प्रगती

“मावशी काय झालं ओ …सकाळी सकाळी पोलीस का आलेत ऑफिसमध्ये?”

रुहीने ऑफिसमध्ये एन्ट्री करता करताच तिथल्या मावशींना विचारलं.

“अहो मॅडम त्या तुमच्या बॉस सुमेधा मॅडमनी आत्महत्या केली वाटतं… तुम्हाला काय खबरच नाय का अजून?? तुम्ही तर सारख्या त्यांच्या सोबत असायचा की..येतील पोलीस तुमच्याकडे पण चौकशीला”.

सुमेधाचं नाव ऐकून रुहीचा पंच मशीनवर ठेवलेला हात कापायला लागला. तिचे पाय लटपटू लागले. अचानक अंग थरथरायला लागलं. मागे वळून पाहिलं तर मावशी ही निघून गेलेल्या… कस बस तीन चार वेळा पंच करून एकदाच लॉगईन झाल्यावर ती आत आली आणि स्वतःच्या डेस्कवर जाऊन बसली. आज प्रोजेक्ट प्रेझेंटेशन होत म्हणून ती जरा लवकरच आलेली. वॉशरूम मध्ये जाऊन तोंडावर सप सप पाणी मारलं आणि चेहरा पुसत डेस्क वर येऊन बसली. सुमेधाचा चेहरा काही केल्या तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हता. सुमेधा इतकी बुद्धिवान, सौंदर्याची खाण, Beauty with talent हे वाक्य जिच्यावर परफेक्ट शोभत, अतिशय महत्वाकांक्षी, दूरदृष्टी, चौकस बुध्दिची यशस्वी स्त्री…एका कंपनीची CEO…कित्येकांना आपल्या मोजक्याच बोलण्यातून सकारात्मकतेकडे प्रेरित करणारी व्यक्ती आत्महत्या कशी करू शकते??? काय कमी होतं तिला…सगळयांना हवंहवंसं वाटणार CEO पद, गलेलठ्ठ पगार, घरी हाताखाली नोकर, उच्च राहणीमान, लक्झरीयस लाईफ स्टाईल आणि कुटुंब म्हणजे ती आणि तिचा नवरा…अजून काय हवं असतं माणसाला या आयुष्यात….सगळं तिला हवं तसं असताना का केली असेल आत्महत्या तिने??? रुही बराच वेळ बंद कॉम्प्युटर कडे बघत विचार करत बसलेली.

मन कामात लागत नव्हतं म्हणून कॅफेटेरिया मध्ये जाऊन कॉफीचा मग हातात घेऊन पुन्हा विचारात गुंग झाली. मागून खांद्यावर कोणी तरी हात ठेवताच तिने दचकून मागे वळून पाहिलं तर समोर नेत्रा उभी होती. ऑफिसच्या कामानिमित्त आठवडाभर बाहेर असणाऱ्या नेत्रालाही ऑफिसमध्ये आल्यावर सुमेधाच्या आत्महत्येबद्दल कळलं होतं. नेत्राला बघताच रुहीच्या डोळ्यांत पाणी आलं. नेत्राही कॉफी घेऊन रुहीसमोर बसली.

न राहवून रुहीने नेत्राला विचारलेच – “का केलं असेल ग सुमेधा मॅमने अस?? त्या कधी अस वागतील मी स्वप्नातही विचार केला नव्हता…कारण त्या तशा नव्हत्याच. नेहमी पॉझिटिव्ह आणि आनंदी दिसायच्या.”

“पॉझिटिव्ह दिसण्यात आणि असण्यात फरक असतो ना रुही. खरं म्हणशील तर सुमेधाने स्वतःनेच या गर्तेत स्वतःला ढकललं होतं. यातून ती सावरूही शकली असती पण यश,पैसा, फेम माणसाला आतून पोकळ करून टाकतं म्हणतात ना तसच काहीसं सुमेधाच्या बाबतीत झालं.” – नेत्रा

रुही अचंबित होऊन नेत्राला विचारते “म्हणजे? त्यांनी अस का केलं हे तुला माहीत आहे?”

“हो. सुमेधाने आणि मी सोबतच हे ऑफिस जॉईन केलं होतं. आमच्या दोघींची गट्टी तेव्हापासून आहे. कामामध्ये आमची बरीच मतमतांतरे होती पण त्यामुळे मागच्या पाच सहा वर्षांची मैत्री तुटू नाही शकली. सुमेधा पहिल्यापासूनच खूप महत्वाकांक्षी. कामात स्वतःला पूर्ण पणे झोकून द्यायची. कोणताही प्रोजेक्ट आला की तो डेडलाईनच्या आधी पूर्ण करण्याचा तिचा अट्टाहास असायचा. त्यासाठी मग ती दिवस रात्र ऑफिसमध्ये थांबायची. तहान भूक विसरून काम करायची. तिच्या या डेडीकेशन मुळे ऑफिसमध्येही नवनवीन प्रोजेक्टसची रांग लागू लागली. मॅनेजमेंटनेही तिच्या कष्टाची दखल घेऊन तीच प्रमोशन केलं. मॅनेजर पदावर आल्यानंतर तिचं ध्येय CEO पदाकडे होतं. प्रगतीच्या शिखरावर झटपट चढायचं होत तिला…यासाठी ती जीवाचं रान करू लागली.  घर,संसार विसरून फक्त ऑफिस आणि ऑफिस इतकंच तीच आयुष्य झालं. साहजिकच तिच्या संसारावर याचा परिणाम होऊ लागला. एका घरात राहून नवरा आणि तिची भेट आठवडा आठवडा होत नव्हती… तिचा नवरा कित्येकदा वेळ काढून ऑफिसमध्ये भेटायला यायचा. तेव्हाही हिच्या मिटींगस, प्रोजेक्ट्स चालूच असायचे. एकमेकांचे वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस,घरगुती कार्यक्रम ती सहज विसरून जायची. तुटत चाललेलं नातं बऱ्याचदा सांधायचा प्रयत्न केला गेला पण वेळेअभावी आणि नातं की यश यांतला सुवर्णमध्य साधता न आल्यामुळे सगळं असफल ठरलं. सुमेधा जसजशी प्रगती करत गेली तसतशी फक्त नवऱ्यापासूनच नाहीतर तिच्या आई वडिलांपासूनही लांब होत गेली.

लग्नाला चार पाच वर्षे होत आलेली…साहजिकच तिच्या घरच्यांना,नवऱ्याला मुलाची अपेक्षा होती पण माझं ध्येय फार वेगळं आहे…मला खूप मोठं व्हायचंय आणि आई झाल्यावर कदाचित माझ्या करिअरलाच ब्रेक लागेल त्यामुळे इतक्यात मूल नको असं सुमेधा म्हणायची. इकडे सुमेधा करिअरच्या सुरुवातीलाच स्वतःच्या मेहनतीवर अवॉर्डस वर अवॉर्डस मिळवत होती तर एकीकडे तिच्या प्रत्येक नात्यांची वीण सैल होत चाललेली. ताणतणाव वाढत होते. अशातच सुमेधाच शहा सरांसोबत बाहेर क्लाएंट मिटिंग्ज ना येणं जाणं जास्त वाढू लागलं. खूपदा बाहेरगावीही कामानिमित्त दोघे जायचे. यातूनच दोघांच्या अफेअरची अफवा सुमेधाच्या घरापर्यंत पोहचली. आधीच ती नवऱ्याला वेळ देत नव्हती त्यात ही अफवा…आगीला हवा मिळत मिळत वणवा पेटत होता. सुमेधाचाही स्वाभिमान कुठेतरी दुखावत होता. या वणव्यातूनच सुमेधाच्या नवऱ्याने तिला घटस्फोटाची नोटीस पाठवली. आपलं ध्येय पूर्ण करण्यात ती इतकी गुंतली होती की या गोष्टी इतक्या थराला जातील कदाचित सुमेधाने कधी विचारही केला नव्हता म्हणून नोटीस बघून तिला खूप मोठा धक्का बसला.

यात आधार द्यायला आई वडीलही सोबत नव्हते. तिचा एकटीचा मार्ग तिनेच निवडला होता. मागच्या वर्षभरापासून ती डिप्रेशन मध्येच होती पण कामाकडे कधी दुर्लक्ष केलं नाही. त्यात ती नेहमीसारखी अव्वल च ठरली. CEO झाली…फार कमी वेळात तिला तिच्या बुद्धीच्या आणि कष्टाच्या जोरावर खूप मोठं यश मिळालं पण ते यश साजर करायला तिच्या सोबत तीच हक्काचं अस कुणीच नव्हतं. हळूहळू तीच एकटेपण तिला आतून पोखरून टाकत होतं पण स्वतःपासूनच ती ते लपवत होती. या सगळया प्रकरणामुळे झोपेच्या गोळ्याही घेत होती. तिचा त्रास तिने कधीच चेहऱ्यावर दाखवला नाही पण मनातून खचत होती आणि हे तिला स्वतःला मान्य करायचं नव्हतं. दोन दिवसांआधीच तिचा घटस्फोट झाला. दुरावलेली नाती आणि आलेलं एकटेपण तिच्यावर हावी झालं असावं…असमाधानी, कोलमडलेल्या तिच्या मनाने अखेर झोपेच्या गोळ्या खाऊन मृत्यूला जवळ करणं जास्त पसंद केलं”.

“पण नेत्रा मग स्त्रीने महत्वाकांक्षी असूच नये का?” – रुही

“हा प्रश्न स्त्री किंवा पुरुष असा नाहीच मुळी. महत्वाकांक्षी इथे प्रत्येकजण असतो..असलचं पाहिजे.प्रगतीची स्वप्नं प्रत्येक जण बघत असतो  पण त्यासोबतच आपण एकटे नसून आपल्या सोबत आपली जोडलेली माणसंही आहेत ..त्यांच्यासाठीही जगायला विसरू नये. सरतेशेवटी तुम्ही यशस्वी व्हाल पण हे यश साजर करायला, यशाचं कौतुक करायला आपली हक्काची नातीच सोबत नसतील तर आनंदी असणार आहात का तूम्ही?? आणि मनात सतत काहीतरी बोचत असेल तर काय अर्थ त्या यशाचा?? प्रगती झाल्यानंतर कणभरही त्याच समाधान वाटत नसेल मनाला तर अशी एकअंगी प्रगती तरी काय कामाची??..कुठली तरी एक बाजू आपण एका हातात घट्ट पकडून आहे तर दुसरी बाजू आपसूक सुटून जाणारच. यश आणि नातं यात समतोल साधता आला पाहिजे तरच समाधानाने जगता येतं.”

नेत्राच्या बोलण्यानंतर सुमेधाला आपली करिअरमधील रोल मॉडेल मानत असलेल्या रुहीला मागच्या महिनाभर चालू असणारे आपल्या घरातील ताणतणाव आठवतात आणि तडक ऑफिसमधून सुट्टी घेऊन ती नवऱ्याला भेटायला जाते आणि पुढचे सगळे दिवस आपलं करिअर सांभाळून आपल्या माणसांसोबत ,नवऱ्यासोबत समाधानाने जगायचं ठरवते.

Image by StartupStockPhotos from Pixabay 

Sarita Sawant

Sarita Sawant

मी By Profession सॉफ्टवेअर इंजिनिअर असले तरीही मनापासून लिखाणातच रमते. कथा,कविता,चारोळी,लेख हे मराठी साहित्य लिहायला मला आवडते. स्त्री विषयक व सामाजिक विषयांवर लेखन करणे मनाला जास्त भावते. आजपर्यंत बऱ्याच प्लॅटफॉर्मवर लेखन केले असून पुण्यनगरी वृत्तपत्रातही माझे स्त्रीविषयक लेख वुमनिया सत्रातुन छापून आले आहेत. मन:पटलावर जे कोरलं जात ते व स्त्रीमनाच्या भावना माझ्या लेखणीतुन उमटतात बस्स इतकंच. माझ्या लिखाणातून मी मलाच गवसते.

8 thoughts on “प्रगती

  • September 1, 2020 at 9:03 am
    Permalink

    छान कथा👍

    Reply
  • September 1, 2020 at 9:56 am
    Permalink

    I guess aready you had pubished this .. I remeber I have read it

    Reply
    • September 1, 2020 at 11:53 am
      Permalink

      Thanks for comment ma’am 😊. But it is impossible. मी ही कथा फक्त लेखक ऑनलाईन साठीच लिहिली आहे. याआधी मी ती कुठेही पोस्ट केलेली नाही.

      Reply
  • September 2, 2020 at 3:03 am
    Permalink

    Same. I also remember similar kind of stuff

    Reply
  • September 21, 2020 at 8:12 am
    Permalink

    कथा आवडली.स्त्री असो वा पुरुष संसारात balance साधलाच पाहिजे.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!