प्रगती- भाग ४
भाग ३ ची लिंक- प्रगती- भाग ३
प्रगती- भाग ४
बेल वाजली. दार उघडताच निरजला आई बाबांचे काळजीनं काळवंडलेले चेहरे दिसले. न राहवून त्यानं विचारलं, “काय झालं? अचानक कविताकडे कसे काय गेलात? सगळे बरे आहेत ना तिच्याकडचे?”
“अरे घरात तरी येऊ देशील की नाही?” असं निरजवर ओरडून आईने सगळा राग
त्याच्यावरच काढला. मग बराच वेळ कोणीच कोणाशी बोललं नाही. निरज परत अभ्यासाला बसला. आई बाबा कविताच्या काळजीनं रात्रभर जागेच राहिले.
कविताचे वर्षसण सुरू झाले. त्या निमित्तानं कविताचं माहेरी येणं, एखाद-दोन दिवस राहणं सुरू झालं. विवेकनं मात्र जाणिवपूर्वक एक अंतर ठेवलं होतं. तो कधीही कितीही आग्रह केला तरी कविताच्या घरी रहात नसे. अगदी दिवाळसणालाही पराडकर सकाळी येऊन संध्याकाळी निघून गेले. ते घरी आल्यावर एका विचित्र तणावात सगळेजण वावरत. पण वातावरण निवळण्यासाठी कोणालाच काही उपाय दिसत नव्हता. पराडकर असहकार पुकारल्यासारखेच वागत होते. कविताचं राबणं काही कमी होत नव्हतं. ती सतत एका अदृश्य ओझ्याखालीच दबलेली असे. जिचं शहाणपणाबद्दल समजुतदार पणाबद्दल नेहमी कौतुक होत असे ती हीच कविता का? असा प्रश्न पडण्याइतपत कवितामध्ये बदल झाला होता. आत्मविश्वास तिच्यात नखभरही उरला नव्हता.
निरजने स्वतःला अभ्यासात झोकून दिलं होतं. एकदा रात्री उशिरापर्यंत अभ्यास करून झोपल्यावर कसल्यातरी आवाजाने त्याला जाग आली. आई बाबा एकमेकांशी काहीतरी बोलत होते. अंथरुणावर पडल्या पडल्याच अभावितपणेच तो त्यांचं बोलणं ऐकू लागला आणि हादरलाच. त्यांच्या बोलण्यातून त्याला समजलं की बाबांची खाजगी नोकरी धोक्यात आहे. ऑफीसनं मंदीचं कारण देऊन स्टाफ कमी करायला सुरूवात केली होती. बाबांना राजीनामा देण्यासाठी सांगितलं गेलं होतं. इतकंच काय तर गेल्या महिन्याचा पगारदेखील दिला गेला नव्हता. कविताच्या लग्नात आणि नंतरचे वर्षसण करण्यात कर्ज झालं नसलं तरी सेव्हींग्ज पण शिल्लक नाहीयेत हे त्याला त्यांच्या बोलण्यातून समजलं.
परिस्थितीचं गांभिर्य न समजण्याइतका तो मुर्ख नव्हताच. बाबांना नोकरी सोडावी लागली. महिन्याभरात कविताच्या सासरी सुद्धा ही बातमी समजलीच. विवेकचा आडमुठेपणा अजूनच वाढला. बाबा नोकरीच्या शोधात होते. मदत म्हणून आईने लाडू, चिवडा, चकली करून हातभार लावण्याचा प्रयत्न केला. निरजला अगदीच असहाय्य अगतिक वाटत होते. पण पार्ट टाईम नोकरीची त्याची कल्पना बाबांनी धुडकावून लावली. सध्यातरी तु फक्त अभ्यास कर असं त्याला घरातून बजावण्यात आलं.
एकदा तिघेही आईने बनवलेल्या पदार्थांचं ऑर्डरचं पॅकींग करत बसले असतानाच फोन खणखणला. बाबांनी फोन घेतला. बघता बघताच काळजीनं त्यांचा चेहरा वाकडा झाला, “अहो पण असं कसं…” असं काहीतरी बोलेपर्यंत पलीकडून फोन कट झाला होता.
बाबा घाईघाईने म्हणाले, “कविताच्या घरून फोन होता. ती चक्कर येऊन पडली सकाळी. उठा… आपण तिघेही जाऊ तिथे.” आणि बाबा मटकन खालीच बसले. शक्तीपात झाल्यासारखे लहान मुलासारखे रडू लागले. कविताच्या काळजीने तिघांनाही काहीच सुचत नव्हते. संकटं सगळ्या बाजूंनी चाल करून येत होती… त्यांना अजूनच अगतिक, असहाय्य बनवत होती.
निरज पटकन पुढे झाला. “बाबा बरं वाटतंय ना? काही त्रास होतोय का?” त्यानं काळजीनं विचारलं. “हो मी बरा आहे.” बाबांनी असं म्हणताच निरजनं स्वैपाकघरात जाऊन पाणी आणलं. आईच्या हातात ग्लास देत तो म्हणाला, “हे पाणी दे बाबांना. मी रिक्षा घेऊन येतो. आपल्याला निघायला हवं”
रिक्षेतून उतरल्यावर तिघेजण राम मंदिराचा गाभारा ओलांडून पराडकरांच्या घरात शिरतानाच जोरजोरात हसण्याचा आवाज आला. तिघांनी चमकून एकमेकांकडे पाहिलं. कविताच्या सासुबाईंनी तिघांचं जोरदार स्वागत केलं. कविताला समोरच खुर्चीत बसलेलं पाहून तिघंही गोंधळून गेले. कविताच्या सासुबाई हसत हसत म्हणाल्या, “अहो तुमच्यासारखेच आम्हीही घाबरून गेलो होतो. पण आता काळजी करू नका. पेढे वाटा. तुम्हाला नातू होणार आहे.”
हे ऐकताच तिघांचा जीव भांड्यात पडला. त्यांच्यासाठी पाणी आणायला उठणार्या कविताला खाली बसवून तिच्या सासुबाईंनी मुलीला पाणी घेऊन यायला सांगितलं.
विवेक म्हणाला, “सकाळी नेहमीची कामं करताना चक्कर येऊन बेशुद्ध पडली कविता. मी तिला तसंच उचलून दवाखान्यात घेऊन गेलो. तेव्हाच ही बातमी डाॅक्टरांनी सांगितली. थोडा विकनेसपण आहे म्हणाले.” हे ऐकून कविताच्या सासुबाईंचा चेहराच पडला. “अहो आजकालच्या मुलीच खूप नाजूक. आपण किती कष्ट केले तरी काही धाड भरायची नाही आपल्याला.” अशी काहीतरी सारवासारवी करत पुढे म्हणाल्या, “मी तर घाबरूनच गेले होते. परक्याची पोर काही बरं वाईट तर झालं नसेल? म्हणून विवेक परतायच्या आतच मीच तुम्हाला फोन केला.”
आईनं कविताकडे पाहिलं तर तिच्या डोळ्याखाली मोठमोठी काळी वर्तुळं उमटली होती. दहा एक किलो वजन सहजच कमी झालं होतं. आई धीर करून म्हणाली, “थोड्या दिवसांसाठी घेऊन जाऊ का कविताला?” यावर सासुबाईंनी होकारार्थी मान डोलवत विवेककडे पाहिलं. विवेकनं मात्र “त्याची काही इतक्यात गरज नाही. बरी आहे ती आता.” असं बोलून साफ नाराजी दाखवून दिली.
थोडा वेळ बसून तिघेही घरी आले. कविताला सुखरूप बघून आणि निदान आता तरी पराडकर कविताची काळजी घेतील या आशेने त्यांना हायसं वाटलं होतं. तरीही कविताच्या सासूबाईंचा ‘नातू’ हा उल्लेख आईला खटकला होताच. पण आता मानसिक श्रम इतके झाले होते की तिला पुढे काही विचार करवेना.
दोन तीन दिवसातच कविताच्या सासूबाईंचा परत फोन आला. विवेकच्या बहिणीचं लग्न ठरल्याचा. त्यांचा एकूण सूर ‘येणारा नातू आम्हाला पायगुणाचा ठरला’ असाच होता.
आता पराडकरांच्या लग्नघरात कविता पूर्ण बुडून गेली होती. तीन महिन्यांनी लग्न असल्याने सगळेच जण लग्नाच्या खरेदीत आणि तयारीमध्ये व्यस्त होते. पराडकरांकडे आधीच माणसांचा राबता खूप होता त्यात या लग्नामुळे भरच पडली होती. कविताची ऑफीसच्या आणि घरच्या कामांमध्ये पूर्ण आबाळ होत होती. पण कोणालाच तिच्याकडे पहायला वेळ नव्हता. फक्त विवेकच्या बहिणीच्या केळवणापुरती अर्धा दिवस ती आईकडे जाऊ शकली. तिची अवस्था बघून आईची तगमग होत होती.
लग्नाच्या दिवशी निरजची परिक्षा असल्यामुळे तो नव्हता. पण आई बाबा कविताची धांदल पहात होते. तेवढ्यातल्या तेवढ्यात तिला पाणी आणून दे. काहीतरी खायला दे असं आई करत होती. संध्याकाळी घरी परतल्यावर आईची काळजी वाढली होती. तर बाबा ‘अजूनही आपल्याला नोकरी मिळाली नाही. कविताचं पुढचं सगळं आपण कसं करणार आहोत?” या विचाराने हैराण होते.
आई बाबांना असं चिंताग्रस्त बघून निरजला वाटलं की या सगळ्यावर पैसा हाच एक उपाय आहे. लोक पैशासमोर झुकतात. काही झालं तरी जीवतोड मेहनत करून आपण डिस्टींक्शन मिळवायचच. हा निश्चय परत एकदा करून तो हाॅलमध्येच अभ्यासाला बसला.
क्रमश:
Image by mehedi9419 from Pixabay
Latest posts by Sanika Wadekar (see all)
- प्रगती भाग ८ – शेवटचा भाग - September 10, 2020
- प्रगती भाग ७ - September 7, 2020
- प्रगती- भाग ६ - September 4, 2020
काळजी वाढंवतंय हो तुमचं लिखाण ! लिहीत रहा.
Pingback: प्रगती- भाग ५ – LekhakOnline – Excellent Marathi Articles