निळ्या खुणा…

एम आय डी सी सुटली,

परल्या घरी निघाला…… जाता जाता चहाच्या टपरीवर थांबला.

तिला एक “हाय ” व्हाट्सअप्प वरच, ……

“भेट ना” तिचा लाडिक आग्रह, …..

“घरी तर पोचू दे, मग येतो …… खाडी रस्त्याला भेटू.”

“हम्मम्म” नंतर वाकडं तोंड करून किस्सी देणारे smily दोन्हीकडून ……..

बाईकला किक, …… घरी पोचला तर राडा चाललेला.

बाबा ….. काय बाय शोधत होता, त्याच्या स्टोव्हची पिन सापडत नव्हती, ……. चार स्टीलचे ग्लास, …. चहा पावडर, साखर, … सगळं थोडं थोडं, ……. पातेलं, एका, तेलाची बाटली, थोडा मसाला, मोठ्या पिशवीत…….

खिशात एक चपटी, ……

तो कुठंही पिकनिकला नव्हता चालला, ……… त्याला कुठं वेळ, असली थेरं करायला.

“परल्या, तू बी दोन घास खाऊन घे, तुलाबी यावं लागन.”

“का ?” परल्या जरा वैतागलाच.

“आज तीनच जमलेत, माझ्या संगट, जाळं वडाय कुणी नाय. चल गुमान……………. अन तो फोन पयला चार्जिंग कर.”

“बाप्पा……. मला तुवा धंद्यात नका घिऊ .”

“मग फुकून टाकतो का समींदर, त्या, ट्रॉलर वाल्या पारश्याला? सोसायटीचं कर्ज घेतलान जाल्यासाठी, चालीस हजार, कसा फेडणार हाय ? तुझ्या एमायडीशीच्या पाच हजारात ? कालच वश्या तामोऱ्याचा फोन आला व्हता, सोसायटीच्या मिटिंग ला बलावलय पर्वा दिशी, ……… चल गप कामाला लाग, ….”

परल्या हिरमुसला.

आता निकिता रुसून बसंल…… तिची समजूत काढाय पाह्यजे.

आज लवकरच बोट ढकलायची होती. बाबा आणखी दोघांना बोलवायला गेला होता.

परल्या घशात, भात न डाळ बळंबळं ढकलत होता. घरच्या साठी ठेवलेली कोळंबी पण आयशीनं विकून टाकली होती.

बाबा आला, “ए चल आटप, अन त्यो फोन पयलो बंद कर. आत गेल्या वर चार्जिंग फुल्ल पाह्यजे.”

बोट ढकलायला आणखी दोन जण आले, ……. नित्यानं इंजिन सुरू करायच्या आधी डिझेल फुल केलं होतं. ………. परल्या जीपीएस चा डब्बा घेऊन बोटीत चढला.

मच्छीमार सोसायटीच्या आरेकरानं , बोटीवर निघालेल्यांची नावं नोंदवली. ……. बोट निघाली ……..

सोबतीला कुणाचीच बोट नव्हती, सगळ्यांच्या बोटी आराम करत होत्या, अन परल्याच्या बाबाला मात्र सवड नव्हती, ……. पोरीच्या लग्नाचा खर्च समोर दिसत होता…… घराचं कर्ज, …… जाळ्याचं कर्ज, बोटीच्या रंगरंगोटीचा खर्च, सगळ्यांचा मेळ बसवायचा होता.

परल्याच्या हात मात्र सारखा खिशातल्या मोबाईलकडे जात होता.

पण अजून तीन चार तासाशिवाय परल्याच्या बा मोबाईल ला हात लावून देणार नव्हता. “कौ ” पण दोन अडीच तासाशिवाय रेंज मध्ये येणार नव्हता.

तिकडं जेवणं आटपून निकी, खाडी रस्त्याकडं येऊन गेली असणार, …… चार पाच तरी दर्दभरी गाणी पाठवली असणार. ….. बेवफा, ….. बेकदर, …..बेखबर आणि काय बाय. इकडं खरंच दुनियेपासून बेखबर व्हायची वेळ आली होती.

चांद पाण्यावर चमकत होता, अन किनाऱ्याच्या गाव हळूहळू पाण्यात नाहीसा होत होता.

आता चारी बाजूला फक्त पाणीच पाणी……. बाबानं बिडी प्यायला घेतली. बोट स्थिर गतीनं पुढं सरकत होती. दिशेचा अंदाज वन्या घेत होता. परल्या हळूहळू पेंगायला लागला, तसा बाबा व्हसकला, ” ए उठ, चल चहा घे करायला, …….गधड्यावानी वाढलाय, काय कामाचा नाय”

परल्यानं गुमान चहा करायला घेतला, ……. लांब कुठंतरी, नेव्हीचं जहाज दिसत होतं, मधून मधून त्यांचे डिस्टन्स लाईट अंगावर पडत होते, …….. मोबाईल च्या उजेडात, परल्या चहा टाकत होता, …… मोबाईलची लाईट सुरू करताना त्यानं डेटापण सुरू केला, अन धडधड मेसेज वाजायला लागलं. पण यावेळी बाबानं लक्ष नाही दिलं.

तिचे रागावून केलेले मेसेज, वाचून परल्या हैराण झाला. मी बोटीवर आहे, एवढा मेसेज कसाबसा केला न बाबानं आवाज दिला,

” परल्या जीपीएस चालू कर तुझं, ……. कौ इथंच कुठं असंल.”

हाकेच्या अंतरात आली होती कौ, समोर फायबर बॉल दिसत होता.

जीपीएसचा डब्बा वाजायला लागला होता. म्हणजे, हीच बाबाची “कौ” होती. वन्यानं चहा पिता पिता, आल्हाद बोट लावली, फायबर पाशी. बा नं खालच्या तंगूसाच्या धाग्याच्या जाळ्याच्या टोकाची गाठण मारली अन वरंन धागा खेचायला सुरुवात केली. कौ मधून ओवून घेतलेल्या धाग्याला ताण बसताच, जाळं खाली गेलं. एकेक करत जाळ्याला सहा ठिकाणी गुंतवून टाकलं…….. खोला मोठा होता.

बाबानं आता चपटी काढली, अन भरून आणलेल्या बिसलेरीच्या बाटलीत ओतली. एकेक घोट घेत बाबा जाळ्याच्या वरच्या धाग्याकडं पहात राहिला.

जाळ्याला जसजसा ताण बसत होता, तसा बाबाचा चेहरा खुलत होता, एकेक स्वप्न डोळ्यांसमोर नाचत होतं, ……. अन घोटावर घोट चढवत होता.

तिकडं परल्या मेसेज चेक करत होता, ती ऑफलाईन होती, त्याचा बोटीवर जाण्याचा मेसेज तिने रात्रीच वाचला होता. पण आताची मध्यरात्रीची सॉरी अन पपी अजून निळी झाली नव्हती. ती रात्री आपली आठवण काढत उठेल आणि त्या मेसेज पोचल्याच्या दोन खुणा निळ्या होतील, या आशेनं तो मोबाईल कडे एकटक पहात राहिला.

“वन्या, …….. काय बघतंय रं हे मोबाइलमधी निरखून.”

बाबानं तर्र झालेल्या डोळ्यांनी परल्याकडं बघत विचारलं.

“निकिताचा मेसेज बगत आसंल.”

तरीही परल्याचं लक्ष नव्हतंच.

“कोण ? त्या ज्ञानू तामोऱ्याची पोरगी?”

“हा,…….. तीच.”

तोवर हलणारी बोट सहन न होऊन, परल्यानं दोन तीन वकाऱ्या काढल्या……. अन सगळी फिदीफिदी हसायला लागली.

हळूहळू जाळ्याचा खोला ताणत चालला तसा बाबा ओरडला,

” ए चला, पटा पटा, जाल्याला वड लागली, खेचायला लागन…..”

तसा, परल्या दोन निळ्या खुणांमधून बाहेर आला, ……. सगळे, खोला आवळण्यात गुंतले, …… परल्यापण कामाला लागला.

आज मोठी मासळी जास्त गावली होती……जाळ्याला हिसके देत होती, …… पण दमादमानं चौघानी जाळी खेचत आणली, …… जास्त नाचणारी सुरमई, रावस, खालच्या बर्फ ठेवलेल्या कप्प्यात टाकली ……. आज, मोठे लॉबस्टर, पापलेटची बरसात केली होती, समुंदरानी, ……. मोठी किरपा झाली होती.

बोट परत निघताना, परल्याच्या बाबा, जाम खुश होता, …… परवाच्या सोसायटीच्या मिटिंग मधी मान खाली जाणार नव्हती, काही न काही कर्जफेड होणार होती. …….. उरलेले चार घोट एका दमात घेऊन मोकळा झाला.

ओकून बेजार झालेल्या, परल्याची आता झोप लागली, …… …… निकिताची आठवण अन मोबाईल मुठीत ठेवून गाढ झोपी गेला, …………………………… पण गप झोपू देईल तर निकी कसली?….. ती हळूच उठली, …… दाराची कडी न वाजवता, …… समुद्रावर आली, …… वाट पाहू लागली, ……….. वारा भणाणत होता,…….. तिच्या बटा उधळत होत्या, ……… लाटा उसळत होत्या, ……. तिला काय झालं, समजलं नाही, सरळ उठली, अन समुद्राकडं चालायला लागली…….. तिला पाण्याचं भान नव्हतं, ……. कमरेपर्यंत पाण्यात, ……. अजून पुढं चालत राहिली,  लाटा मागे ढकलत राहिल्या, ……. अन आता नाकातोंडात पाणी …….

” निक्के, ….. मागटी फिर,…. घरला जा….. मागटी फिर”

परल्या ओरडतच जागा झाला, …… स्वप्न होतं कळल्यावर परल्या पार वरमला. बाबा, खालच्या स्टोरेज मध्ये मासळीचा हिशोब लावण्यात गुंगला होता, ……… नशीब, …… वाऱ्याच्या भणभणीमुळं परल्याचं विव्हळणं त्याला ऐकू नाही गेलं नाही. पण बाकीचे दोघेजण, तळलेल्या ताज्या चार पापलेटा खाता खाता, ………. हसून हसून पार उलटे झाले, …………….

पहाट होत आली होती,……….. अजून तासाभरात, बोट जेटीवर पोचणार होती. काहीच उत्तर आलं नव्हतं, त्यामुळं परल्याचा जीव व्याकुळ झाला होता.

इतक्यात, बाबानं फोन काढून घेतला ……….. मच्छी उचलणाऱ्या दलालांना फोन लावत सुटला, …….. बोली लावण्यासाठी बोलावू लागला. अन बोलता बोलता, फोन त्याच्याच बर्म्युडयाच्या खिशात गेला. आता निक्कीनं सकाळी सकाळी लाडात येऊन फोन केला तर पंचाईत, ……. परल्याचा जीव उलघाल…….. कमीत कमी दहा वेळा तरी देलवाडी मातेला नवस बोलून झाला.

जेटी जवळ आली तशी आवराआवर सुरू झाली, …… बोली लावणारे आधीच येऊन बसलेले, …. अंधुक प्रकाशातच बोट धक्क्याला लागली.

परल्या पाट्या भरू लागला, ……. अजून तीनचार जण मदतीला आले, …….. एकेका वाटयाची आशा त्यांनाही, …… अर्ध्या तासात तर मासळी वेगवेगळी करून झाली. बोली लावायला सुरुवात झाली. बाबा त्यात गुंतून पडला. अन परल्याचं लक्ष गेलं, वर कठड्याला टेकून निकी उभी होती, ……… परल्या टरकला. एवढ्या पहाटे, ही कशी काय?

कुणाचं लक्ष नाही पाहून तो सटकला,

“तू कधी आली ? …..”

“पहाटे चार पासून हितच हाय मी ……..झोपच येत नव्हती, म्हणलं सकाळी सकाळी तुझं तोंड बघावं म्हणून आले.”

“काळजी वाटत हुती ? ”

“हं ………” म्हणताना तिचे डोळे भरून आले, अन मेसेज पोचल्याच्या खुणा फोन न बघताच निळ्या झाल्या. बराच वेळ डोळ्यात हरवला.

“मांगेल्याच्या पोरीक येवडी धास्ती बरी न्हाई, ……” बाबाचा करडा आवाज आला, ……. परल्याचा बाप हिशोबातून मोकळा झाला होता, …. दोघे सकपकले. त्याच्या खिशातली बंडलं चेहऱ्यावर ओसंडून वाहत होती……. त्यामुळं रागे भरण्याची शक्यता नव्हती …… पण जाता जाता वळून म्हणाला, ” येवडी धास्ती करू चाली नै, ……. ती जमीन बग, ……….  एव्हडा उधानतो, कधी रुसून ओहोट लागतो, तरी त्या समींदरा संगट संसार फुलवते, ……… तुवा बापाला निरोप सांग, खंबा घिऊन ये म्हणा सांजच्याला.”

बाबा निघून गेला, ……

परल्या निकीच्या डोळ्यात डोळे घालून पहात राहिला,………..

बाबाच्या निरोपानं मगाच्या तिच्या डोळ्यातल्या, निळ्या खुणा अधिकच गडद होऊन वाहू लागल्या.

Image by Quang Nguyen vinh from Pixabay 

B_R Pawar
Latest posts by B_R Pawar (see all)

B_R Pawar

बी आर पवार , भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये नोकरी. शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनिअर आहे. त्याखेरीज कथा, कविता, चित्रकलेत रमतो. जीवनानुभव शब्दात चितारायला आवडतो.

14 thoughts on “निळ्या खुणा…

  • August 11, 2020 at 2:37 pm
    Permalink

    खूप छान

    Reply
  • August 11, 2020 at 4:17 pm
    Permalink

    सुरेख 👌🏻👌🏻

    Reply
  • August 12, 2020 at 9:50 am
    Permalink

    वा!👍 फार छान.

    Reply
  • August 13, 2020 at 7:51 pm
    Permalink

    Surekh…majja Ali jara vegal kahi vachayla milal

    Reply
  • August 14, 2020 at 4:17 am
    Permalink

    Dhanyawad mitrano !

    Reply
  • August 14, 2020 at 5:11 pm
    Permalink

    खुपच छान….वेगळी कथा👌👌👌

    Reply
    • August 15, 2020 at 10:41 am
      Permalink

      सुंदर 👌👌👌👌👌

      Reply
  • April 10, 2021 at 9:45 am
    Permalink

    Vegli bhashashailee…

    Surekh varnan…..Vegla anubhav….mast

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!