममधून बाहेर आली. दारातून तिने मागे वळून त्याच्याकडे बघितले. दाताखाली ओठ दाबून तिच्याकडे बघून तो तसाच तिरपे हसत होता. जयूला वाटले असेच त्याच्या जवळ जाऊन त्याला किस करावे. ती हसली आणि बाहेर पडली

रात्रीची जेवणे झाली. मागचे आवरून ती बेडरूममध्ये आली. अनिरुद्ध बेडलॅम्प लावून वाचत होता. दार लावून तिने त्याच्याकडे बघितले.

“अनि काय वाचतोयस?”

“बायकोला बेडरूममध्ये हळूच बोलावण्याचे एकशे एक उपाय”

ती हसायला लागली. तिने त्याच्या हातातून पुस्तक काढून घेतले

“अहो ताप होता तुम्हाला आज सकाळी. जरा जपून” ती मिस्कील आवाजात त्याला म्हणाली

“आता वेगळा ताप चढलाय” त्याने लॅम्प विझवत उत्तर दिले.

त्याच्या स्पर्शात मिठीत विरघळत होती जयू. आज अचानक बऱ्याच दिवसांनी दोघांना असा हवाहवासा वेळ मिळाला होता.

“अनि” बऱ्याच वेळाने श्वास सापडल्यावर जयू त्याला मन भरून बघत म्हणाली

“हुं” तो अजून सावरला नव्हता

“तुला एक सांगायचे होते”

“बोल ना” तो डोक्याखाली हात घेत कोपरावर रेलला

ती उठली. तिने तिचा टी शर्ट शोधला. उठून लॅपटॉप घेऊन ती परत बेडवर बसली

“हे काय मध्येच?” तो तिच्या मांडीवर डोके ठेवत म्हणाला

“बघ ना”

त्याने स्क्रीनकडे बघितले

स्क्रीनवर एका छान हिरव्यागार खाचरामध्ये कौलारू घर होते. छोटेसे. टुमदार. उतरत्या छपराचे. लालचुटुक विटांचे. घराला एक छोटेसे दगडी कुंपण होते. बुटकेसे फाटक होते एक लोखंडी. त्यातून आत शिरल्यावर उजव्या बाजूला एक मोठे आंब्याचे झाड होते. आणि घराच्या दाराशी एक लाल गुलाबी रंगाच्या गुलाबांनी डवरलेले रोप होते. हे सगळे आभाळाच्या गर्द निळ्या पार्शवभूमीवर फारच खुलून दिसत होते.

अनिरुद्ध बघतच राह्यला.

“अमेझिंग. किती सुंदर आहे हे जयती.”

“काय आहे ओळख?”

“काय?” त्याला काही कळेना

“आपले सेकंड होम” जयू खुषीत म्हणाली

अनिरुद्ध उठून बसला.

“खरंच जयती?” तो अजूनही स्क्रीनकडे बघत होता.

“हो आणि मी घराचे डिझाईन पण केलंय. दाखवते तुला”

अनिरुद्धने तिच्या लॅपटॉपचा स्क्रीन लावला. एका हाताने लॅपटॉप बाजूला ठेवत त्याने तिला जवळ ओढून किस करायला सुरुवात केली.

“अनि” तिचा श्वास गुंतला

“लव्ह यू जयती”

“आय लव्ह यू टू”

“जमेल ना गं हे आपल्याला?”

“हो. तू आणि मी मिळून करूया अनि. एक छोटेसे घर आपले. नक्की”

त्याचे हात तिच्या पाठीवरून फिरत होते. त्याचा बेभान रंगगंध तिच्यात उतरत होता. त्याचा चेहरा ओंजळीत घेऊन तिने त्याच्या कपाळावर ओठ टेकले

“एक करशील जयती नक्की”

तिने काय असे नजरेनेच विचारले

त्याने तिचे केस ओढून तिची मान वर केली.

“बेडरूम मोठी करशील घराची” तिरके हसत तो म्हणाला.

जयूला हो नाही म्हणायला अवसरच मिळाला नाही.

©प्राजक्ता काणेगावकर

Image by Maria Saunders from Pixabay 

mandar jog

mandar jog

मंदार जोग ह्यांची कटिंग पिनाकोलाडा, वन बाय टू मार्गारिटा आणि कोनिएक कथा ही तीन पुस्तक प्रकाशित झाली असून त्यांच्या साडेचार हजार प्रती छापील आणी इबुक स्वरूपात विकल्या गेल्या आहेत. दृकश्राव्य, प्रिंट तसेच सोशल मिडीयावर मंदार जोग नियमित लिखाण करत असतात. लेखक ऑनलाईन ह्या संकल्पनेला सत्यात आणणाऱ्या टीमचा मंदार जोग एक हिस्सा आहेत.

3 thoughts on “सेकंड होम – ३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!