“प्यासा सावन”- तृप्ता
उत्तररात्रीचा प्रहर चालू होता. उजाडायला अजून थोडाच वेळ बाकी होता. हलके हलके विरत असलेल्या अंधाराने भोवतालच्या निसर्गाला एक वेगळेच परिमाण दिले होते. अंधारात ती छोटीशी पर्णकुटी धवल वस्त्र पांघरून झोपलेल्या एखाद्या मुग्ध कन्येसारखी दिसत होती. जवळून वाहणाऱ्या झऱ्याचा खळखळाट किंवा मधेच ओरडणारा एखादा चुकार पक्षी त्या निरव शांततेचा भंग करत होते – पण तेव्हढयापुरताच. बाकी सर्व सृष्टी शांतपणे निद्रादेवीच्या कुशीत पहुडली होती.
कुटीत झोपलेल्या तिच्या चेहऱ्यावर एक मंद हसू पसरले होते. एका सुंदर स्वप्नाचा सुखद अनुभव ती घेत असावी असं तिच्या चेहऱ्यावरुन वाटत होतं. तो अनुभव जसा जसा उत्कट होत होता तसतसं तिच्या चेहऱ्यावरचं हसू फुलत चाललं होतं.
निर्जन भागातल्या त्या अरण्याच्या एका कडेला थोडी मोकळी जागा बघून तिच्या तातांनी – ऋषी किदंबिंनी – तिथे ही पर्णकुटी उभारली होती. कुणाचा उपद्रव होऊ नये किंवा तपसाधनेत व्यत्यय येऊ नये असा त्यांचा विचार त्यामागे होता. पण बरोबर असलेली आणि वयात येऊ लागलेली त्यांची कन्या तिथे कितपत रमेल असा विचार सुरुवातीला त्यांच्या मनात यायचा व ते चिंतीत व्हायचे. पण ती मुग्ध कलिका हळूहळू तिथल्या निसर्गाशी बोलू लागली, तिथल्या पशुपक्ष्यांशी खेळू लागली आणि त्या शांत, सुंदर निसर्गाचाच एक भाग बनली. तिला निसर्गाच्या सानिध्यात मोठी होताना बघून मात्र ते निश्चिंत होत गेले व आईविना वाढवलेल्या तिला त्या निसर्गाच्या हाती सोपवून आपल्या तपसाधनेत गर्क झाले.
एव्हाना तिचं स्वप्न संपलं असावं व शरीरभर पसरत चाललेल्या एका अनामिक ऊर्जेची चाहूल लागून तिने डोळे उघडले. पहाटे उजाडण्याच्या आत नकळत जाग येण्याचा हा अनुभव तिला नवीन होता. स्वप्नातल्या त्या गूढरम्य अनुभवाने तिचं हृदय अजूनही धडधडत होतं. तिनं आजूबाजूला बघितलं.. बाहेर पसरलेलं फिकट चांदणं हलकेच पर्णकुटीत शिरलं होतं. त्या मंद प्रकाशात तिच्या ओळखीच्या वस्तू अधिकच सुंदर भासत होत्या. कुटीतून बाहेर पडून बाहेरचा निसर्ग अनुभवावा अशी दाट उर्मी एकदम तिच्या मनात दाटून आली. तिने नेहमीच्या जागेवर बघितलं तर काही अंतरावर तिचे प्रिय तात शांतपणे झोपले होते. त्यांचा सुरकुतलेला प्रेमळ चेहरा त्या चांदण्यात चमकत होता. आपल्या अंगावरचे वस्त्र सावरत ती हलकेच उठली आणि कोणताही आवाज न करता पर्णकुटीचे दार उघडून तिने बाहेर पाऊल टाकलं.
बाहेर आल्यावर पहाटेचा मंद, सुगंधी वारा तिला प्रेमाने येऊन बिलगला. तो मंद सुगंध दूरवरून कुठूनतरी येत होता. रातराणीच्या त्या मंद, धुंद सुवासाने ती वेडावली. तिने एक दीर्घ श्वास घेतला. आपल्या श्वासातून तो सुवास खोलवर आपल्या नसानसांत भिनतो आहे असं तिला वाटलं आणि एका विलक्षण धुंदीत ती चालू लागली. तिच्या तळपायांना मऊ लुसलुशीत गवताचा कोवळा स्पर्श होत होता. तो आज अजूनच सुखद का वाटतो आहे हे तिला कळेना. नकळत तिचं लक्ष वर आकाशाकडे गेलं. निशेला निरोप देत आणि उषेचं स्वागत करायला थबकलेल्या काही चुकार चांदण्या तिच्याकडे पाहून हसत होत्या. पूर्व क्षितिजावर नाजूकशी चंद्रकोर हळू हळू फिकी होत होती. नभांगणातालं ते दृश्य बघून तिला एकदम तिचं स्वप्न आठवलं आणि नकळत ती स्वतःशीच लाजली. त्या चांदण्या जणू खाली उतरून तिला चिडवू लागतील असं तिला वाटलं.
एखाद्या निर्जन रानात दुरून बासरीचे मंद सूर कानी यावेत तसं जवळच वाहणाऱ्या झऱ्याचा खळखळाट कानी येत होता. निसर्गाचं ते मंद संगीत तिला हवंहवंसं वाटलं. नकळत तिची पावलं त्या झऱ्याच्या दिशेने वळली.
झऱ्याच्या पाण्याचा थंड स्पर्श पावलांना झाला तशी ती नखशिखांत शहारली. त्याचबरोबर एक गोड शिरशिरी तिच्या अंगाअंगात पसरत गेली. हृदय परत एका अनामिक ओढीने धडधडू लागले. नकळत तिने तळहातांनी आपला चेहरा झाकून घेतला. ‘हे नक्की काय होतंय मला?’ ती मनानेच आजूबाजूच्या निसर्गाला विचारु लागली.
हळूहळू चेहऱ्यावरचे तळहात बाजूला करत तिने ते आपल्याच उष्ण होत चाललेल्या नाजूक कानांवर धरले. आपल्याच हृदयाचे ठोके तिला तिथे जाणवू लागले. नकळत तिचे हात कानांवरून गळ्यावर आणि गळ्यावरून खाली येत तिच्या धपापणाऱ्या उरावर स्थिरावले. तिथली ताठरता सहन न होऊन तिने स्पर्शाने ती कुरवाळून शांत करायचा प्रयत्न केला. पण त्या स्पर्शाने मोहरत एक वीज तिच्या अंगात सळसळत गेली आणि अग्नी विझण्याऐवजी अधिकच प्रज्वलित झाला.
तिचे शरीर नक्कीच तिला काहीतरी सांगत होते आणि ते समजून घ्यायची ओढ तिला लागली होती. मग झऱ्याच्या बाहेर येऊन बाजूच्याच तृणपात्यांवर ती काही क्षण उभी राहिली. अंगातले वस्त्र भिजले होते, अस्ताव्यस्त झाले होते. पण त्याचीही तिला काहीच तमा वाटली नाही. उलट त्यांचा आपल्याला भार होतो आहे हे जाणवून तिने ते अलगद आपल्या देहावेगळे केले आणि ती हलकेच त्या तृणपात्यांवर पहुडली.
पण त्यातही तिला समाधान वाटेना. अजून काहीतरी पाहिजे आहे.. पण नक्की काय ते समजत नव्हतं. मग तिने प्रेमाने त्या तृणपात्यांवरुन हलकेच हात फिरवायला चालू केले. या कुशीवरून त्या कुशीवर वळत सर्वांगाला त्यांचा स्पर्श होऊ दिला. ती पाती आता तिला सर्व बाजूंनी स्पर्श करत होती – कधी हळुवार तर कधी किंचित टोचरा ! इथे तिथे होणारा तो स्पर्श तिला आवडू लागला..जवळचा वाटू लागला..
अचानक तिच्याही नकळत ती त्या तृणपात्यांवर पालथी झाली. तिचे अवघे शरीर आता थरथरत होते. हृदयाचे ठोके अजूनच जलदगतीने पडू लागले होते. तिच्याही नकळत तिच्या शरीराच्या काही हालचाली होऊ लागल्या.. जणू तिचे अवघे शरीर त्या तृणपात्यांना कुरवाळू बघत होते..कवेत घेऊ बघत होते.
मग एक क्षण असा आला की तिच्या शरीरभर उत्तेजनेची एक लाट पसरली आणि मुक्तपणे ती त्या लाटेवर स्वार झाली..पुढचा प्रवास केवळ अदभुत होता.. तिने कधीच न अनुभवलेला! आत्यंतिक सुखाने तिला भोवळ आली आणि तिने डोळे गच्च मिटून घेतले.
त्या लाटा विरल्यावर काही वेळाने तिने हलकेच डोळे उघडले व आजूबाजूला बघितले. ती तृणपाती, तो निर्झर.. ती चंद्रकोर..सगळा निसर्ग आपल्याकडे बघून मंद स्मित करत आहे असा तिला भास झाला.
नकळत तिच्याही चेहऱ्यावर एक आगळे हसू पसरले..
© उमेश पटवर्धन
Latest posts by Umesh Patwardhan (see all)
- तो… - November 6, 2020
- “प्यासा सावन”- नववधू प्रिया मी..भाग ५ - August 31, 2020
- “प्यासा सावन”- नववधू प्रिया मी..भाग ४ - August 27, 2020
Chan lihile aahes umesh!!
धन्यवाद !
निसर्ग वर्णन अप्रतिमच
धन्यवाद !
👌👌👌👌
Thanks 😊
वेगळी कथा👍
छान लिहिलंय.
धन्यवाद !