गौराक्का…
गौराक्का गेली.
कोणालाच खरं वाटणार नाही , अशी चुटपुट लावून गेली.
ऐंशी – पंच्याऐंशी च्या घरात वय होतं तिचं , म्हणजे अगदी तिच्या मुलांनाही मोठाली नातवंडं आली होती ! पण टुकटुकीत होती म्हातारी !
सदाशिव ने तोंडात तुळशीपत्र ठेवलं आणि गंगा फोडून तोंडात उपडी केली .. अर्धोन्मीलित डोळे अन सुरकुतलेला लक्ख गोरा चित्पावनी चेहरा, डोक्यावर मोजकेच पांढऱ्या शुभ्र रेशमासारखे मऊसूत केस, अगदी बोटभर लांबीचे ..
“असं वाटतंय आत्ता उठून बसतील आणि गप्पा मारायला सुरुवात करतील .. ” कोणी बाई म्हणाली आणि बायकांच्या घोळक्यातून मुसमुस सुरु झाली ..
धाकटी मुलगी सुमी गौराक्काच्या सुरकुतलेल्या गालावरून डबडबलेल्या डोळ्यांनी हात फिरवत राहिली ..
—
“हे बघ अशी पातळ करायची असतात पानगी , बरं का सुमे .. ” गौराक्का पोरसवदा सुमीला शिकवत होती ..
“नुसतं स्वैपाकघरात डांबू नका तिला .. तुमच्यासारखी निरक्षर राहिली तर आयुष्यभर चूल अन मूल च्या पुढं जायची नाही कधी .. ” ओसरीवरून गौराक्काचे पुरोगामी सासरे गरजले .. तशी हिरमुसून गौराक्का डोळ्यांनीच सुमी ला “जा” म्हणाली ..
सुमी आणि तिचा अभ्यास यात गौराक्काने स्वयंपाक कधीच येऊ दिला नाही .. संपूर्ण स्वयंपाकघराचा ताबा कायम तिच्याकडेच राहिला, म्हणूनच घराबाहेर अशी ती कधी पडलीच नाही .. सुमीची कामे म्हणजे कधीमधी भाज्या चिरून देणे, चहा करणे, फार फार तर खिचडी करणे ..
त्या नंतर सुमी संपूर्ण स्वयंपाक शिकली तो थेट लग्न झाल्यावर ..
लग्नानंतर गणपती आले अन आपल्या लेकीच्या काळजीने गौराक्का तिच्या सासरी डोकावली .. सुमीला ना काही येत होतं ना जमत होतं ..
“हे असलं कसलं सासर शोधलं ग माझ्यासाठी .. नुसत्या आपल्या भाज्या चिरा नि पोळ्या करा .. ” भांड्यांची आपटा-आपट करत वैतागून सुमी म्हणाली .. “गप्प बैस .. तोंड रंगवून ठेवेन मुर्खासारखी बरळशील तर .. ” गौराक्का फणकारल्या .. दुसऱ्याच क्षणी स्वतः ला सावरत म्हणाल्या .. “अगं इतकी बुकं शिकलेली तू, हे काय अवघड आहे ! हे बघ मी शिकवते तुला .. ” म्हणून मायलेकी फराळ करायला बसल्या ..
“हम्म .. अशी खरपूस तळून घ्यायची मग करंजी .. हळूहळू सुमे अगं फुटली ती करंजी , लक्ष कुठंय तुझं ? सुमे .. सुमे .. ”
—
“सुमे .. ” सदाशिवच्या हाकेने सुमी भानावर आली .. “चल , न्यायचंय तिला .. ” आणि सगळे तिला शेवटचा निरोप द्यायला निघाले ..
आल्यावर अंघोळी पांघोळी झाल्या .. कित्येक वर्षात प्रथमच घरातली चूल बंद होती आज! नाहीतर बाहेरून आणलं तरी वाटीभर वरणभात तरी लावलाच जाई घरात!
आज अगदी नकोशी शांतता होती स्वयंपाकघरात .. सगळी भांडी जणू रुसून बसली होती ..
गौराक्काच्या खोलीतून जाता – येताना तिथली ती उब , ती अंधारी खोली .. आणि बामचा तो वास सतत गौराक्का आजूबाजूला असण्याची जाणीव करून देत होता ..
शेजारून पिठलं भाकरी आली .. पहिला घास खाताच सदाशिव ला आईची आठवण आली .. इतका वेळ दाबून ठेवलेला हुंदका मोकळा झाला ..
—-
अपरात्री दारावर टकटक झाली आणि घाबरतच गौराक्काने दार उघडले .. दारात सदाशिव उभा होता ..
“इतक्या रात्री कसा आलास रे सदा .. ” गौराक्का काळजीने म्हणाली .. “पैसे नव्हते म्हणून चालत आलो .. ” १५ वर्षांचा सदा म्हणाला .. शिक्षणासाठी १५ किलोमीटरवरच्या तालुक्याच्या गावी राहणारा १५ वर्षांचा सदा भर थंडीत अंधारात रस्ता तुडवत चालत घरी आला होता .. अंगावर मोजके कपडे .. थकून कोमेजलेले डोळे ..
गौराक्काच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येऊ लागले .. परसात भर थंडीत बंब पेटवून कढत कढत पाणी काढून देऊन गौराक्काने गरम गरम पिठलं भात केला ..
थाळीत पिठलं भात घेऊन त्याला भरवत म्हणाल्या .. “पिठलं आवडतं म्हणून केलंय .. मिरची कुस्करून घातलीय आणि पापड हि भाजलाय .. मी भरवते, सावकाश जेव” गौराक्का म्हणाली .. धुरकट केशरी नऊवारी पातळ नेसलेली, तन्मयतेने सावकाश पिठलं भाताचा मऊ घास कालवून, फुंकून कोमट करून भरवणारी गौराक्का सदा च्या मनात कायमची कोरली गेली .. आणि तो पिठलं भात हि ..
—
“भांडी पोरकी झालीयेत अगदी .. अक्का दिवसाआड तरी चिंचेचं पाणी लावून धूत होत्या आपण धुतली तरी .. ” सदा ची पत्नी – माधवी म्हणाली .. “मी जाते ग वहिनी थोडी घेऊन .. आई ची आठवण म्हणून ..” सुमी म्हणाली ..
“जी हवी ती ने ग .. त्यात काय .. ” माधवी म्हणाली .. भांडी उचकटताना हातात छोटंसं बुटकुल लागलं .. पितळेच .. मूठभर तांदळाच्या मापाचं .. लहानपणी त्यातच पाणी प्यायची सुमी .. एक एक आठवणी उलगडत होत्या .. तोच पितळेचा डब्बा दिसला तिला .. अक्काने त्यात किती सुंदर नारळीच्या वड्या करून दिल्या होत्या एकदा! आणि हे छोटंसं चहा च पातेलं .. अक्का चा दिवसातून ३-४ वेळा चहा त्यातच व्हायचा! अगदी आत्ता पर्यंत!
—
“किती वेळा चाखून बघणार ग तो चहा .. गाळ आता, बास झाली चव बघून … ” सुमी म्हणाली .. “येऊ दे अजून उकळी .. दाटपणा नाही आला अजून .. मला पिववत नाही बाई असा चहा तर पाहुण्यांना कसा द्यायचा .. कोणाला काही खायला देताना ते चांगलं असलंच पाहिजे .. ” चहा ढवळत गौराक्का म्हणाली .. “फोडणी अशी खमंग बसली पाहिजे प्रत्येक पदार्थाला .. कोशिंबीरी कशा रसाळ हव्या, नुसता चोथापाणी नको.. एकवेळ पुरणावरणाचा स्वयंपाक जमून जातो .. पण साधी रानभाजी, लाल भोपळा, चिवळ , दुधी , घोसावळी .. या फार न नटणाऱ्या कमी मसाल्यातला भाज्या जिला जमतात तीच खरी सुग्रण! घरचा गोडा मसाला असा हवा कि चिमूटभर नुसता घातला तरी खिचडी ची चव जिभेवर रेंगाळली पाहिजे .. ” चहा फुलपात्रात गाळत गौराक्का म्हणाली ..
“पण समजा नसेल जमला पदार्थ तर ??” सुमी ने प्रश्न विचारला .. “आमच्या वेळी तर तो दंडकच होता बाई .. तेव्हा चूल नि मूल शिवाय होतं का काही वेगळं .. तुझी आज्जी तर इतकी कडक होती या बाबतीत. आज्जी गेल्यावर तू झालीस आणि तुझे आजोबा म्हणाले कि हिला चूल-मूल मध्ये बांधून ठेवू नकोस .. इंदिराबाईंचा आदर्श ठेव .. तिला शिकवून मोठं बनव खूप .. ” गौराक्का म्हणाली ..
“म्हणजे तुला आवडत नाही तरीही करतेस तू हे सगळं .. ” सुमी म्हणाली .. “असं नाही ग .. मला आठवत नाही तेव्हापासून करतीये मी हे सगळं .. आणि मला खूप जवळचं वाटतं मला हे .. हि भांडी बोलतात माझ्याशी .. चरचरीत फोडणी जमली कि कोण आनंद होतो मला ते नाही कळणार तुला .. तुझे आजोबा म्हणायचे गल्लीत सायकल वळवली कि सुनबाईंच्या आमटीचा दरवळ असतो नुसता .. त्यांना फार आवडायची .. तुझ्या बाबांना आवडतात त्या अळूच्या वड्या , भरपूर तीळ लावलेल्या अगदी खुसखुशीत .. तशा हव्या तशा जमल्या कि त्यांना आनंद होतो त्यातच माझा आनंद .. तुझ्यासाठी पुरणपोळी .. सदासाठी पानगी .. हे सगळं बनवणं हाच तर माझा आनंद आहे .. ”
“आणि तुझा आनंद ? तुला काय आवडतं ग आक्का?” सुमी ने विचारले .. क्षणभर विचार करून गौराक्का उत्साहाने गुपित सागितल्यासारखे सांगू लागली .. “मला ना .. ”
“आज मिळेल का चहा .. ” गौराक्का सांगणार इतक्यात बाहेरून तिरकस आवाज आला .. “पाठवते ss ” गौराक्का म्हणाली ..
“जा ग लवकर चहा घेऊन , चिडतील बाबा परत .. ” खुसफुसत गौराक्का म्हणाली ..
—
“आले आले .. ” सुमी म्हणाली .. “चप्पल च घालत होते रे दादा ..”
“अगं गुरुजी येऊन थांबलेत घाटावर .. ” सदा म्हणाला .. सगळेजण गाडीत बसले .. “वहिनी घेतलंस ना ग सगळं .. ” सुमी म्हणाली .. “हो ग .. शिरा, भाजी, दहीभात, आमटी हि घेतलीये .. रव्याचा लाडू हि घेतलाय .. ” माधवी म्हणाली .. “आईच्या निवडी बऱ्याच माहिती आहेत ग तुला .. ” सुमी म्हणाली .. “म्हणायच्या अगं त्या नेहमी, कि तुझ्या हातचे रव्याचे लाडू, भजी आमटी, आवडते मला म्हणून!” माधवी म्हणाली ..
“वाहिनीच्या हातचे हे सगळे तिला आवडायचे .. पण “तिला” काय आवडायचे.. ” सुमी च्या मनात विचार आला .. पण तिने लगेच तो झुरळासारखा झटकून टाकला ..
आज अक्काचा दहावा ..
एक एक पदार्थ ठेवला गेला ..
“तशी समाधानाने गेली ती .. जीव कशात अडकला नसेल तिचा .. ” म्हणत नातेवाईक पिंडाला कावळा शिवायची वाट बघत होते ..
५.. १०.. १५… २० मिनिटे झाली .. लोकांची चुळबुळ सुरु झाली .. घड्याळाकडे नजर जाऊ लागली ..
सुमीच्या, सदा आणि माधवीची घालमेल वाढू लागली .. हे काय विपरीत म्हणायचं ??
“सदा, आक्का ला म्हणावं मी सुमीला कधी अंतर देणार नाही .. ” आक्काची कोणी बहीण सदाशिवजवळ येऊन म्हणाली ..
सदाशिव ने पिंडाला मनोभावे नमस्कार केला .. “आई .. तुला माहितीये, मी सुमीला कधीच अंतर देणार नाही .. तू निश्चित रहा”
तरीही कावळा शिवेना!
“नक्की काय राहिलं तिचं करायचं ?? परदेशवारी झाली, चारधाम झाली .. नातवंड आली .. त्यांच्या मुंजी झाल्या .. अजून काय राहिलं होतं तिचं ..” सदा विचारात पडला ..
शेवटपर्यंत कावळा काही शिवला नाही ..
दर्भाचा कावळा करून शिववला ..
“त्या दिवशी बाबांनी हाक मारली असती तर आज आपल्याला माहित असतं तिला काय आवडतं ते .. त्यानंतर कधीच विषय नाही निघाला तो .. का तिने येऊ दिला नाही ? कि आपण काढलाच नाही ?? काढला असता तर आज कावळा शिवला असता का ?? कशात जीव अडकला आहे अक्काचा .. ??” सुमी खंतावलेल्या मनाने विचार करत राहिली ..
सगळे घाटावरून परतू लागले ..
दूर एक डोमकावळा मात्र कर्कश्श ओरडत रडत होता ..
सगळ्यांना प्रेमानं खायला घालणारी अन्नपूर्णा आज भूकेलीच राहिली ..
तव्यावरची पहिलीच आयती गरम गरम पोळी आणि तूप .. हे काही शेवटपर्यंत गौराक्काला नशिबी आलं नाही ..
Ⓒपूजा खाडे पाठक
Image by Sandeep Barot from Pixabay
- दिवाळी २०२० स्पेशल- १९ - November 27, 2020
- दिवाळी २०२० स्पेशल- ३ - November 13, 2020
- पाडस - October 23, 2020
👌👌
खूप छान!! शेवटची ओळ मनाला स्पर्शून गेली!
Khup chhan
mazya ajjichi athvan ali!!! mast
भावस्पर्शी 😘