रिले कथा- ब्लाईंड स्टोरी डेट -भाग ९
ब्लाइंड स्टोरी डेट – भाग – ९ – पूजा खाडे पाठक
नीरज घाईघाईने आत आला. त्याचे कपडे भिजलेले होते.. आणि मनही. मन भिजलं होतं तसंच काळवंडलंही होतं – अगदी डोईवर व्यापून राहिलेल्या आभाळासारखं. नीरजला आता खूपच हळवं हळवं वाटू लागलं.
हा पावसाळी ऋतू मोठा चमत्कारिक असतो. कधी मूड एकदम छान होतो तर कधी..
त्याने लग्नानंतर जानूबरोबर साजरे केलेले पावसाळे आज त्याला दिसत नव्हते. त्याला दिसत होता पावसात भिजणारा १५ वर्षांपूर्वीचा टवटवीत नीरज.
टवटवीत ? आता तो टवटवीत नव्हता ? खरंतर आता तो जास्त सुखात असायला हवा होता. पण सुखाची व्याख्या पण अशीच फसवी ! त्या काळात जेव्हा बाबा रिटायर होणार होते तेव्हा करियरचं, प्लेसमेंटचं टेन्शन, चांगल्या नोकरी च टेन्शन, त्यात स्मिताच्या घरी..
स्मिता! काही पावसाळे आतल्या आत गाडून टाकावे लागतात तसेच काही पावसाळे त्याने गाडून टाकले होते आतल्या आत, खोलवर. इतके की तो पूर्ण त्याबद्दल.. आज कितीतरी दिवसांनी त्याने तिचे नाव स्मरले. स्मिता!
त्याला अचानक काय झालं काय माहित, पण त्याने लॅपटॉप उघडला .. नाही, सई आणि प्रशांतचं लग्न झालंच पाहिजे .. आपल्यालाही करायचं होतं स्मिताशी लग्न .. आपली पण अशीच अवस्था नव्हती का झाली ??
त्याने भराभरा हात चालवायला सुरुवात केली. त्या अंधारात लॅपटॉपचा प्रकाश आणि बटणांचा खडखड आवाज घुमत राहिला.
शेवटी सई आणि तो एक झाले.. त्यांचं लग्न झालं आणि त्याला स्वतः मधलं काहीतरी राहून गेलेलं.. अपूर्ण राहिलेलं पूर्ण झाल्यासारखं वाटू लागलं ..
हेच आपण तेव्हाच केलं असतं तर? त्याच्या मनात विचार आला आणि समोरून गळणाऱ्या पागोळ्यांमध्ये , चमकणाऱ्या विजांमध्ये त्याला स्मिताची विविध रूपं दिसू लागली!
स्मिता – त्याची कॉलेज मधली मैत्रीण. तिच्यासोबत घालवलेले सुंदर क्षण.. दिल्या-घेतलेल्या आणाभाका.. सगळंच किती कोवळं, निर्व्याज आणि बिनमतलबी होतं! नंतर नंतर येत गेला तो व्यवहार. त्याला आठवलं, जानूचं स्थळ आलं तेव्हा जानूच्या घरच्यांनी पूर्ण कुंडली पारखून घेतली होती आपली. घर, संपत्ती, शेती-वाडी, बाहेरून चौकश्या, आईनेही तेच केलं तिच्या बाबतीत. हो- आयुष्यभराचा प्रश्न होता, सगळं पारखून नको घ्यायला?
आणि जर सगळं पारखून घेतलं होतं तर आज आपण खरंच सुखात आहोत का? हो, तिने आपलं घर छान सांभाळलं आहे. छान मुलगा दिला आपल्याला. अगदी मुलीसारखं नाही पण उत्तम कर्तव्यदक्ष सून आहे ती. स्वतः च छोटं का असेना पण करियर सांभाळून आहे. पैशांच्या बाबतीत काटेकोर आहे, संस्कारांच्या बाबतीत दक्ष आहे, आणि बेड .. हो तिथेही सुखी आहेच की मी.
पण कधी कधी असं वाटतं की हा पाऊस जसा बरसतोय धसमुसळेपणाने, तसंच बरसावं तिनेही कधी. झोकून द्यावं स्वतः ला. प्रत्येकवेळी संयतपणा कशाला सगळ्या बाबतीत? हातचं राखून ठेवल्यासारखा? हल्ली तर हे जास्तच जाणवायला लागलय.
‘त्या’ बाबतीत तर आता तिला नाहीच विशेष इंटरेस्ट. पण बाकी सुद्धा दोघांनीच फिरायला जाणं.. दोघांनीच काही क्षण एन्जॉय करणं.. एकमेकांना व्यावहारिक सोडून ज्या गोष्टी खरोखर आवडतात याचा निर्व्याज आनंद घेणं हे का नाही जमत तिला?
कॉलेजमध्ये असताना आपण असंच काहीबाही खरडायचो. पण स्मिताला किती कौतुक होतं त्याचं! एकदा आपण लिहिलेली कविता तिला ऐकवली होती सिंहगडावर, नुकतीच थंडी सुरु झाली होती आणि हवेवर संध्याकाळच्या वेळी हलका धुक्याचा पदर ढळत होता. कल्याण दरवाजाच्या पुढे असलेल्या एका दगडावर बसून तिला ऐकवली होती आपण ती कविता. तिने त्या वेळी जीन्स, आकाशी रंगाचा स्लिव्हलेस टॉप आणि त्यावर काश्मिरी जाकीट घातलं होतं. अहा! अगदी डोळ्यासमोर आली ती त्याच्या! हनुवटीवर हात ठेवून बसलेली!
ती कविता ऐकून तिने हलकेच आपला हात हातात घेतला आणि आपल्या बोटांना हळुवार तिच्या ओठांनी स्पर्श केला! “किती छान लिहितोस रे .. ” असंच म्हणत होते तिचे ओठ. तिला बोलायची गरजच पडली नाही!
जानूला सुद्धा आपण ऐकवली होतीच की कविता, अगदी पहिल्या रात्रीनंतर बेड मध्ये असतानाच! पण चहात साखर किती घालावी याचं जसं प्रमाण असतं तसं प्रत्येक गोष्टीवर किती हसावं याचं प्रमाण असल्यासारखं फक्त हसली ती!
आपण जानूला बोर झालोय का? तसं असेल तर ते अर्थात चुकीचं हं. मी का जज करतोय तिला?
हा विचार मनात आला आणि नीरज चमकला. आपल्या फारच अपेक्षा आहेत का? हे काय होतंय आपल्याला ? आपण मिड लाईफ क्रायसिस..
नीरज कितीतरी वेळ अंधारातच स्वतःशी विचार करत राहिला. इतक्यात दार उघडल्याचा आवाज आला. “नीरज, आला आहेस का तू ? मेणबत्ती लावायची ना रे लाईट गेलेत तर .. ” जानू म्हणाली. तेव्हाच त्याला लाईट गेल्याचं कळलं. तो बाहेर आला तेव्हा जानू भिजलेल्या अवस्थेत सामान जागच्या जागी ठेवून देत होती. त्याने हलकेच मागून जाऊन तिची क्लिप काढली, तसे सगळे ओले केस तिच्या चेहऱ्यावर आले.
“हे काय ? सरक, आधी मला कपडे बदलू देत .. थंडी वाजतीये मला .. आणि हो, प्लिज कॉफी करशील का ?” असे म्हणत जानू आत गेली सुद्धा!
त्याने जाऊन स्कॉचचा लार्ज पेग बनवला, जानूसाठी कॉफी बनवली, आणि बेडरूम मध्ये घेऊन आला.
इतक्यात जानू अंघोळ करून आली. मुलगा घरात नसल्याने जरा निष्काळजीपणाने ती टॉवेल गुंडाळूनच बाहेर आली. एकेकाळी अगदी सुडौल असलेली जानू आता किंचित स्थूल झाली होती. पण अजूनही तितकीच सुंदर आणि आकर्षक होती.
जाऊन तिचा टॉवेल खसकन ओढून तिला आपल्या बाहुपाशात घेऊन, त्या विजांच्या आवाजात त्या पावसासारखं बेधुंद होऊन बरसावं असं त्याला वाटलं, पण तो उठणार इतक्यात त्याला तिच्या जागी स्मिताचा चेहरा दिसला आणि तो गोंधळून गेला. स्मिताची तीव्र आठवण येऊन त्याच्या हृदयात एक कळ येऊन गेली. त्याच्याही नकळत तो उठला, खिडकीशी आला आणि बाहेर अंधारात कोसळणाऱ्या पावसाचा नाद ऐकत राहिला.
Ⓒपूजा खाडे पाठक
Image by mohamed Hassan from Pixabay
- दिवाळी २०२० स्पेशल- १९ - November 27, 2020
- दिवाळी २०२० स्पेशल- ३ - November 13, 2020
- पाडस - October 23, 2020
👍
Nice
खूप सुंदर 👌😊
Waiting for Next part
खूप छान.. waiting for next part
Waiting for next part
Next part 10 th??