“प्यासा सावन”- तृष्णा
राजेश आज तसा रागातच बाहेर पडला. त्याने रागानेच मीनलकडे पाहिले तर तिने उगाचच नाक उडवले आणि तो आणखीनच वैतागला. चेहऱ्यावरील नापसंती दर्शवित तो घरातून बाहेर पडला. खरंतर घरात आई, बाबा आणि त्यातच काल नाशिकहून आलेली बेबी मावशी असल्याने आपण काहीच करू शकलो नाही याचेच ते दुःख होते. त्यात मीनल मुद्दाम त्याला पेटवीत असे आणि मग तो असा चिडचिड करत असे. बरं घरात कोणी विचारले काय झाले तर त्याला सांगताही येत नसे.
आता आज सकाळचीच गोष्ट. काय गरज होती सकाळी आवरून डोक्यावरून आंघोळ करून, निवांत झोपलेल्या मला, ते ओलेते केस टॉवेलने झटकताना उडणाऱ्या तुषारकणांनी जागे करण्याची? तिला माहिती आहे तिने असे केले की माझे मन अधीर होते, तिला मिठीत घेण्यासाठी बेभान होते. आपल्या हक्काच्या बेडरूम मध्ये आपल्याच बायकोला मिठीत घ्यावे तर म्हणे आधी उठ आणि आवर. तोंड तर धू. आपण आवरून बाथरूम मधून बाहेर यावं तर बाईसाहेब आज नेमकी माझी आवडती जांभळ्या कलरची साडी नेसून तयार होत होत्या. त्या साडीत ती एकदम कातिल दिसते हे तिला स्वतःला ही माहित आहे. आणि मग मी जवळ आलो की काहीतरी कारण सांगते. आज काय म्हणे श्रावणी शुक्रवार आहे. पूजा करायची आहे वगैरे. तोंड गोड करण्यासाठी मी जवळ गेलो तर अरे मला आज खालच्या पेठेंच्याकडे सवाष्ण म्हणून जायचे आहे. त्यामुळे दुपारपर्यंत माझा आत्ता उपवास… आणि त्यामुळे तुझा संध्याकाळपर्यंत… असे म्हणत एक डोळा बंद करून खट्याळ पणे हसत मला दूर लोटले. त्यामुळे थोडासा खट्टू होऊनच मी ऑफिससाठी बाहेर पडलो.
राजेश एका फायनान्स कंपनीत क्रेडिट मॅनेजर आहे. ६ फूट उंच, मजबूत शरीरयष्टी, गव्हाळ रंग, काळे पाणीदार डोळे, कुरळे केस असे त्याचे व्यक्तीमत्व. आपल्या मितभाषी वागण्या बोलण्याने तो समोरच्यावर सहज छाप पाडत असे. सहाच महिन्यांपूर्वी त्याचा मीनलशी विवाह झाला होता. खरंतर अरेंज मॅरेज प्रकार, त्यातूनही कांदेपोहे वगैरे प्रकार त्याला अजिबात आवडत नव्हता. पण मिनू मावशीने पाठवलेल्या मीनलच्या फोटोकडे तो पाहताच राहिला होता. राजेश आपल्यावर लट्टू आहे हे मीनलने पहिल्या भेटीतच ओळखले आणि नाही म्हणायला तिला देखील राजेश मनापासून आवडला होता. त्याचे वागणे बोलणे, स्वभाव या गोष्टी तिला पहिल्या तीन चार भेटीत भावल्या होत्या. नाकारण्यासारखे काहीच नसल्याने तिने सुद्धा लग्नाला होकार दिला होता. बघण्याचा कार्यक्रम झाला, बैठक झाली, लग्न जमले आणि बघता बघता मीनल आणि राजेश लग्नाच्या बेडीत अडकले देखील.
सौन्दर्य शब्दाचा योग्य अर्थ काय असे कोणी विचारले तर ते कळावे म्हणूनच परमेश्वराने मीनलची निर्मिती केली असे राजेश नेहमी म्हणतो. साडेपाच फूट उंच, चाफेकळी नाक, रेखीव भुवया, टपोरे मेहंदी कलरचे डोळे, गोरा रंग, गोल चेहरा, गोबऱ्या गालावर पडणारी खळी, लांबसडक काळेभोर केस याने तिला पाहताक्षणीच समोरच्याची नजर तिच्यावर खिळून राहत असे. त्यातून मौसमी चॅटर्जी सारखा तिचा उजव्या बाजूचा एक दात सुळ्यावर आलेला त्यामुळे ती हसली की विलक्षण सुंदर दिसत असे. त्यामुळेच राजेशला ती पाहताक्षणीच आवडून गेली होती. तिच्याशी बोलल्यावर तिचा स्वभावही आवडून गेला होता. सहा महिन्यात राजेशला तिच्या सौंदर्याची नशाच चढली होती.
अगदी पहिल्या भेटीपासून पहिल्या रात्रीच्या पहिल्या स्पर्शापासून मीनलला देखील राजेश आवडून गेला होता. मधुचंद्राच्या रात्री त्याच्या आश्वासक प्रेमळ मिठीत ती हरवून गेली होती. तो क्षण होता आणि त्यानंतरचा एकांताचा प्रत्येक क्षण होता तिला राजेशचे प्रेम करणे आवडून गेले होते. हनिमूनसाठी शिमला आणि कुलू-मनाली मध्ये सोबतचे १५ दिवस हे कधीच संपू नयेत असे वाटत असतानाच ते संपले आणि दोघांना घरी परतावे लागले. एव्हाना दोघानांही नजरेची भाषा काळात होती. काय केले की समोरचा शहारतो, काय म्हटले की गालावर लाली चढते हे दोघांना कळत होते. एकत्र कुटुंब असल्याने तिचे ते आरस्पानी सौन्दर्य न्याहाळायला आणि तिच्या कुशीत विसावयाला राजेशला बेडरूममधील एकांताची वाट पाहावी लागत असे. अशावेळी सब्र का फल हमेशा मीठ होता है असे मीनल खट्याळपणे म्हणत असे. अशा वेळी राजेशला चेहऱ्यावर आगतिकता न दाखवण्याची कसरत करावी लागत असे.
बाहेर मस्त श्रवण सारी बरसत होत्या. राजेश ऑफिसमध्ये काम करत होता पण त्याचे लक्ष आज कामात लागत नव्हते. अर्थात मीनलने छेडल्याने तो अजूनच बेचैन होत होता. दिवस अगदी कासवगतीने चालला आहे असे त्याला वाटत होते. लंच नंतर काही मिटींग्स आणि कॉल्स मुळे मात्र तो जरा बिझी झाला. फ्री होऊन ऑफिस मधून बाहेर पडेपर्यंत ७ वाजून गेले. त्याने गाडी काढली आणि नाक्यावरच्या मावशींकडून मोगरा घेतला आणि गाडी घराकडे वळवली. तेवढ्यात मीनलचा मेसेज आला. उपवास सोडण्याची वेळ झाली. राजेशच्या काळजाची धडधड पुन्हा वाढली. पुन्हा सकाळसारखी ती गम्मत करते आहे असे समजून त्याने फक्त हा हा करून हसण्याच्या स्मायलीज पाठवून दिल्या आणि त्याने गाडी पळवायला सुरुवात केली.
घरी पोहचून त्याने बेल वाजवली. मीनलने दार उघडले असता तो पाहतच राहिला. रॉयल ब्लू कलरच्या त्या स्लिव्हलेस शॉर्ट वनपीस मध्ये ती अप्रतिम दिसत होती. शिमल्यात घेतलेला हा वनपीस त्याचा आणि तिचा दोघांचाही फेव्हरिट होता. राजेशला पाहताक्षणीच तिला मिठीत घ्यावेसे वाटले. घरी आई, बाबा आणि मावशी असताना आज हिने आज हा ड्रेस कसा घातला? हा प्रश्न त्याच्या मनात तरळून गेला. म्हणजे तसे घरी आई बाबाना काहीच प्रॉब्लेम नव्हता पण मीनललाच थोडे ऑकवर्ड वाटे त्यामुळे ती सगळे असताना हा ड्रेस घालत नसे. घरात हॉल मध्ये कोणी नाही हे पाहून त्याने तिच्या मांसल दांडावरून आपली तर्जनी हलकीच फिरवली. हे असे केले की मीनलच्या अंगावर शहर येतो हे त्याला ठाऊक होते. तिच्या पाठीमागे जाऊन तिच्या खांद्यावर हलकेच हनुवटी टेकवून त्याने तिच्या मानेवर हळूच फुंकर घातली. तिच्या अंगावर सर्रकन काटा आला तसे राजेशने तिला आपल्याकवे वळवले आणि तिच्याकडे पाहून हलकेच हसला. त्याच्या डोळ्यात डोळे घालून मीनलने बाबा अशी हाक मारताच तो गडबडला आणि दूर पळाला. ते पाहून मीनल खळखळून हसली. जाता जाता त्याने मोगऱ्याच्या कळ्या असलेली पुडी तिच्या हाती दिली आणि बेडरूम मध्ये गेला. पण घरातील शांतता त्याच्या लक्षात आली. बाबाना आवाज देऊन बाबा बाहेर आले नाहीत म्हणजे कुछ तो गडबड है हे जाणून त्याने बाहेर येऊन विचारले आई, बाबा, मावशी कुठे गेले?
मीनल म्हणाली ते मघाशीच मिनू मावशीकडे गेलेत.
काहीसे आश्चर्य काहीसा आनंद असे भाव त्याच्या चेहऱ्यावर होते. ते पाहून मीनल म्हणाली अरे बेबी मावशींना जायचे होते मग त्यांनी आईंनाही आग्रह केला. मग बाबा म्हणाले मी पण जातो बरेच दिवस सुधीर काकांसोबत गप्पांची मैफिल जमली नाही.
राजेश म्हणाला अच्छा आणि तुझे ते हळदी कुंकू?
मीनलने येऊन त्याच्या गळ्यात हात घातले आणि म्हणाली ते मघाशीच झाले. आता कोणीच येणार नाहीये आणि आता इथून कोणी बाहेरही जाणार नाहीये.
राजेश म्हणाला आई बाबा काय उद्या येणार आहेत का? ते येतीलच की
मीनल ने नाही अशी मन हलवली
लटक्या रागाने राजेशने विचारले मग हे मला आधी का नाही सांगितले?
मीनल म्हणाली कारण… कारण… सब्र का फल हमेशा मीठा होता है
राजेशने नजरेनेच म्हणजे असे विचारले असता
मीनल म्हणाली ते तिघे पूर्ण विकेंड तिकडेच थांबणार आहेत.
तिच्या या वाक्यावर खुश होऊन राजेशने तिला मिठीत घेतले. हलकेच तिच्या गालावर ओठ टेकले आणि म्हणाला ऐसा मीठा फल है तो हम सब्र करने को तय्यार है मॅडम…
आजची रात्र आणि पुढचे दोन दिवस घरी फक्त आपण दोघेच असणार या जाणिवेने राजेश खुश झाला. मन मोरपिसासारखे हलके होऊन वाऱ्यावर स्वार व्हावे तसे त्याचे झाले. दुधात साखर विरघळावी तशी मीनल त्याच्या मिठीत विरघळली.
मोगऱ्याच्या कळ्यांनी धुंद असे वातावरण निर्माण झाले होते. मीनलच्या मोबाईलवर श्रावणात घन निळा बरसला हे गाणे वाजू लागले. मिठीत हरवलेले राजेश आणि मीनल आता एकमेकांवर चुंबनाचा वर्षाव करू लागले. बाहेर श्रावणसरी बरसत होत्या आणि आत बेडरूममध्ये दिवसभर प्यासेच राहिलेले राजेश आणि मीनल आता एकमेकांची तृष्णा तृप्त करत होते.
– अभिजीत इनामदार
Latest posts by Abhijit Inamdar (see all)
- पाऊस - July 30, 2021
- बडी ताकत के साथ… बहोत बडी जिम्मेदारी भी आती है - May 11, 2021
- आठवणींच्या_पटलावर - April 20, 2021
वा!👍 मस्त कथा अभिजीत.
Thank you !!
छान
Thank you Sir
👍
Thank you!!