“प्यासा सावन”- नववधू प्रिया मी..भाग ४

नववधू प्रिया मी.. भाग ४
उशिरा कधीतरी झोप लागल्याने त्याला अंमळ उशिरा जाग आली. जाग आल्यावर रात्रीचा सगळा प्रसंग आठवून त्याने झटकन बाजूला पाहिले तर ती बाजूला नव्हती. घड्याळात पाहिलं तर आठ वाजत आले होते. अरे बापरे ! आता उशिरा उठल्यामुळे सगळ्यांना चेव येणार आणि सगळे चेष्टा सुरु करणार असे वाटून तो गडबडीने उठला. पांघरुणाची घडी घालून आणि चादर नीटनेटकी करुन तो दबकत बाहेर आला. सुदैवाने बाहेर हॉलमध्ये त्याचे बाबा, काका अशी काही जेष्ठ मंडळी बसली होती. त्यांची नजर चुकवून तो तडक आत बेसिनजवळ गेला. हॉलमधून पॅसेजमध्ये येता येता एकदम ती समोर आली. आपली बायको ! त्याने हळूच तिच्याकडे पाहिले. तिचा चेहरा किंचित उतरला होता आणि डोळे लालसर दिसत होते. नजरानजर झाली आणि झटकन नजर खाली वळवून ती किचनमध्ये घुसली. त्याचाही चेहरा आता चांगलाच उतरला होता.
मग दोन तीन दिवस असेच गेले – क्वचित नजरभेट पण त्यापलीकडे काहीच नाही. त्याला तिचा काहीच अंदाज येत नव्हता. रात्री फक्त एका बेडवर शेजारी शेजारी झोपणे होत होते पण परत तिच्या अंगाला हात लावायचे धाडस त्याला झाले नाही. थोडं जुजबी काही बोलून ती दोघे एकमेकांकडे पाठ करुन झोपू लागली. दिवसा दादा आणि वहिनी मात्र दोघांना मनसोक्त छळत होते. त्यांची सूचक बोलणी, चेष्टा एरव्ही त्याला आवडली असती पण जशी चेष्टा सुरु व्हायची तसं हा कसंनुसं हसून द्यायचा तर ती गप्प होऊन जायची. दादा वहिनीच्या ते हळूहळू लक्षात येऊ लागलं होतं. एकदा तर चौघेच बेडरूममध्ये पत्ते खेळत असताना अशीच थोडी चेष्टा दादाने चालू केली असताना तो थोडा चिडला आणि त्याने थोडंस रागाने तिच्याकडे पाहिलं तशी ती पटकन उठून तिथून निघून गेली. डाव मोडला गेला. तोही उठून गेला तसा दादा वहिनी काय समजायचं ते समजले. ‘आपण बोलू त्यांच्याशी’ असं नजरेनेच त्यांनी एकमेकांना सांगितलं.
त्याची रजा संपत आली होती. आत्ता जास्त रजा न मिळाल्याने हनिमून दोन तीन महिन्यांनंतर प्लॅन करावा लागणार होता. तसे त्याने बॉसबरोबर सेटिंग केले होते. अखेर ज्या दिवशी त्याला ऑफिस जॉईन करायचं होतं त्याच्या आदल्या दिवशी रात्री जेवण झाल्यावर दादाने पान खायला म्हणून बाहेर त्याला बाहेर काढलं. बाहेर पडतानाच त्याला अंदाज आला होता. त्याप्रमाणे दादाने टपरीच्या बाजूला नेऊन सिगारेट शिलगावत कधी थेट तर कधी अप्रत्यक्षपणे प्रश्न विचारत हळूच त्याच्याकडून ‘त्या’ रात्रीची सगळी माहिती काढून घेतली. मग थोडासा विचार करुन त्याला प्रश्न केला, “का रे, तुला आठवतं तुला मी गियरची गाडी शिकवली होती?'” त्याने नुसतीच मूकपणे मान हलवली. ‘पहिल्या दिवशी जमली होती का रे गाडी चालवायला तुला? सगळं व्यवस्थित सांगूनही तू गियर टाकून क्लच एकदम सोडलास तशी गाडी हवेत उडाली आणि आपण दोघे खाली पडलो होतो. आठवतं?” त्याने मान हलवली.
“पुढे काय झालं मग? आपण शिकायचं सोडलं का? नाही ना? अरे मग तू हळू हळू सगळं शिकलास. मी सांगितलेलं सगळं लक्षात ठेवून क्लच हळू हळू सोडू लागलास, योग्य वेळी गियर टाकू लागलास, योग्य वेळी ब्रेक दाबू लागलास आणि बघता बघता माझी मदत न घेता एकटा गाडी चालवू लागलास ना?” याने परत मान हलवली.
“नुसता ठोंब्यासारखा मान हलवू नकोस. काही डोक्यात शिरतंय का? पहिल्याच दिवशी आधी सांगूनही घाईगडबडीत तू क्लच एकदम सोडलेला दिसतोय म्हणून तुमची गाडी रस्त्यावरून सरळ न धावता हवेत उडाली. मी आधी सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना? मग ते सगळं लक्षात ठेवायचं आणि गाडी परत रुळावर आणायची. काय? जमेल ना?”
योगायोगाने त्याचवेळी त्यांच्या बिल्डिंगच्या गच्चीवर तिची जाऊ आणि तिचं याच विषयावर बोलणं चाललं होतं. खूप खोदून खोदून विचारल्यावर तिने काय घडलं ते जाऊला सांगितलं. त्यावर ती इतकंच म्हणाली, “हे बघ, नवीन संसार सुरु करायचा तर प्रत्येक गोष्ट नवीन असते. बायकांना तर सगळंच नवीन आणि अनोळखी असतं. अगदी ज्या घरात रहायचं त्या घरापासून सगळ्या गोष्टींची ओळख करून घ्यायची असते. या सगळ्यांत एक मोठा आधार असतो तो म्हणजे आपल्या जोडीदाराचा. तो जरी अनोळखी असला तरी आपल्या जन्माचा साथीदार असतो आणि त्यालाही या गोष्टीची जाणीव असते. त्याच्यावर विश्वास ठेवून आणि त्याचा हात हातात घट्ट पकडूनच आपण या अनोळखी वाटेवरुन पुढे चालू लागतो. काही वेळाने तो घट्ट पकडलेला हात सैल झाला तरी वाट ओळखीची झालेली असते..आणि आता तुला एक गुपित सांगते. आमच्या पहिल्या रात्री थोड्याफार फरकाने आमचीही अशीच गत झाली होती. पण मी याचा हात पकडून ठेवला.. सोडला नाही. तो मला कोणतीही इजा होऊ देणार नाही या विश्वासावर. आहे तुझा विश्वास तुझ्या जोडीदारावर?..”
तिला तसंच विचारमग्न ठेऊन जाऊ खाली निघून गेली. ती बराच वेळ आकाशातल्या चांदण्या पहात विचार करत राहिली.
त्या रात्री नेहमीचं जुजबी बोलून झोपणार तोच तिने स्वतःहून एक विषय काढला आणि प्रथमच ती त्याच्याशी चार वाक्य सलग बोलली. तिच्यातला हा बदल त्याला सुखावून गेला मग त्यानेही उत्साहाने त्याला काय आवडते, तिला काय आवडते या विषयावरून गाडी पुढे नेत तिला बोलतं केलं. आपल्या कॉलेजमधल्या, ऑफिसमधल्या गमती जमती सांगून हसून डोळ्यांतून पाणी येईस्तवर तिला हसवलं. ती रात्र दोघांनीही जागून काढली..छान गप्पा मारत !
(क्रमशः)
Image by kalhh from Pixabay
Umesh Patwardhan

Umesh Patwardhan

उमेश पटवर्धन, पुणे हे इन्फोसिस या IT कंपनीमध्ये गेली काही वर्षे कार्यरत आहेत. लेखनाची सुरुवात इंजिनियरिंगला असताना एका कथास्पर्धेद्वारे झाली. त्यावेळी लिहिलेल्या कथा किर्लोस्कर, उत्तमकथा आदी मासिकांतून प्रसिद्ध झाल्या. पुढे काही वर्षांचा खंड पडून २०१६ मध्ये एका कथालेखन कार्यशाळेद्वारे पुन्हा लेखनाला सुरुवात केली. या काळात नुक्कड, अक्षरधन, Lekhakonline अशा साहित्याला वाहिलेल्या ग्रुपवर सातत्याने कथालेखन केले. २०१८ मध्ये एक कथासंग्रह ईबुक आणि ऑडिओबुक स्वरूपात प्रसिद्ध झाला. लेखनाच्या या दुसऱ्या टप्प्यात उत्तमकथा, शिक्षण विवेक, निरंजन, रोहिणी अशी दर्जेदार मासिके आणि दिवाळी अंकात अनेक कथा प्रसिद्ध झाल्या. अलीकडच्या काळात काही कथांना विविध स्पर्धांमध्ये पारितोषिकं मिळाली आहेत.

8 thoughts on ““प्यासा सावन”- नववधू प्रिया मी..भाग ४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!