झाले मोकळे आभाळ
तू मला पाहणं म्हणजे माझ्यासाठी उत्सवच असायचा.
मी बहरायचे ,फुलायचे ,तू मला भेटलास ,मला बघितलंस की. तुझा अगदी चुकून झालेला पुसट स्पर्श सुद्धा माझ्यासाठी सुखाचं शिंपण असायचे आणि हे तू पक्कं जाणून होतास .
त्या दिवशीची भेट मी कधीही विसरणार नाहीये ,आणि बहुदा तू ही ..
तू गाडीवरून उतरून आपल्या भेटण्याच्या नेहमीच्या ठिकाणी माझी वाट बघत उभा होतास. आभाळ भरून काळ्या ढगांनी दाटीवाटी केली होती ,तरीही तू गॉगल लावून उभा होतास,कारण तुला गॉगल खूप आवडायचा आणि तू त्यात डॅशिंग दिसायचास .दंडात रुतणाऱ्या टी शर्टच्या बाह्या तुझं कमावलेलं शरीर दर्शवायच्या.तू मला भेटल्यावर तुझी रोज मी नजरेनेच दृष्ट काढायचे.ते ही तुला कळायचं आणि हसायचास गालातल्या गालात.
मी रिक्षेतून उतरले आणि नेमका पाऊस सुरू झाला. तुझ्या हट्टाखातर आज मी सिल्कची साडी नेसून आले होते ,आणि तुला आवडणारा स्लीवलेस ब्लाउज सुद्धा ,पण पावसाने पूर्ण मूड घालवला होता. कशी बशी स्वतःला आणि साडीला सावरत ,उडणारे केस कानामागे ढकलत छत्री उघडून धावतच तुझ्यापाशी आले .
नेहमीप्रमाणे तू आल्याआल्या मला घट्ट जवळ घेऊन कानात पुटपुटलास, “आज मी तुझी दृष्ट काढणार आहे ,पण वेगळ्या पद्धतीने”
हे तुझं खोडसाळ बोलणं आणि वागणं मला खूप आवडलं होतं तरीही मी सुखाने पण डोळे वटारून तुझ्याकडे बघितलं आणि तू ओठांवर बोट ठेऊन डोळा मारलास.
खरंच काही क्षण हे मनाच्या एखादया कुपीत बंद करून ठेवावे असं वाटतं नाही का? तसेच हे आणि ह्याच्या पुढचे असणार होते.
‘चल, आत हॉटेलच्या ,पाऊस वाढला आहे ,मस्त गरम गरम चहा मारू”
छत्री बंद करून ,कमरेला खोचलेला पदर परत सोडून तो सावरत ,केस झटकत मी तुझ्याकडे बघितलं.आणि म्हंटल “चल”
“एखादा मरेल ना गं जुई हे इतकं सुंदर तुझं काय चाललंय ते बघून”
“गप रे केदार ,काहीही तुझं….चल चहा पाजतो आहेस ना ”
त्याने हसत कमरेभवती हात गुंडाळला आणि जे काही अंगावर रोमांच आले त्याने मी एका वेगळयाच दुनियेत प्रवेशले.
आत आल्यावर आपल्या नेहमीच्या खिडकीजवळच्या टेबलापाशी येऊन ,तू मला आत जाऊ दिलेस आणि स्वतः बाहेरच्या बाजूला बसलास
कधी कधी अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून एखाद्याचे अपल्यावरचे प्रेम आणि काळजी दिसून येते नाही ?
तू चहाची ऑर्डर दिलीस , वेटर पाच मिनिटांत चहा घेऊन आला , तुझं सहज माझ्याकडे लक्ष गेलं आणि तू नजरेनेच मला छातीवरचा पदर नीट करायला सांगितलास,कारण तू मला जपत होतास
चहा पीत पीत तू विषयाला हात घातलास “मग काय ठरवलं आहेस आपल्या नात्याबद्दल? ,म्हणजे तुझं उत्तर ऐकायला मी गेले आठ दिवस खूप आतुर आहे,आणि उत्तर सकारात्मक असणार हे ही मला माहीत आहे,फक्त तुझ्या तोंडून ऐकायचे आहे’
“केदार,हो ”
तू चहाचा कप तसाच खाली ठेवलास आणि माझ्याकडे तोंड करत आनंदाने मला मिठी मारलीस
“मला माहीत होतं, जुई मला माहीतच होतं तुझा होकार असणार ,पण इतका वेळ का गं घेतलास??,मी किती वाट बघत होतो तुझ्या उत्तरची”
केदारच्या डोळ्यात केवळ आनंद आणि आनंदच दिसत होता. पण इतके दिवस मी का थांबले होते हे ही त्याला कळायला हवं होतं.
“केदार काही प्रॉब्लेम होते रे,काही अडचणी होत्या,आणि कळत नव्हतं तुला ह्यातलं सांगू की नको”
“अगं पण मी प्रेम करतो तुझ्यावर ,मला तू सगळं सांगायला हवंस,तुझा माझ्यावर विश्वास आहे ना?” त्याने माझे दोन्ही हात हातात घेत माझ्या डोळ्यात आरपार बघत मला विचारले
“स्वतःपेक्षा जास्त आहे केदार , पण तरीही तुझी काळजी वाटत होती , किंवा मीच कन्फर्म नव्हते”
“कशाच्या बाबतीत?”
“सगळं सांगते , नीट ऐक”
तू चहा संपवलास आणि खरंच लक्ष देऊन माझ्याकडे बघत मी बोलण्याची वाट पाहू लागलास. आत्ता ह्या क्षणी एका निरागस बाळा सारखा दिसत होतास , वाटलं काहीही सांगू नये केवळ तुला मिठी मारत ह्या आठ दिवसांत भोगलेलं दुःख मोकळं करावं तुझ्या मिठीत.
“केदार आठ दिवसांपूर्वी मी तुला भेटून घरी गेले ती आनंदातच कारण तू मला प्रपोज केलं होतंस त्या दिवशी , आणि तुला माहित आहे , आपण ज्याच्यावर मनापासून प्रेम करतो ते प्रेम आपल्याला मिळणं किती सुदंर असतं, त्यात काय सुख असतं हे त्या दिवशी मी अनुभवत होते. घरी येऊन आईला सुद्धा सांगितलं. ती ही खूप सुखावली.
दुसऱ्या दिवशी अंघोळ करताना अचानक हाताला छातीशी एक लहान गाठ लागली आणि मी प्रचंड घाबरले, दहा बारा वेळा चेक केली पण गाठच वाटत होती , आईला हाक मारली आणि तिला चेक करयाला सांगितलं , तिलाही जाणवली , आणि ती ही खूप घाबरली, पण तशी ती धीराची “ “जुई , पटकन आटप ,आणि आज ऑफिसला जाऊ नकोस आपण लगेच गायनक कडे जाऊ”
डॉक्टरने सगळ्या टेस्ट सांगितल्या करयाला, त्या आम्ही त्याचं दिवशी केल्या पण रिपोर्ट यायला सहा सात दिवस जाणार होते. ह्या दिवसांत मी आणि आई कसे जगत होतो आमचे आम्हाला महित रे ! त्या आजाराचे नाव सुद्धा आम्ही दोघींनी एकदाही उच्चारलं नाही , पण तोच आजार मनात येत होता ….कॅन्सर ….
त्या दिवसांत मी तुझ्याशी बोलणं , तुला भेटणं का टाळत होते किंवा हे तुला का आणि कसे सांगत नव्हते हे तुला आत्ता कळले असेलच , आणि तुला वाटत होतं मी वेळ लावते आहे , किंवा तुझ्या प्रपोजल चा विचार करत आहे म्हणून? अरे वेड्या माझं खूप खूप प्रेम आहे रे तुझ्यावर आणि मरेपर्यंत राहणार आहे”
“ तू बोल पुढे , मी ऐकतो आहे”
तुला सगळ ऐकायचं होतं, सगळी उत्सुकता दिसतंच होती तुझ्या डोळ्यात आणि काळजी सुद्धा.
“काल रिपोर्ट आले हातात”
“मग , काय होतं त्यात ?”
“ निगेटिव”
तू मला कडकडून मिठी मारलीस. काहीच बोलायची अपेक्षा नव्हती , खचितच तू आत्ता ह्या क्षणी काय विचार करत असशील जाणत होते मी , हे सगळं ऐकताना तुझ्यावर काय ताण आला असेल कळत होतं मला.
“जुई , एक विचारू ?”
“विचार की”
“हेच जर माझ्या बाबतीत झालं असतं तर, आणि मी असा वागलो असतो तर ?”
मी पटकन त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि रागातच बोलले
“केदार गप्प बस , काय बोलतो आहेस, हे किती वाईट आहे, तुला नाही माहित, आणि तुला मी काही होऊनच देणार नाहीये आणि झालंच काही तरीही मी तुझ्या सोबत कायम असणार आहे हे लक्षात घे, कळलं ना !”
“ बघ नुसत्या विचाराने तुला राग आला माझा , कारण तू जीवापाड प्रेम करतेस माझ्यावर , तुला माझी साथ सोडायची नाहीये कारण तुला मी हवा आहे माझं प्रेम हवंय , तुला काळजी आहे माझी , मग हा विचार मी ही केला असता हे का तू लक्षात घेत नाहीयेस?”
“केदार मी नाही सांगू शकत असं का वागले, पण खूप प्रेम होतं तुझ्यावर कदाचित म्हणून आणि तुला कसलाही त्रास होऊ नये म्हणून वागले असेन अशी , पण जाऊदे आता तो वाद नको ना रे, तुझ्या आवडीची साडी आणि तुला हवी तशी नटून आले आहे मी तुला भेटायला , आज बाहेर पावसाने आभाळ भरून आलं आहे, पण ह्या आठ दिवसांत आपल्या नात्यावर आलेले काळेकुट्ट ढग मात्र हटले आहेत”
“जुई खरंच आजचा दिवस लक्षात राहील असाच आहे गं, तुझे रिपोर्ट हरले आणि आपलं नातं जिंकलं, आणि आता ह्यापुढे कुठल्याच प्रकारचं सावट आपल्या नात्यावर येऊ नये अशी आपण देवाजवळ प्रार्थना करू”
“नक्कीच….. चल, बाप्पाचा आशिर्वाद घ्यायला देवळात जाऊ , त्याच्या आशीर्वादाने करू नवीन सुरुवात”
त्याने खिशातून एक डबी काढली, हळूच माझा हात हातात घेतला आणि अनामिकेत एक सुंदर हिरे जडलेली सोन्याची अंगठी घातली, मी अनपेक्षितरित्या तोंडाचा आ करूनच किती वेळ तुझ्याकडे आणि अंगठीकडे बघत होते
केदार……इतकंच बोलू शकत होते , कारण सारखे डोळेच भरून येत होते , बोलवतच नव्हतं
“जुई मला आतूनच वाटत होतं, तुझा होकार असणार , आणि पुढे तू परत काहीही आढेवेढे घ्यायच्या आधीच तुला मी ही अंगठी घालयाची असे ठरवले होते”
मी फक्त “Love You” इतकंच म्हंटल आणि हक्काने त्याला बिलगले
सगळा हॉटेलचा स्टाफ , manager आणि वेटर सगळे आमच्याकडे कौतुक मिश्रित आनंदाने बघत होते.
आता आभाळ मोकळं झालं होतं, बाहेरचं आणि आतलं सुद्धा ….
मानसी चापेकर
Image by smarko from Pixabay
- शर्वरी…(कथा संग्रह) - September 12, 2022
- निसरडी वाट- 1 - September 17, 2021
- फिरुनी नवी जन्मेन मी ….२ - July 27, 2021
मस्त
फारच सुंदर कथा
Very nice Manasi
Happy to read all this
छान