मुक्कामपोस्ट बाल्कनी
या घरात येऊन आम्हाला आता वीस वर्ष होतील. वीस वर्ष हा मोठा काळ आहे. मित्रमैत्रीणी जेव्हा बदल्यांबद्दल, घर बद्दलण्याबद्दल, नवीन घरांबद्दल, शिफ्टिंगबद्दल बोलत असतात तेव्हा मला त्यात फारसा भाग घेता येत नाही कारण त्याचा काहीच अनुभव मला नाही. मी आजवर एकदाही घर बदललेलं नाही. हे चांगलं की वाईट ते माहीत आहे. पण हे असंच आहे. त्यामुळे मी त्यांच्या गप्पा फक्त ऐकत राहते.
मला वाटतं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे, भटकंतीचे, वेगवेगळ्या वास्तूंचे जसे वेगवेगळे अनुभव असतात, तसेच एकाच ठिकाणी राहून, तळ ठोकून, वर्षानुवर्षे केलेली आजूबाजूची बदलती निरीक्षणं ही देखील तितकीच महत्त्वाची असतात. आपल्या डोळ्यांदेखत तीच ती जागा बदलत असते, वेगळं रूप घेत असते. कधी ते रूप नेत्रसुखद असतं, कधी भीषण.
नशीब म्हणा किंवा काही, आमच्या घराच्या बाल्कनीसमोर फक्त हिरवाई आहे. गेल्या काही आसपासच्या परिसरात अनेक बदल झाले पण ही समोरची हिरवाई गर्द वाढत गेली आहे. आसपास मोठमोठे बिल्डिंगांचे ठोकळे उभे राहिले, पण या सभोवतालच्या झाडीने ते आम्हाला फारसे दिसणार नाहीत याची कायम काळजी घेतली. टेरेसच्या बरोबर समोर नारळाची चार मोठाली झाडं आहेत. तो नारळवाला माणूस वर्षातून एकदा येऊन झाडावर सरसर वर चढत जाऊन हलक्या हाताने पटापट नारळ खाली टाकतो, तेव्हा बदक्कन असा एक वेगळाच आवाज येतो. आमच्या दोन्ही मुलांनी लहान असताना हे सर्व दृश्य डोळ्याचं पातही न लवता पाहिलं आहे. आजकाल लहान मुलांना असली ऍक्शन(!) घरबसल्या पाहायला मिळणे हे भाग्यच म्हणायला हवं. कोकणात, गावात हे रोजचंच दृश्य असेल, पण माझ्यासारख्या ऐन शहरात, मध्यवस्तीत राहण्यारीला याचं फार अप्रूप आहे. अपरात्री झाडावरून एखादा नारळ धाडकन खाली पडल्याचा आवाज येऊन दचकून जागं होण्यापासून ते आता गाढ झोपेत, “हं, पडला का?” असं वाटण्यापर्यंतचा माझा प्रवास झालेला आहे. रात्रीतून कधी जाग आली आणि या झाडांकडे पाहिलं की एक प्रकारचा आधार वाटतो. आज इतके वर्ष पाहतो आहे यांना. दोस्तच झाले आहेत जणू ही झाडं आमची!
बाल्कनीच्या उजवीकडे एक चाफ्याचं झाड आहे. आम्ही इथे आलो तेव्हा ते छोटं होतं. आता ताडमाड मोठं झालं आहे. उन्हाळ्यात ते फुलायला लागतं आणि वाऱ्याच्या झुळकीबरोबर चाफ्याच्या फुलांचा मंद सुवास घरात पसरतो. श्रावण महिन्यात सुद्धा म्हणजे सध्या तर ते फुलांनी अगदी डवरलेलं आहे. हिरव्या पानांच्यामधून डोकावणारी ती पिवळी फुलं फार सुंदर दिसतात. बाल्कनीच्या बरोबर खाली, समोरच्या बाजूला छोटीशी बाग आहे. पूर्वी तिथे एक मोठं, छान पसारा असलेलं एक वेगळंच झाड होतं. कधीही कुठेही न पाहिलेलं झाड होतं ते. आमच्या माळीकाकांनी विचारलं की म्हणायचे, “हाय असंच वाडलंय कुटलं तरी.” खूप पक्षी यायचे तिथे. बहुदा फायकस असावं. त्या झाडाखाली कायम सावली असायची. आमचे माळीकाका, त्यांची बायको, जेवण करून तिथे उन्हाळ्यात दुपारच्या वेळेला, गारव्याला पहुडलेले असायचे. चार वर्षांपूर्वी ते झाड एका पावसात पडलं. अचानक ती जागी भयंकर ओकीबोकी दिसायला लागली. अर्धवट उघड्या पडलेल्या त्या झाडाच्या खोडाकडे पाहून फार वाईट वाटायचं. एखाद्या नववधूला साजशृंगाराशिवाय पाहतोय असं वाटायचं.
आता माळीकाकांनी तिथे नवीन झाड लावलं आहे. नवऱ्यानी एक उंबराचं झाड पण झाड त्यांना दिलं आहे, मी एक बेलाचं दिलं आहे. ही झाडं वाढली की ती जागा पूर्वीसारखी बहारदार आणि हिरवीगार होईल. त्याच जागेच्या आजूबाजूला केळीची झाडं आहेत. माळीकाका अधूनमधून सगळ्या सोसायटीला केळी देत असतात. त्याच्याच बाजूला गोलात सुपारीची झाडं लावली आहेत. नवऱ्यानी कोकणातून येताना कधीतरी आणली होती. त्याला फार हौस आहे. झाडं आणण्यायची, जगवण्याची, लावण्याची आणि वाटायची. आता ती सुपारीची झाडं छान वाढली आहेत. वरून पाहिलं की त्यांच्या फांद्या नक्षीदार दिसतात.
त्या खालच्या बागेतून वर पाचव्या मजल्यापर्यंत एक एमएसइबीची विजेची तार गेली आहे. इथल्या हिरवाईला जणू गालबोट असल्यासारखी ती मधूनच गेली होती. पण इथल्या nature architect ला ते पटलं नसावं. त्या वायरीवर कधीतरी मागे एक रानटी वेल लटकला. मग तो त्या तारेवरच वाढत गेला. ती तार हिरवीगार झाली. त्या भरगच्च हिरव्या झुपक्यामुळे तारेची शोभा वाढली आहे. अनेक पक्षी त्या हिरव्यागार झोक्यावर बसलेले दिसतात.
डावीकडे आंब्याची झाडं आहेत. मुलांना दगड मारून पाडण्यइतक्या कैऱ्या त्याला लागतात. माळीकाका बिनधास्त कैऱ्या पाडू देतात. आमचे माळीकाका नुसते माळ्याची नोकरी करत नाहीत, तर झाडापक्ष्याफुलांवर त्यांचं मनापासून प्रेम आहे. दसऱ्याच्या, लक्ष्मीपूजनाच्या आदल्यादिवशी सगळ्यांना आवर्जून आंब्याची पानं आणून देतील. श्रावणतल्या सोमवारी बेल देतील. मंगळागौरीला लागणारी सगळी पत्री शोधून आणून देतील. अशी माणसं आजकाल फार कमी मिळतात आणि असा माणूस झाडांची काळजी घ्यायला असेल तर ती बाग का नाही बहरणार?
लॉकडाऊनमध्ये माळीकाका दोन महिने त्यांच्या गावी अडकले होते. झालं, आमच्या बागेची सगळी रयाच गेली. त्यांच्या जागी काम करणारा माणूस झाडलोट करून, झाडांना पाणी घालून जायचा पण त्यात ओलावा काहीच नसायचा. या काळात टेरेसवरून खाली पाहिलं तर सुकलेल्या पानांचा सडा सगळीकडे पसरलेला दिसायचा..पण तो सुद्धा दिमाखदार दिसायचा बरं का! निसर्गाचं ते अस्ताव्यस्त रूपही आवडलं होतं मला.
पावसाची मजा तर बाल्कनीमधून पाहण्यात काही औरच मजा आहे. कधी रिपरिप, कधी मुसळधार, कधी रिमझिम, त्याची विविध रुपं एका हातात चहाचा मग घेऊन पहात राहावं. आमच्या बाल्कनीतून पक्षी पण चिकार दिसतात. चिमणी, कावळा, मैना, पोपट, भारद्वाज, बुलबुल तर रोजचेच. पण अधूनमधून खंड्या, झाडावर ठोके मारणारा सुतारपक्षी, पिवळं पोट असलेला शिंजीर, घरट्यासाठी माल जमवणारी सुगरण हे सुद्धा दर्शन देतात. खंड्या दुपारी येऊन माळीकाकांनी पक्ष्यांसाठी पाणी भरून ठेवलेल्या थाळीतून पाणी पिऊन जातो आणि बरोबर संध्याकाळचे सात वाजले की गोड शीळ घालत सात ते आठ पोपट येऊन त्या हिरव्यागार वायरीवर झोके घेऊ लागतात. लॉकडाऊन काळात इथले पक्षी आणि इथली हिरवाई दुपटीने वाढली असं मला जाणवलं.
या लॉकडाऊनच्या काळात मी सर्वात जास्त वेळ आमच्या बाल्कनीमधे घालवला आहे, घालवते आहे. लॅपटॉपवर काम इथेच केलं, भाज्या इथेच निवडल्या, गाणी सुद्धा इथेच ऐकली अन पुस्तकं सुद्धा इथेच वाचली. यापूर्वी कधीही न पाहिलेली आजूबाजूच्या परिसराची रुपं मला आमच्या बाल्कनीमधून पाहायला मिळाली. लोक stress घालवण्याकरता घराबाहेर निसर्गरम्य जागा शोधत असतात, मला ही जागा माझ्या घरातच मिळाली. खूप आनंद दिला या जागेने मला.
एक गंमत सांगते.
युरोपमध्ये उन्हाळी सुट्टीचं खूप महत्त्व असतं. सगळे लोक गाड्या काढून ऊन अंगावर घेण्याकरता, टॅन होण्याकरता त्यांच्या आवडत्या गरम ठिकाणी जात असतात. जर्मनीतले लोक हॉलंडला जातात, फ्रेंच लोक ग्रीसला जातात, वगैरे. हे सुट्टीचं पेव युरोपात इतकं फोफावलंय की अलीकडे ट्रिपच्या ठिकाणी प्रचंड गर्दी असते, म्हणून लोक घरीच राहण्याला प्राधान्य देतात. घरी निवांत राहावे, गर्दी, प्रदूषण, गडबड, गोंधळापासून वाचावे हे त्यांना जास्त आवडतं. अनेक लोकांना “व्हेकेशन” परवडत नाही ती लोकं देखील घरी राहणं पसंत करतात. अश्या लोकांना सुट्टी संपल्यावर जेव्हा कोणी विचारतं, “काय मग, या वर्षीची उन्हाळी सुट्टी कुठे घालवली?” तेव्हा ही लोकं उत्तर देतात, auf den Balkonien” म्हणजे “सुट्टी बाल्कनीत घालवली.” याचा अर्थ मी फारसा कुठे गेलो नाही/मला कुठेच जाता आलं नाही/मला परवडत नाही/मला गर्दीत जायची इच्छा नव्हती.
तसंच, या वर्षी माझीही सुट्टी “auf den Balkonien” च गेली आणि काय झकास सुट्टी झाली, नाही का?
Image by Annalise Batista from Pixabay
- समीर – अनयाच्या वॉट्सऍप गोष्टी - September 26, 2022
- कच्चा लिंबू - June 20, 2022
- आई - January 21, 2022
surekh
Mast, we are also blessed to have balcony like this!😊
That’s nice to know.
Utttam !
कित्ती छान! 🙂👌👌
Mukkam post Balcony vachlya vachlyach ,Urlaub auf den Balkonien’ athvla.. 😅👍
Masta lekh, Gauri ma’am.. Reading this while seating in my Balkonien.
फारच छान वर्णन केले आहे… खरंच परिसर खूप छान आहे…. मोरांचे आवाज पण छान वाटतात पहाटेच्या वेळी…
👌👌👌
खूप छान
माझ्या अलिबागच्या घराची आठवण झाली…
या lockdawn मुले जवळजवळ पाच महिन्यात जाणे झाले नाहीय… खूप मिस करतेय…
मस्त
मस्तच, 👍👍फोटो पहायला आवडतील