माझी टाचदुखी- ४

आधीच्या भागाची लिंक–  माझी टाचदुखी-3
माझी टाचदुखी- ४
23 तारखेला वाशिमहुन घरी परत येत असताना तीन दिवसांच्या रजेचा अर्ज मी शाळेत ठेवला होता. एकेक क्षण घड्याळाच्या काट्यांची टिकटिक मोजत काढलेली, कधीही न विसरता येणारी जागरणाची ती तिसरी रात्र ! उजव्या टाचेतील प्रचंड ठणकांची रात्र !
‘आतले इन्फेक्शन सुकेल किंवा पिकेल. तीन दिवसांनी परत या’ ह्या डॉक्टरांनी सांगितलेल्या वाक्यावर विसंबून राहत 24 तारखेच्या सकाळी सगळी औषधे गोळ्या घेऊन मी निव्वळ एका जागी बसून होते. खरेतर माझे उठणे, बसणे, चालणे सगळेच मंदावले. सगळ्या हालचाली निव्वळ दुखऱ्या ! टाच तर धक्का सहन करीना. खोलीतून निघून दहा फुटांवरचे बाथरूम गाठणे हे सुद्धा एक दिव्य वाटायला लागले ! हळूहळू माझ्या टाचदुखीबद्दल कॉलोनीत आजूबाजूच्या सर्वांना माहीत झाले. नातेवाईकांत दुखण्याची गोष्ट पसरली. एकेकाचे फोन यायला सुरुवात झाली. कुणी काही सांगतो आहे तर कुणी काही. कुणी ‘इंजेक्शनच कशाला घेतलं’ म्हणत हळहळतो आहे तर कुणी ‘अरे एकदा मला विचारायचं तर होतं’ असं म्हणत रागावतो आहे. शेजारच्या मैत्रिणी भेटायला येताहेत माझे विव्हळणे डोळ्यात साठवून अतीव कणवेने न्हाऊन निघत काहीबाही सुचवताहेत. एक ना दोन हजार प्रकार !
ह्या सगळ्या प्रकारात माझे दुखणे वाढतच चालले असल्याचे मला लक्षात आले. पायावर सुरुवातीला असणारी किंचित सूज आता वाढून पाय टम्म झाला होता. तो टेकवताच येत नसल्याने काठीचा आधार घ्यावा लागत होता. काठी हातात नसताना वॉशएरियातील वॉशिंग मशीनवर हात टेकवून भार दिला असताना मशीनच्या ड्रायरच्या झाकणाची काच तडकली. नशीब की वॉशिंग मशीनला काही झालं नाही. येत्या काही दिवस तरी तिचं काम महत्वाचं ठरणार होतं.
त्या दिवशी संध्याकाळी निलेश घरी आल्यानंतर माझं दुखणं रडणं त्यांच्याने बघवेना. परत वाशीमला जाऊया म्हणत त्यांनी तयारी केली आणि आम्ही सलग दुसऱ्या दिवशी परत एकदा वाशिम गाठले.
त्या संध्याकाळी डॉ तोष्णीवाल ह्यांच्या दवाखान्यात मी परत एकदा  हजर होते. आदल्या दिवशीपेक्षा जास्त सुजलेला पाय बघून डॉक्टरांनी मला पुन्हा वेदनाशामक इंजेक्शन दिले. तेच इंजेक्शन प्रिस्क्रिप्शनमध्येही लिहून दिले. आणि ‘इन्फेक्शन पिकते आहे पण सद्ध्या काहीच करता येणार नाही. जास्त दुखल्यास हे लिहून दिलेले इंजेक्शन तुमच्याच गावातील डॉक्टरांकडून टोचून घ्या.’ असे सांगितले. त्या दिवशी गाडीतून उतरून दवाखान्यात मी महत्प्रयासाने गेले होते; पण दवाखान्यातुन बाहेर येताना मात्र व्हीलचेअरवर मला बाहेर आणले गेले. जणू काही मी अपंग झाले होते !
घरी परत येताना मागच्याच दिवसाची पुन्हा उजळणी झाली. पुन्हा डोळ्यांवर झापड येत होती. पुन्हा सारे जग त्या गुंगीत बुडून निघत होते आणि माझी टाच मात्र मला सतत जागं ठेवण्याचा वसा घेतला असल्यासारखी सतत ठणकत होती.
24 तारखेला पुन्हा एकदा संपूर्ण रात्र जागरण, रडणे आणि विव्हळणे इतकेच घडले. घरातील कोणीही काहीही करू शकत नव्हते… त्यांची असहायता, हतबलता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. काळजी तर सर्वानाच वाटत होती. मुलांचे चेहरे चिमले होते.
अशातच 25 ची सकाळ उगवली….
क्रमश:
पुढील भागाची लिंक–  माझी टाचदुखी- ५
Image by jacqueline macou from Pixabay 
Vinaya Pimpale_w

Vinaya Pimpale_w

सहायक अध्यापिका (इयत्ता पहिली ते चौथी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खापरी कान्होबा जिल्हा वाशिम पत्रमालिका, कथा, कविता आणि गझललेखन. मित्रांगण, विवेक आणि रत्नागिरी एक्स्प्रेस इत्यादी दिवाळी अंकात कथालेखन केले आहे. दैनिक दिव्य मराठी, पुण्यनगरी तसेच विवेक साप्ताहिक, युवाविवेक इत्यादींमध्ये लेख प्रसिद्ध. 'भूक' ह्या लघुतमकथेला लोकप्रिय लघुतमकथेचा तसेच, 'जाग' ह्या कथेकरिता सर्वोत्कृष्ट लघुकथा लेखनाचा पुरस्कार प्राप्त.

One thought on “माझी टाचदुखी- ४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!