गुरू असावे ऐसें…(२)
कोणतीही नवी किंवा परकीय भाषा शिकवणे म्हणजे फक्त व्याकरण, वाक्यप्रयोग, उच्चार नव्हे तर सर्वात आधी येतात ते शब्द. लहान मूल सुद्धा जेव्हा भाषा शिकतं, तेव्हा सर्वात आधी तुटक शब्द बोलायला शिकतं आणि मग वाक्यांत बडबड करायला लागतं. शब्दांपासून वाक्य, वाक्यांपासून परिच्छेद, परिच्छेदांपासून निबंध, लेख, सारांश, मेल असा सगळा भाषेचा प्रवास होतो. विद्यार्थ्यांची शब्दसंपदा वाढली की त्यांचा भाषा शिकण्याचा उत्साह वाढतो. एखाद्या नव्या भाषेतील शब्द शिकवायला जगभरातले शिक्षक सतत वेगवेगळे प्रयोग करत असतात.
त्यातला एक प्रयोग म्हणजे Word cloud, शब्दांचे ढग. Word cloud म्हणजे एक महत्त्वाचा/मुख्य शब्द घ्यायचा, तो वहीत किंवा फळ्यावर, सध्या स्क्रीनवर, मधोमध लिहायचा आणि त्याभोवती गोलाकार त्या शब्दाशी संबंधित असलेले सगळे शब्द जसे सुचतील तसे लिहीत जायचं. उदाहरणार्थ, मी “प्रवास” हा शब्द मधे घेतला तर त्याभोवती रेल्वे, बस, तिकीट, बॅग, खाऊ, निसर्ग असे अनेक शब्द येतील. हे शब्द हवे तितके वाढू शकतात. आणि मग तयार होतो Word cloud. हा दिसायलाही देखणा दिसतो आणि चांगलं हस्ताक्षर असेल तर Visual memory म्हणून लक्षात ठेवायलाही सोपा जातो.
माझ्या वर्गात मी अनेकदा हा प्रयोग करत असते. यातून काही गमतीजमती देखील घडत असतात. एकदा “प्रेम” या शब्दावर मी Word cloud करून घेत होतो. सर्व मुलांनी प्रेमाशी निगडित अनेक शब्द सांगितले, जसे की कुटुंब, प्रियकर, कॉफी, डेट, काळजी, आपुलकी वगैरे. एका मुलाने हात वर करून , “मॅम, यात “leere Tasche पण लिहा!” असं सांगितलं. सगळा वर्ग खो खो हसला. leere Tasche म्हणजे मराठीत मोकळा खिसा किंवा रिकामे पाकीट!
त्यावर्षी मी शिकवायला लागल्यापासून चारेक वर्ष झाली असतील. वर्गात मी “घर” या विषयावर Word cloud घेतलं होतं. मुलांनी भरपूर शब्द सांगितले. अगदी फळ्याच्या बाहेर जाईल एवढा मोठा word cloud तयार झाला कारण घर हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. वर्गातला एक मुलगा भरपूर शब्द सांगत होता. त्याचं नाव मयूर. मयूर हुशार होता. हुशारपेक्षाही तल्लख म्हणावा लागेल असा. मुलं बोलत होती, शेवटी मला सगळ्यांना जबरदस्तीने थांबवायला लागलं. Word cloud बनवून झाल्यावर सांगितलं, आता गृहपाठ म्हणून सगळ्यांनी या शब्दांचा आधार घेऊन स्वतःच्या घराबद्दल एक छोटासा निबंध लिहा. लिहिताना शक्य होतील तितके सगळे शब्द वापरा.
दुसऱ्या दिवशी मुलं गृहपाठ घेऊन आली. एकेकजण उभं राहून वाचत होता. आमच्या जर्मन भाषेच्या पुस्तकांमध्ये अतिशय सुंदर घरांची चित्रं असतात, त्यांची वर्णनंही छान असतात. सगळ्यांनी ती पाहून माझं घर, बाल्कनी, किचन, बाग, घरातली माणसं याबद्दल लिहिलं होतं. मयूरलाही मी वाचायला सांगितलं. जरा चाचरतच तो उठला आणि वाचू लागला. मात्र वाचताना फिरून फिरून तीच ती चारपाच वाक्य वाचू लागला. माझ्या घरात एक टीव्ही आहे, एक छोटा बेड आहे, खिडकीला निळा पडदा आहे वगैरे.
मी त्याला रागावले. “इतके सगळे शब्द शिकवून देखील तेच तेच चारपाच शब्द काय वापरतो आहेस? जरा तुझ्या बाल्कनीबद्दल सांग, डायनिंग टेबलबद्दल सांग, किचनमध्ये काय काय आहे ते सांग. बाकीची मुलं नाही का वर्णन करत आहेत त्यांच्या घराचं? बेडरूम किती मोठी आहे, किचन छोटं आहे व छान आहे असं सांगत आहेत, हॉलमध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत..तसं तू ही सांग की! इतकं शिकवल्याचा काय उपयोग नाहीतर? काल तर भरपूर बोलत होतास. आज काय झालं?”
मयूर खाली मान घालून म्हणाला, “मॅम, माझं घर म्हणजे एकच खोली आहे. संडास बाथरूम कॉमन आहे. त्याच खोलीत बेड, किचन आणि एक खिडकी आहे, जिला निळा पडदा आहे. मी अजून काही बोलूच शकत नाही, कारण घरच इतकं छोटं आहे.
मला अक्षरशः कोणीतरी जोरात थोबाडीत मारल्यासारखं झालं. आपण नक्की कोणत्या जगात वावरत असतो? घर म्हणजे तीन किंवा त्यापेक्षा जास्त खोल्या अश्याच कल्पना आपण डोक्यात घेऊन फिरत असतो. काय झालं असेल मयूरला आमच्या पुस्तकातली इतकी सुंदर वर्णनं वाचून? वर्गातल्या इतर मुलांच्या घरांची वर्णनं ऐकून? मी त्याची शिक्षिका होते, निदान मी तरी ही शक्यता गृहीत धरायला हवी होती की वर्गात छोटी घरं असणारी, आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसणारी मुलं असणार आहेत. एक शिक्षक म्हणून माझ्या वर्गात सर्व स्तरातील विद्यार्थी असतील हे एकदा सुद्धा माझ्या मनात कसं काय आलं नाही? त्यादिवशी वर्ग झाल्यावर मी मयूरची मनापासून माफी मागितली. दुसऱ्या दिवशी त्याचा निबंध परत वाचायला सांगून, त्याच्या भाषेचं कौतुक करून वर्गात सर्वांना टाळ्या वाजवायला सांगितल्या. पण इतकंच करू शकले. मयूरच्या मनावर मात्र कायमसाठी एखादी खोल जखम झाली असेल.
शिक्षकी पेशा कोणी शिकवू शकत नाही. शिकवता शिकवताच माणूस शिकत असतो, प्रगल्भ होत असतो. त्या दिवसापासून मी शहाणी झाले. वर्गात शिकवताना माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांचा, त्यांच्या परिस्थितीचा बारकाईने विचार करू लागले. शक्यतो कोणाला त्रास होणार नाही, न्यूनगंड वाटणार नाही अशी उदाहरणे देऊ लागले. प्रत्येक विद्यार्थ्याप्रति शक्य तितकी सहानुभूती बाळगू लागले, त्याच्या बाजूला जाऊन त्याच्या दृष्टिकोनाने विचार करायला शिकले.
शिक्षण कधी थांबत नाही. ते अविरत सुरू असतं. अजूनही अश्या अनेक गोष्टी मी शिकत आहे.
अश्या या मला सर्वांप्रति सहानुभूती आणि आदर बाळगायला शिकवणाऱ्या माझ्या विद्यार्थ्याला, माझ्या गुरूला मी कशी काय विसरू शकेन?
क्रमशः
Image by Alexey Marcov from Pixabay
Latest posts by Gauri Brahme (see all)
- समीर – अनयाच्या वॉट्सऍप गोष्टी - September 26, 2022
- कच्चा लिंबू - June 20, 2022
- आई - January 21, 2022
👌👌
👍
मस्त
मला तुमचं लिखाण मनापासून आवडतं. अगदी सहज, खुसखुशीत आणि थेट मनाला भिडणारं.
आपलं शिक्षण कधीच थांबत नाही, हे अगदी खरं आहे. मला सुद्धा असाच एक अनुभव आला होता. मी सर्व मुलांना त्यांचा परिचय लिहून आणायला सांगितला होता, (अर्थातच जर्मन भाषेत). माझ्या वर्गातील एका मुलीने बऱ्यापैकी सर्वकाही व्यवस्थित लिहून आणले होते, पण तिने तिच्या Familenstand म्हणजेच marital status बद्दल काही लिहले नव्हते, मी अगदी सहज बोलून गेले, की तू तो मुद्दा कसा काय विसरलीस. तेव्हा ती म्हणाली, मॅडम मी विधवा आहे, हे ऐकुन मला वाईट वाटले आणि मी तिची माफी मागितली. त्या दिवसापासून, मी ठरवले की सगळ्यांनीच सगळी माहिती देणे गरजेचे नाही. तो एक व्ययक्तिक निर्णय असायला हवा.
👍