व्हॉट द फ* !!- जिभेवरील F चा व्हायरस

        के. बी. सी.  चा झगमगता सेट …
श्री अमिताभ बच्चन   त्या दिवशीच्या  ‘सेलिब्रिटी’  चं नाव पुकारून  अदबीने स्वागताला
प्रवेशद्वारी उभे …जेमतेम सतरा अठरा वर्षांची आलिया भट प्रवेशते  आणि म्हणते ,  “लुकिंग सेक्सी !!”
काहीतरी निरामय  संगीत  सुरू  असतांना  नखांनी ओरखडल्या चा आवाज ऐकल्या सारखं वाटलं . कितीतरी काळ  ते खटकत राहिलं . त्या नंतर मग तरुण मुलं मुली एकमेकांना
“मस्तं सेक्सी चप्पल घेतली ग !”
किंवा  “आज डिनर चा प्रोग्राम ? …सेक्सी !! “
  अशा शब्दात बोलतांना ऐकायला येऊ लागली   तेव्हा कानांनी मेंदूला फक्त हाच शब्द नाही तर  ‘असे’  अनेक नवे शब्द नव्याने शिकवले . ( नाही म्हणायला सिनेमात गाणे ऐकले होते , पण संवादात इतका सहज वापर नवीन होता .) म्हणजे   ‘आकर्षक’ किंवा दिलखेचक अशा अर्थाने  सेक्सी हा शब्द आजची ही मुलं अगदी सहज वापरत असत .  पुढे ह्याचे मोठे भावंडं येणार आणि हा शब्द मिळमिळीत होणार असं त्यावेळेला वाटलं नव्हतं .  नंतर अशी अनेक आक्रमणं झाली .
  अक्राळविक्राळ  समाज माध्यमातून आयात झालेल्या अनेक परदेशी शब्दांनी  तरुणाईची भाषाच बदलवून टाकली .    काळानुरुप टी. व्ही  चॅनेल्स वर  संपूर्ण  कुटुंबासोबत कुठलेली दृश्य बघताना कशी नजर मरत गेली , तसं  आजच्या तरुणाई  चे संवाद ऐकतांना आपले कान  ‘वारताएत’ .  त्यातून वेब चॅनेल्स नि तर पार हद्दच केलीय .
*नालायक , दळभद्री , वेडी , मूर्ख …अशा सोज्वळ रागीट संबोधनांची जागा*  *पाश्चात्यांनी  संक्रमित केलेल्या “फ”  च्या शब्दांनी कधी घेतली ते कोवळ्या कोवळ्या पोरा पोरींनाही कळलं नाही* . मोठं दुर्दैव म्हणजे पुढील पिढी जिच्या हातात आहे त्या तरुण मुला मुलींना ह्याशिवाय बोलताच येत नाही .
*अनेक साधे साधे शब्द , जसे* …
*जाऊदे मरुदे , खड्ड्यात जा , बापरे , आईग* ! , जोरात ,
शी! ह्या  सारख्या अनेक उद्गारवाचक शब्दांसाठी एकच शब्द  वापरल्या जातोय ,  “”फ*”” !!!
सरळ सरळ लैगिक क्रिया दर्शक शब्द !
सोशल मीडियावर , कॉलेज कट्ट्यावर ,  दैनंदिन संवादात , ऑफिस मध्ये  याचा नको तितका आणि दुर्दैवाने सर्वमान्य सुळसुळाट झाला आहे . ननेटफ्लिक्स , ऍमेझॉन , hotstar आणिक बऱ्याच वेब चॅनेल्स वर लैंगिकता , नग्नता , अभद्र शब्द यांचा बीभत्स भडिमार आहे . ह्यावर अंकुश ठेवणारं मंडळ अजून कसं अस्तित्वात नाही ?
*एखाद्या गोष्टीतून स्वर्गसुख वाटतंय किंवा आनंद वाटतोय हे निदर्शनास आणतांना* *ह्या शारीरिक सुखाशी निगडित वापरल्या जाणाऱ्या शब्दाचा वापर  इतक्या वेगात झाला की  हे चूक आहे , याला आवर घालायला हवा याची जाणीव होण्या आधीच हा तरुण जिभेवर घट्ट रुतून बसला देखील* !
लैंगिक कृती हा आधीपासूनच शिव्यांचा गाभा राहिलाय . *सतराव्या शतकाच्या शेवटी  “फ*”  हा शब्द एका इंग्रजी कवितेत आल्याने त्याची प्रचंड चर्चा झाली होती* . वाईट गोष्टींचा प्रसार फार पटकन होत असतो ह्या नियमानुसार तो प्रचलित झाला , आणि १९६५ मध्ये ह्या शब्दाला डिक्शनरीत जागा मिळाली .
     ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी’  ह्या म्हणीनुसार
‘जिच्या हाती भाषिक वैभव’  असा विचार नको करायला ? ही घसरण का इतक्या सहजपणे स्वकारल्या गेली ? *आपण अनावश्यक लैंगिकता अशी चव्हाट्यावर आणतोय याची जाण ह्या तरुणाईला कोण देणार*?
सवंगता अशी अंगात भिनली की नजर बोथट आणि जाणिवा शिथिल होतात याचा अनुभव घेतोय न सगळा समाज?
     याचा अर्थ फक्त स्त्रीयांनी अथवा मुलिंनीच  सावध व्हावे आणि पुरुषाला
दैनंदिन संभाषणात किळसवाणी स्वैरता असावी असा मुळीच नाही . जबाबदारी तर लिंगातीत आहे , पण भावी आईची पिढी जास्त जागरूक होणे आवश्यक नाही का ? मग ही धुरा आजच्या तरुण पालकांनी खांद्यावर घ्यायला हवी .
     आपल्या कोवळ्या वयातील पाल्याला सतत  शाब्दिक सभ्यतेची जाणीव देत रहावी .
आज जी पिढी पन्नाशीच्या मागेपुढे आहे , त्यांनी नुसतं  ‘च्यायला’ ,
‘च्यामारी’  म्हटलं तरी आईचा फटका बसत होता  , त्यांच्या  ‘भ’ , आई , बहिणीवरील आणि  ‘च’  बाराखडीतील शिव्या इतक्या सहज  निदान रोजच्या संवादात तरी नसत . आता मात्र कसं ..
बाहेर जाताना पाऊस आला ,
“”व्हॉट द फ*!!””
कुणाशी वाद झाला , “”फ* विथ यु!”
स्टॅण्ड अप कॉमेडी मध्ये तर तरुण पोरी सर्रास म्हणतात “”फ* विथ यु ऑल !””
अरे??? हद्द झाली !!  बरं  ऐकणारे , प्रसारण करणारे सगळे हे नुसतं सहनच नाही , तर एन्जॉय करत आहेत!
विचार करा ह्या वरील वाक्यांचा शब्दशः
अर्थ लावला तर ते किती भयानक आहे !
 तसं फार पूर्वीपासून
अर्वाच्य शब्द  ही काही फक्त पुरुषांची मक्तेदारी नव्हतीच . पण स्त्रियांच्या तोंडी  सर्रास  लैंगिकतेशी निगडीत  शब्द समूह नसत . पुरुषांनी मात्र  आतली मळमळ ओकताना  बीभत्स , अर्वाच्य आणि लैंगिकता चव्हाट्यावर आणणाऱ्या भाषेचा मुक्त वापर केला . सौम्य शब्दांची वासलात लावली .
     कुठलेच शाब्दिक सोवळेपण न जपता  आपल्या संतापाचं  यथोचित प्रदर्शन करण्यासाठी  समोरच्या व्यक्तीला जास्तीत जास्त अपमानित  करण्याहेतूने  स्त्री देहाला केंद्रस्थानी ठेवून शिव्यांची  रचना करण्यात आली .
    क्वचित संतसाहित्यात ही काही प्रेमळ शिव्या सापडतात .  स्त्रीयांच्या हक्कांसाठी  जग  भरात लढा देणाऱ्या असंख्य पुरोगाम्यांना ह्या शाब्दिक उत्पीडनातून तिची अंशतः देखील सुटका करता आली नाही . समाजातील इतर विकृती इतक्या प्रखर होत्या की त्या पासून तिची काही अंशी मुक्तता करताना  देखील अनेक पिढ्या खर्ची पडल्या .  मग तिला सतत भोग्य समजत स्त्री देह आणि लैंगिक संबंध  ह्या भोवती फिरणाऱ्या शिव्यांकडे स्त्रियांना गांभीर्याने बघता आलेच नाही .
    त्यातल्या त्यात एक समाधान होतं की निदान  स्त्रियांचं तरी इतकं जिव्हास्खलन झालं नव्हतं .
आतली ऊर्जा इतर समाजविघातक कामांकडे वळण्यापेक्षा शिव्या वरून आत लपलेल्या राक्षसाला शांत करण्यात ह्या शिव्यांचा वाटा आहे हे देखील काबुल करावे लागेल .
पु. लं  नि म्हटल्या प्रमाणे
*शिवी ही सोड्याच्या बाटली प्रमाणे फुटली पाहिजे ,तरच संतापाचं पूर्ण स्वरूप आकारबद्ध होतं*.
*शिवीत आशयाला नाही तर आवेशाला महत्त्व आहे* .
 ह्यातील विनोदाचा भाग सोडला तर लक्षात घेऊ की फक्त संतापाला वाट करून देतांना ह्याचा वापर अधोरेखित होतो ;
 उठता बसता , चालता बोलता नाही!
      जरा आपल्या भोवती असणाऱ्या तरुण वर्गाच्या संवादांना ऐका . हा *फ*’
चा व्हायरस  त्यांच्या शाब्दिक हार्ड डिस्क ला  कर  करप्ट  करून बसलाय .  ह्या विषयावर अनेक ‘ बेस्ट बुक सेलर्स’  पण आहेत , जसे
बेंजामिन बर्गन यांचं
*WHAT THE F*.
यात त्यांनी शिवराळ भाषा , समाजाची नैतिकता , जिभेच्या शील अश्लील मर्यादा , त्यांचे पडसाद आणि त्यातून वर उठण्याची आवश्यकता ह्याचा बौद्धिक उहापोह केलाय .
ही जागृती आपल्याकडे येणं किती गरजेचं आहे ह्याची अजून  दुर्दैवाने आपल्याला जाणीवच झालेली नाहीये .
कोव्हीड–19 वर आपले शास्त्रज्ञ  लवकरच लस शोधून काढतीलच , पण जिभेवर  रुतून आत झिरपणाऱ्या ह्या
“”फ*””  च्या व्हायरस वर कोण लस शोधणार?
©*अपर्णा देशपांडे*
Image by Gerd Altmann from Pixabay 
Aparna Deshpande
Latest posts by Aparna Deshpande (see all)

Aparna Deshpande

अपर्णा देशपांडे - (B.E E&TC , M.A soc ) एक अभियांत्रिकी प्राध्यापिका . समाज माध्यमं आणि वर्तमानपत्रात नियमित लेखन . वाचन आणि चित्रकारितेची विशेष आवड .

9 thoughts on “व्हॉट द फ* !!- जिभेवरील F चा व्हायरस

  • August 15, 2020 at 3:59 am
    Permalink

    इंग्रजी f तरी आता कॉमन झालाय. हिंदी शिव्या भयाण आहेत.

    Reply
    • August 15, 2020 at 3:25 pm
      Permalink

      हिंदी आपल्याला जवळची भाषा आहे न , म्हणून

      Reply
  • August 26, 2020 at 8:27 am
    Permalink

    मस्त
    कूठे तरी हे सर्व जानवत राहत

    Reply
  • October 1, 2020 at 8:23 am
    Permalink

    खरच, हे कुठेतरी थांबायलाहवं।

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!