माझी टाचदुखी-1
शरीर म्हंटले की दुखणी आलीच. काही दुखणी फार मोठी असतात आणि काही छोटी. छोट्या छोट्या दुखण्याकडे आपण कायमच दुर्लक्ष करतो. कालांतराने अशी छोटी दुखणी आपोआप बरी होतातही. आणि त्यामुळे होते काय की ही दुर्लक्ष करण्याची सवय आपल्या अंगवळणी पडू लागते. त्यातूनच एखादे मोठे दुखणे आपल्या पाठी लागते. टाचदुखी नावाचे एक छोटेसे दुखणेही याच प्रकारातले. ह्या दुखण्याने माझ्या आयुष्याचा वेग काही काळापुरता मंदावला. माझ्याच नादात राहण्याच्या माझ्या सवयीतून मला हलवून जागं केलं. अनेक भावनिक प्रसंग माझ्या झोळीत टाकले. आरोग्याच्या अनिश्चिततेचे सावट डोक्यावर घोंघावत ठेवले.
2018 सालच्या ऑगस्ट महिन्यातील गोष्ट- माझ्या दोन्ही पायांच्या टाचा भयंकर दुखू लागल्या. त्यातल्या त्यात उजवी टाच जरा जास्तच दुखत होती. सकाळी झोपेतून उठून उभे रहावे तर टाचांमधून काहीतरी काट्यांसारखे खुपत असे आणि टाचा जमिनीला टेकवणेही अशक्य होऊन जाई. टाचा न टेकवता काहीवेळ निव्वळ पुढच्या बोटांवर सगळा भार टाकत, भिंतींचा आधार घेत हळूहळू चालावे लागे. थोड्या वेळाने जरा बरे वाटू लागे आणि मग पुढची कामे होत.
खरंतर हा असा त्रास मला पहिल्यांदाच होत होता असे नव्हते. दरवर्षी उन्हाळ्याच्या अध्यमध्यात असा त्रास सुरू होई. दरवर्षी मी त्याकडे दुर्लक्ष करीत असे. आणि दरवर्षी पावसाळ्याच्या अध्यमध्यात कधीतरी हा त्रास हळूहळू कमी कमी होत जाई. पण चार पाच वर्षांपासून सतत माझ्या दुर्लक्षाचाच लाभार्थी ठरलेल्या ह्या दुखण्याने 2018 सालच्या ऑगस्ट महिन्यात आपले डोके वर काढले; इतके की नेहमीप्रमाणे याही खेपेला त्याकडे दुर्लक्ष करणे मला अगदीच अशक्य होऊन बसले !
साधारण अर्धा तास उभं राहणं झालं की टाचांमधून कळा यायला लागायच्या. थोडावेळ बसून पुन्हा उभे रहावे तर सकाळी उठल्यानंतर जसे खुपायचे तशाच खुपू लागायच्या. चालताना काही वेळ बरे वाटायचे, पण थांबून पुन्हा चालणे अधिकच दुखरे होऊन जायचे. दुखण्याच्या सुरुवातीच्या दिवसात निव्वळ सकाळी सकाळी अनुभवायला मिळणारे हे दुखणे हळूहळू दिवसभर पायाशी गुंतून राहू लागले. उठणे-बसणे-चालणे आणि एकूणच सगळ्या हालचाली करताना सतत सगळे लक्ष, सगळे अवधान फक्त आणि फक्त टाचांवरच केंद्रित होऊ लागले. याचाच परिणाम म्हणून दैनंदिन कामांमध्ये लक्ष घालणे, चित्त स्थिर ठेवणे मला अशक्यप्राय होऊ लागले. शाळेत आणि घरात कोणत्याच कामात लक्ष लागेना.
मी ज्या गावात रहाते ते गाव म्हणजे वाशिम जिल्ह्यातील एक छोटासा तालुका आहे. इथे अड-नड भागवणारे, सर्दी-ताप-खोकल्याचे, जुजबी-तात्पुरते औषधोपचार करणारे दवाखाने आहेत. टाचदुखी सारखे दुखणे ही त्यावेळी माझ्या दृष्टीने फार क्षुल्लक बाब असल्या कारणाने मी गावातीलच दवाखाना गाठला. त्यावेळी डॉक्टर साहेबांनी मला घरदारात मऊ चप्पल वापरण्याचा सल्ला दिला. काही औषधी दिल्या आणि वजन कमी करण्याचे सांगितले. ह्या तात्पुरत्या उपायांनी मला दोन दिवस थोडे बरे वाटले. पण ‘ये रे माझ्या मागल्या’ म्हणत पूर्वीचेच दुखणे पुन्हा ‘जैसे थे’ अवस्थेत परतले. मधल्या दोन दिवसात बरे वाटत असताना ‘आता आपण बरे झालो आहोत’ ह्या आनंदात जो काही अति उत्साह दाखवत जास्तीची कामे मी केली त्याचा परिणाम औषधांचा अंमल उतरल्यावर दिसू लागला. टाचा पूर्वीपेक्षा अधिक दुखू लागल्या; इतक्या की दुखणे असह्य होऊन डोळ्यांना धारा लागाव्या.
हे सततचे दुखणे दुखणेच डोक्यात राहत असल्याने माझी चिडचिड होऊ लागली. एकूणच घरातली शांतता ढवळून निघाली. अशा अवस्थेत जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन ‘आर्थोपेडिक’ डॉक्टरचीच ट्रीटमेंट घ्यावी ह्या निर्णयाप्रत मी आणि घरची मंडळी येऊन ठेपलो. शेवटी दिनांक 11 ऑगस्ट 2018 रोजी वाशिम ह्या आमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी ‘सिक्युरा हॉस्पिटल’ ह्या भल्यामोठ्या मल्टीस्पेशालिस्ट दवाखान्यात आर्थोपेडिक डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांनी औषधांची भली मोठी यादी दिली. आणि ‘उजवी टाच जरा जास्त दुखते’ हे माझे म्हणणे लक्षात घेत ‘उजव्या टाचेत इंजेक्शन घ्यावे लागेल.’ असे मला डॉक्टरांनी सांगितले. माझी टाचदुखी ही त्यावेळेला इतक्या भयंकर स्तरावर पोचली होती की ‘टाचेत इंजेक्शन घेणे’ हाही उपाय मला सोपाच वाटला. टाचेत इंजेक्शन घेतल्याने माझे दुखणे ‘छूss’ होऊन जाईल असेच मला वाटले… पण… पण… मला असे वाटणे किती हास्यास्पद होते याचा अनुभव मला पुढील काही दिवसात आला.
एखादे दुखणे आपले अस्तित्व तुमच्या शरीरात कसे प्रस्थापित करते याचा प्रत्यय मला येत्या काही महिन्यात येणार होता. मागचा पुढचा काहीही विचार न करता केवळ ‘ह्या दुखण्यातून लवकरात लवकर मला बरे व्हायचे आहे… सुटायचे आहे.’ या एकाच ध्यासापायी मी टाचेत इंजेक्शन घेतले आणि नंतरच्या पाच महिन्यांच्या एका काळ्याकुट्ट पर्वाला माझ्या आयुष्यात प्रवेश मिळवून दिला. अजाणता का होईना पण माझ्या दुर्लक्ष करण्याच्या सवयीतून हे दुखणे मी माझ्यावर ओढवून घेतले होते.
ह्या पाच महिन्यांतील माझ्या मनस्थितीवर झालेला परिणाम आणि त्यातून सुटण्याची माझी धडपड आणि वाढत गेलेला गुंता ह्याचीच ही गोष्ट- माझी टाचदुखी.
क्रमश:
पुढील भागाची लिंक– माझी टाचदुखी-२
@विनया निलेश पिंपळे
Image by jacqueline macou from Pixabay
Latest posts by Vinaya Pimpale_w (see all)
- जिगसॉ जिंदगी पत्र क्रमांक 8 - May 20, 2021
- फुलपाखरू - April 13, 2021
- पोटॅटो पिनव्हील - March 27, 2021
Pingback: माझी टाचदुखी-२ – LekhakOnline – Excellent Marathi Articles