भातुकली
अतिशय देखणा भव्य बंगला , समोर आखीव रेखीव फुललेली बाग , आणि त्यावर सोडलेली संयत रोषणाई . मंद संगीत आणि हिरवळीवर मांडलेल्या सुबक टेबल खुर्च्या . सगळं चित्रातल्या सारखं मोहमयी . इनामदारांच्या एकुलत्या एक मुलाचं लग्न झालं होतं , त्याची आज छानशी छोटेखानी मेजवानी होती .
रागिणी ताई आणि शशिकांत यजमान म्हणून जातीने सगळ्याची आवभगत करत होते . देशमुखांसारखे व्याही आणि मंजिरी सारखी आर्किटेक्ट सून मिळाली म्हणून खूष होते दोघं .
गडद मरून रंगातील वेलवेट चे काळे काठ असलेली उंची साडी आणि हिऱ्याचे मोजके दागिने घालून उभी असलेली मंजिरी म्हणजे बुद्धीमत्ता आणि सौंदर्य यांचं सुरेख मिश्रण होती .
अजिंक्य काळ्या सुटामध्ये कसला देखणा दिसत होता … मंजिरी डोळ्यांच्या कोनातून त्याला बघत होती .
” कातील दिसतियेसी .” हळूच तिच्या कडे झुकत तो तिच्या कानाशी कुजबुजला .कोपऱ्याने त्याला हलका गुद्दा घालत ती म्हणाली ,
” तू पण दिसतोय , मारू!!”
आणि मग अचानक आठवून म्हणाली ,
” अरे ? रेणू नाही आली ? लग्नाला पण नव्हती . आश्चर्य आहे नाही ? तू भांडला नाहीस तिच्याशी ?”
“अग , रोहन तरी कुठे येऊ शकला यू .एस वरून?” त्याने हसत प्रश्न केला .
ती काही बोलणार इतक्यात मध्येच त्यांना भेटायला बरीच मंडळी आल्याने संवाद पूर्ण झाला नाही .
अतिशय रुचीपूर्ण जेवण करून भरपूर उंची भेटवस्तूंचा ढिगारा आवरून रात्री उशिरा सगळे आत बंगल्यात गेले .
नोकर चाकर मंडळी भराभर सगळं आवरत होती . मंजिरी पण वरती त्यांच्या खोलीत गेली . शशिकांत ने खास लक्ष घालून अजिंक्य च्या खोलीत नवीन फर्निचर करवून घेतलं होतं .
एक आर्किटेक्ट म्हणून अख्ख्या देशात नाव कमावलेल्या शशिकांत साठी आपलं घर सजवणं हे अतिशय जिव्हाळ्याचं काम होतं .मंजिरी वर गेली , तसा अजिंक्य मागच्या अंगणात पायरीवर जाऊन बसला …त्याची आवडती जागा .. फक्त त्याचीच नाही , रेणू ची पण आवडती जागा .
अजिंक्यची तंद्री लागली .
तिथे त्या कोपऱ्यात बसायचो आपण . किशन काकांनी एक छोटीशी चूल बनवून दिली होती …मग रेणू , काशी , स्वप्नील आपण तासनतास भातुकली खेळायचो इथे .
काशी मुरमुरे आणायची . स्वप्नील गूळ आणि फुटाणे , मी कधी बिस्किटं , कधी केक , तर कधी चॉकलेट्स न्यायचो . असं काही नेलं की चिडायची ती .
” इथे विकतचे पदार्थ नाही आणायचे . ही आपली भातुकली आहे न ? आपण सगळं इथे बनवूया ना ! ” असं म्हणायची .
रेणू आणि काशी पुढाकार घ्यायच्या . आपण आणि स्वप्नील मात्र नुसतं टीवल्या बावल्या करायचो . एकदा तर भांडण झालं तेव्हा आपण सगळी पिटुकली भांडी उधळून लावली होती .
काशी रड रड रडली , पण रेणू ने मात्र उठून येऊन मला आणि स्वप्नील ला चांगलंच बदडलं होतं . लहान पणापासूनच धीट आणि स्वाभिमानी होती फार .
शाळा शाळा खेळतांना रेणू ला नेहमी गणिताची ‘बाई’ व्हायला आवडायचं .
पाढे मुकपाठ होते तिचे . गणित इतकं आवडीचं की गणितात एम. एस्सी केलं तिने . कॉलेज मध्ये असतांना मला म्हणायची ,
” अभ्यासक्रमातील गणित उत्तम असेल तर आयुष्याचं गणित पण जमतच बरोबर .” खरंच जमलं का तिला ? तो स्वतःशी बोलत बसला असतांनाच आवाज आला .
” अजिंक्य? इथे का बसलाय ? ” मंजिरी मागे येऊन उभी होती .
” आय डोन्ट बिलिव्ह!” ज्या माणसाची आज लग्नानंतरची पहिली रात्र आहे , तो असा एकटा इथे बसलाय? …मला न तुझं कोडं पडतं नेहमी .”
” अग , तू वर फ्रेश व्हायला गेलीस , म्हणून मी इथे बसलोय , इतकंच .
Lets go .” पटकन उठून तिच्या खांद्यावर हात घालून हलकं तिला जवळ ओढत वरच्या दिशेने घेऊन गेला .
जाताजाता मंजिरी ने एक नजर मागच्या अंगणात टाकली , जिथे एकटक बघत तो बसला होता .
********
” धिस इस रिअली ब्युटीफुल ! ओ अजिंक्य , आय ऍम सो हॅपी !! ” त्याला आपल्या हातांनी वेढून घेत ती म्हणाली .
मॉरीशस च्या आलिशान हॉटेल समोरील राखीव समुद्र किनारी दोघे बसले होते .
” असं वाटतंय न , की सगळं आयुष्य इथे ह्या किनाऱ्यावरच घालवावं ? तू अशी माझ्याजवळ , आणि समोर ही मावळती संध्याकाळ !..सुंदर !! ” मग बोलताना काही क्षण हरवल्या सारखा झाला , आणि म्हणाला ,
रेणू ला फार वेड होतं समुद्राचं . अशी काठावर बसायची आणि वाळूत सुरेख किल्ला किंवा घर बनवायची . इतकं सुबक की बाकी पर्यटक यायचे बघायला . …
तो बोलत राहिला , आणि मंजिरीची त्याच्या भोवतीची पकड ढिली झाली .
तिने आपली पर्स उचलली , सॅंडल गोळा केल्या तसा अजिंक्य भानावर आला .
” सॉरी मंजिरी !! रिअली सॉरी ! ….बस न . ”
” बसले असते रे , पण काय न , तासनतास समुद्रावर बसायला मला नाही आवडत ! …बाय द वे , मी मंजिरी . आपलं बहुतेक गेल्या आठवड्यात लग्न झालंय ! आणि तू माझ्यासोबत इथे हनिमून ला आलाय ! ” झटक्यात मागे वळून ती हॉटेल कडे चालू लागली .
” मंजिरी …प्लिज थांब …” म्हणत तो ही मागे धावत गेला .
नंतर पंधरा मिनिटं तो तिची मनधरणी करत होता .
” कम ऑन मंजिरी . तुला माहितेय की ती माझी अतिशय जवळची मैत्रीण आहे . तुला सगळं बोललोय न मी . ..हा , मान्य आहे मला की आपल्या रोमान्स मध्ये तिचा विषय काढणे बरोबर नाही , पण मम्मी , पप्पा , आजी इतकीच ती देखील भिनली आहे माझ्यात . सहज विषय निघतोच ग .”
” सहज ? ..मी संशय नाही घेतय अजिंक्य . मम्मीनी मला कल्पना दिली होती , की तुम्ही दोघं चड्डी बड्डी मित्र आहात . पण प्रत्येक नात्याची आपली आपली एक जागा असते . एक पुसटशी अदृष्य चौकट . त्या चौकटीचे नियम देखील असतात . त्या बाहेर नातं गेलं न , की सूर बिघडतात . ”
पायाला मॉइश्चरायझर क्रीम चोळत ती म्हणाली .
” मी समजू शकतो .”
” तुझ्या ह्या समजूतदार पणा वरच तर भाळले मी . तुझा हॉटेल व्यवसाय , त्यात तुझं सर्वस्व झोकून काम करणं , सामाजिक बांधिलकी जपणं , हे सगळं खूप आवडलं मला . पण पप्पा आर्किटेक्ट आणि मुलगा हॉटेल व्यावसायिक हे कसं रे ? ”
” खरं सांगू की खोटं ? ” डबल बेड वरील रेशमी दुलई पांघरत त्याने मिश्कीलपणे विचारलं .
” म्हणजे ?”
” नाही , उत्तर देताना पुन्हा रेणू येणार मध्ये ; म्हणून विचारलं . ”
” ऑफकोर्स खरं !”
” रेणुला वेगवेगळ्या डिशेश बनवून बघायला खूप आवडायचं . यु ट्यूब वर बघून ती काय काय बनवायची . तिचे सगळे खाद्यप्रयोग माझ्यावरच होत . मी
चव बघून तिला दर्दी माणसासारखं मार्गदर्शन करायचो . आणि तो पदार्थ परफेक्ट व्हायचा . मग ती म्हणायची ,
‘ अजु , तू न , चीफ फूड अडव्हायझर व्हायला पाहिजे . तुझी “”टेस्ट”” परफेक्ट आहे . ‘
” मग?”
” मी म्हटलं तिला ..तूच का नाही होत अशी अडव्हायझर ?…तर म्हणाली , मला गणितज्ञ व्हायचंय . ..त्याने ऍनालीटीकल माईंड डेव्हलप होतं . तू मात्र हॉटेल काढलंस न , तर मस्तं चालवशील !”
माझ्याही नकळत मी वेगवेगळ्या खाद्यपदार्थ च्या साईट्स वर ‘टीप्स’ द्यायला लागलो . हॉटेल मॅनेजमेंट ला ऍडमिशन घेतली .
मग स्वतःचा ब्लॉग सुरू केला . त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला . इतका की मला अनेक हॉटेल वाले बोलवायला लागले . त्यानंतर तर तो भाटिया नाही का , त्याने हॉटेल ची ऑफर दिली . भाटिया म्हणजे , रेणू च्या सध्याच्या ऑफिस कलीग चे वडील . घरून पाठिंबा मिळाला , केलं सुरू हॉटेल . मग लवकरच एकाचे तीन झाले . पण सुरुवात रेणू मुळेच झाली . ”
” हं . तू तिच्या प्रेमात नाही पडलास कधी ?”
” हा प्रश्न तू मला कितीतरी वेळा विचारलाय मंजिरी !”
” पण तू आज पर्यंत समाधानकारक उत्तर पण नाही दिलस !”
” मी कितीदा आणि काहीही सांगितलं तरीही तुझं समाधान होतच नाहीये . मग
सांग मी काय करू?”
” मला नेहमी वाटतं की मी माझा नवरा तिच्या सोबत
वाटून घेतेय . त्याचा काही हिस्सा रेणुपाशी अडकून पडलाय .”
त्याने प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवला आणि म्हणाला ,
” अजिबात नाही ! डोक्यातून काढ ते , आणि झोप आता .”
दुलईत शिरून , पाठ वळवून मंजिरी कितीतरी वेळ जागीच होती .
शेजारी झोपल्याचं नाटक करत अजिंक्यही जागाच होता . त्याच्या मनाचा पट पुन्हा उलगडलाच ….
******** ” अजू , मला एम.एस्सी. ला स्कॉलरशिप मिळतेय .” रेणू उत्साहाने फुलली होती नुसती .
” हाय रे मेरा बच्चा ! ..आलोच मी तिकडे .”
” आलोच काय? उद्या तुझा इंटरव्ह्यू आहे न , त्या यु ट्यूब चॅनेल वर?..मी येतांना काकू जवळ सूट ठेवून आलेय . तो घेतलास?”
” सूट कशाला ? नोकरी साठी इंटरव्ह्यू
नाही देतंय मी! ”
” जास्त शहाणपणा नको करुस , मुकाट घरी जा , सूट घाल , आणि मग जा . मी आले असते , पण काय न , बंगलोर पुणे अंतर जरा जास्तच आहे नाही ?”
” मी आहे म्हणून तुझं ऐकतोय ग ! तुला असा हट्टी नवरा मिळेल न ,बघ तू .
मग त्याचं सगळं ऐकशील तू .”
” बा s s य !” म्हणून तिने संवाद बंद केला होता .
रेणू माझा लकी चॅम्प होती .
तीची संमती असली की सगळीकडे यश मिळायचच . अगदी शाळेत पण ……एकदा मला बाईंनी बोलावून घेतलं होतं …डिबेट स्पर्धा होती .
………” रेणू , बाई म्हणतात , मी इंटरनॅशनल ‘यंग जिनिअस’ च्या डिबेट स्पर्धेत मध्ये जावं .”
” wow ! अजू””
“”विषय काय माहितेय?
“रोल ऑफ युथ इन कंट्रीज प्रोग्रेस””………
मग रेणू ने कुठून कुठून कितीतरी पुस्तकं आणून दिली आपल्याला . नोट्स काढून दिल्या , सराव करवून घेतला , आणि मी राज्यात पहिला आलो तर गावभर नाचत सगळ्यांना पेढे वाटले ….पागल होती …पागल ! …..…….
तिला लंडन च्या
गणित संशोधन संस्थेत जॉईन होण्याचा प्रस्ताव आला तर आनंदाने नाचत घरी आली होती …मध्यरात्री ….
” रेणू ? तू ? इतक्या रात्री ? ”
” तिकडे इंग्लड ला तर दिवस आहे न ? मला मेल आलीये . मला लंडन मध्ये जॉब लागलाय अजू !!!. ”
“……”
” काही तरी बोल न ! ”
” ग्रेट !”
” बस ? इतकंच ? तुला आनंद नाही झाला ?”
” झाला ग , पण ..म्हणजे तू आता इंग्लंड ला जाणार?”
” हो . मला पण कसंतरीच वाटतंय , पण माझं स्वप्न अजू , स्वप्न पूर्ण
होतंय. ”
ती इंग्लंड ला रुळली . जबरदस्त पगार होता तिला . आणि तेव्हाच भाटियाचा प्रस्ताव आला … हॉटेल पार्टनरशिप .
आपण तिला इंग्लंड ला कळवले .
” रेणू , भाटिया ने मला हॉटेल ची ऑफर दिलीये . ”
” मला खात्री होती अजू !! Yess !!!! ”
” येस काय ? किती मोठी गुंतवणूक आहे कल्पना आहे का ?”
” किती ?”
” तीन कोटी!!”
” तू कशाला त्रास करून घेतोय? मी आहे ना . इथे इंग्लंड मध्ये असून काय कामाची मी ?”
आणि खरंच मला न सांगता
दहा दिवसातच रेणुने दोन करोड पाठवले . चक्क दोन करोड .
नक्कीच ते सगळे तिचे जमवले पैसे नव्हते , काही उधार घेतले असणार , पण माझं काम तिने अतिशय सोपं केलं हे नक्की .
रेणुला खूप जवळून ओळखत असूनही त्यावेळी आई बाबांना फार आश्चर्य वाटलं होतं .
” इतकी प्रचंड रक्कम तिने पाठवली , संध्या आणि प्रशांत भौजींना माहितेय का अजू ? त्यांची मुलगी अशी दुसऱ्याला मदत करतेय ते? ” आई नी विचारलं होतं .
” हो , माहितेय .”
” कमाल आहे रे त्यांची .”
आई चं म्हणणं बरोबरच होतं .
कारण आमच्या दोघांच्या आईवडिलां कायम वाटत होतं की आम्ही लग्न करणार आहोत , मग काय हरकत आहे कितीही पैसे गुंतवले तरी … शेवटी दोघांचा पैसा एकच आहे , असं त्यांना वाटे .
एकदिवस रेणू चा फोन आला .
” अजू , आई बाबा लग्नासाठी मागे लागले आहेत . ”
” आता हरकत नाही खरं तर . पण तुला भेटला नाही कुणी अजून ?”
ती चिडली होती .
” भेटला असता तर तुला सांगितलं नसतं का ? काही पण विचारतो !”
” रेणू? ..अग , तुझं लग्न झालं की मला तुझे पैसे लगेच वापस द्यावे लागतील न ग ? तुझा नवरा का खपवून घेईल हे?”
” …..”
” अग बोल की !”
” पंचवीस सव्हीस वर्षांची मैत्री मोठी की आठ दिवसांपूर्वी आयुष्यात आलेला
नवरा नावाचा प्राणी मोठा ? ”
असा प्रश्न करून तिने गप्प केलं होतं आपल्याला .
आमच्या घरच्या मोठ्यांना मात्र
भयानक धक्का बसला जेव्हा आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली होती. रेणू ला त्यांनी बोलावून घेतलं होतं . आम्हाला दोघांना आपापल्या घरी अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले होते .
संध्या काकू तर कसली उसळली होती .
” कमाल आहे!! फक्त मैत्री म्हणे! नुसते मित्र मैत्रीण असे मध्य रात्री एकमेकांच्या घरी जात असतात का ? …मित्राला कुणी दोन कोटी रुपये
‘असंच’ लिखापढी न करता देत असतं का ? इतके एकमेकांत गुंतलेले तुम्ही ,पण लग्न नाही करणार?” असं बरंच काय काय बोलली होती .
******* मधुचंद्राची नशा उतरून अजिंक्य मंजिरी जोरात कामाला लागले होते . त्यांच्यातील विश्वास , प्रेम आणि सामंजस्य हे खूप दृढ होतं , पण रेणू च्या बाबतीत काही प्रश्न मंजिरीला अस्वस्थ करत असत . एक दिवस न रहवून तिने केतकीताईंना विचारल .
” आई , एक विचारू? खरं उत्तर द्याल ?”
” खोटं बोलण्यासारखं काही आहे का मंजिरी?”
” आई , अजिंक्य आणि रेणू इतके जवळचे मित्र , तर रेणू आमच्या लग्नात का नव्हती ? माझी आणि तिची आतापर्यंत फक्त फोनवरच भेट का बरं झाली?”
” रेणू तिथे इंग्लंड मध्ये आजारी आहे . तुमच्या लग्नानंतर तिने सांगितलं . सध्या संध्या , म्हणजे तिची आई तिकडेच गेली आहे . ”
” काय झालं आई ? काही सिरीयस ? अजिंक्य ला माहितेय हे?”
” नाही , तसं काहीच नाही , पण इथे इतका लांब प्रवास करण्या इतपत चांगली झाली की मग येतील दोघी इकडे …आणि हो . अजिंक्य ला माहीत आहे .”
” ओहह”
मंजिरीचं समाधान झालं , पण रागिणी मात्र पुन्हा अस्वस्थ झाली . अजिंक्य आणि रेणू च्या मैत्रीमुळे मंजिरी दुखावल्या नको जायला असं तिला वाटत होतं .
रेणू अजिंक्य कॉलेज मध्ये असल्यापासून ती रेणुला सून म्हणून ह्या घरात
आणायचे स्वप्न बघत होती . रेणू लंडन ला जाणार हे कळाल्यावर तिने अजिंक्य जवळ हा विषय काढला होता .
” अजू , तू रेणुशी बोललास ?”
” कशाबद्दल ?”
” कशाबद्दल काय? तुमच्या नात्याबद्दल !”
” ए आई ! तू भलतंच डोक्यात घेऊन नको बसुस हं . आम्ही बालमित्र आहोत ..बस! ”
” पण जर मी म्हणाले की मला ती सून म्हणून हवी आहे तर ?”
” शी ! काहीतरीच काय ? ब्रो कोड रिलेशन आहे आमचं ”
” बघ बाबा . डोळ्यासमोर ची मुलगी आहे , आणि माझा जीव आहे तिच्यात .”
सगळं उडवून लावलं होतं अजिंक्यने . त्याची भातुकलीतील मैत्रीण , कुणीतरी खूप जीवाभावाची अशी रेणू …त्याचं मैत्र्य !
********* मंजिरी क्विन्स टॉवर्स ह्या एकूण चार सहामजली इमारतीच्या डिझायनिंग चं काम बघत होती . रोज यायला उशीर होत होता . रागिणी ताई सगळं सांभाळून घेत होती .
आजही रागिणी ने मावशीबाईंकडून सगळं करवून घेऊन जेवण टेबलवर तयार ठेवलं होतं . आणि ती झोपायला निघून गेली .
मंजिरी बरीच उशिरा आली . आत रूममध्ये गेली तर अजिंक्य कुणाशीतरी बोलत होता .
बहुतेक कुणाजवळ रेणू ची चौकशी करत असावा . तिच्याकडे वळून म्हणाला ,
” हाय ! थकलीस न ? चल , फ्रेश होऊ , आणि मस्तं जेवण करू .”
“कुणाचा फोन होता ?” तिचा आवाज त्रासिक .
” अग , समीर शी बोलत होतो…….एक सेकंद !! तू संशय घेतीयेस माझ्यावर ? ”
” संशय नाही , अजिंक्य . सतत कुणीतरी आपल्याला बघतंय , तुझ्यावर हक्क दाखवतंय , माझं प्रेम वाटल्या जातंय ही भावना जगू देत नाहीये मला. ”
” मंजिरी , हद्द झाली यार ! माझा बालमित्र कुणी मुलगा असला असता , आणि मी वारंवार त्याच्या आठवणी तुला सांगत असतो तर तू असंच म्हणाली असतीस का ? तुला समजत कसं नाहीये ?”
” मित्राने तुला दोन करोड दिले असते ? ”
” व्हाय नॉट ? ”
” डिसगस्टिंग !….बरं ठीक आहे , मला झोप येतेय , तू जाऊन जेऊन घे .”
अजिंक्य हताशपणे तिच्याकडे बघत बाहेर गेला .
रागिणी आणि शशिकांत आपल्या खोलीतून काळजीने त्याच्याकडे बघत होते .
रात्री त्याचा फोन वाजला . तिने नाव वाचलं . ‘रेणू?’
पलीकडून रेणू बोलत होती . तो उत्साहात बोलत होता .
******* ” मंजिरी , थोडा वेळ काढून घरी येतेस का ? सरप्राइज आहे .”
रागिणी ने फोन केला , आणि तासाभरात मंजिरी घरी आली .
घरात अजिंक्य आणि रोहन गप्पा मारत होते .
” सरप्राईज !!” रोहन म्हणाला , तशी अत्यानंदाने जाऊन मंजिरी त्याला बीलगली .
” तुला झोडून काढते ! नालायका , लग्नाला आला नाहीस न आमच्या? …अमेरिका काय इतकी दूर आहे का ?
..बाय द वे , अजिंक्य , हा माझा मित्र ..”
” अरे , आमची ओळख झाली , आंटी च्या हातचे थालीपिठ आणि कॉफी पण झाली . एकदम टेस्टी ! मंजिरी , यू आर सो लकी ! ”
” येस ! नक्कीच . ” ती म्हणाली .
” बरं रोहन , फ्रेश होऊन जा , आणि कुठेही हॉटेल मध्ये रहायचं नाही , इथे गेस्ट रुम आहे . आता तुम्ही गप्पा मारा , मी कमावर जातो .” म्हणत रोहन चा निरोप घेऊन अजिंक्य निघून गेला .
रोहन ला हॉटेल वर न जाऊ देता त्यांनी घरीच ठेवून घेतला . मंजिरी
रोहनला दोन वर्ष्यानी भेटत होती . सगळ्या जुन्या आठवणी , मित्रांशी विडिओ कॉल्स , कॉलेज कंपू सोबत बाहेर जेवणे , अमेरिकेतील मित्रांशी रात्री उशिरा बोलणे , अशी धमाल सुरू होती .
ते काही दिवस तिने भरपूर मजा केली . तिला अजिंक्य चा विसर पडल्यासारखं झालं होतं .
रोहनने पण जातांना अजिंक्य साठी भारीची भेटवस्तू आणली होती .
जातांना त्याला गंमतीत ‘ आमच्या हिरॉईन ची नीट काळजी घ्या हा !’ अशी तंबी देऊन गेला .
“हा बॉक्स कशाचा आहे ग ?” एक लाल मखमली डबा बघून अजिंक्य म्हणाला .
” अरे , रोहन ने यू. एस. वरुन डायमंड नेकलेस आणलंय मला गिफ्ट म्हणून . कसला मेक आहे न ? चांगला मालदार झालाय हा रोहन .”
” असू दे ग , अशी मैत्री मिळायला भाग्य लागतं . उगाच ह्या वस्तुचं ओझं नको बाळगूस . त्याची आई पण बोलली न तुझ्याशी ? किती छान लोकं आहेत ही . आपल्या करिअर आणि नोकरीच्या टप्प्यावर कितीतरी मित्र भेटतात . पण ही चड्डी बड्डी शाळेतील मैत्री काही वेगळीच ! स्पर्धा ,असूया , अपेक्षा यांच्या पलीकडची . ती देखील प्रत्येकाच्या वाट्याला असतेच असं नाही ….” अजिंक्य बोलत होता .
ऐकताना तिच्या चेहऱ्यावर चे भाव मात्र बदलत होते .
अजिंक्य बोलू लागला ” रेणू चा मला काल रात्री फोन आला होता . आम्ही कायम मैत्रीच्याच नात्यात अत्यंत गुंतलो होतो . त्यात कुठेही त्यापालिकडचे प्रेम नव्हते . आम्ही एकमेकांच्या अडचणीत कायम सोबत असूच , पण तिने मला त्या नात्याच्या मर्यादांची काल जाणीव दिली . तुझ्या माझ्या नात्यात त्याची फक्त उपस्थिती असावी बस..त्या पलीकडे गेल्याच गालबोट लागेल म्हणाली …”
मंजिरीला काहीतरी आत खोलवर जाणवल्यासारखं झालं..
तिने अचानक आवेगाने त्याला मिठी मारली . काहीतरी गवसलं होतं .
******* “आठ दिवस सुट्टी मिळेल का रे तुला ?” अजिंक्य चा टिफिन बॅग मध्ये ठेवत तिने विचारलं .
” इरादा काय आहे मॅडम?”
” सांगू ? रेणू येणार आहे , आम्हाला खूप धमाल करायचीय . तुझ्या सगळ्या लहानपणी च्या खोड्या चे किस्से ऐकाययचेत . खास करून भातुकलीचे .”
” अस्स ? ” म्हणत त्याने अलगद तिच्या गालावर ओठ टेकवले .
© अपर्णा देशपांडे
- आत्तु-भाग ३ (शेवटचा भाग) - June 17, 2022
- आत्तु- भाग २ - June 7, 2022
- आत्तू- भाग १ - June 3, 2022
Khup ch surekh
धन्यवाद
एकदम छान
धन्यवाद
खूपच छान …..!!!
धन्यवाद
खूपच छान…. गोष्टं संपूच नये असे वाटत होते.
ओहह
धन्यवाद
सुरेख!!
धन्यवाद
शब्दप्रतिभेला सलाम🙏🙏🙂🙂
धन्यवाद
अगदी सुंदर👌👌👌👌👌
Khup chan
धन्यवाद
apratim !
धन्यवाद
खूपच छान… असे मित्र मैत्रिणी ज्यांना आहेत ते भाग्यवान…
👌👌