संवाद
आपल्या आयुष्यात कधी कोण आणि कोणत्या कारणाने येईल हे आपल्याला माहीत नसतं. प्रत्येकासाठी मनाची कवाडं उघडली जातातच असं नाही. पण काही जण असतात जे आपल्या आयुष्यात येतात अन मग आपल्या अस्तित्वाचा ठसा उमटवतात. अशा माणसांशी भेटणं होतं, बोलणं होतं. कधी प्रेमाचा धागा जोडला जातो तर कधी मैत्रीचा. ह्या धाग्याला मन कधी पक्क्या गाठी मारतं ते आपलं आपल्यालाच कळत नाही.
मी तेव्हा नगरला इंजिनिअरिंग करत होतो. सावेडी हा भाग मुख्य अहमदनगर शहरापासून ६ किमी आहे. आमचे कॉलेज विळद घाटात होते. त्यामुळे आम्ही काही मित्र मिळून सावेडीत एक बंगला भाड्याने घेऊन रहात होतो. असेच एक दिवस औटी काकांच्या नेट कॅफेमधून बाहेर आलो. बाहेर त्यांच्याच असणार्या टपरीवर चहा घेत बसलो होतो. तिथे त्याची भेट झाली.
गोरा पान, सहा फूट उंच, गोल चेहरा, वाढलेले दाट कुरळे केस, कोरलेली दाढी, भुर्या रंगाचे पाणीदार डोळे, रेखीव भुवया, जाड ओठ. चेहर्यावर एक विलक्षण पण त्रासलेला भाव. तो बहुतेक जीम करत असावा कारण टीशर्टच्या बाहीमधून त्याचे मजबूत दंड बघताक्षणी दिसत होती. अगदी एखाद्या हिंदी किंवा साऊथच्या फिल्म मधे हिरो किंवा सेकंड लीड रोल मिळेल अशी पर्सनॅलिटी. का कोणास ठाऊक पण मला जरा त्याच्याबद्दल ओढ वाटली.
मी अभावितपणे स्माईल दिले. त्याने देखील आता समोरच्याने स्माईल केले आहेच म्हणून हलकेच स्माईल केले. अन मग पुढच्या प्रत्येक भेटीत हा स्माईलचा सिलसिला सुरु झाला. मग हळूहळू बोलणे सुरू झाले. त्याचे नाव अलंकार होते. त्याचे सगळे मित्र आणि औटी काका सुद्धा त्याला आल्या असे म्हणत. ज्यांच्याशी सूर जुळतात त्यांच्याशी एकेरीवर येण्यासाठी कधीच वेळ लागत नाही. त्यासाठी त्या दोन व्यक्तींमधे वय, मान, सन्मान, पद, अधिकार या कशातही असणार्या भिन्नतेचा काही फरक पडत नाही. इथे तर आल्या आणि माझे वयही जवळपास एकच होते. त्यामुळे सूर जुळले नसते तरच नवल.
आल्या सुध्दा माझ्याच कॉलेज मधे इंजिनिअरिंग करत होता. मेकॅनिकल इंजिनिअरिंग उसके बस की बात नही थी. पण तरीही गेले ४ वर्षे तो झगडत होता. दोन वर्षे इयर डाऊन झाल्यामुळे कॉलेजला जायचे नाही तर मग काय करायचे? हा प्रश्न तो इथे औटींच्या टपरीवर पडीक राहून सोडवायचा.
हळूहळू आल्या आणि माझं मेतकुट जमलं होतं. औटींच्या टपरीजवळच माझी खोली होती. तो आता तिथेही येवू लागला होता. अभ्यासाची पुस्तके घेऊन तो बराच काळ रुमवर थांबत असे. तसा त्याचा कोणालाही त्रास नव्हता त्यामुळे माझ्या बाकी रुममेटस् ची काहीच तक्रार नव्हती. तो आला की बोलत रहायचा. त्याला वाचनाची आणि फिरायची प्रचंड आवड होती. वाचलेल्या अनेक पुस्तकांमधून मिळालेलं ज्ञान तो फ्री वाटत रहायचा. त्याच्या ओघवत्या शैलीत त्याने एकदा बोलायला सुरुवात केली की रुमवर सगळेजण कामधाम सोडून त्याच्या समोर प्रवचन ऐकायला जमावे तसे येऊन बसत. आपलं असं एक हटके वाचनालय असावं अशी त्याची इच्छा होती. ते नाही जमलं तर टुरीझम क्षेत्रात करियर करायची त्याची इच्छा होती.
ही अशी इच्छा बाळगणारा मुलगा इंजिनिअरिंग सारख्या नावडत्या क्षेत्रात काय करतोय हे मी त्याला अनेकदा विचारले. त्याने प्रत्येकवेळी तो प्रश्न टाळलेला. पण एक दिवस स्वतःच खुलासा केला. एक दिवस असाच आला तर चेहर्यावरचं नेहमीचं हसू गायब. कपाळावरच्या शीरा टणटण उडत होत्या. तो आल्यावर त्याचं काहीतरी बिनसलंय हे जाणवत होतं. मी त्याला जरा शांत होऊ दिला.
मी – आल्या काय रे काय झाले?
आल्या – काही नाही रे. रोजचीच कटकट. आता कुठेतरी पळून जायची इच्छा होत आहे. नको वाटते आहे घरी जायला.
आल्या आमच्या रुमजवळच रहायला होता. वडील एमआयडीसी मधील एका मोठ्या कंपनीमधे प्लॅंट हेड. ते स्वतः मेकॅनिकल इंजिनिअर. आई एसबीआय मधे शहर ब्रांच हेड. आल्या हा त्या दोघांचा एकुलता एक मुलगा. आई वडील दोघेही अत्यंत हुशार आणि करिअर ओरिएंटेड माणसं. वडिलांचे वडिल म्हणजे आल्याचे आजोबा मिलिटरी मॅन होते. त्यांची शिस्त आल्याच्या बाबांमधे आली होती. तसेच आलंकारने देखील डिसिप्लीन्ड असावे अशी त्यांची इच्छा. त्यांच्या घरात त्यांचा शब्द प्रमाण मानला जायचा. इतरांनी त्यांचे ऐकावे त्यांना इतरांचे ऐकण्याची सवय नव्हती. त्यामुळे आल्या शाळेत असल्यापासून त्यांनी त्यांच्या अपेक्षांचे ओझे त्याच्यावर लादले होते. आल्याने इंजिनिअरिंग करुन एमएस करावे हा त्यांचा हट्ट होता. आल्याला मुळात इंजिनिअरिंगच झेपत नव्हते तो एमएस काय करणार? आल्या काही बोलायला लागला की घरात वाद ठरलेला. आजही असाच वाद झालेला त्यामुळे आल्या नाराज होता. मला पळून जायला मदत करशील का? हे त्याचे वाक्य मनात घर करुन गेले.
मी काहीसे ठरवून त्याला उठवले आणि त्याला घेऊन त्याच्या घरी गेलो. तो नको नको म्हणत असताना त्याच्या बाबांशी बोलायला बसलो.
मी – काका, थोडे बोलायचे आहे.
आल्याने मी कोण, काय करतो वगैरे हे त्यांना सांगितले
काका – अच्छा म्हणजे माझ्या मुलाचे वकीलपत्र घेऊन आलास काय?
मी – अगदी तसेच नाही पण काही गोष्टी बोलायच्या आहेत.
त्यांचा करारी चेहरा मला खाऊ की गिळू नजरेने पाहत होता.
मी – काका तुम्ही इंजिनिअरिंग केले ते कोणाच्या सांगण्यावरून?
काका – माझे मी ठरवले. कोणी कशाला सांगायला हवे.
मी – पण तुमच्या बाबांना पण तुम्ही तेच करावे असे वाटत होते?
काका – नाही. त्यांना वाटत होते की मी मिलिटरी जॉईन करावी.
मी – मग तुम्ही त्यांची कशी समजून काढली?
काका – मी त्यांना ठणकावून सांगितले मी इंजिनिअर होणार. अन मला जर फोर्स केला तर मी पळून जाईन घरातून.
मी – मग? काय म्हणाले तुमचे बाबा?
काका – मग त्यांनी बोलणेच टाकले.
मी – म्हणजे तुम्ही तुम्हाला हवे ते केले पण तुमच्या मुलाने मात्र तुमचे ऐकायला हवे हा तुमचा हट्ट का?
काका – हो कारण त्याला कळत नाही करिअर कशात करायचे. निर्णय कसे घ्यायचे. तो लहान आहे.
मी – तुम्ही निर्णय घेतला तेव्हा तुम्ही अलंकार पेक्षाही लहान असणार. तुमचा निर्णय तुम्ही तुमच्या वडिलांवर लादला. त्यातून तुम्हाला हवे ते मिळाले देखील. पण तुमच्या मुलाला नक्की काय हवंय हे कधी विचारलंत? कधी त्याला शेजारी बसवून पाठीवर थाप मारुन बाप म्हणून नाही तर मित्र म्हणून संवाद साधलात? तो एकदा साधा म्हणजे तुमच्या घरात मला येऊन अशी काही वकीली करावी लागणार नाही. कारण असेही मी इंजिनिअरिंग करतोय वकिली नाही.
काका क्षणभर स्तब्ध झाले.
मी – आज जर तुम्ही तुमच्या घरातल्या प्रश्नांना सोडवण्यासाठी संवाद साधायला कमी पडलात तर तुमचा मुलगा कायमचा तुमच्यापासून दूर गेला असता.
काका – म्हणजे?
मी – म्हणजे आज तो घर सोडून चालला होता. शेवटचा प्रयत्न म्हणून मी आलो. वास्तविक मी तुमच्यापेक्षा वयाने, ज्ञानाने आणि समजेनेही लहान आहे. माझा तुम्हाला काही सांगण्याचा अधिकारही नाही तरीही तुम्हाला बोललो. चुकीचे वाटत असले तर मला माफ करा.
काका काकुंचे डोळे डबडबले.
काका – काय? अलंकार घर सोडून जाणार होता? आमच्याशी न बोलता? अर्थात त्याला मीच कारणीभूत आहे म्हणा.
त्यांना पुढे काही बोलवेना. डोळ्यातील अश्रू आता गालावर ओघळले होते. ते पुढे काही बोलणार तोच मी म्हणालो
मी – काका तुमच्या घरातील खुंटलेल्या संवादाच्या प्रवाहातील बोळा आता निघाला आहे. तुमच्या कुटुंबियांसोबतचा संवादाचा प्रवाह आता सुरु होऊ द्या. आता मी इथे असण्याची गरज नाही. असे म्हणून मी तिथून बाहेर पडलो.
आल्या पुन्हा घर सोडून गेला नाही. मधे आधे रुमवर येत राहिला. पुढचे प्लॅन सांगायचा. मीही माझ्या आयुष्यात रमलो. इंजिनिअर झालो. नोकरी, घर, संसार या सगळ्यात बिझी झालो. कधीतरी मग भुतकाळाला डोळे फुटतात आणि मग मन फुलपाखरू बनते. जुन्या आठवणी शोधते, तिथे रमते. बर्याच आठवणीत बरेचजण आठवतात. अशातच आल्याची आठवण झाली. त्याची गाडी सुसाट सुटली होती. फोनवर आणि मेलवर तो अपडेट्स देत असतो. तो नगरलाच स्थाईक झाला होता. त्याला भेटायचे भेटायचे म्हणत होतो पण वेळ नाही ही सबब सारखी पुढे यायची.
मध्यंतरी नगरला एका व्हेंडर मीटला गेलो होतो. मीटिंग लवकर संपली. आल्याची आठवण आली. फोन केला तर ताबडतोब घ्यायला आला. पहिल्यांदा तो त्याच्या कॅफे मधे घेऊन गेला. ते कॅफे म्हणजे आल्याचा प्राण होता. हे साधेसुधे कॅफे नव्हते. त्या कॅफेत वेगवेगळ्या विषयांची पुस्तके तिथे बसून वाचण्याची मुभा आणि जोडीला चहा, स्नॅक्स ची सोय असा अनोखा संगम होता. मला तो प्रकार जबरी आवडला.
कॅफेसोबत त्याने टुरीझमचा बिझनेस सुरु केला होता. कॅफे त्याची बायको हॅंडल करत होती. तीही याच्यासारखी पुस्तकवेडी. दोघांचे सुत छान जमले होते. टुरीझमचे अॉफिस बघितल्यावर मी चाटच पडलो. तो वर्ल्ड टूर पासून अगदी आष्टविनायक यात्राही अरेंज करत होता. भरपुर स्टाफ होता. एकुणच सगळं अलबेल होतं. मी निघतो म्हणताच आई बाबांना भेटल्याशिवाय जायचे नाही असे म्हणाला.
संध्याकाळ झाली मी आलंकारच्या नवीन घरी गेलो. काका काकुंशी झकास गप्पा रंगल्या. जेवणाचा आग्रह झाला मला तो मोडवेना. जेवताना काका काकू आग्रह करत होते. तुडुंब जेवलो. आता निघणे भाग होते. निघताना काका मला म्हणाले
काका – अभि, आमच्या या आनंदी वास्तूचे श्रेय तुला जाते. त्यादिवशी माझे डोळे तू उघडले नसतेस तर आज हे असं हसतं खेळतं घर बघणं माझ्या नशीबात नसतं.
मी – मी काहीच केलं नाही काका. सगळं तुम्हीच केलंत. त्यादिवशी मी गेल्यावर एकमेकांशी काय बोललात हे देखील मला माहीत नाही आणि मला ते जाणूनही घ्यायचे नाही. तुमच्यातला खुंटलेला संवाद सुरु केला एवढंच काय ते माझं श्रेय.
आल्याने नको नको म्हणत असताना काही मिठीईचे बॉक्स आणि दोन पुस्कांचा संच माझ्या हातात टेकवला.
मी – कशासाठी हे? मित्र म्हणतोस ना मला.
आल्या – हो रे. मित्र आहेस म्हणूनच हक्काने हे देतोय. तू जे केलेस त्यामुळे आमचं आयुष्य खुप बदललं. अन ही त्याची किंमत नाही. पण त्याची आम्हाला जाण आहे हे सांगण्यासाठी हे फक्त टोकन अॉफ अॅप्रिसिएशन आहे असे समज.
मग मी काही बोललो नाही.
आल्याच्या पाच वर्षांच्या चिमुरड्या संवादीनीने बोबड्या बोलात
संवादिनी – ताता पलत नत्ती या आणि खुप वेलासाठी या असा दम भरला.
कधीकाळी आपल्या काही क्षणांच्या काहीतरी बोलण्याने एखाद्याचे आयुष्य बदलून जाते. त्यांच्या दृष्टीने तो हवाहवासा, सुखासीन बदल आपल्यालाही सुखावून टाकतो अशी काही माझी अवस्था झाली.
मुलीचे संवादीनी नाव छान आहे रे असे मी म्हणताच आल्या खुलला. घरातून बाहेर पडलो. आता पोर्च मधील लाईट लावली होती. गेटमधून बाहेर पडलो. गाडीत बसताना बाय करताना सहज त्याच्या घराकडे लक्ष गेले तर तिथे लाईटच्या उजेडात आल्याच्या घराचे नाव डोळ्यात भरत होते… “संवाद”
– अभिजीत इनामदार
Image by Peggy und Marco Lachmann-Anke from Pixabay
Latest posts by Abhijit Inamdar (see all)
- पाऊस - July 30, 2021
- बडी ताकत के साथ… बहोत बडी जिम्मेदारी भी आती है - May 11, 2021
- आठवणींच्या_पटलावर - April 20, 2021
सही
Thank you!
छान
Thank you!
मस्तच
Dhanyawad !!
Sunder
Dhanyawad !!
Best
वाह अभिजित!!
Thank you Gauri Madam!!
छान
Thank you MAhesh ji
खुप च मस्त!!हल्ली सवांद कमी आणि वाद जास्त झालेत
Mastch…
छान